॥ श्रीएकनाथमहाराजकृत
59.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय एकूणसाठावा ॥
रावणाचे युद्धार्थ आगमन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
रावण सावध होऊन मंदोदरीला धीर देतो, सांत्वन करितो :
निजमूर्च्छा सांवरुन । सावध झाला रावण ।
तंव पुढे विझालें हवन । रावणे आपण देखिले ॥१॥
सखळ यज्ञसामग्री । वानरी केली बोहरी ।
ते देखोनि दशशिरी । क्रोध शरीरी चढिन्निला ॥२॥
मंदोदरी स्वये रडत । देखोनिया लंकानाथ ।
स्वये तीस शांतवीत । निजपुरुषार्थ बोलोन ॥३॥
साभिमानैर्वचोभिस्तां सांत्वयन्निदमब्रवीत् ।
कींरोदिषि शुभे दीनं मायि जीवति मानिनि ॥१॥
न मे किश्चित्समो युद्धे त्रिषु लोकेषु भामिनि ।
सेंद्राः सुरगणाःसर्वे तिष्ठंति हि वशे मम ॥२॥
किमल्पसारैः शक्योऽहं जेतुं वानरमानुषै ॥३॥
निजाभिमाने दशानन । मंदोदरीप्रति वचन ।
करोनि तिचे शांतवन । स्वये आपण बोलत ॥४॥
सुमंगले मंदोदरी । व्यर्थ रुदनातें न करी ।
तुज खस्ता केली वानरी । त्यांची बोहरी करीन मी ॥५॥
शुभानने परियेसीं । संग्रामी संमुख मजसी ।
रणा न येववे कोणासी । दैत्यदानवांसी कोण गणी ॥६॥
इंद्रादि सुर समस्त । बंदिगृहीं सेवा करित ।
ब्रह्मा माझा नित्यांकित । नित्य पढत शांतिपाठ ॥७॥
तेथे अल्पशक्ति किंकर । मानव आणि वनचर ।
रणा येती मजसमोर । हे उत्तर घडेना ॥८॥
तुजदेखतां भामिनी । वानरमानवांच्या श्रेणी ।
क्षणे पाडीत मी रणी । न्हाणीन धरणी अशुद्धे ॥९॥
माझे क्रोधदृष्टीपुढें । केंवी राहती माकडें ।
आता रणी पाडीन लोंढे । निजनिवाडे पाहे तू ॥१०॥
वानरमानवांच्या भूतळी । शिरांची खेळेन चेंडूफळी ।
अशुद्धाचा टिळा तत्काळी । लावीन निढलीं पै तुझ्या ॥११॥
जिही हाती निश्चित । तुज केले खस्ताव्यस्त ।
ते उपडीन समस्त । तुज देखत भामिनी ॥१२॥
हातांपायांची कांडोरीं । शिरांच्या वढवाळी थोरी ।
तुजदेखतां करीन जरी । तरीच निर्धारी मी रावण ॥१३॥
निवटोनियां वानरगण । रामसौमित्रांच्या रुधिरें जाण ।
तुझ्या दुःखाचे क्षाळण । करीन आपण सुंदरी ॥१४॥
इति तां शोकसंतप्तां सांत्वयित्वा तु रावणः ।
रथमारुह्य वेगेन निर्जगाम रणं प्रति ॥४॥
स क्रुद्धः कवची खड्गी शरी धन्वी तथैव च ।
तस्य निष्कममाणस्य दग्धुकामस्य रोदसी ॥५॥
रावणाने केलेली घोर प्रतिज्ञा :
आजि पृथ्वी अरावण । की अराम देखसी जण ।
म्हणोनि गर्जता आपण । करी सांत्वन मंदोदरीचे ॥१५॥
ऐसी दुःखसंतप्त मंदोदरी । तिसी रावणे बहुतांपरी ।
