॥ श्रीएकनाथमहाराजकृत
85.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय पंचाऐंशीवा ॥
राज्याविषयी लक्ष्मणाची विरक्ती -
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
श्रीरामांचा आनंदसोहळा :
श्रीरामाचे अभिषिंचन । आनंदमय त्रिभुवन ।
भक्तवृंद सुखैकघन । आनंदें पूर्ण गर्जती ॥१॥
भद्रीं बैसला रघुनाथ । ब्रह्मांड सुखे दुमदुमित ।
विनोदे श्रीरामाचे भक्त । रामसुखार्थ दाविती क्रिया ॥२॥
श्रीरामसुखे संपन्न । संतोषावया रघुनंदन ।
अग्निक्रीडा मांडिली पूर्ण । औषध भरून रज तम ॥३॥
दारूकामाचे रूपकात्मक अनुपम सुंदर वर्णन :
तीव्ररजतमांची औषधे । करोनि अग्नियंत्रे सन्नद्धें ।
श्रीरामभक्तिआनंदें । क्रीडा विनोर्दे मांडिली ॥४॥
सूक्ष्म ममतेची हवाई । पहिली आणियेली पाही ।
वैराग्यवाती लावितां ठायी । चिद्गगनी तेही उसळली ॥५॥
गुरुवाक्यें प्रज्याळिली । सद्विवेकें आंबुथिली ।
लागता हवाई जळाली । क्षणे उडाली चिद्गगनी ॥६॥
अहंकाराचा बाण कठिण । गुरुवचनें प्रज्याळितां पूर्ण ।
उततला न लागता क्षण । आब्रह्मभुवन प्रकाशलें ॥७॥
सुटतां अहंकाराचा बाण । सोहं जाळिलें चिद्गगन ।
देखोनिया रघुनंदन । सुखैकघन स्वये झाला ॥८॥
तंव आणिक नवलपरी । आशातृष्णेच्या चिचुंदरी ।
भरून आणिल्या झडकरी । पीडिले भारी लोक तिन्ही ॥९॥
विसरोनि रघुकुळटिळक । पाहू लागले कौतुक ।
त्यांसी जाळित उठल्या देख । एक एक शोधू शोधूं ॥१०॥
वेगे जाळित उरी शिरी । भडका उठला हृदयावरी ।
खांडमिशा तोंडावरी । वस्त्रामाझारी घुसती ॥११॥
श्रीरामविमुख विषयेंकरोनी । त्यांची होतसे भंगाणी ।
सोवळ्या धोत्रां दाणादाणी । उघडी पाडोनी जाळिती ॥१२॥
देखोनि तयांचे कौतुक । भक्त हासती अलोलिक ।
सात्विक उपहासिती देख । रघुकुळटिळक तटस्थ ॥१३॥
विचित्र संकल्पाच्या फुलवाती । रम्यसुमनाकार भासती ।
निर्धार करिता निगुतीं । रक्षा निश्चिती प्रत्यक्ष ॥१४॥
रामभक्ताच्या निरीक्षणयुक्ती । लावोनि अनुसंधानाच्या वाती ।
श्रीरामदृष्टी भस्म करिती । क्षणही निश्चिती न लागता ॥१५॥
कामक्रोधांचे अति उद्भट । भुईनळे पै घनदाट ।
माजी अभिनव काळकर्कोट धूम निघत मदमत्सरांचा ॥१६॥
व्यापीत चालिला गगन । आच्छादित जननयन ।
अविवेक्यापीडा गहन । खवट घाण घसां भरे ॥१७॥
देखोनयां श्रीरामभक्त । खवळले अत्यद्भुत ।
अनुभवाचा हत्ती मस्त । रवंदळित सोडिला ॥१८॥
अहंममतेचा नाद क्रूर । त्याते आच्छादोनि सत्वर ।
स्वानंदे गर्जोनियां थोर । केला चूर तयाचा ॥१९॥
निजबोधचंद्रज्योति पूर्ण । तेणे उजळिलें त्रिभुवन ।
प्रकाश दाटला पूर्ण । मीतूंपण असेना ॥२०॥
ऐसा निजभक्ताचा अद्भुत । देखोनिया पुरुषार्थ ।
संतोषला श्रीरघुनाथ । आलिंगित हदयेसीं ॥२१॥
श्रीरामहृदया हृदय मिनले । तेणे रामहृद्गत सगळे ।
निजहृदया तत्काळ आले । सुख कोंदलें अगाध ॥२२॥
निजराज्यें सुखैकघन । स्वये होवोनि रघुनंदन ।
