॥ श्रीएकनाथमहाराजकृत
4.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अरण्यकाण्ड
॥ अध्याय चौथा ॥
मंदकर्णी ऋषींचा उद्धार
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
मंदकर्णी ऋषींचा उद्धार
शरभंगे दिवं प्राप्ते मुनिसंघाः समंततः ।
अभ्यगच्छंत ककुत्स्थं रामं ज्वलिततेजसम् ॥१॥
ब्राह्मण आश्रयार्थ श्रीरामांकडे येतात :
विराध वधिला अति दारुण । केले शरभंगोद्धरण ।
ते देखोनि मुनिगण । आले ठाकून श्रीरामा ॥१॥
वैखानस वालखिल्य । अग्निहोत्री शुद्धशीळ ।
राक्षसभये अति व्याकुळ । आले सकळ श्रीरमापासीं ॥२॥
जळाहारी फळाहारी । जताधारी ब्रह्मचारी ।
पत्राहारी वायुआहारी । निरहारी ऋषी आले ॥३॥
एक भगवे एक नागवे । वल्कलधारी मळिन लेवे ।
राक्षसभये आले आघवे । आम्हा राघवें रक्षावें ॥४॥
एकांगुष्ठाव्रत एकांसी । एक ते वृक्षाग्रनिवासी ।
एक ते एकपाद तापसी । भयें संन्यासी येवो सरले ॥५॥
जळवासी आकाशवासी । विवरवासी अहर्निशी ।
एक ते सदा शमशानवासी । तेही धाकेंसीं येवो सरले ॥६॥
राक्षसधाकाची धुकधुक । सपत्नीक अपत्नीक ।
विधुर आले पै अनेक । रघुकुळटिळक संरक्षी ॥७॥
वृक्षवृद्धें श्रीरामाप्रती । अतिशये येती काकुळती ।
राक्षसमहामार अती । आम्हा रघुपती रक्षावे ॥८॥
एक बोचरे उखळे हाती । फळे ठेंचठेंचोनि खाती ।
तेही आले श्रीरामाप्रती । राक्षयभये महाभीत ॥९॥
ज्ञानी ध्यानी समाधानी । राक्षसभये भिवोनी ।
आले श्रीरामा ठाकोनि । अवघे मुनी एकत्र ॥१०॥
एवं वयं न मृष्यामो विप्रकारं तपस्विनाम् ।
क्रियमाणं वने घोरं रक्षोभिर्भीकर्मभिः ॥२॥
ततस्त्वां शरणार्थ च शरण्यं समुपस्थिताः ।
परिपालय नो राम वध्यमानान्निशाचरैः॥३॥
ब्रह्मवृंदाची गार्हाणी :
सांगती राक्षसांच्या कडोविकडी । मारिल्या तापसांच्या कोडी ।
मांस खावोनि सांडिली मढी । लोळती बापुडी असंस्कारें ॥११॥
जे संस्कार करु जाती । त्यांसी राक्षस येवोनि खाती ।
ऐसी मढी नेणो किती । लोळती क्षिती श्रीरामा ॥१२॥
आम्ही आलो तुजपासी । राक्षसी बहुत केली कासाविसी ।
शरण आलो तुझ्या चरणांसी । आता संरक्षी श्रीरामा ॥१३॥
आम्हांसी रक्षिता नाही कोणी । दैवे आलासी तू धनुष्यपाणी ।
आम्ही घालितो लोटांगणी । आमच्या रक्षणीं सज्ज होई ॥१४॥
आम्ही तुझे शरणागत । शरण आलो गा समस्त ।
तू कृपाळु श्रीरघुनाथ । दिननाथें अनाथ रक्षावे ॥१५॥
आम्ही केवळ गोब्राह्मण । काया वाचा मनसा शरण ।
आमचें करावे संरक्षण । अवघे जण प्रार्थिती ॥१६॥
श्रीरामांचे विनम्र उत्तर :
ऐसे ब्राह्मणाचें दीन भाषण । ऐकोनिया श्रीरघुनंदन ।
कळवळोनियां संपूर्ण । काय आपण बोलत ॥१७॥
