॥ श्रीएकनाथमहाराजकृत
35.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय पस्तिसावा ॥
मकराक्षाचा वध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
कुंभ पडल्यावर निकुंभाचे रणांगणावर आगमन :
सुग्रीवे झोंटधरणी । कुंभ पाडिलिया रणी ।
ते देखोनिया नयनी । निकुंभ क्षोभोनी चालला ॥१॥
निकुंभो भ्रातरं दृष्ट्वा सुग्रीवेण निपातितम् ।
प्रदहन्निव कोपेन सुग्रीवं प्रत्यवेक्षत ॥१॥
कृतसंग्राममालं च दत्तपंचांगुलं शुभम् ।
आददे परिघं घोरं नगेंद्रशिखरोपमम् ॥२॥
निकुंभो भूषणेर्भाति परिघेणायतेन च ।
नगर्या विटपावल्या गन्धर्वनगरैरपि ॥३॥
सहसैवामरावत्या सर्वैश्च भुवनैः सह ।
निकुंभपरिघोद्भूतं भ्रमतीव नभस्थलम् ॥४॥
निकुंभाच्या परिघ आयुधाने वानरसैन्याची दाणादाण :
कुंभ पडताचि रणी । निकुंभ चालिला कोपोनी ।
सुग्रीवा जाळिले नयनी । क्रोधोन्मादीं अवलोकी ॥२॥
मागे बहुता रणांगणी । जेणे केलिया संग्रामश्रेणी ।
जो दाटुगा अरिदळणीं । तो परिघ घेवोनि चालिला ॥३॥
परिघमाथां पंचपाकोळी । दृढ धरिला पंचागुळीं ।
निकुंभ वीर महाबळी । घेऊन करतळी चालिला ॥४॥
कुमुटकुंडलें पदक कंठी । बाहुभूषणें सुगंध उटी ।
अंगत्राण लखलखाटी । परिघ मुष्टी डुल्लत ॥५॥
परिघ साधन प्रत्यावृत्ती । अमरावती अलकावती ।
बसतां हाती बीट पावती । भ्रमणावर्तीं पाडिल्या ॥६॥
भ्रमे गंधर्वांचें नगर । सचंद्र तारा ग्रह समग्र ।
परिभ्रमतां परिघाग्र । काळचक्र परिभ्रमे ॥७॥
निकुंभाअंगी प्रबळ बळ । परिघ साधोनि अति कुशळ ।
भ्रमत भासे नभोमंडळ । भासे भूतळ परिभ्रमतें ॥८॥
प्ररिघाच्या भ्रमणद्वारा । छेदिलें वृक्षशिळाशिखरा ।
पुढे रिघवेना वानरा । परिघधारामहामारें ॥९॥
भंवता परिघाचा आवर्त । न चले वानरांचा पुरुषार्थ ।
कपिप्रताप गेला व्यर्थ । संग्रामार्थ चालेना ॥१०॥
वानर होता लज्जान्वित । देखोनि आला हनुमंत ।
पहावया निकुंभाचा पुरुषार्थ । संग्रामी येत संमुख ॥११॥
हनुमंताचे आगमन व निकुंभाशी युद्ध :
हनुमान म्हणे निकुंभवीरा । तुझ्या परिघाचा थोर दरारा ।
आधी मज मारी वानरा । मग पुढारा संग्राम ॥१२॥
मारिले सुर नर समस्त । दैत्य दानवां केला घात ।
मज मारिल्या हनुमंत । तुझा पुरुषार्थ कळेल ॥१३॥
मागील बडिवाराचे बोल । आज मी करीन तुझे फोल ।
पाहू पा किती तुझे बळ । परिघें प्रबळ हाण मज ॥१४॥
ऐकोनि हनुमंताच्या उत्तरा । दांत खावोनि करकरा ।
परिघ भोवंडोनि गरगरा । मारुं वानरा धावला ॥१५॥
परीघ गाळीव लोहान्वित । सुवर्णबंदी रत्नांकित ।
पाचपिरोजीं लखलखित । सिंदुरार्चित नरमांसें ॥१६॥
निकुंभें परिघ घेवोनि करी । भोवंडोनि चक्राकारी ।