शांतवोनि अति कुसरी । गिरागजरीं गर्जिन्नला ॥१६॥
आजि श्रीरामाते रणी । बाणेंकरीं भंगाणी ।
झणें भय धराल कोणी । पहा करणी करीन ते ॥१७॥
रावणाकडून सैन्य सिद्ध करण्याची आज्ञा :
कुचा भवंडिला सैन्यासी । सिद्ध व्हावे वेगेंसीं ।
उठा चला रणभूमीसी । रामसौमित्रासी वधावया ॥१८॥
घावो घातला निशाणा । वेगे पालाणा पालाणा ।
आवेश आलासे रावणा । रणांगणा जावया ॥१९॥
दीपा अस्त होता पाहे । प्रकाश अधिकाधिक होये ।
तैसे रावणा झाले आहे । गर्जताहे अति गर्वे ॥२०॥
पुष्पाचें जे विकासणें । तेंचि त्याचे सुकणें ।
तेंवी रावणाचे गर्जणें । जीवे मरणें तत्काळ ॥२१॥
विजु प्रकाशातें पावणें । तोचि तिसी अस्त होणें ।
तैसे मांडिले रावणे । निजमरणें गर्जत ॥२२॥
काठीकार सैरां धांवती । सैन्य सन्नद्धबद्ध करिती ।
रणा निघाला लंकापती । शीघ्रगती चालिला ॥२३॥
म्हणोनिया त्वरित । सोटेमार करी दूत ।
तेणे नगरी अति आकांत । कळकळित नरनारी ॥२४॥
नगरी होत रणवळसा । पिया झोंबती प्राणेशा ।
मागुती देखावया ऐसा । धीर सहसा उपजेना ॥२५॥
प्रजाजनांचे आक्रंदन :
आम्ही काय करु आता । आम्हासी कोण निरुपिता ।
मरण आले लंकानाथा । सांगाती तत्वता करीतसे ॥२६॥
आता आम्ही करणे कायी । तुम्हासी पाहो कोणे ठायी ।
म्हणोनि कंठी झोंबती पाही । लोळणी तिही घातली ॥२७॥
कांतेप्रति कांत सांगत । देह पोशिला दिवस बहुत ।
रावणाचे वेतन खात । त्यासी रणांत सोडू नये ॥२८॥
जळो तयाचे वेतन । पोत भरुं भिक्षा करुन ।
रणा नवजावें आपण । म्हणोनि चरण वंदिती ॥२९॥
तंव दूत हाणिती पाठीवरी । ओढून काढिती बाहेरी ।
शंखस्फुरण घरोगरीं । नरनारी कळकळिती ॥३०॥
वानरसैन्याला आनंद व त्यांचा युद्धाचा आवेश :
काळे तोंड लंकानाथा । चोरुन आणिली सती सीता ।
आता मरावया जाता । सवे समस्ता नेतसे ॥३१॥
ते ऐकूनि हरिगण । देती रामनामे किराण ।
श्रीरामासंमुख दशानन । युद्धालागून निगाला ॥३२॥
आता कायसी खटपट । कासया पडखळूं दशकंठ ।
म्हणोनि हरिखले मर्कट । देती उद्भट किराण ॥३३॥
रावणसैन्याची सिद्धता :
तंव रावणदळ समस्त । सन्नद्धबद्ध झाले तेथ ।
वाद्यें लागलीं अद्भुत । नादे गर्जत भूगोळ ॥३४॥
तुरे लागलीं विविध । अनुहताचा निजनाद ।
ध्वनि उठल्या बहुविध । भाग्य विविध रावणाचे ॥३५॥
भेरी मृदंग निशाण । गुजबुजी गिडिबिडी जाण ।
काहळा चिनकाहळा दारुण । भोंगळा सत्राण त्राहाटिल्या ॥३६॥
वीणा वेणु झल्लरी । नाद उठिला अति गजरीं ।
विराणीं वाजती एकसरी । नादाभीतरीं मन निवे ॥३७॥
