॥ श्रीएकनाथमहाराजकृत
16.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अरण्यकाण्ड
॥ अध्याय सोळावा ॥
लक्ष्मण आश्रमातून गेल्यावर भिक्षेकर्याच्या वेषात रावणाचे आगमन :
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
लक्ष्मण आश्रमातून गेल्यावर भिक्षेकर्याच्या वेषात रावणाचे आगमन :
लक्ष्मण गेला रामापासी । सीता एकली गुंफेसी ।
रावण आला तेचि संधीसीं । सीतेपासीं भिक्षुवेषें ॥१॥
एतदंतरमासाद्य दशग्रीवः प्रतापवान् ।
परिव्राजकरुपेण वैदेहिमन्ववर्तत ॥१॥
गुंफे नसतां श्रीरामलक्ष्मण । शून्य मंदिरी रिघे श्वान ।
तेंवी आला दशानन । सीताहरणकार्यार्थी ॥२॥
गर्भजन्में जन्मली नाही । सीता देहींच विदेही ।
तिचे हरन करावया पाही । आला लवलाही लंकानाथ ॥३॥
सीताहरण करु म्हणता । मुळींच भीक लागली लंकानाथा ।
चौपालवी आली हाता । अंगी अशुभता बाणली ॥४॥
चौदा चौकड्यांचे राज्यलक्ष्मण । ते गेले न लागता क्षण ।
भिकारी जाला आपण । सीताहरण करु म्हणता ॥५॥
सीतेचा आश्रम देखता । भेणे पळाली राजवैभवता ।
भिक्षेने वरिलें लंकानाथा । ऐसे सामर्थ्य सीतेचे दुर्धर ॥६॥
अभिलाषितां लाविली भीक । लंकेस सीता नेलिया हे देख ।
राक्षस मारवील एकाएक । लंका निःशेख जाळिल ॥७॥
वळचणीमाजी दिपकळी । ठेवितां ते तत्काळ जाळी ।
तेंवी राक्षसकुळी । करील होळी क्षणामध्ये ॥८॥
अभिलाषितां कामधेनु । निर्दाळिला सहस्रार्जुनु ।
तेंवी सीताहरने रावणु । कुळनिर्दळणु राक्षसा ॥९॥
सीतेला पाहून रावणाची झालेली अवस्था :
सीता पाहू जाता जाण । पळाली त्याची आंगवण ।
भिक्षुरुप अति हीन । दिनवदन भिक्षार्थी ॥१०॥
स्वयंवरी सीता देखता जाण । रावणा जाहला अति अपमान ।
येथेंही सीता पाहता पूर्ण । निजापमान भिक्षुकत्वें ॥११॥
बाप सीतेचे विदान । दृष्टीनें गांजिला रावण ।
आपणियां आपण दे अपमान । दीनवदन भिक्षार्थीं ॥१२॥
रावणा सन्निपात सीतेचा संपूर्ण । न कळे शुभाशुभ चिन्ह ।
भिक्षुवेषें अत्यंत हीन । दीनवदन भिक्षार्थी ॥१३॥
षण्मासिक अन्निपात । रावणासी जाला येथ ।
सीताभिलाषीं निश्चित । निजात्मघात सकळेंसीं ॥१४॥
ऐसिया युक्ती रावण । धरोनि भिक्षुत्व संपूर्ण ।
करोनि नारायणस्मरण । आला आपण आश्रमा ॥१५॥
सीता देखता गोरटी । रावणाची खुंटली दृष्टी ।
पूर्ण अभिलाष जाला पोटी । अति गोमटी रामकांता ॥१६॥