हाणिता हनुमंताचे उरावरी । शतसहस्त्री भंगला ॥१७॥
वज्रदेही कपि बळकट । लागता परिघ झाला पीठ ।
निकुंभ करी कटकट । म्हणे फटफट हनुमंत ॥१८॥
तुझे अंगी पोंचट बळ । घाव हाणिती तो पोकळ ।
परिघ जैसा एरंड सरळ । गेला तत्काळ मोडून ॥१९॥
पुढा तिखट मागे पोंचट । तैसे तुझे फळकट ।
वृथा संग्रामी करिसी कष्ट । आजि तू स्पष्ट मरसील ॥२०॥
कंप न येचि धराधरा । आकश कांपेना थरथरां ।
तेंवी मज हनुमंता वीरा । नाही भेदरा परिघाचा ॥२१॥
गज हाणिता फुलेंसीं । तैसा परिघ हनुमंतासीं ।
नाही मूर्च्छा ना कासाविसी । रणाभिनिवेंशी गर्जत ॥२२॥
जेंवी गगनी उल्कापात । तेंवी परिघखंडे समस्त ।
उडोनि पडली धगधगीत । लखलखित धरेवरी ॥२३॥
तुझा घेता परिघघात । तेणे मी झालों रिणाईत ।
उतराई व्हाया येत । मुष्टिघात साहें माझा ॥२४॥
निकुंभाचा परिघघात । हनुमंते केला व्यर्थ ।
त्यासी हाणावया मुष्टिघात । जाला उदित वानर ॥२५॥
पंचांगुळीं अंगुष्ठनेटीं । दृढ वळोनि वज्रमुष्टी ।
निकुंभा हाणिता नेटपाटीं । पाडिला सुष्टी धुकधुकित ॥२६॥
धन्य कपीची आंगवण । फोडोनियां अंगत्राण ।
देहींचें चर्म भेदून जाण । मुष्टि दारुण लागली ॥२७॥
मुष्टि हाणिता गोळांगुळा । राक्षसहृदयीं निघती ज्वाळा ।
प्रतापतेजाचा उमाळा । जेंवी अंतराळां । महाविजु ॥२८॥
ऐसे हनुमंते आपण । निकुंभ पाडिला जाण ।
तरी त्यासी न ये मरण । आंगवण सांडीना ॥२९॥
हनुमंते हाणोनि मुष्टिघात । निकुंभ पाडिला मूर्च्छित ।
पडिला तो जांभया देत । नव्हे प्राणांत तयाचा ॥३०॥
पडल्या पडल्या रणाआंत । राक्षस स्वये भ्रमरहित ।
होवोनी तो सावचित्त । धरी हनुमंत कवळोनी ॥३१॥
निमाला मानूनि निश्चित । हनुमंते टाकिला उपेक्षित ।
राक्षस होवोनि सावचित्त । धरी हनुमंत कवळोनी ॥३२॥
धरिला मानूनी हनुमंत । उल्हास राक्षससैन्यांत ।
एक जावोनि लंकेआंत । हरिखें सांगत लंकेशा ॥३३॥
बहुता प्रकारांचा वैरी । हनुमान धरिला युद्धामाझारी ।
ऐसे सांगता निशाचरी । दशशिरीं अति धाक ॥३४॥
जरी धरिला हनुमंत । तरी त्याचा न करवे घात ।
जरी आणिला लंकेआंत । करील आकांत राक्षसा ॥३५॥
मागे धरिला ब्रह्मपाशीं । तै न मारावेचि आम्हांसी ।
मारोनियां राक्षसांसी । जाळून लंकेसी प्रतापें गेला ॥३६॥
कपि न धरवे संग्रामांत । ऐसे मानी लंकानाथ ।
येरीकडे पै हनुमंत । करी घात निकुंभाचा ॥३७॥
निकुंभे धरिता हनुमंतासी । तोही मुष्टि हाणी त्यासी ।
मिठीं न सोडून मारुतीसी । पडे तेणेंसीं रणभूमीं ॥३८॥
न सुटे निकुभाची मिठी । हनुमान पडल्या लोटी ।
चेपिता राक्षसाची घांटी । अति संकटी सोडिला ॥३९॥
स्वये सोडोनी ऐसियापरी । हनुमान उडोनि अंबरी ।