रणनोवरा दशशिरी । पर्णावया मोक्षनारी ।
निगालासे झडकरी । अनुहतगजरी लावोनियां ॥३८॥
सन्नद्ध चतुरंगसेना । सवे सकळ युद्धरचना ।
शस्त्रास्त्रांची विवंचना । खडतर जाणा सांगाते ॥३९॥
विचित्र कवचांचे भार । खड्ग तोमर लहडीचक्र ।
गदा मुद्गल अपार । सर्वे गाढे भार चालिले ॥४०॥
विचित्र शस्त्रांचिया जाती । त्रिशूळ चेंडु झेलिती किती ।
एव वीर परिघहाती । पागोरे पिटिती भिंडिमाळा ॥४१॥
गाडे भरोनि अपार शर । सुवर्णबंदी कोदंडभार ।
ज्यांचा ऐकता टणत्कार । कांपे थरथर त्रिलोक ॥४२॥
अस्त्रदेवता समस्ती । भेणेंचि सवे चालती ।
विपायें वांचला लंकापती । करील शांति सकळांची ॥४३॥
येणे भयेंकरोनि जाण । संमत्र अस्त्रदेवतागण ।
स्वये चालवी दशानन । विचित्र विंदाण सेनेचें ॥४४॥
ध्वजा पताका अंबरी । भाले झळकती चवरी ।
दिव्य छत्रे सैन्यावरी । राक्षसभारीं अति शोभा ॥४५॥
महामदें दाटले गजघट । वारुंचा वाजिन्नला साट ।
रथचक्रातळीं सपाट । होती पीठ पर्वत ॥४६॥
पुत्रप्रधानाचें दुःख । स्त्रियेची खस्ता अलोलिक ।
आठवोनि दशमुख । क्रोधे देख कांपत ॥४७॥
साधावया श्रीरामासी । रथी बैसता रावणासीं ।
रुप वाढिन्नलें आकाशी । देखता लोकांसी पळ सुटे ॥४८॥
सैन्य चालिलें अति गजरीं । यावा दाविला स्वारी ।
हो हो मा मा जीजीकारीं । वारु कुसरी नाचती ॥४९॥
सैन्य चालिलें घनदाट । अश्वगजांचे पै थाट ।
सैन्यरथांचे घडघडाट । रजें अंबर कोंदलें ॥५०॥
दुश्चिन्हांचा आविष्कार :
दिवि भुवि अंतराळ । दिशांच्या पोकळ्या सकळ ।
रजे कोंदलें जगतीतळ । रविमंडळ झांकले ॥५१॥
दिवसाच पडिला अंधार । रजें बुडाले पै नेत्र ।
दुर्निमित्तें थोर थोर । तेथे सत्वर ऊठिलीं ॥५२॥
निमित्तानि च तत्रासन्भयशंसीनि सर्वतः ।
प्रतिलोमो ववौ वायुर्मंदरश्मिर्दिवाकरः ॥६॥
सागरश्चुक्षुभुश्चैव चकंपे च वसुंधरा ।
जानुभिः पेतुरश्वाश्च बाप्पबिंदूनथामुचन् ॥७॥
तानुत्पानचिंत्यैव रावणः क्रोधमूर्च्छितः ।
सशरं धनुरादाय रणभूमि विवेश ह ॥८॥
शिखाकेत अग्निकेत । गगनी उठिले धूमकेत ।
तयांमाजी उल्कापात । अकस्मात ऊठिले ॥५३॥
नक्षत्रे पडती टळटळां । भूकंप होतसे वेळोवेळां ।
भालू भुंकती समकाळा । अग्निज्वाळा वमूनियां ॥५४॥
हनुमंते पूर्वी प्रबोधिला । तो आठव धरोनि वहिला ।
प्रतिकूळ वायु सुटला । उडवूं लागला राक्षसा ॥५५॥
वस्त्रे उडती आकाशा । वायु भरला राक्षसघसां ।
प्राण परतेना सहसा । थोर दुर्दशा रावणा ॥५६॥
धुळीं भरले डोळे । स्वसैन्य परसैन्य न कळे ।