स्वरुपरुपें अति सगुण । रुपरेखा गुणलावण्य ।
सर्व अवयव सुखैकघन । सुखनिधान जानकी ॥१७॥
केवळ लावण्याची पुतळी । निखळ सौंदर्याची ओतिली ।
बरवेपणासी चढली । सीता शोभली सुखरुप ॥१८॥
सीतासौंदर्यें निवाले नयन । विसरला भूक तहान ।
देखोनि सुखावलें निजमन । नवनिधान जानकी ॥१९॥
सीतेसी होता दृष्टीभेटी । भेटीसवें आनंदकोटी ।
इचेनि योगें सुखसंतुष्टी । आनंअ सृष्टी असेना ॥२०॥
ऐसिया सौंदर्याची बोली । कदाकाळीं नाही ऐकिली ।
सीता घवघवीत देखिली । भुली पडली इंद्रियां ॥२१॥
नैव देवी न गंधर्वी नासुरी न च किन्नरी ।
एवं रुपा मया नारी दृष्टरुपा महीतले ॥२॥
देवदानवगंधर्वादि स्त्रियांत तिच्या तुलनेची कोणीही नाही :
देवी गंधर्वी सुरेश्वरी । त्याही न पावती इची सरी ।
रंभा उर्वशी किन्नरी । इच्या नखाग्री न सरती ॥२२॥
दैत्यदारा आणि दानवी । सरी न पावती मानवी ।
सावित्री न पवे इची पदवी । सर्वावयवी सुखरुप ॥२३॥
पद्मिनी नारी अति विख्याता । सरी न पवती वनदेवता ।
उमा रमा हरिहरकांता । इची स्वरुपता त्यां नाही ॥२४॥
मंदोदरी येथे कायसी । जेंवी खद्योत सूर्यापासीं ।
सीता लावण्याची राशी । सीमा रुपासीं न करावे ॥२५॥
अमृतप्रय इची बोली । ऐकता पीयूषा पडली भुली ।
परमहंस नये चाली । वेडावली मनोबुद्धि ॥२६॥
अंगी खुपती चंद्रकिरण । सुखैकघन सुकुमार ।
अकार उकार निर्विकार । मनोहर जानकी ॥२७॥
आणिक स्त्रिया मनोहर । कवि वर्णिती स्तुतिमात्र ।
परी सीता मनोहर साचार । मज किंकर इये केले ॥२८॥
मज हिंडता सक्ळ सृष्टी । ऐसी देखिली नाही दृष्टी ।
इसी झालिया भोगभेटी । सुखसंतुष्टी स्वानंदे ॥२९॥
सीतासुखभोगसंतुष्टी । यासी काटाळें ना सृष्टी ।
भाग्य असलिया लल्लाटी । सीता गोरटी तै लाभे ॥३०॥
जरी स्वयंवरी धनुष्य उचलतें । तरी तैंच सीता वरिती माते ।
धनुष्य भोवलें मजभोवतें । सामर्थ्य तेथे न चलेचि ॥३१॥
आता ही आहे अति सांकडीं । सीता एकली वनी निर्वडी ।
श्रीरामाची पडल्या उडी । माझी नरडी मुरडील ॥३२॥
सांडोनि न वचे सीतेसी । श्रीरामाचा धाक मानसी ।
छळोनि हरावया सीतेसी । भिक्षुभावेंसी बोलत ॥३३॥
कासि कस्य कुरश्च त्वं किंनिमित्त च दंडकम् ।
एका चरसिं कल्याणि घोरराक्षससेवितम् ॥३॥
इह वासश्च कान्तारे किमर्थं ते वरानने ॥४॥
रावणाचा सीतेला प्रश्न – या भयावह अरण्यात तू एकटी कशी आलीस ?