उडी घातली निकुंभावरी । संग्रामगजरीं गर्जोन ॥४०॥
हनूमानुत्पपाताशु निकुंभं मारुतात्मजः ।
समुत्पत्य च वेगेन निपपातास्य वक्षसि ॥५॥
परिगृह्य च बाहुभ्यां परिवृत्य शिरोधराम ।
अपातयत्तस्य शिरो भैरवं नदतो महत् ॥६॥
अथ निनदति सादिते निकुंभे पवनसुतेन रणे बभूव युद्धम्।
दशरथसुराक्षसेंद्रसूनोर्भूशतरमागतरोषयोः सुभीमम् ॥७॥
हनुमंताकडून निकुंभाचा वध :
हनुमंते गिरागजरीं । उडी घालोनी निकुंभावरी ।
दोन्ही बाहु मुरडोनि करी । शिर नखाग्री ख्रुडिलें ॥४१॥
छेदोनी निकुंभाचें शिर । रामनामाचा गजर ।
हनुमंते केला भुभःकार । गर्जती वानर हरिनामें ॥४२॥
हनुमंते बळानुबंधें । निकुंभ मारिला महायुद्धे ।
वानर नाचती आनंदे । जयजयशब्दें गर्जोनी ॥४३॥
श्रीरामांचा आवेश :
निकुंभ मारिला पराक्रमें । हे देखोनिया श्रीरामे ।
कोपा चढला क्षात्रधर्मे । पुरुषानुक्रमें बोलत ॥४४॥
लहान सहान मारिता येथ । युद्ध नव्हे पै समस्त ।
मारावया लंकानाथ । धनुष्या हात घातला ॥४५॥
निर्दाळावया रावण । आले श्रीरामा स्फुरण ।
बाहु थरकती संपूर्ण । धनुष्यबाण सज्जूनी ॥४६॥
रावण मारावया कडाडीं । काढोनि धनुष्याची वोढी ।
श्रीरामे घालिता उडी । आले तांतडी त्रिवर्ग ॥४७॥
सुग्रीव बिभीषण हनुमंत । तिघीं जणीं श्रीरघुनाथ ।
निववोनी कोप केला शांत । सभा स्वस्थ बैसली ॥४८॥
व्यपेते तु जीवे निकुंभस्य हृष्टा विनेदुः प्लवंगा दिशः सस्वनुश्च ।
चचालेव चोर्वी पफालेव साद्यौर्बलं राक्षसांना भयं वा विवेश ॥८॥
निकुंभवधामुळे वानरसैन्यांत जयजयकार :
निकुंभ देखोनी निर्जीव । करोनि रामनामाचा रव ।
हरिखें नाचती वानर सर्व । केले अपूर्व हनुमंते ॥४९॥
हनुमंताची आंगवण । देखोनि हनुमंताची ख्याती ।
राक्षस चळचळ कांपती । चळी कांपे लंकापती । रणी मारुति नाटोपे ॥५१॥
विजयाच्या निजगजरीं । वानर गर्जती नामेंकरी ।
नाम कोंदलें चराचरी । दशदिशांमाझारीं हरिनाम ॥५२॥
निकुंभाच्या बळाची थोरी । ज्यासी कांपिजे सुरासुरी ।
तोही मारिला निर्धारी । क्षणामाझारीं हनुमंते ॥५३॥
हनुमंते बळे अद्भुत । केला निकुंभाचा घात ।
पुढिल कथावृत्तांत । श्रोतां सावध परिसिजे ॥५४॥
निकुंभ पडतांचि रणी । राक्षसा जाली महापळणी ।
पळोनी गेले लंकाभुवनीं । घायवट रणी कुंथत ॥५५॥
कुंभ – निकुंभ वधामुळे रावणाला दुःख व मकराक्षाची योजना :
कुंभ निकुंभ दोघे जण । कपींनी मारिले करोनि रण ।
ते ऐकोनि रावण । दुःख दारुण पावला ॥५६॥
आजानुबाहु विशालाक्ष । वीरपुत्र जो का मकराक्ष ।
संग्रामी परम दक्ष । विपक्षपक्षच्छेदक ॥५७॥
त्यासी पाचारोनी रावण । गुह्य सांगे स्वये आपण ।