रामस्तेषां वचःश्रुत्वा तापसानां तपस्विनाम् ।
इदं प्रोवाच धर्मात्मा सर्वानेव तपस्विनः॥४॥
नैवमर्हथ मां वत्कुमहमेवं सलक्ष्मणः ।
तपोवृद्धान्वयोवृद्धान्शरण्यान्शरणागतः ॥५॥
भवतामर्थसिध्यर्थमागतोऽहं यदृच्छया ।
तस्य मेऽयं वने वासो भविष्यति महाफलः ॥६॥
तपस्विनां रणे शत्रून्हन्तुमिच्छामि राक्षसान् ।
पश्यंतु विर्यमृषयः सभ्रातुर्मे तपोधनः ॥७॥
श्रीराम म्हणे मी किंकर कोण । नव्हे तुमच्या दासासमान ।
त्या मज म्हणा आलो शरण । हे नव्हे वचन तुम्हा योग्य ॥१८॥
तुम्ही वयोवृद्ध तपोवृद्ध । सज्ञान ज्ञानी अति प्रबुद्ध ।
जेष्ठ महासिद्ध । सन्मानवाद न वदावा ॥१९॥
तुम्हांपासूनि घ्यावा मान । तेचि आम्हांसी विषप्राशन ।
तुम्ही माझे देवतार्चन । साधुसज्जन मज पूज्य ॥२०॥
आमुचा धर्म द्विजरक्षण । वना आलो याचि कारण ।
खरदूषणनिर्दळण । संरक्षण साधूंसी ॥२१॥
तुमचे आशीर्वादजोडीं । रणांगणी निजपरवडीं ।
मारीन राक्षसांच्या कोडी । अर्धघडी न लागता ॥२२॥
ऐसी ऐकोनि श्रीरामवाणी । जयजयकार केला ब्राह्मणी ।
हर्ष पावोनि मुनिगणीं । आशीर्वचनी अभिषेक ॥२३॥
स राघवःसह भ्रात्रा वैदेह्या च परंतपः ।
सुतीक्ष्णस्याश्रमपदं जगाम सहितो द्विजैः ॥८॥
सीता लक्ष्मण रघुनाथ । सांगतें मुनिगण समस्त ।
शरभंगानें धाडिले जेथ । त्या आश्रमा जात सुतीक्ष्णाच्या ॥२४॥
सर्वजण सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमी जातात :
सुतीक्ष्ण ऋषि महाश्रेष्ठ । तपस्तेजें अति तेजिष्ठ ।
त्याच्या आश्रम सुखोद्दिष्ट । दुःखसंकट असेना ॥२५॥
नवल आश्रमाची लीला । सुवास सुस्वाद फळमूळां ।
आचमन करिता तेथींच्या जळा । भ्रमा सकळा निवारी ॥२६॥
आश्रमा येतांचि देख । अवघ्या आले परम सुख ।
सुखावोनि रघुकुळटिळक । ऋषिसन्मुख तो आला ॥२७॥
श्रीरामांचे स्वागत :
आला देखोनि रघुनंदन । ऋषीनें सांडिलें आसन ।
सांडोनिया जप ध्यान । अति सावधान भेटीसी ॥२८॥
ज्यालागीं कीजे जप ध्यान । ज्यालागीं कीजे तपःसाधन ।
ज्यालागी किजे अनुष्ठान । ते हे चिद्रत्न श्रीराम ॥२९॥
ज्यालागीं कीजे वेदपठण । ज्यालागीं कीजे शास्त्रश्रवण ।
ज्यालागीं कीजे योगसाधन । ते हे चिद्रत्न श्रीराम ॥३०॥
ज्यालागीं कीजे व्रत तप । ज्यालागी कीजे रुद्रजप ।
ज्यालागी धैर्य आकल्प । ते हे चित्स्वरुप श्रीराम ॥३१॥
ज्यालागी शिवभवानी । नित्य चिंतिती अनुदिनी ।
तो हा श्रीराम देखिला नयनी । जो त्रिभुवनी परमात्मा ॥३२॥
ज्यालागीं आम्ही नित्य तापसी । ज्यालागी आम्ही वनवासी ।
तो हा श्रीराम अनायासीं । भाग्ये आश्रमासी स्वये आला ॥३३॥