मिनले जे ऋषिजन । मांडिलें संभावन तयांचें ॥२३॥
सहस्त्रशतमश्वानां धेनूनां च गवां शतम् ।
ददौ शतवृषान् पूर्वद्विजेभ्यो मनुजेश्वरः ॥१॥
त्रिंशत्कोटिहिरण्यस्य ब्राह्मणेभ्यो ददौ पुनः ।
ननभरणवस्त्राणि महार्हाणि च राघव: ॥२॥
श्रीरामांनी वसिष्ठादिकांची पूजा करून त्यांना सहस्रशः गोदाने व द्रव्यदाने दिली :
वसिष्ठादि प्रमुख । क्रषिमंडळीं अलोलिक ।
श्रीरामासी अभिषेक । मंत्रोक्त देख जिही केला ॥२४॥
वेदोक्त विधिपाळण । करोनि होम प्रधान ।
लोकपाळां संतोषवून । रघुनंदन अभिषेकिला ॥२५॥
तया क्रषीश्वरांची पूजा । करिता झाला रघुराजा ।
वसिष्ठ निजगुरू वोजा । प्रथम पूजा तयाची ॥२६॥
कामधेनूचीं शतसहस्रें । सुवर्णशृंगी रौप्यखुरे ।
सवृषभ युग्में परिकरे । द्रव्यें अपारे कोटिसंख्या ॥२७॥
धान्यकोठारें असंख्य पूर्ण । श्रीरामे सद्गुरु पूजिला जाण ।
तैसेचि ऋषी इतर जन । श्रीरामे आपण पूजिले ॥२८॥
रोड दुर्बळ दीन याचक । श्रीरामदर्शनें सकळा सुख ।
सांगणें मागणें ठेले निःशेख । मनोवृत्ति देख नित्यतृप्त ॥२९॥
देखता श्रीराम श्रीमुख । याचकासी झाले परम सुख ।
तृप्तीची दोंदे पेलली देख । हरिखें हरिख दाटला ॥३०॥
श्रीराम दानें देता प्रबळ । नगरी मागत्यांचा दुकाळ ।
सकळा स्वसुखाचा कल्लोळ । निजानंद केवळ श्रीरामे ॥३१॥
निष्ठा देखोनि अद्भुत । कृपेनें वोळला श्रीरघुनाथ ।
नमागतांचि अभर करित । द्वारी वोळंगत महासिद्धि ॥३२॥
वस्त्रे भूषणे सुमन चंदन । सुवासित माळा गहन ।
वसिष्ठा सद्गुरुसहित जाण । रामे ब्राह्मण सुखी केले ॥३३॥
देव-दानव-मानव यांचा श्रीरामांकडून सत्कार :
ऐसे ब्राह्मणांचे पूजन । श्रीरामे केले आपण ।
मंडळवर्ती राजे जाण । त्याचेंही पूजन तैसेंचि ॥३४॥
वस्त्रे भूषणे टिळेमाळा । मंडळवर्ती भूपाळां ।
पूजिता झाला घनसांवळा । सन्मान सकळा देवोनी ॥३५॥
ब्रह्मा इंद्र ईशान । मरुद्गणेंसीं' अमरेंद्र जाण ।
दानव मानव पन्नग पूर्ण । स्वये रघुनंदन पूजित ॥३६॥
सकळीं आणिली उपायनें । त्याहूनि अधिक कोटिगुणें ।
स्वये देवोनि रघुनंदने । सकळ सुरगण गौरविले ॥३७॥
त्याहूनि अनंत अधिक । श्रीरामे देवोनि निजसुख ।
सुखी केले सकळ लोक । द्वंद्वदुःख जेथे न रिघत ॥३८॥
जेथे न रिघे मीतूंपण । पावों न शके देहाभिमान ।
दृश्य द्रष्टा आणि दर्शन । त्रिपुटीचें भान जेथ नाही ॥३९॥
देखता श्रीराममुख । एवढे पावले निजसुख ।
राम कृपाळू नेटक । आत्मत्वें देख निवविले ॥४०॥
निकटवर्ती निजगण । सुग्रीवादि बिभीषण ।
त्यांची पूजा रघुनंदन । स्वये आपण करिता झाला ॥४१॥
पूजावया निजगण । स्वये बोलवी रघुनंदन ।
तेणे काळे भरत जाण । स्वये आपण पुढे झाला ॥४२॥
बिभीषण सुग्रीव हनुमंत । अंगदेसीं अति विनवीत ।
भरतें विनविला रघुनाथ । धर्मयुक्त नीतिवचनें ॥४३॥
पितृआज्ञा निज नेमस्त । चौदा वर्षे वनवासव्रत ।
स्वामींनी संपादिलें यथार्थ । बंधूसहित स्त्रियेंसी ॥४४॥