रावण केवळ कपटवेषी । स्वये होवोनि संन्यासी ।
येवोनियां सीतेपासीं । सद्भावेंसी पूसत ॥३४॥
तू तंव लावण्याची राशी । वनी एकली का वससी ।
कोणी न देखो संगतीसीं । निजवृत्तांतासी मज सांगे ॥३५॥
तू कोण कोणाची पै कैची । एकाकी वस्ती कानाची ।
हे वृत्ति नव्हे साधुत्वाची । वस्ती वनींची अति कठीण ॥३६॥
दुस्तर वस्ती दंडकारण्यीं । राक्षस मायावी ये वनी ।
स्त्रिया हरिती सिंतरोनी । ब्राह्मण मारोनी भक्षिती ॥३७॥
ऐसिया कठिण वनस्थळी । तू तंव दिससी राजबाळी ।
वनी वससी का वेल्हाळी । हे समूळी मज सांगे ॥३८॥
स्वयंवरापासून साद्यंत वृत्तांत सीता सांगते :
ऐकोनि अतीताचें वचन । सीता सांगे निजकथन ।
मी तंव दशरथाची सून । कन्यारत्न जनकाचें ॥३९॥
स्वयंवरीं रावणा अपमानून । श्रीरामे हरचाप भंगून ।
परशुरामाते जिंकोन । पर्णन केले पै माझे ॥४०॥
श्रीराम आणि लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न ।
हे चवघे बंधु जाण । जीवप्राण येरयेरा ॥४१॥
राया दशरथाने जाण । कैकेयीभाष्यनिर्बंधन ।
वना धाडिले श्रीरामलक्ष्मण । दंडकारण्यवनवासीं ॥४२॥
नेम मर्यादा चवदा वर्षी । श्रीरामे वसावें वनवासी ।
मजही धाडिलें वनवासासी । निजसेवेसीं श्रीरामा॥४३॥
श्रीरामसेवेसी सावधान । माझे करावया संरक्षण ।
सवे दिधला लक्ष्मण । वीर दारुण प्रतापी ॥४४॥
श्रीरामे मारिले ताटकेसी । सुबाहु मारिला रणकर्कशी ।
मारीच उडविला आकाशी । बाणार्धेसीं झडपोनी ॥४५॥
विराधें मज धरिता जाण । श्रीरामे विंधोनियां बाण ।
एकेंचि घाये घेतला प्राण । दुष्टनिर्दळण श्रीराम ॥४६॥
विराधाऐसा महाबळी । घाये मेळविला धुळी ।
तेणे राक्षस कापती चळचळीं । आर्तुबळी श्रीराम ॥४७॥
मग येवोनि गंगातटीं । आश्रम करोनि पंचवटीं ।
वनवासाते तो कंठी । सुखसंतुष्टी स्वानंदे ॥४८॥
सार्धवर्षत्रयोदश । रामे क्रमिला वनवास ।
आता उरले षण्मास । मग प्रवेश अयोध्ये ॥४९॥
सुवर्ण मृग वधावयासी । श्रीराम धांवला वनासी ।
लक्ष्मण गेला तयापासी । तेणे मज देखसी एकली ॥५०॥
येथे मी एकटीच नसून माझे दोगेजण संरक्षक आहेत, ते येईपर्यत थांबण्याची विनंती :
मी एकली नव्हे जाण । मज रक्षावया दोघे जण ।
दुर्धर वीर श्रीरामलक्ष्मण । न लागता क्षण येतील ॥५१॥
मृग मारोनियां जाण । आता येतील रामलक्ष्मण ।
तंववरी रहावे आपण । भिक्षा पूर्ण देईल राम ॥५२॥
श्रीराम अतीतांचा सेवक । तुम्हांसी देखिल्या होईल सुख ।
भिक्षा देईल आवश्यक । तुम्ही नावेक रहावे ॥५३॥
ऐकता सीतेची गोष्टी । रावण थरथरां कांपे पोटी ।
मागे पाहे चकितदृष्टीं । उठाउठी पळूं पाहे ॥५४॥
करावया सीतेचे हरण । अत्यंत साक्षेपी रावण ।
गोड बोलाच करी प्रश्न । विश्वास पूर्ण उपजावया ॥५५॥