ऐसे ऋषींचें मनोगत । जाणोनिया सुनिश्चित ।
श्रीराम उल्हासयुक्त । चरण वंदित ऋषींचे ॥३४॥
श्रीराम ऋषींचें मनोगत । हृदयी जाणतो हृदयस्थ ।
श्रीराम परब्रह्म निश्चित । ऋषि जाणत निजज्ञानें ॥३५॥
देखणे देखोनि अति तिक्ष्ण । यालागी नांवे सुतीक्ष्ण ।
त्याचे श्रीरामे वंदिलें चरण । दिधले अलिंगन ऋषीने रामा ॥३६॥
स निरीक्ष्य तो धीरं रामं दशरथात्मजम् ।
मूघ्नर्यवघ्राय चाश्लिष्य बाढं वचनमब्रवीत्॥९॥
उपजिघ्रन्नतो मूर्घ्निं वचनं चेढमब्रवीत ।
मत्प्रसादात्सभार्यस्त्वं विहरस्व सलक्ष्मणः ।
रामस्तु सहसौमित्रिः सुतीक्ष्णेनाभिपूजितः ॥१०॥
स्वये सुतीक्ष्णें आपण । आलिंगोनि श्रीराम लक्ष्मण ।
करोनि मस्तकी अवघ्राण । आल्हादे वचन बोलत ॥३६॥
माझा आश्रम दंडकारण्य । येथे नाही भयबंधन ।
श्रीराम सीता लक्ष्मण । सुखसंपन्न वसावे ॥३७॥
माझिया निजआश्रमाआंत । न चले राक्षसांचा घात ।
सुखे वसावें श्रीरघुनाथ । सीतासमवेत स्वानंदे ॥३८॥
अति प्रेमे सुतीक्ष्ण । पूजोनिया श्रीरामलक्ष्मण ।
देवोनि वनफळीं भोजन । षण्मास पूर्ण राहविले ॥४०॥
तमुग्रतपसा दिप्तं महर्षि सत्यवादिनम् ।
आवासं त्वहमिच्छामि प्रदिष्टमिह कानने॥११॥
एवमुक्तस्तु रामेण महर्षिर्लोकाविश्रुतः ।
अब्रवीन्मधुरं वाक्यं हर्षेण महता युतः ॥१२॥
दंडकारण्यात कोठे राहाणे योग्य ? :
सुतीक्ष्ण तपस्तेजोराशी । श्रीराम पुसे स्वये त्यासी ।
मज रहाव्या आश्रमासीं । स्थान नेमेंसीं सांगावे ॥४१॥
शरभंगाची आज्ञा ऐसी । सुतिक्ष्ण सत्यवादी तापसी ।
स्थाननेम पुसोनि त्यासी । त्या आश्रमासी वसावें ॥४२॥
ऐकता श्रीरामाचे वचन । ऋषि झाला सुखसंपन्न ।
दिधले श्रीरामा अलिंगन । सर्वांगी पूर्ण निवाला ॥४३॥
हर्षे सांगे श्रीरामासी । दंडकारण्यनिवासी ऋषी ।
पाहे त्याच्या आश्रमांसी । देखता तुम्हांसी आल्हाद ॥४४॥
जे जे आश्रमी तुम्हांसी । विश्रांति वाटेल अतिशयेंसी ।
त्याचिया निवासस्थानासी । नेमस्तेंसी नेमीन ॥४५॥
करोनि ऋषिआश्रमदर्शन । शीघ्र येथे यावे आपण ।
मग मी निवासाचें स्थान । नेमस्त जाण नेमीन ॥४६॥
ऐकोनि ऋषीचें वचन । श्रीराम सीता लक्ष्मण ।
तिघीं करोनिया नमन । केले गमन दंडकारण्या ॥४७॥
जाण्याचा क्रम बदलण्याची लक्ष्मणाची सूचना :
तंव बोलिला लक्ष्मण । मागे सीता चालता जाण ।
विराधें केले होते हरण । तैसे आपण न करावे ॥४८॥
पुढे श्रीराम मागे सौमित्र । मध्ये घालोनिया सीता सुंदर ।
वेगी निघाले सत्वर । धनुर्धर महाबळी ॥४९॥
सीतेपासीं ऋषिगण । तापस ब्रह्मचारी ब्राह्मण ।
श्रीरामासवे निघाले जाण । त्यांसही रक्षण श्रीराम ॥५०॥