तैसे निजराज्याचें शासन । तुझे आज्ञेकरोनि जाण ।
केले राज्यपरिपालन । किंकर' दीन मी तुझे ॥४५॥
आपल्याप्रमाणेच लक्ष्मणाला अभिषेक करण्याची रामांना भरताची विनंती :
पितृआज्ञानिजनेमांतीं । राज्याभिषेक जया रीती ।
तुम्ही अंगाकारिला रघुपती । सौमित्र त्या स्थितीं अभिषेका ॥४६॥
सांडोनि आहार विहार । तुच्छ करोनिया शरीर ।
श्रीरामसेवे नित्य तत्पर । आठी प्रहर सावध ॥४७॥
श्रीरामसेवेचें महिमान । ख्याति वर्णी त्रिभुवन ।
सौमित्रे जग पावन । सौमित्रे व्रत साच केले ॥४८॥
देहावरी आल्या आघात । श्रीरामभजनी नव्हे च्युत ।
ऐसे शास्त्र गर्जत । ते केले यथार्थ सौमित्रे ॥४९॥
सांडोनि क्षुधेतृषेची आस । कळिकाळावरी घालोनि कांस ।
श्रीराम सेविला सावकाश । भाग्य असोस सौमित्राचें ॥५०॥
यौवराज्यभिषिंचन । त्यासी करावे आपण ।
करोनि श्रमाचें परिहरण । सुखसंपन्न निजराज्ये ॥५१॥
जैसे भरताचे विनवण । तैसे सुग्रीव बिभीषण ।
अंगदासहित वानरगण । हनुमान आपण विनवीत ॥५२॥
जिंकोनियां निद्रातंद्रा । निःशेष त्यजोनियां आहार ।
सौमित्रे सेविले रामभद्रा । जन्मोद्धारालागोनी ॥५३॥
श्रीरामभजनाची पदवी । आचार्यत्व निजगौरवी ।
दीक्षा दाखविली बरवी । ख्याति देवीं वानिजे ॥५४॥
त्या सौमित्राचे अभिषिंचना । यौवराज्य देवोनियां जाणा ।
संतोषवावें रघुनंदना । तूंचि निजजनां कृपाळू ॥५५॥
भरतआदि निजगण । ऐकोनि तयांचें वचन ।
संतोषला रघुनंदन । सौमित्र आपण बोलाविला ॥५६॥
कृपापूर्ण रामरावो । सौमित्र बोलावोनि पहाहो ।
सांगता झाला अन्वयो । श्लोकपर्यायो अवधारा ॥५७॥
नित्यानुरक्तं मेधावी लक्ष्मणं वाक्यमब्रवीत् ॥३॥
आतिष्ट धर्मज्ञ मया सहेमां गां पूर्वराजाध्युषितां बलेन ।
तुल्यं यथा त्वं पितृभिःपुरस्तात्तैयौवराज्ये धुरमुद्वहश्च ॥४॥
श्रीरामकृत लक्ष्मण प्रशंसा व त्याला यौवराज्यपद स्वीकारण्याची आज्ञा :
सौमित्र सुमित्रानंदना । निजमैत्रीच्या अधिष्ठाना ।
बंधुपणाची अवज्ञा । अगुमात्र जाण तुज नाही ॥५८॥
मी एक बंधु अंतरंग । ऐसा अणमात्र नाही दाघ ।
नीचसेवेसी सर्वांग । तुवा सांग वेंचिलें ॥५९॥
सांडोनि बंधुत्व अभिमान । नीच दासाचेपरी जाण ।
माझे सेवेसी वेंचिला प्राण । अंगी बाण साहोनी ॥६०॥
सांडोनि आहारविहार । श्रीरामभजनी नित्य तत्यर ।
निद्रा नाही अहोरात्र । निरंतर सावध ॥६१॥
मस्तकी काष्ठाचे संभार । जीवन! वाहिलें निरंतर ।
बांधोनियां निजउदर । आम्हा फळाहार पुरविला ॥६२॥
त्रिकाळीं चरणक्षाळण । दोघांचें चरणसंवाहन ।
उसंत नाही क्षण । तत्प्रवीण अहर्निशी ॥६३॥
एक एक दिवसींची सेवा । आठवितां बंधुदेवा ।
कांप येतसे जीवा । देहभावा उरी कैंची ॥६४॥
सीतेलागीं होवोनि भ्रांत । आप आपणा विसरत ।
तुज मारू धावे लात । ते तू निवांत साहिली ॥६५॥
मी भ्रांत तै सावध करिसी । मज भागल्या श्रम हरिसी ।
मज शोकाकुलिताचा फेडिसी । सावकाशीं सकळ श्रम ॥६६॥