पुढे पाऊलही न उचले । भुलविले सकळांसी ॥५७॥
रवि मंदरश्मि झाला पाही । दिशा धुंदल्या सर्वही ।
सागरींचे जळ तेंही । लवलाही उचंबळले ॥५८॥
ऐंसी दुश्चिन्हे जितुकीं । सकळही रावणकटकीं ।
प्रवेशलीं एकाएकी । तेणे दशमुखी सचिंत ॥५९॥
रावण उद्विग्न होतो :
म्हणे शंकराचे वचन । मिथ्या करु शके कोण ।
यज्ञा उठिलिया विघ्न । घात संपूर्ण कर्त्याचा ॥६०॥
ते आजि दिसते फळ । दुर्निमित्तें जी प्रबळ ।
येथे दिसताती सकळ । समग्र दळ व्यापिले ॥६१॥
ऐसा झाला सचिंअत । दुर्निमितें भ्रमिभूत ।
क्षण एक झाला लंकानाथ । अति आकांत वर्तला ॥६२॥
रावण स्वतःला सावरुन सैन्याला धीर देतो :
सवेंचि सावध होवोनि पाही । विचारीं आपुल्याच ठायी ।
म्हणे दुश्चिन्हीं भय कायी । युद्धाच्या ठायी शूरासी ॥६३॥
सुचिन्हामाजी शंकर । तो दुश्चिन्हीं काय गेला दूर ।
व्यर्थ पामराचा विचार । मी चिंतातुर लटकाचि ॥६४॥
रांडवे बायलेच्यापरी । चिंतातुर मी शरीरी ।
जळो माझी सामर्थ्यथोरी । काय संसारी जीतसें ॥६५॥
म्हणोनि झाला सावध । निजसैन्या करीत बोध ।
मिथ्या उठिलें हे द्वंद्व । त्याचा विषाद न मानवा ॥६६॥
शिवे पाहो आदरिलें व्रत । युद्धी लागलिया आघात ।
रणी दुश्चित की सावचित्त । निश्चितार्थ पहावया ॥६७॥
ते शंकरकृपा आम्हांसी । आपेंआप फळली कैसई ।
आम्हासंमुख विघ्नांसी । रहावयासी तोंड कैंचे ॥६८॥
बाप कृपाळु शंकर । विघ्न निरसिले समग्र ।
भिवो नका चला शिघ्र । नरवानर निवटावया ॥६९॥
ऐसे सांगोनि सैन्यासी । आश्वासोनि तयासी ।
संमुख जाता रणभूमीसी । रथ तोंडघसी आदळला ॥७०॥
पुनः विघ्नांचा उत्पात व रावणाचा आवेश :
विषमस्थळ नसतां जाण । भूमि असता समान ।
वारू चालता स्यंदन । आडखळोन पडियेला ॥७१॥
आवरितां सारथ्यासी । वारु पडले तोंडघसी ।
तेणे चिंता रावणासी । निजमानसीं वर्तली ॥७२॥
तथापि वीरवृत्ती करून । साटोप धरोनि रावण ।
वारू उठविले जाण । उदकसिंचन करोनिया ॥७३॥
अश्वांचिया नेत्रद्वारा । अश्रुबिंदु स्रवती सैरा ।
ते पुसोनि वेगवत्तरा । रहंवर संजोगिले ॥७४॥
वीर रावण जगजेठी । विघ्नें घालोनिया पोटी ।
धनुष्यबाण धरोनि मुष्टी । क्रोधे कडकडाटीं चालिला ॥७५॥
आठवोनि पुत्रांचें निधन । धाकुटा बंधु कुंभकर्ण ।
प्रहस्तादि प्रधान । सकळ सैन्य निमलें ॥७६॥
करोनि तयांची आठवणी । क्रोधे झाला काळाग्नी ।
प्रवेशला रणांगणी । देवोनि पाणी सर्वस्वा ॥७७॥
राज्याशा आणि जीविताशा । सांडूनि भोगाची भोगाशा ।