वने उपवनें शुभ काननें । ऋषिआश्रम अगाध स्नानें ।
तापस करिताती अनुष्ठानें । वेदाध्ययनें अगिन्होत्रें ॥५१॥
पाहता ऋषींचे महिमान । आलोडिती दंडकारण्य ।
तंव पुढे तडागी सुगायन । श्रीराम लक्ष्मण ऐकतातई ॥५२॥
श्रेष्ठ तडाग अति पुनीत । त्यामाजीं मनोहर नृत्यगीत ।
परी गातें नाचतें न दिसे तेथ । तेणे विस्मित श्रीराम ॥५३॥
पंचाप्सर सरोवरावर नृत्यगीत ऐकून त्याचा वृत्तान्त विचारतात :
सवे चालती ऋषिगण । त्यांसी श्रीराम पुसे आपण ।
येथे गीत नृत्य करी कोण । मग ते पूर्वकथन सांगती ॥५४॥
ऋषभ ऊवाच :
इदं पंचाप्सरो नाम तटाकं पूर्वकालिकम् ।
निर्मितं तपसा राम मुनिना मांडकर्णिना ॥१३॥
स हि तेपे तपस्तीव्रं मांडकर्णिर्महामुनिः ।
दशवर्षसस्त्राणि वायुभक्षो जलाशये ॥१४॥
या तडागा नाम पंचाप्सर । पुरातन हे सरोवर ।
निर्मिता मांडकर्णि ऋषीश्वर । तेणे तप तीव्र केले ॥५५॥
मंदकर्णीचा तपोभंग करण्यासाठी अप्सरा :
येथे दहासहस्त्र वर्षी । निराहारी वायुभक्षी ।
त्याची स्थिर बुद्धि कैसी । काम मानसी स्पर्शेना ॥५६॥
कर्मठ म्हणती स्वर्ग चांग । ऋषि म्हणे तो क्षयरोग ।
सत्यलोकींचे जे जे श्रेष्ठ भोग । तो मरणमार्ग तयाचा ॥५७॥
जेथवरी विषयासक्ती । तेथवरी पुनरवृत्ती ।
ऐसे जाणोनि निश्चिती । तीव्र तपस्थिति मांडकर्णि ॥५८॥
त्याच्या देखोनि तीव्र तपासी । स्वर्गी हाहाकार सुखरांसी ।
इंद्रें विघ्न मांडिले त्यासी । पंचाप्सरांसी धाडिलें ॥५९॥
रुप यौवन मनोहर । गीत नृत्य सालंकार ।
ते देखोनिया ऋषीश्वर । कामतत्पर पै जाला ॥६०॥
त्याची देखोनि कामासक्ती । अप्सरा नागव्या नाचती ।
तोही लिंग धरोनिया हाती । निजकामार्थी नाचत ॥६१॥
ऋषींचा प्रक्षोभव अप्सरांचे पलायन :
त्यांसी झोंबोनि मागातां रती । त्या निघाल्या ऊर्ध्वगती ।
त्यांसी ऋषि येत काकुळती । कृपेने रती मज द्यावी ॥६२॥
मज रत्यर्थी अतीतासी । विमुख होता नये तुम्हांसी ।
मी लागतों तुमच्या पायांसी । कृपेने रतीसी मज द्यावे ॥६३॥
मी तुमचा धर्मसांगती । परमार्थी मज द्यावी रती ।
त्यांचे अंगुष्ठ धरी दातीं । तंव त्या जाती उपेक्षोनी ॥६४॥
तंवचि वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता न देखे दृष्टी ।
एकांती तीस जालिया भेटी । विरक्तही उठी भोगार्थीं ॥६५॥
हो का कामिनी एकदा मनी । एकांतींच देखता नयनी ।
धांवोनि झोंबती जपी ध्यानी । तपोनिर्दळणी स्त्रीसंग ॥६६॥
जंव पुरुषासी अति विरक्ती । तंवचि सिद्धी ओळंगती ।
पुरुष जालिया कामासक्ती । सिद्धी जाती थुंकोनी ॥६७॥
स्त्रीगीत पडता कानी । वैराग्य गेले हरपोनी ।