तो आठवितां पाहे । हदय फुटोनि ठिकरिया होये ।
बहुत बोलावें म्या काये । शिवतले पाहे चरण तुझे ॥६७॥
तुझिया भजनाचें अंकिलें । जीवे सर्वस्व विकिले ।
यावरी ते काय बोले । मौन पडिले चहू वाचां ॥६८॥
निजपित्याचे राज्य आहे । ते दोघे चालवूं समन्ययें ।
पितृआज्ञा ऐसीच आहे । ते तू स्वये अंगीकारीं ॥६९॥
चौदा वर्षे नेमस्त । पितृआज्ञा राज्यीं भरत ।
तैसेंचि आम्हा नेमस्त । वनवासप्रत तितुकेंचि ॥७०॥
पाळोनि पितृआज्ञेसी । आम्ही आलो निजराज्यासी ।
वसिष्ठे अभिषेकिले आम्हांसी । तू यौवराज्यासी अंगीकारीं ॥७१॥
म्हणोनि निजकृपापूर्वक । आज्ञापिता रघुकुळटिळक ।
येरू झाला पै साशंक । विघ्न अलोलिक मज आले ॥७२॥
यौवराज्यभिषिंचन । करावया रघुनंदन ।
स्वये करी आज्ञापन । येरू उद्विग्न स्वये झाला ॥७३॥
ते ऐकताच लक्ष्मणाला दुःख होऊन तो मानसी उद्विग्न झाला :
सौमित्र मर्यादेसी मंडन । स्वामीसी न देववे प्रतिवचन ।
अति संकोचित झाले मन । घाली लोटांगण हरिचरणी ॥७४॥
अश्रु पूर्ण आले नयनी । कंठ दाटला बाष्पेंकरोनी ।
भ्रमित झाला हृदयभुवनीं । गिरा' वचनी पांगुळली ॥७५॥
प्रेमे उकसाबुकसीं रडे । स्फुंदस्फुंदोनि पाया पडे ।
विघ्न आले मज रोकडे । कोणीकडे जाऊ आता ॥७६॥
का क्षोभला रघुनंदन । कांही अपराध घडला पूर्ण ।
त्याचे हेंचि दिसे चिन्ह । राज्याभिषिंचन सौमित्र ॥७७॥
श्रीरामासी सकळ सुमित्र । तेणे तो सकळांचा कुमित्र ।
मजसी मांडिला वैराकार । राज्यभार देऊ पाहती ॥७८॥
श्रीरामराज्यें सकळा सुख । तेंचि मज ओढवले दुःख ।
पूर्ण क्षोभला रघुकुळटिळक । गिळिलो अशेख महापापे ॥७९॥
वनवासी एकाएकी असता । अपराध घडला न कळतां ।
तेणे क्षोभ आला रघुनाथा । राज्याभिषेक मज करी ॥८०॥
राज्यामाजी परम सुख । ऐसा जनवाद असे देख ।
पुण्यफळ अलोलिक । ऐसे लोक बोलती ॥८१॥
पुण्य नव्हे पातक । माझी प्रतीति निष्टंक ।
ग ऐक तयाचा विवेक । मतिविशेष सांगेन ॥८२॥
राज्यमदाचे दुष्यरिणाम :
राज्यमद चढल्या देही । राम सर्वथा नाठवे पाही ।
सर्वेद्रियें अंध पाही । कार्यकारण कांही स्मरेना ॥८३॥
अंतरी संचरल्या भोगकाम' । कोणाची सेचा कैंचा राम ।
सर्वथा नाठवे धर्माधर्म । पडे भ्रमे अति अंध ॥८४॥
सर्प लागलिया जाणा । बुद्धि पालटे तत्क्षणां ।
कटुमधुराचिया ज्ञाना । विंवचना कळेना ॥८५॥
अत्यंक कदु निंब कैसा । गोड म्हणोनि खाये घसघसां ।
गूळ टाकी निंब जैसा । भ्रम मानसा दृढत्वें ॥८६॥
भ्रम चढत अंतःकरणी । तेचि इंद्रियां विपरीत करणी ।
विषयसेवन अनुदिनी । आणिक मनी नाठवे ॥८७॥
विषय म्हणो विषासमान । यांसंगें अधःपतन ।
ऐका तयाचे लक्षण । निजचिन्ह नित्यत्वें ॥८८॥
विषं समानं विषयो यकाराद्विषयोऽधिकः ।
विषमेकाकिनं हन्ति विषयाश्च पुनःपुनः ॥४॥
विषयसंगतीचे परिणाम :
विषय म्हणो विषासमान । तरी विषाहूनि विषय गहन ।
विषभक्षणें एकदां मरण । पुनः पुन्हा पतन विषयार्थीं ॥८९॥