रणी मारावे रामलक्ष्मण । वानरगणसमवेत ॥५८॥
धरोनि पुरुषार्थाचें बळ । रामलक्ष्मण माझे शल्य ।
ते त्वा करावे निःशल्य । वानरदळ दंमूनी ॥५९॥
पितृघातक मुख्य वैरी । त्यासी तू साधोनिया मारी ।
तुझ्या पुरुषार्थाची थोरी । सुरासुरी कांपिजे ॥६०॥
ऐसे बोलोनि दशानन । स्वये सांडून सिंहासन ।
मकराक्षासी आपण । गौरवी रावण युद्धार्थीं ॥६१॥
दिव्य गंध सुमनमाळा । मुकुत कुंडले कटिमेखळा ।
अंगत्राण पदक गळा । मुक्ताफळांसमवेत ॥६२॥
मकराक्षाची घोषणा व प्रयाण :
ऐकोनि रावणांचे वचन । शुर अभिमानी खरनंदन ।
मारोनि राकलक्ष्मण । विशल्य करीन लंकेशा ॥६३॥
नमस्कारोनी रावणा । त्यासी करोनि प्रदक्षिणा ।
मकराक्षें केली गर्जना । शीघ्र रथ आणा सैन्येंसी ॥६४॥
रामलक्ष्मण मनुष्यमात्र । मनुष्य आमचा नित्य आहार ।
वानर ते पालेखाईर । मारीन समग्र रणमारे ॥६५॥
मकराक्षआज्ञा समर्थ । सैन्येंसीं आणिला रथ ।
प्रदिक्षिणा करोनि येथ । रथी बैसत साटोपे ॥६६॥
स्वये सारथियासी सांगत । जेथे आहे रघुनाथ ।
तेथवरी जाऊ दे रथ । संग्रामार्थ तेणेंसीं ॥६७॥
लहानसहनासी हात । नाही घालणें रणाआंत ।
स्वये निवटीत रघुनाथ । निश्चितार्थ हा माझा ॥६८॥
राक्षसांप्रती गर्जोन । मकराक्ष सांगे आपण ।
रणी मारावे रामलक्ष्मण । स्वये रावण मज सांगे ॥६९॥
आजी रणी आपण । वधीन रामलक्ष्मण ।
सुग्रीवातें निर्दळीन । वानरसैन्यसमवेत ॥७०॥
मकराक्षाचें सबळ सैन्य । विकट दाढा विक्राळ वदन ।
एका अंगी रोम दारुण । जैसे बाण सतेज ॥७१॥
व्याघ्रमुख तरसमुख । वडवामुख तगरमुख ।
राक्षससैन्य अनेक । भयानक गडगर्जे ॥७२॥
मत्त वृषभाऐसे डरकत । मत्त गजाऐसे गडगर्जत ।
राक्षस मिळाले असंख्यात । मकराक्ष तेथ मुख्य धूर ॥७३॥
घाव घातला निशाणा । शंख भेरी विकट विराणा ।
दुंदभि गाजती दणदणां । विक्राळ गर्जना वीरांची ॥७४॥
मकराक्षाला अपशकुन :
ऐसा वीरांचा गडगजर । चालता मकराक्षाचा संभार ।
निष्ठोनी सारथ्याचा कर । आंसूड सत्वर तळी पडला ॥७५॥
वीरवीरांची आरोळी । सैन्य चालता गजदळी ।
निष्ठोनि सारथ्याकरतळीं । आंसूड तळी पडों सरला ॥७६॥
वेगे काढिता आसुंडा । रथातळीं झाला रगडा ।
अश्व चालता पुढा । चरणांची उबडा पडती मेटें ॥७७॥
वारुवांची क्षीण शक्ती । समभूतीं मेटें वळती ।
अवघे अडखळोनी पडती । खुंटली गती रथाची ॥७८॥
उठवोनि अश्वसमाज । रथ करु जाता सज्ज ।
रथाचा मोडोनि पाडिला ध्वज । जेंवी का विज लखलखित ॥७९॥
प्रतिकूळ वायु खवळला बळी । डोळा उघडितां रिघे धूळी ।
जो तो दोन्ही डोळे चोळी । अश्रूंते गाळी गजाश्व ॥८०॥
करीत वाजंत्रांचा गजर । येता मकराक्षाचा भार ।