यालागी नांवे मंदकर्णी । श्रुतिपुराणीं अभिधान ॥६८॥
प्रमदागाणें ऐकोनि कानी । प्रसाद पावला तत्क्षणीं ।
वैराग्य विवेक गेलिया दोनी । मंदकर्णि तेणे नाम ॥६८॥
नीतो मदनवश्यत्वं सुराणामर्थसिद्धये ।
ताश्चैवाप्सरसः पंच मुनिपत्नीत्वमागताः ॥१५॥
तटाके निर्मितं तासां तस्मिन्नंतर्हितं गृहम् ।
तत्रैवाप्सरसः पंच निवसंत्या यथासुखम् ॥१६॥
रमयंति तपोयोगान्मुनि यौवनमास्थितम् ।
तासां संक्रीडमनानामेष वाढित्रनिस्वनः ॥१७॥
तडागे निर्मितं तासा तस्मिन्नंतर्हिततं गृहम् ॥१८॥
इंद्राचे वरप्रदान । तिही अप्सरीं पांचा जणीं ।
सुरकायार्थ साधोनी । ऋषि मोहिला स्त्रीमोहनी । कामगाणीं संतप्त ॥७०॥
इंद्रें करविले विघ्नासी । ऐसे कळलिया तया ऋषीसी ।
कोपोनि देईल शापाशी । तेणे इंद्रासी महाभय ॥७१॥
भूत भविष्य वर्तमान । ऋषीस होय त्रिकाळज्ञान ।
अपूर्ण कामे कोपायमान । शाप दारुण देईल ॥७२॥
ऋषि तापसी महाक्रूर । दहा सहस्त्र वर्षे तप अत्युग्र ।
शात देईल अति दुर्धर । धाके सुरेंद कांपत ॥७३॥
शापभयें अतिसत्वर । ऋषीपासीं आला इंद्र ।
मागसी तो देईन वर । आज्ञाधार मी स्वामी ॥७४॥
तंव ऋषि म्हणे इंद्रासी । पंचाप्सरा लावण्यराशी ।
त्या मज द्याव्या नित्यभोगासी । इंद्रें ऋषीसी दीधल्या ॥७५॥
दहासहस्त्र वर्षीं । तपें जरठ जर्जर ऋषी ।
तो नावडे अप्सरांसी । म्हणोनि त्यासी उपेक्षिती ॥७६॥
जाणोनि अप्सरांचे मन । ऋषि सामर्थ्ये अति संपन्न ।
जाला स्वरुपें मदनमोहन । विराजमान तारुण्यें ॥७७॥
देखोनि ऋषीच्या रुपासी । अप्सरा भुललिया सर्वस्वेंसी ।
आन पुरुष नावडे त्यांसी । जीवभावेंसीं विनतल्या ॥७८॥
ऋषि सामर्थ्ये अत्यंत थोर । ते तडागजळीं जळांतर ।
उभारोनि निजमंदिर । क्रिडातत्पर पंचाप्सरीं ॥७९॥
त्यांचे गीतनृत्यध्वनी । श्रीराम पडिले तुझे श्रवणीं ।
ऐसे सांगती सकळ मुनी । विस्मित मनी श्रीराम ॥८०॥
तेथील करिता आचमन । श्रीराम देखे ऋषिभुवन ।
मंदकर्णीस आल्हाद पूर्ण । श्रीरघुनंदन देखोनि ॥८१॥
मंदकर्णीचे स्वागत :
अति आदरेंकरोनि ऋषीं । श्रीराम नेला निजभवनासी ।
सीता राम लक्ष्मण त्रिवर्गांसी । वर्षानुवर्षी राहविलें ॥८२॥
मंदरर्णी ऋषीश्वर । श्रीरामसेवेसी तत्पर ।
पंचाप्सरा अति सादर । श्रीरामचंद्रनिजभजना ॥८३॥
पूर्वी निष्काम तपोवृत्ति । त्या तपाची फलप्राप्ति ।
घरा आली श्रीरामामूर्ति । हृष निश्चिती सभाग्य ॥८३॥
त्याचे भाग्य वानू किती । चढती वाढती नित्यप्रीती ।
श्रीरामाची आवडे भक्ति । अहोरात्री उल्हास ॥८४॥
जपतां श्रीरामनाम वाक्पुटी । उद्धरले कोट्यनुकोटी ।
श्रीरामप्रेम धरिता पोटी । ब्रह्मसंतुष्टी ऋषिवर्या ॥८५॥