स्वभावे विषय दृष्टी पडता । तत्काळ मोह उपजे चित्ता ।
ऐका त्याचीही व्यवस्था । घातकता वृत्तीची ॥९०॥
लसुणाचे संगतीं जाण । कस्तूरीचे आच्छादे सुवासपण ।
दुर्गंधीचे बळ दारुण । सुवास जाण गिळोनि जाय ॥९१॥
राज्यभोगविषयो पूर्ण । अखंड भोगाचें अधिष्ठान ।
स्रकचंदनादि गहन । भोग दाटून पुढे येती ॥९२॥
भोग आदळल्या अंगेंसी । दाटोनि प्रवेशती मानसी ।
क्षणे मुलविती प्राण्यासी । सावधानतेसी ठाच कैंचा ॥९३॥
अणुमात्र विषयस्थिती । हिताहित कोण चिंती ।
विषय तो परमघाती । नरकप्राप्ती आकल्प ॥९४॥
तेथे कैंचा रघुनंदन । कोण स्मरे श्रीरामभजन ।
कैंचा परमार्थ कैंचें ज्ञान । भ्रमित मन होवोनि ठाके ॥९५॥
कैंचा जप कैंचें ध्यान । कैंचा यज्ञ केचें ज्ञान ।
कोण स्मरे रघुनंदन । विषयबंधन अनिवार ॥९६॥
विसरोनियां रघुनाथा । नरकी बुडिजे तत्वता ।
एवढी अंगी वाजे अवस्था । अति बाधकता विषयांची ॥९७॥
लक्ष्मणाची वनवासातील रामसेवा :
वनवासी असता पूर्ण । अखंडता रामानुसंधान ।
वना जाय फळांलागून । तेथेही ध्यान खंडेना ॥९८॥
आसनी भोजनी शयनी । स्तानी दानी गमनागमनी ।
जागृतिसुषुप्तिस्वप्नीं । अखंड चिंतनीं श्रीराम ॥९९॥
श्रवणीं राम नयन राम । वाचेसी वदनी नित्य राम ।
अखंड हृदयी चिंतनीं राम । ध्यानीं राम सर्वदा ॥१००॥
करी चरणसंवाहन । चरणी नित्य प्रदक्षिण ।
आलोडोनियां सकळ वन । फळभोजना फळे आणी ॥१०१॥
रात्री होवोनि जागारी । फेरे घालीं निरंतरी ।
ऐसी श्रीरामसेवा अहोरात्री । सर्वोपरी करितसें ॥१०२॥
चरणक्षाळणा आणीं जीवन । त्रिकाळ करी पादक्षाळण ।
त्रिकाळ करी नीराजन । मुखावलोन त्रिकाळ ॥१०३॥
श्रीरामहोमालागून । नित्य माथा वाहें इंधन ।
तेणे मी सुखैकघन । आनंदमग्न सर्वदा ॥१०४॥
श्रीरामसेवा करिता पूर्ण । जिंतोनिया मानाभिमान ।
छेदिलें मी देहबंधन । स्वरूप चिद्धन पावावया ॥१०५॥
तेथे अंगीकारिता राज्यासी । अत्यंत होईन विषयविलासी ।
राम नाठवे मानसी । अधःपातासी जाईन तेणे ॥१०६॥
म्हणाल राज्यी श्रीरघुनाथ । असता होई न विषयासक्त ।
तरी विषयबाधा अद्भुत । तुजही निश्चित न होईल ॥१०७॥
राम निर्विषय तुज का विषय । ऐसा सुचला जरी अन्वय ।
तेही विषयींचा अभिप्राय । सावधान परिसावा ॥१०८॥
श्रीरामांची निर्विषयता :
राम अवतारा अवतारी । राम व्यापक चराचरी ।
रामी मिथ्या नरनारी । विषयउरी तेथे कैची ॥१०९॥
पूर्णब्रह्म रघुनंदन । तेथे मिथ्या राज्यभान ।
राम नित्य सावधान । ऐका चिन्ह सांगेन ॥११०॥
विश्वामित्रयागाप्रती । अनिद्र राहोनि सात रातीं ।
राक्षसांची जाति व्यक्ती । केली शांत श्रीरामे ॥१११॥
सुबाहु वधिला बाणधारा । मारीच उडविला अंबरा ।
साह्य व्हावया दशवक्त्रा । ठेविला पुरा तद्वध ॥११२॥
देखता ऋषिवरांचा पाळा । चरणी उद्धरली शिळा ।
पर्णावया जनकबाळा । यागा आला जनकाच्या ॥११३॥
धनुष्य चढवितां गुण । धुळीं मेळविला रावण ।