तो देखोनी वानरवीर । युद्धा सत्वर मिसळले ॥८१॥
अपशकुनाला उपेक्षून मकराक्षाची पुढे चाल :
ऐसे देखोनी अपशकुन । मकराक्ष सांडी उपेक्षून ।
जेथे उभे रामलक्ष्मण । तेथे आपण शिघ्र आला ॥८२॥
उडउडों पै वानर । झांबडती राक्षसभार ।
तैसेच क्षोभती निशाचर । रणी वानर मर्दिती ॥८३॥
रणी खवळला वेताळ । वनरां निशाचरां प्रबळ ।
रोमहर्षे युद्ध तुंबळ । हलकल्लोळ राक्षसा ॥८४॥
वानरसैन्यावर मकराक्षाचा बाणांचा वर्षाव :
शूळ पट्टिश विंधिती बाण । हाणिती शिळा द्रुम पाषाण ।
फोडोनियां अंगत्राण । धनुष्यबाण मोडिती ॥८५॥
जैसे दानवांसी सुरवर । रणी भिडती अति दुर्धर ।
तैसेचि वानर आणि निशाचर । घोरां दर मांडिलें ॥८६॥
मोडिले देखोनी निशाचरसैन्य । मकराक्षें वाहोनिया गुण ।
रणी त्रासिले वानरगण । सपिच्छ बाण भेदूनी ॥८७॥
श्रीरामाचे आश्वासन :
सपिच्छीं खडतरतां बाण । रणी त्रासिले वानरगण ।
श्रीरामापाशीं अवघे जण । आले पळोन अति भीत ॥८८॥
श्रीराम कृपाळू संपूर्ण । निवारोनी राक्षसबाण ।
आश्वासोनि वानरगण । अभयदान दीधलें ॥८९॥
वारितान्राक्षसान्दृष्ट्वा मकराक्षो निशाचरः ।
क्रोधानलसमाविष्टो वचनं चेदमब्रवीत् ॥९॥
क्वासौ रामः सुदुर्बुद्धिर्येन मे निहतः पिता ।
जनस्थानगतः शूरः सानुजः सपरिच्छदः ॥१०॥
मकराक्षाची दर्पोक्ती :
आश्वासोनी वानरगण । संत्रासितां राक्षससैन्य ।
ते मकरक्षे देखोन । रागे आपण जल्पत ॥९०॥
कोण तो राम कैसा येथे । जेणे जिणोनी जनस्थानातें ।
मारिले माझिया पितयातें । बंधूसहित ससैन्य ॥९१॥
ते तुझी संग्रामख्याती । आजी मी आणीन समाप्ती ।
तुम्ही बापुडीं मनुष्यें किती । माझे शरघातीं उरावया ॥९२॥
जनस्थानी मी नव्हतों तेथे । म्हणोनि पावलेती यशातें ।
आता जाणवेल येथे । संग्रामार्थ पुरुषार्थी ॥९३॥
पुरुषार्थाचिया प्रौढी । मारीन रामलक्ष्मणजोडी ।
वानरांची करीन झोडी । ती तंव बापुडीं वनचरें ॥९४॥
अद्यं गंतास्मि वैरस्य पारं ते रजनीचर ।
सुहृदां चैव सर्वेषां निहतानां रणाजिरे ॥११॥
हत्वा रामं सुदुर्बुद्धि लक्ष्मणं च नराधमम् ।
तयोःशोणितनिस्यंदैः करिष्ये सलिलक्रियाम् ॥१२॥
एवमुक्ता महाबहुर्युद्धेषु रजनीचरः ।
रथेनांबुदघोषण ययौ रामदिदृक्षया ॥१३॥
आहूयमानो बहुभिर्वानरैर्बलशालिभिः ।
युद्धाय स महातेजा रामादन्यं न चेच्छति ॥१४॥
रणी मारिले माझे पितर । त्या वैराचें परपार ।
आजि मी पावेन साचार । रामसौमित्र मारुनी ॥९५॥
मारोनि दोघे महाबळी । त्यांच्या अशुद्धीची अंजुळी ।
पितरा देईन तिळांजळी । तेचि काळी उत्तीर्ण ॥९६॥
या दोघांचें घेवोनी रक्त । रणी मारिले सुहृद आप्त ।