करिता श्रीरामाची भक्ती । मंदकर्णि पावला मुक्ती ।
पंचाप्सरा त्याचे संगतीं । निजात्ममुक्ती पावल्या ॥८६॥
श्रीरामनामें जड तरती । तो श्रीराम देखता अति प्रीती ।
चारी मुक्ती दासी होती । श्रीरामभक्तिप्रतापें ॥८७॥
ऋषीस ब्रह्मसमाधान । अप्सरा जाल्या सुखसंपन्न ।
करोनिया दीनोद्धरण । रघुनंदन निघाला ॥८८॥
उषित्वा स सुख तत्र पूज्यमानो महर्षिभिः ।
जगाम चाश्रमांस्तेषां पर्यायेण तपस्विनाम्॥१९॥
क्वचित्परिदशान्मासानेकसंवत्सरं क्वचित् ।
क्वचिच्च चतुरो मासान्पज्च षट् च परान्क्व्चित॥२०॥
अपरत्राधिकान्मासानध्यर्धमधिकं क्वच्चित् ।
त्रीन्मासानष्टमासांश्च राघवो न्यवसत्सुखम् ॥२१॥
तत्र संवसतस्तस्य मुनीनामाश्रमेषु वै ।
रमतश्वानुकूल्येन ययुः संवत्सरा दश ॥२२॥
प्ररिसृत्य च धर्मज्ञो राघवःसह सीतया ।
सुतीक्ष्णस्याश्रमपदं पुनरेवाजगाम ह ॥२३॥
आश्रमाचे निरिक्षण करीत सुतीक्ष्णाचे पुनः आमगन :
मंदकर्णीचे देखोनि प्रेम । त्या आश्रमी सुखी जाला श्रीराम ।
ऋषिही सुखी जाला परम । सुखसंभ्रम अप्सरां ॥८९॥
सुखी जाली लक्ष्मण सीता । मग ऋषीस पुसोनि तत्वता ।
पहावया आश्रमां समस्ता । होय निघता श्रीराम ॥९०॥
ऋषिआश्रम सावकाश । कोठे मास कोठे दोन मास ।
कोठे नेमस्त पंच मास । कोठे षण्मास श्रीराम राहे ॥९१॥
कोठे वर्ष दीड वर्षी । कोठे राहे चतुर्मासीं ।
ऐसा विचरता वनवासी । सुतिक्ष्णापासी राम आला ॥९२॥
श्रीरामाचे पुनरागमन । तेणे हरिखला सुतीक्ष्ण ।
आलिंगिले श्रीराम लक्ष्मण । आल्हाद पूर्ण ऋषिवर्या ॥९३॥
नित्य श्रीरामपूजन । देवोनि वनफळे भोजन ।
राहविला श्रीरघुनंदन । किंचिन्न्यून अर्धाब्द ॥९४॥
अगस्ति-आश्रमाला प्रयाण :
श्रीराम बैसोनि सावकासी । सादरें पुसे सुतीक्ष्णासी ।
अगस्त्याश्रम जये प्रदेशीं । तेथे आम्हांसी धाडावे ॥९५॥
ऐकोनि श्रीरामाचे वचन । सुतीक्ष्ण म्हणे धन्य धन्य ।
अगस्त्याश्रम परम पावन । वश्य गमन तेथे किजे ॥९६॥
वन लागलेंसे घनदाट । सहसा मार्ग न कळे स्पष्ट ।
स्वामींनीं दाखवावी वाट । अवस्था उत्कट गमनार्थी ॥९७॥
श्रीरामा मी सांगूं किती । तू आमच्या गतीची गती ।
मार्ग पुससी आम्हांप्रती । आश्चर्य किती सांगावे ॥९८॥
येथोनि असे अर्धयोजन । अगस्तीचें आश्रमस्थान ।
येणे मार्गे करावे गमन । ऐसे सुतीक्ष्ण बोलिला ॥९९॥
सीता राम लक्ष्मण । ऋषीस करोनिया गमन ।
तिघीं जणीं केले गमन । अगस्तिस्थान लक्षूनी ॥१००॥
अगस्तीचा महिमा :
अगस्तीचें निजमहिमान । ऐके श्रीराम सावधान ।
वातापी इल्वल ब्राह्मणघ्न । त्यांचे निर्दळण तेणे केले ॥१॥
इहैकदा किल क्रूरो वातापिरपि चेल्वलः ।