ते भंगिले न लागता क्षण । जनकनंदिनी पर्णिली ॥११४॥
वडवानळ क्षात्रकुळासी । एकवीस वेळां धरित्रीसी ।
केले निःक्षत्री वेगेंसीं । त्या भार्गवासी गांजिलें ॥११५॥
सांडोनिया क्षात्रदर्पा । वना धाडियेले तपा ।
त्या श्रीरामप्रतापा । वाग्जल्पा केंवी वर्णवे ॥११६॥
त्यागोनियां निजराज्यासी । झाला वनस्थ वनवासी ।
विषयलोभ श्रीरामासी । नाही मानसी सर्वथा ॥११७॥
स्वये वर्जिता दशरथ । न सांडी वनवासव्रत ।
येवोनियां भरत । अति निघात मांडिला ॥११८॥
त्याचा न करोनि अंगीकार । बोळविला भरत त्रीर ।
होवोनियां वनवासी वनचर । ख्यातिचरित्रें पै केली ॥११९॥
म्हणाल असेल प्रतिष्ठाकाम । अथवा विषयी असेल राम ।
सुखे वनी विषयाराम । होत असे परम सीतेसी ॥१२०॥
दशग्रीवें नेता सीता । स्वये दाविली तेचि अवस्था ।
झाडा खोडा खेंव देता । होय गर्जता सीते सीते ॥१२१॥
आम्ही म्हणो विषयी राम । सीतेसाठी चढला भ्रम ।
तंव तो सर्वथा निष्काम । परब्रह्म श्रीराम ॥१२२॥
भ्रांत देखोनि रघुनाथा । छळू आली शिवकांता ।
अति सुंदर होवोनि सीता । श्रीरघुनाथापुढें ठेली ॥१२३॥
राम बोभाये सीता सीता । उमा ओ दे रघुनाथा ।
तीतें सांडोनि तत्वता । होय आळविता आनौतें ॥१२४॥
राम धांवे आणिकीकडे । उमा राहे येवोनि पुढे ।
रामे ओळखिली निवाडे । आम्ही पुढे जाणा ना ॥१२५॥
मी सांगे पुढे सीता । राम न मानी सर्वथा ।
करू धांवे माझ्या घाता । कैंची सीता म्हणोनी ॥१२६॥
टक देवांदानवांसी । टक पडली सुरसिद्धांसी ।
पुढे देखता सीतेसी । राम तिसी नोळखे ॥१२७॥
हाती धरिता श्रीरामासी । राम निखंदी तियेसी ।
आई का वो झोंबसी । शंकरासी त्यजुनियां ॥१२८॥
स्वामी सांडोनि कैलासीं । परपुरुषा का हो छळिसी ।
तुझ्या लागतों चरणांसी । सोडी आम्हांसी जननिये ॥१२९॥
नाही कामाचा अंकुर । क्रोध नाही अणुमात्र ।
नित्य सावध श्रीरामचंद्र । उमा सत्वर नमियेली ॥१३०॥
तेणे खोंचली जिव्हारी । उमा श्रीरामचरण धरी ।
वृथा भ्रमसी कामाचारी । कोणेपरी श्रीरामा ॥१३१॥
राम म्हणे शिवापासीं । पुसो जाये वो वेगेंसीं ।
स्वमुखें पै निजकीर्तीसी । कोणासीही नये सांगू ॥१३२॥
सांडोनिया कपटच्छळण । उमा झाली अनन्य शरण ।
तिसी देवोनि समाधान । केली बोळवण कैलासा ॥१३३॥
ऐसा श्रीराम निष्काम । तेथे कैचा रिघे काम ।
ऐकता श्रीरामाचे नाम । होय भस्म कामाचें ॥१३४॥
श्रीरामाची सावधानता । श्रीरामचि जाणे तत्वता ।
ते नये आणिकाचे हाता । अवतारसामर्थ्यता रामाची ॥१३५॥
श्रीरामे अवतारा अवतारसत्ता । श्रीराम प्रकृतिपुरुषांचा कर्ता ।
त्या श्रीरामाची सामर्थ्यता । नये हाता आणिकांच्या ॥१३६॥
असो श्रीरामाची कथा । अनुसरोनि भरतव्रता ।
अंगीकारुनी युवराजता । आला रघुनाथाची पाळावी ॥१३७॥
तेहि विषयींचा वृत्तांत । सावध ऐका सुनिश्चित ।
संपादावया वनवासव्रत । केले अद्भुत श्रीरामे ॥१३८॥
वधोनिया लंकानाथ । संस्थापिला शरणागत ।