ते ते तर्पीन समस्त । पितृकार्यार्थी उत्तीर्णत्वें ॥९७॥
प्राशावें लक्ष्मणाचे रक्त । ऐसा शूर्पणखेचा मनोरथ ।
तिचाही पुरवीन अर्थ । दोघे रणांत मारुनी ॥९८॥
ऐसा बोलोनी बडिवार । युद्धलागीं खर पुत्र ।
मेघगडगर्जनें रहंवर । पेलोनि सत्वर संग्रामा आला ॥९९॥
वानरवीर अति आवेंशीं । मकराक्ष पाचारी युद्धासी ।
उपेक्षूनि त्यां समस्तासी । श्रीराम गिंवसीं संग्रामा ॥१००॥
श्रीरामावांचून आणिकांसी । नाही करणे संग्रामासी ।
ऐसा करोनी नेमासी । श्रीरामा गिंवसी साटोपे ॥१॥
वीर धीर श्रीरघुनाथ । ऐसा पवाडा अति विख्यात ।
तो का लपतो वानरांत । संग्रामार्थ निघेना ॥२॥
श्रीरामासी रणकल्लोळ । करावया मकराक्षाचें बळ ।
डावलोनि वानरदळ । आला तत्काळ संग्राम ॥३॥
दृष्ट्वा रामं सदूरस्थं लक्ष्मणं च महारथम् ।
सेषुणा पाणिनाहत्य ततो वानमब्रवीत् ॥१५॥
तिष्ठ राम मया सार्धं द्वंद्वयुद्धं प्रयच्छ मे ।
त्याजयिष्यामि ते प्राणन्धनुर्मुक्तैःशितैः ॥१६॥
य़त्तदा दंडकारण्ये पितरं हतवान्मम ।
दह्यंते भृशमंगानि दुरात्मन्म राघव ॥१७॥
दिष्ट्यासि गोचरं राम राम मम त्वं प्राप्तवानासि ।
कांक्षितोऽसि क्षुधार्तस्य सिंहस्येवेत्तरोः ॥१८॥
ऐसा विचारतां रणाआंत । दूरी देखिला रघुनाथ ।
तंव मकराक्ष बाणहस्त । असे पाचारीति कराग्रें ॥४॥
ऐके श्रीरामा सावध । मजसी द्यावे द्वंद्वयुद्ध ।
आम्हा तुम्हा युद्धसंबंध । इतरीं विनोद पहावा ॥५॥
दोघांच्या संग्रामात । जो तिसरा घालील हात ।
त्याचा तेथेंच करावा घात । हा निश्चितार्थ करावा ॥६॥
संगें नको वानरगण । कायसे बापुडे लक्ष्मण ।
तुजसी करावे रणांगण । संकल्प पूर्ण हा माझा ॥७॥
त्रिशिरा मारिला खर दूषण । त्यां द्वंद्वाचा संताप पूर्ण ।
तुझा घ्यावया प्राण । रणांगण वांच्छितो ॥८॥
हो का माझे अदृष्टपूर्ते । भाग्ये भेटलासी तू येथे ।
जेंवी क्षुधिता सिंहाते । भेटती अवचितें लांडगे मृग ॥९॥
क्षुद्र मृद्र सिंहासीं ग्रास । तैसा मी तुझा करीन घांस ।
कायसा संग्रामविलास । श्रीरामपशु भेटला ॥११०॥
जरी असेल आंगवण । तरी मजसी करावे रण ।
त्याही युद्धाचे लक्षण । सावधान अवधारी ॥११॥
तू श्रीराम प्रतापें प्रबळ । मी मकराक्ष संग्रामशीळ ।
माझा तुझा रणकल्लोळ । लोक सकळ देखत ॥१२॥
शस्त्रास्त्रीं धनष्यबाणीं । शूलमुद्गलगदापाणी ।
अथवा मल्लविद्याविंदाणीं । बाहुप्रहरणीं भिडूं दोघे ॥१३॥
जे जे अभ्यासिलें रघुपती । मजसी भिडावें त्वा व्युत्पत्तीं ।
श्रीरामाची यशःकीर्ती । करीन समाप्ती संग्रामी ॥१४॥
श्रीराम नामे ब्रिदाइत । सकळकुळीं कुळ प्रस्तुत ।
मज द्यावा द्वंद्वयद्धार्थ । कळेल पुरुषार्थ दोघांचा ॥१५॥