सांडून ऐश्वर्याची आशा । विरक्त सर्वस्वा रावण ॥७८॥
केवळ क्रोधाचें निजशरीर । तेणे रुपा आला दशशिर ।
जेंवी मध्यान्हीं अति उग्र । दिसे खडतर भास्वत ॥७९॥
माध्यान्हकाळींचा रवी । सहसा होय दुर्निरीक्ष्य जेंवी ।
तैसा अति क्रोधाविर्भावी । दशग्रीव भासे ॥८०॥
अंतरींचें निजसामर्थ्य । तेणे करोनि प्रदिप्त ।
रणी गर्जोनि लंकानाथ । काय बोलत रामासी ॥८१॥
राम त्वं तु समाश्वस्तः समाश्वस्तस्तथाप्यहम् ।
कुर्वे त्वया समं युद्धं तिष्ठेदानीं स्थिरो भव ॥९॥
वीरश्चास्मि सुसंवृत्तस्त्वत्सकाशादरिंदम ।
क्रमेण परिनष्टो ह्यस्तेनाहमपयातवान् ॥१०॥
नाहं बिभ्ये सुराणां हि समस्तानामपि प्रभो ।
कि पुनर्वानराणां तु येशामाश्रयिता भवान् ॥११॥
श्रीरामांवर बाग्बाणांचा वर्षाव आणि रावणाची आत्मप्रौढी :
रामा तुझे पोटी । युद्ध करणे कडकडाटीं ।
ते आजि साधिली गोष्टी । झणी पाठी देवोनी पळसी ॥८२॥
बहुता दिवसांची माझी । असोसी फळली आजी ।
राम सांपडला झुंजी । पुण्यपुंजी फळा आली ॥८३॥
सावध ऐके रघुनंदन । होऊं नको पलायमान ।
जितकी असे आंगवण । तैसे रण करीन आजि ॥८४॥
पूर्वी मजपासून पळाला । तो मागुतेनि रणा आला ।
आतांही पळवीन वहिला । झणें या बोला भ्रमसील ॥८५॥
तरी एक वेळ ऐसे जाहलें । रथसारथि वारु मेले ।
म्हणोनि पलायन घडले । ते सर्वथा पहिलें विसरावें ॥८६॥
मी न भियें देवांसी । दृष्टी नाणी दानवांसी ।
तेथे कोण गुणी तुम्हासी । जिही वानरांसी आश्रयिलें ॥८७॥
पालेखाइरीं मर्कटें । रणा आलासी त्यांच्या नेटे ।
घाव घालतां अवचटे । अति संकटें मराल ॥८८॥
वीरवृत्तीचा गर्व बहुत । तुजमाजी असे नांद ।
तेणे रणवीरां न गणित । तो पुरुषार्थ आजि दावी ॥८९॥
लक्ष्मणाने रावणाची केलेली नालस्ती :
ऐसे बोलता दशानन । उत्तर नेदी रघुनंदन ।
जेंवी वायसाचें वचन । सांडी उपेक्षोन राजहंस ॥९०॥
सिंह देखोनि वाडेंकोडें । श्वान भुंके पुढे पुढे ।
तेंवी श्रीराम रावणाकडे । न पाहे कोडे हांसोनी ॥९१॥
काकुत्सथोपि महातेजाः श्रुत्वा रावणभाषितम् ।
न किंचिदुक्त्वा धर्मात्मा तस्थौ संग्राममूर्धनि ॥१२॥
लक्ष्मणःक्षोभयामास धिक्कृत्य तु दशाननम् ।
लक्ष्मणस्य वचः श्रुत्वा संपीडितमनास्तदा ॥१३॥
रावणाच्या तिखट उत्तरीं । राम न भीच रणकेसरी ।
जेंवी सिंहापुढे कोल्हाळ करी । निजगजरीं शूकर ॥९२॥
ते देखोनि लक्ष्मण । क्रोधे झाला देदीप्यमान ।
निर्भर्त्सिला रावण । काळे वदन पै तुझे ॥९३॥
निर्लज्जा न लाजसी दशकंठा । हीन दीन संग्रामनष्टा ।