बंदी सोडवोनि देव समस्त । स्थापिले निश्चित स्वपदीं ॥१३९॥
मुक्त करोनि जनस्थान । ब्राह्मणांसी द्यावे दान ।
म्हणोनिया रघुनंदन । भरत आपण अनुग्रहिला ॥१४०॥
राज्यी असोनि निर्लोभता । देही असोनि विदेहता ।
भोगी असोनि अभोक्ता । श्रीरघुनाथाचेनि धर्मे ॥१४१॥
मिष करोनि पादुकांचें । अंतरी प्रवेशला त्याचे ।
तेणे सामर्थ्य भरताचे । वंदी साचे त्रैलोक्य ॥१४२॥
श्रीराम आणि रावण । अलौकिक युद्धत्राण ।
आणिका गोष्टी न करवे जाण । थरकांप पूर्ण चित्तासी ॥१४३॥
तैसा राम देव भरत भक्त । हे त्याचे त्यासीच साजे व्रत ।
येर शब्दावरी श्लाघत । परी शब्दार्थ लाभेना ॥१४४॥
म्हणोनि देवपण रघुनाथीं । भक्तपण साजे भरतीं ।
येरा न साथेचि युक्ती । विषयगतीं आदळिजे ॥१४५॥
स्मरता श्रीरामनाम । विषय होती भस्म ।
तेथे करिता भजनधर्म । विषय दुर्गम कोणासी ॥१४६॥
मला यौवराज्यपद नको, ते भरताला द्यावे अशी लक्ष्मणाची वसिष्ठांना प्रार्थना :
ऐसा आहे निश्चितार्थ । श्रुतिशास्त्रे साक्षी वेदांत ।
तरी राज्य। शिवेना माझे चित्त । आण निश्चित श्रीरामाची ॥१४७॥
स्वामी वसिष्ठा सत्य जाण । शिवितले जी तुझे चरण ।
राज्य न शिवे आपण । श्रीरामचरण सांडूनी ॥१४८॥
मनसा वाचा कर्मणा । राज्यलोभ नाही जाणा ।
संदेह न धरावा आपणा । सत्य प्रमाण हे माझे ॥१४९॥
राज्यीं असोनि भरत । तपें कष्टला अद्भुत ।
सकळ भोगविरक्त । होवोनि रघुनाथ सेविला ॥१५०॥
त्यासी करोनि अभिषिंचन । भरत सुखावी पूर्ण ।
तेणे मज सुख गहन । भरता अभिषिंचन देखिलिया ॥१५१॥
आणि राज्यभारहस्तक्रिया । मज नाही जी गुरुवर्या ।
भरत युक्ति राज्याचिया । निःसंदेह जाणत ॥१५२॥
चौदा वर्षे अलिप्तपणें । श्रीरामाहूनि अधिकगुणे ।
राज्यपाळण भरतें येणे । सुखसंपन्ने नांदती प्रजा ॥१५३॥
श्रीरामे सुख सकळांसी । त्याहूनि भरता विशेषी ।
वर्णिता श्रीरामगुणासीं । सुखैकराशी समस्ता ॥१५४॥
देशोदेशींचे भूपती । भरतमुखें श्रीराम कीर्ती ।
ऐकावया अति प्रीती । भरता येती लोटांगणी ॥१५५॥
असो भूपाळांचें वृत्त । महाऋषि जे विख्यात ।
सदा ब्रह्मानंदे तृप्त । तेही येत भरता पै ॥१५६॥
सांडोनिया निजाश्रम । श्रीरामकीर्तीसी सप्रेम ।
येवोनियां ऋषिसत्तम । आल्हादे परम श्रवण करिती ॥१५७॥
श्रीरामकीर्तीचिया प्रीती । अयोध्येसीं अद्भुत वस्ती ।
धन्य भरताची संगती । श्रीरामकीर्ती सुख सर्वा ॥१५८॥
म्हणोनि भरतासी आपण । यौवराज्यीं अभिषिंचून ।
सुखी करावे सकळ जन । कीर्ति पावन श्रीरामे ॥१५९॥
म्हणोनि सौमित्रे आपण । घालोनि गुरूसी लोटांगण ।
धरिले श्रीरामाचे चरण । करावे अभिषिंचन भरतासी ॥१६०॥
लक्ष्मणाची विरक्ती पाहून सर्वजण विस्मयचकित :
गुरूचे शिवोनियां चरण । सौमित्रे वाहिली आण ।
देखोनि त्याचे निर्वाण । श्रीरघुनंदन तटस्थ ॥१६१॥
सभा झाली तटस्थभूत । सुर सिद्ध अति विस्मित ।
ब्रह्मादिक चाकाटत । लोकपाळ तेथ वेडावले ॥१६२॥