तुझिया पुरुषार्थाची झडती । घेवो मी निश्चिती ।
वानरांमाजी लपसी किती । निंद्य युद्धार्थी श्रीरामा ॥१६॥
श्रीरामांचे प्रत्युत्तर :
ऐकोनि मकराक्षाचें वचन । श्रीराम बोले हास्यवदन ।
ज्याचे ठायी बहुत जल्पन । आंगवण त्या नाही ॥१७॥
महाशूराची नवलगती । युद्धी करोनी दाविती ख्याती ।
वृथा जे का बडबडती । ते तंव निश्चिती तोंडभांड ॥१८॥
सैरा बडबड करिती भांड । त्यांचे बोल भंडउभंड ।
तैसेंचि जाण तुझे तोंड । अति वितंड जल्पसी ॥१९॥
बोलाचिया बळावारी । कोणी जिंतिला नाही वैरी ।
तू तंव निर्लज्ज संसारी । भांडाच्या परी जल्पसी ॥१२०॥
जरी असेल आंगवण । तरी करोनी दावी रण ।
बडबडेचें फळ कोण । सीतारमण बोलिला ॥२१॥
नाही बळ नाही पुरुषार्थ । तोंडभांड जल्पसी येथ ।
ऐसे बोलता रघुनाथ पोळला जीवांत मकराक्ष ॥२२॥
बोलाचिया बळावारी । कोणी जिंतिला नाही वैरी ।
येणेंही बोले जिव्हारी । पोळला भारी मकराक्ष ॥२३॥
धनुष्या वाहोनिया गुण । शत सहस्र अमित बाण ।
श्रीरामावरी क्षोभोन । वर्षे आपण मकराक्ष ॥२४॥
सुवर्णपुंखी मनोहर । रत्नांकित अति गंभीर ।
मकराक्षाचे तीव्र शर । रामे समग्र छेचिले ॥२५॥
बद्धगोधांगुळित्राण । ज्याघोष तळघोष जाण ।
तेणे नादे कोंदले गगन । त्रिभुवन दुमदुमिले ॥२६॥
मकराक्ष आणि श्रीरामचंद्र । युद्धी मिसळले महाशूर ।
कौतुक पहावया सुरवर । विमानी समग्र दाटले ॥२७॥
देव दानव ऋषीश्वर । महोरग नर किन्नर ।
सिद्ध गंधर्व विद्याधर । विमानी अंबर कोंदलें ॥२८॥
मकराक्ष वर्षे शर । बाण वर्षे श्रीरामचंद्र ।
तेणे लोपले रवि चंद्र । दिशा समग्र कोंदल्या ॥२९॥
बाणी खिळोनि सांडिली धरा । बाणी खिळियेला वारा ।
बाणी व्यापिले अंबरा । दिशा समग्र कोंदल्या ॥३०॥
निशाचर विंधी जे जे शर । ते ते तोडी रामचंद्र ।
श्रीरामाचे शर दुर्धर । निशाचर स्वये छेदी ॥३१॥
छेदिता बाणी बाण । कोपा चढला रघुनंदन ।
अनिवार शर दारुण । विंधी आपण साटोपे ॥३२॥
ततःक्रुद्धो महाबाहुर्धनुश्चिच्छेद संयुगे ।
अष्टाभिरथ नाराचैः सूतं विव्याध राघवः ॥१९॥
छित्वा शरै रथं रामो हत्वा चाश्वानपोथयत् ।
विरथो वसुधां प्राप्य मकराक्षो निशाचरः॥२०॥
अधिकं क्रोधसंरब्धः शूलं जग्राह पाणिना ।
त्रासयन्सर्वभूतानां युगांताग्निसमप्रभम् ॥२१॥
विभ्राम्याथ च तच्छूलं प्रज्वलंतं निशाचरः ।
क्रोधाश्च प्राहिणोत्तस्मै राघवाय महात्मने ॥२२॥
श्रीरामांनी मकराक्षाचे रथ अश्व, सारथी यांचा संहार केला :
मकराक्षें आपण । निवारितां बाणे बाण ।
श्रीरामे धनुष्य छेदोनी आपण । पाडिलें जाण क्षितितळी ॥३३॥
सवेंचि विंधोनिया बाण। सारथ्याचा घेतला प्राण ।