वृथा वाढलासी मांसें मोठा । धर्मनष्टा दुरादारा ॥९४॥
वृथा बोल बोलसी किती । करोनि दावी रणख्याती ।
जाणवेल तुझी शक्ती । शस्त्रप्रयुक्तिपर्यावो ॥९५॥
महाशूरांचें लक्षण । करोनि दाविती रणकंदन ।
वृथा वल्गोनि काय कारण । भुंके श्वान तैसा तू ॥९६॥
त्यामुळे रावणाचा क्रोधावेश :
ऐकोनि सौमित्रवचन । क्रोधे खवळला रावण ।
घृतें खवळे हुताशन । तेंवी दशानन क्षोभला ॥९७॥
नेत्र भवंडी गरगरा । दांत खात करकरा ।
मस्तक पिटी सैरा । या रघुवीरा काय करु ॥९८॥
आता काय करु विंदान । माजवीन रणांगण ।
तृप्त करीन भूतगण । तै रावण मी सत्य ॥९९॥
ऐसे बोलता लंकानाथ । भूते शकुन मानित ।
रावणे भूतगण तृप्त । भाष्य वदत वाग्देवी ॥१००॥
क्रोधे खवळोनि रावण । धनुष्यमुष्टि सज्जन ।
वेगी चढवोनियां गुण । सीतीं बाण लाविला ॥१॥
बाण ओढोनियां कानाडी । गर्जोनियां हाक फोडी ।
श्रीरामा साहें माझी वोढी । रणनिर्वडी पुरुषार्थ ॥२॥
राक्षस व वानरांचे भयंकर युद्ध :
तंव उठावले सकळ दळ । रणी उठला हलकल्लोळ ।
भिडती राक्षस गोळांगूळ । युद्ध तुंबळ मांडलें ॥३॥
राक्षस बळे हाणिती काती । वानर हाते झेलिती ।
फिरवोनि तेचि ओपिती । लोळवित राक्षसा ॥४॥
राक्षस ओपिती भाले । फुटती वानरांचीं कपाळें ।
अशुद्धे दिसती बंबाळें । सर्वांग निथळ वानरांचे ॥५॥
गैरिकादिक धात । ओहळतां शोभे पर्वत ।
तेंवी वानरसैन्याआंत । शोभा अद्भुत वानरा ॥६॥
तुतती वानरकपाळें । पुच्छे कमळोनि बळे ।
सवेंचि भिडती गोळांगुळे । श्रीराम बळे अनिवार ॥७॥
घावो लागे जेथ जेथ । श्रीरामचरणरज लाविती तेथ ।
तेणे कानपोनियां खत । नामे गर्जत मारिती ॥८॥
भाले त्रिशूळ मुद्गर काती । राक्षस निजबळे हाणिती ।
ते देखोनि जुत्पती । स्वये विटाविती राक्षसा ॥९॥
वांकुल्या दावोनि तयांकडे । सवेंचि हाणिती पर्वतखडे ।
नामे गर्जती माकडें । भिडती निवाडे रणमारा ॥११०॥
भिंडिमाळांचे पांगोरे । राक्षस हाणिती तोमरें ।
धोंडे गुंडे पर्वतशिखरें । घेवोनि वानरे ठोकिती ॥११॥
वीर खवळले अति क्रोधे । रणी मातले रणमदें ।
एक नाचती युद्धछंदें । रणछंदे तळपती ॥१२॥
थरक सरक उड्डाण । ओढणें धडकती तळपोन ।
वानर देवोनि किराण । नेती हिसडोन हातियेरें ॥१३॥
घायीं पडती वानरगण । ते श्रीरामपदरजेंकरुन ।
तत्काळ होती सावधान । करिती गर्जन रामनामे ॥१४॥
राक्षस पडती घायीं । त्यांसी उठविता कोणी नाही ।
राक्षसांचे सैन्य सर्वही । वानरी पाही निवटिले ॥१५॥
रामांच्या हस्ते निधन होणारे भाग्यवंत राक्षस :