भ्रातरौ सहितावास्तां ब्राह्मणघ्नौ महसुरौ ॥२४॥
वातापी ब्राह्मणं रुपमिल्वलः संस्कृतौदनम् ।
आमंत्रयति विप्रान्स श्राद्धमुद्दिश्य निर्घृणः ॥२५॥
वातापी इल्वलांचा नाशः। वातापी ब्राह्मण होय आपण ।
इल्वल कपटें होय अन्न ।
्राह्मण निमंत्रोनि जाण । श्राद्धभोजन संतृप्त देती ॥२॥
वातापी बोभाय बंधूसी । येरु निघे फोडोनि द्विजकुशी ।
यापरी तिही ब्राह्मणांसी । छळोनि राक्षसी मारिजे ॥३॥
ऐसे जाणोनि ब्राह्मणघाती । त्यांपासी स्वये आला अगस्ती ।
इल्वलओदनान्नप्रयुक्ती । दिधले संतृप्त भोजन ॥४॥
अगस्ती प्रतिग्रासोग्रासीं । भस्म करी जठराग्नीसी ।
ठाव नाही इल्वकासी । कवणें कुशी फाडावी ॥५॥
वातापी बोभाय इल्वलासी । तंव अगस्ति म्हणे म्या जिरविलें त्यासी ।
कोप आला वातापीसी । अगस्तीसी गिळू धांवे ॥६॥
विकट धरोनि राक्षसवेष । दारुण देवोनिया हाक ।
धांवला अगस्तिसन्मुख । विक्राळ मुख पसरोनी ॥७॥
अगस्तिनेत्रींचा कोपाग्नी । वातापी सांडिला जाळोनी ।
भस्म केला अर्धक्षणीं । जो का ब्राह्मणी छळघाती ॥८॥
ऐसे पापा राक्षस दोनी । अगस्तीनें सांडिलें जाळोनी ।
ऐसा प्रतापी महामुनी । अवश्य दर्शनी जावे तुम्ही ॥९॥
अयमाख्यामि ते राम यत्रागस्त्यो महमुनिः ।
योजनान्याश्रमात्तात याहि चत्वारि वैततः ॥२६॥
दक्षिणेन महान्श्रीमानगस्त्यभ्रातुराश्रमः ।
तत्रैकां रजनीं व्युष्य प्रभाते राम गभ्यताम् ॥२७॥
मार्गात अगस्तीचे धाकटे बंधू महामतींची भेटः
स्वये सागें सुतीक्ष्ण । पुढे वन अति गहन ।
सहसा न टाकीं अगस्तिस्थान । सांगेन खूण ते ऐका ॥११०॥
ज्येष्ठ बंधु नांवे अगस्ती । कनिष्ठा नाम महामती ।
तेथोनि अर्धयोजनांतीं । आश्रमस्थिति तयाची ॥११॥
जावोनि त्याच्या आश्रमाप्रती । आजिची तेथे क्रमोनि राती ।
प्रातःकाळी श्रीरघुपती । तुम्हा अगस्ति भेटल ॥१२॥
महामतीची वनस्थळी । न पेरिता साळी केळी ।
पिंपळी नागवेली पोफळी । आश्रमाजवळी शोभती ॥१३॥
ऋषिसत्तम महमती । तुम्हांसी भेटावया अगस्ती ।
ज्या ज्या सांगेल गमनगती । त्या त्या स्थितीं तुम्ही जावे ॥१४॥
सुतीक्ष्णा करोनि नमन । तिघीं जणीं केले गमन ।
वने उपवने शोभायमान । वसतिस्थान महामतीचें ॥१५॥
आश्रमा आला श्रीरघुपती । परम आल्हाद महामती ।
राहवोनियां अति प्रीती । सीतपति पूजिला ॥१६॥
एकाजनार्दना शरण । वधावया त्रिशिरा खर दूषण ।
अगस्तीसी श्रीरामदर्शन । अस्त्रगहण ऋषिवरदें ॥१७॥
इति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
श्रीरामपंचाप्सरामंदकर्ण्यद्धरणं नाम चतुर्थोऽध्यायः ॥४॥
॥ ओंव्या ११७ ॥ श्लोक २७ ॥ एवं १४४ ॥