चारी वारु मारिले जाण । श्रीरामे क्षोभोन संग्रामी ॥३४॥
हताश्च हतसारथी । मकराक्ष जाला विरथी ।
सक्रोध शूळ घेवोनी हाती । श्रीरामाप्रती धांविन्नला ॥३५॥
मकराक्षाचे निर्वाणभल्ल । शूळ हस्तीं वरद ।
धगधगीत अति प्रबळ । अग्निकल्लोळतेजस्वी ॥३६॥
जेंवी का भूतांसी घातक । दंडहस्तें धांवें अंतक ।
तेंवी शूळहस्तें मकराक्ष । रामासंमुख धांविन्नला ॥३७॥
ज्वाळा निघती नेत्रद्वारा । दांत खातसे करकरा ।
शूळ परजोनी गरगरा । श्रीरामचंद्रा हाणितला ॥३८॥
शूळ येतांचि कडाडीं । सर्व भूतां पडे झांपडी ।
स्वर्गी सुरवरें झाली वेडीं । रामे निर्वडी विंधिला ॥३९॥
आपतंतं ज्वलंतं तु खरपुत्रकराच्च्युतम् ।
बाणैश्चतुर्भिराकाशे शूलं चिच्छेद राघवः ॥२३॥
स च्छिन्नो बहुधा शूलो दिव्यहाठकचित्रितः ।
व्यशिर्यत महोल्केव रामबाणार्दितो भुवि ॥२४॥
तं दृष्ट्वा विफलें शुलं मकराक्षो निशाचरः ।
मुष्टिमाधाय काकुत्स्थं तिष्ठ तिष्ठेति चाब्रवीत् ॥२५॥
स तं दृष्ट्वा पतंतं तु प्रहस्य रघुनंदनः ।
पावकास्त्रं ततो रामः संदधे स्वशरासने ॥२६॥
तेनास्त्रेण हतं रक्षः श्रीरामेण महात्मना ।
संभिन्नहृदयस्तत्र पपात च ममार च ॥२७॥
मकराक्षाचा वध :
शूळ येता धगधगित । राम रणयोद्धा सावचित्त ।
ती बाणी आकाशांत । छेदूनि निश्चित पाडिला ॥१४०॥
शिववरद शूळशक्ती । श्रीराम शिवाची ध्येयमूर्ती ।
देखोनि पळाली ते परती । शूळ या युक्ती छेदिला ॥४१॥
बाप धनुर्वाडा श्रीरघुनाथ । जैसा गगनी उल्कापात ।
तैसा शूळ धगधगित । रणाआंत पाडिला ॥४२॥
शुळ जातांचि निष्फळ । मकराक्ष करी तळमळ ।
श्रीरामासी न चले बळ । सिद्धि सळ न पवेचि ॥४३॥
म्हणे श्रीरामा राहे राहे । माझा मुष्टिघाय साहें साहें।
म्हणूनि उभवोनी बाहे । आला लवलाहें राक्षस ॥४४॥
मकराक्ष येता दारुण । श्रीरामे सज्जिला अग्निबाण ।
हृदयी विंधितांचि जाण । पडे निष्राण क्षितितळीं ॥४५॥
बोंब सुटली राक्षसदळीं । वानरी पिटिली टाळी ।
मकराक्ष महाबळी । रामे तत्काळी मारिला ॥४६॥
दृष्ट्वा ते राक्षसाः सर्वे मकराक्षस्य पातनम् ।
लंकामेव प्रधावंति रामबाणभयार्दिताः ॥२८॥
राक्षस – सेनेचे लंकेत पलायन :
श्रीरामे निमिषार्धात । मकराक्षाचा केला घात ।
राक्षससेना भयभीत । लंकेआंत पळाली ॥४७॥
दुर्धर मारिला निशाचर । विजयी जाला श्रीरघुवीर ।
वानर करिती जयजयकार । श्रीरामचंद्र निजविजयी ॥४८॥
एका जनार्दना शरण । झाले मकराक्षाचें निर्दळण ।
पुढील गोड निरुपण । रामायण अति रम्य ॥१४९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
मकराक्षवधो नाम पंचत्रिशत्तमोऽध्यायः ॥३५॥
ओंव्या ॥१४९॥ श्लोक ॥२८॥ एवं ॥१७७॥