श्रीरामाच्या दृष्टीपुढें । महावीर रणी निधडे ।
घायिं पडले वाडेंकोडें । भाग्य केवढें सांगो मी ॥१६॥
श्रीरामासंमुख रणांत । युद्धी वीर ते पडत ।
त्यांच्या युद्धाचा निश्चितार्थ । सावचित्त परिसावा ॥१७॥
घायीं शिर एक तुटले । चढोनि इंद्रपदा गेले ।
तेथील सुख नश्वर देखिले । मग परतले रामाकडे ॥१८॥
श्रीरामदृष्टीपुढें । स्वर्गसुख ते बापुडे ।
श्रीरामचरणीं सुख गाढे । जन्ममरण पुढे असेना ॥१९॥
एक शिर हो उसळले । सत्यलोकापर्यंत गेले ।
भोगक्षयें पतन देखिले । मग परतले रामाकडे ॥२०॥
आब्रह्मभुवनलोक । भोग तितुका कामनात्मक ।
ऐसे गीतावचन देख । म्हणोनि शिर परतले ॥२१॥
शिर उसळलें तुटोन । वैकुंठपर्यंत गेले उडोन ।
नावडे एकदेशी स्थान । धिक्कारुन परतले ॥२२॥
सलोकसमीपस्वरुपता । वोसंडोनि सायुज्यता ।
श्रीरामचरणीं जीव अर्पिता । निजमुक्तता सहजचि ॥२३॥
शिरें तुटोनि झडकरी । उडोनि जाती लोकांतरीं ।
तेथून परतती माघारीं । रामचरणांवरी स्वये पडती ॥२४॥
श्रीरामाचरणांपुढें । वैकुंठ कैलास नावडे ।
म्हणोनि हरिखे शिर मुरडे । चरणांवरी पडे श्रीरामाच्या ॥२५॥
श्रीराम दृष्टी देखता । भलत्याचेनि हातें मरतां ।
चहू देहा देवोनि लाता । निजमुक्तता पावती ॥२६॥
स्थूळ लिंग आणि कारण । चवथा देह महाकारण ।
निरसून तयांचें भान । श्रीरामचरण सेविती ॥२७॥
शिरें परतोनि मागुती । श्रीरामाते ओंवाळिती ।
येवोनि चरणावरी पडती । उत्तीर्ण होती चहू देहा ॥२८॥
मागिले जन्माचें उसणें । वीर काढिती श्रीरामचरणें ।
उसण्याघायी संकुख मरणें । नन्ममरणधरणें उठविती ॥२९॥
ते देखोनि समस्ता । वीरां आवेश बहुता ।
युद्ध् करिता साटोपता । फाडावया खता जन्माच्या ॥१३०॥
युद्ध करिता महावीरी । सरली शस्त्रास्त्रांची सामग्री ।
मग मल्लयुद्धकुसरी । वीरी वानरी मांडिली ॥३१॥
सडका घालिती परस्प्रीं । थडका हाणिती येरयेरीं ।
उरीं शिरी खांदी कोपरीं । जानूंवरी ताडिती ॥३२॥
एक ते मागे सरती । छागयुद्धें सवेंचि भिडती ।
अंगीच्या रोमा पिंजारिती । मग मिसळती कुक्कुट जैसे ॥३३॥
युद्ध करिती विविध । घारयुद्ध श्येनयद्ध ।
मार विविध पै त्यांचा ॥३४॥
मागे फिरती वाडेंकोडें । परतोनि हाणिती लाताडें ।
त्यांसी पायी धरिती माकडें । भवंडोनि कोडे त्राहाटिती ॥३५॥
मरतां राक्षस बोलती । श्रीरामे थोर युद्धख्याती ।
युद्धी परमानंद प्राप्ती । सायुज्य मुक्ती पावलों ॥३६॥
युद्ध नव्हे हा परमानंद । रण नव्हे आनंदकंद ।