देखोनिया सौमित्राची विरक्ती । सुमनें वर्षल्या सुरपंक्ती ।
जय जय गर्जे त्रिजगती । सभाग्य निश्चिती सौमित्र ॥१६३॥
सर्वस्व त्यजोनि वहिला । श्रीरामसेवे वना गेला ।
सर्वभावे राम सेविला । त्यजूनि दादुला आहारातें ॥१६४॥
परतोनि आलिया राज्यासी । राज्यलोभ नाही मानसी ।
सौमित्राच्या भाग्यासी । सीमा वेदांसी न करवे ॥१६५॥
कोणाला यौवराज्याभिषेक करावा असा प्रश्न रामांनी विचारल्यावरून
भरतालाच अभिषेक करावा असे वसिष्ठांचे रामांना उत्तर :
सौमित्र न घे अभिषेकासी । यौवराज्यासी स्थिती कैसी ।
अभिषेक करावा कोणासी । श्रीवसिष्ठासी राम पुसे ॥१६६॥
सौमित्राची निर्विषयता । येणे संतोष वसिष्ठचित्ता ।
सौमित्र आलिंगोनि तत्वता । होय बोलता रामासी ॥१६७॥
तू अंतर्यामी रघुवीर । जाणसी सकळांचे अंतर ।
आम्हांसि पुसणे विचार । हा वृद्धाचार राखिसी ॥१६८॥
तुझे नाम अंतर्यामी । अंतर जाणता तू स्वामी ।
काय विचार सांगणें आम्ही । तुमचे तुम्ही विचारा ॥१६९॥
ज्याची जैसी अंतर्वृत्ती । जो भजे जैसिया रीती ।
त्याचिया मनोरथाप्रती । निजविश्रांती तू दाता ॥१७०॥
सांडोनि तुझे चरणसेवन । सौमित्रासी राज्याभिषिंचन ।
सर्वथा नाही नाही जाण । वाहून आण सांगतसे ॥१७१॥
ज्यासी तुझ्या चरणी प्रीती । त्यासी बळेंचि रघुपती ।
राज्य देणे न घडे निश्चिती । नये वृत्तीसी खेद करू ॥१७२॥
आण राज्यनीतिविचार । ज्यासी जेथे नाही आदर ।
त्यावरी करिता बलात्कार । विकळ समग्र होऊं पाहे ॥१७३॥
सौमित्र राज्यीं उदासीन । तो केवी करी राज्यशासन ।
तू श्रीराम सर्वज्ञ । योग्यायोग्य पूर्ण जाणसी ॥१७४॥
भरत सर्वाथी सावधान । ज्ञाने विरक्ती श्रीरामभजन ।
सकळाथीं कुशल पूर्ण । करी अभिषिंचन भरतासी ॥१७५॥
ऐकोनि श्रीवसिष्ठवचन । श्रीराम झाला सुखैकघन ।
स्वये उठोनि आपण । सौमित्र धरोनि आलिंगिला ॥१७६॥
श्रीरामहृदया हृदय मिनले । दुणे वैराग्यपुट झाले ।
सबाह्य स्वरूप कोंदलें । अहाळबहाळ रामाचे ॥१७७॥
d
मनोरथ पूर्ण केल्याबद्दल लक्ष्मणाचे रामांना वंदन व रामस्तुती :
q
चरणांवरी ठेवोनि माथा । सौमित्र विनवी रघुनाथा ।
मनोरथ पूर्ण करिता । कृपावंता श्रीरामा ॥१७८॥
तू अनाथाची माउली । आर्त श्रांतांची साउली ।
निजजनां कल्पवल्ली । शृतीची बोली ऐकिजे ॥१७९॥
ते आजि आले फळा । प्रसन्न झालासी घननीळा ।
सोडविले सकळा । घोर दुःखापासूनी ॥१८०॥
आजि भाग्य आले फळासी । चुकोनियां राज्यभ्रमासी ।
अधिकार लाधलों सेवेसी । निजहरिखेंसी नाचत ॥१८१॥
यौवराज्याभिषिंचन । भरता करील रघुनंदन ।
शत्रुघ्ना सेनानीपण । सकळ जन सुखमय ॥१८२॥
ते कथा अति गहन । श्रोती द्यावे अवधान ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥१८३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
सौमित्रविरक्तिकथनं नाम पंचाशीतितमोऽध्यायः ॥८५॥
ओंव्या ॥१८३॥ श्लोक ॥५॥ एवं ॥१८८॥