राम ओळला सच्चिदानंद । अगाध बोण रणरंगीं ॥३७॥
राम परमामृत पुतळा । राम मुक्तीचा जिव्हाळा ।
राम आनंदाची कळा । पाळी लळा सकळांचा ॥३८॥
द्वेषबुद्धीं युद्ध करिता । वैरिया दे सायुज्यता ।
अगाध बोध रघुनाथा । परमानंदता अरिमित्रीं ॥३९॥
रावण रामाचा नव्हे वैरी । तारक् आमुचा निर्धारी ।
ज्याच्या द्वेषबद्धिकरीं । राम तारी राक्षसा ॥१४०॥
वीरां वानरा रणी । थोर झाली झोंटधरणी ।
राक्षस निमाले रणी । रथचक्रश्रेणींसमवेत ॥४१॥
सैन्य निमाले अपरिमित । अश्वगजरथसमवेत ।
रणकर्दम झाला तेथ । पूर् वाहत रुधिराचा ॥४२॥
मज पाहता निश्चितार्थ । रुधिर नव्हे ते परमामृत ।
तयामाजी जे लोटत । ते नित्यमुक्त स्वये होती ॥४३॥
मोक्षाचिया आशा जाण । वीर बळेंचि देती प्राण ।
रणी वोळला रघुनंदन । निशाचरगण उद्धरिले ॥४४॥
बहुसाल सैन्य मरतां । क्रोध आला लंकानाथा ।
रणी जिंकावया रघुनाथा । साटोपता चालिला ॥४५॥
जेंवी पतंग दीपावरी । गज जेंवी केसरीवरी ।
तेंवी आवेशें दशशिरी । श्रीरामावरी चालिला ॥४६॥
कुचभाराचें उभारणें । तयाचि नांव पडणे ।
तेंवी मरावया रावणे । मांडिलें येणे समरंगणीं ॥४७॥
इंद्र श्रीरामांना रथ पाठवितो :
अति गर्वे गर्वोन्मत्ती । घेवोनि शस्त्रास्त्रसंपत्ती ।
रावण चालिला रामाप्रती । भेणे कापती सुरवर ॥४८॥
सबळ बळे लंकापती । रावणाचा रथ लीलागती ।
रामा एकला पदाती । युद्धख्याती केंवी होय ॥४९॥
एकाकी भिडतां रावणाप्रती । साह्य न पाहे सांगती ।
एकांगवीर रघुपती । करील शांती रावणाची ॥१५०॥
संदेह नाही ये अर्थी । राम धर्माची धर्ममूर्ती ।
सौमित्रा न सांगे सर्वांर्थीं । करील ख्याती निजांगें ॥५१॥
राम कार्य साधील न चुके । रावण निवटील बाणे एके ।
सुर सोडवील कौतुके । भरेल हरिखें त्रैलोक्य ॥५२॥
कांही स्वहितालागीं जाणा । साह्य व्हावे रघुनंदना ।
म्हणोनिया सहस्त्रनयना । अवस्था दुणी लागली ॥५३॥
आजवरी श्रीरामसेवा । अंश घडली नाही केव्हा ।
तेणे आतुडलों दशग्रीवा । घेत सेवा निजबळे ॥५४॥
तो सूड घ्यावयासी । साह्य होणें श्रीराघवासी ।
पाचारोनि सारथ्यासी । करवी रथासी सन्नद्ध ॥५५॥
संजोगोनियां स्यंदन । ठाकून जाय रघुनंदन ।
रथी करोनि आरोहण । राम रावण निवटील ॥५६॥
एका जनार्दना शरण । श्रोती व्हावे सावधान ।
पुढील रामरावणांचें रण । अति दारुण परिसावे ॥५७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणयद्धागमनं नाम नवपंचाशत्तमोऽध्यायः ॥५९॥
ओंव्या ॥१५७॥ श्लोक ॥१३॥ एवं ॥१७०॥