एह व्यालमृगाः सिंहा वृकव्याघ्रश्च राक्षसाः ।
कथमस्मिन्महारण्ये न बिभेषि वरानने ॥५॥
रावणाने सीतेला निर्भय असण्याचे कारण विचारल्यावरुन तिने पूर्वीची कावळ्याची कथा सांगितली :
ये वनी श्वापदें दुस्तर । व्याघ्र सर्प सिंह शूरक ।
वृक जंबुक तरस तगर । निशाचर नरभक्षी ॥५६॥
स्त्रिया भयभीत त्रिभुवनी । तुज भय नुपते दुर्धर वनी ।
हेंचि सांगे मजलागोनी । तू कैसेनि निःशंक ॥५७॥
अतीता तू ऐके सावधान । वनी वसतां श्रीरघुनंदन ।
प्रतापतेजे अति दारुण । संरक्षण निजभक्ता ॥५८॥
हृदयी हाणोनियां नखे । मज अभिलाषिलें काकें ।
रामे सोडिले दर्भईषिके । वचनें एके माझेनि ॥५९॥
श्रीरामाची दर्भईषिका । निवारेना ब्रह्मादिका ।
काक हिंडतां तिही लोका । शिवादिकां दुर्धर ॥६०॥
श्रीरामईषिका देखोन । चळीं कांपत इंद्रवरुण ।
कळिकाळ घाली लोटांगण । यम आपण शिरी वंदी ॥६१॥
ईषिके नाही निवारण । काक श्रीरामा आला शरण ।
मग ईषिकेनें वाम नयन फोडून । कृपेनें प्राण वाचविले ॥६२॥
तैंपासोनि श्वापद गाढे । कोणी न पाहे मजकडे ।
तेथे राक्षस कायसे बापुडे । मजपुढे यावया ॥६३॥
श्रीरामाची प्रतिची प्रतिज्ञा पूर्ण । जो जो करील सीताहरण ।
त्याचा घेईन मी प्राण । दुर्धर बाण सोडोनि ॥६४॥
शूर्पणखा वगैरे कपटीवेषाने आलेल्यांची रामाने बोळवण कशी केली :
पक्षियावरी अति पुरुषार्थ । करोनि प्रतापी श्रीरघुनाथ ।
ऐसा न मानावा अर्थ । रणकंदनार्थ अवधारी ॥६५॥
श्रीरामा नावडे कपटदृष्टी । शूर्पणखा अति खोटी ।
छळो आली पंचवटीं । केली नकटी सौमित्रे ॥६६॥
शूर्पणखाकैवारी जाण । मारिले त्रिशिरा खर दूषण ।
चवदा सहस्र राक्षणगण । रामे संपूर्ण निर्दाळिले ॥६७॥
लक्ष्मणे युद्धाआंत । अद्यापि लाविला नाही हात ।
त्याचा अनुच्छिष्ट पुरुषार्थ । इद्रंजितवधार्थ ठेविलासे ॥६८॥
मारिले त्रिशिरा खर दूषण । तै श्रीरामेंच केला पण ।
मारोनि कुंभकर्ण रावण । अयोध्यागमन मग करणे ॥६९॥
ऐसा प्रतापी श्रीरघुकुळटिळक । पशुपक्षियां त्याचा धाक ।
त्याचेनि बळे यथासुख । वनी निःशंक मी विचरे ॥७०॥
असे सांगून सीता बसण्यासठी आसन देते :
ऐसे सीता स्वये बोलोन । अतिथीस घाली आसन ।
तंव तिसी करावया सन्निधान । चाले आपण हरणार्थी ॥७१॥
तिला पळविण्यास लक्ष्मणरेषेची अडचण :
तंव लक्ष्मणाची मर्यादारेखा । उल्लंघवेना दशमुखा ।
करिता बळाचा आवांका । मर्यादारेखा नुल्लघवे ॥७२॥
रेखा रावण जंव पाहे तळी । तंव ते खोल सप्तपाताळीं ।
वरती पाहता निराळीं । नभोमंडळी जडलीसे ॥७३॥
तळींहूनि जावया नाही गती । उल्लंघावया न चले शक्ती ।
रेखेनें रोधिला लंकापती । सीतेप्रती न वचवे ॥७४॥
सीतेपासीं न वचवे जाण । मग कैसेनि करवेल हरण ।
सत्य सत्वाथिला लक्ष्मण । रेखारक्षण जानकिये ॥७५॥
सीता सांडोनि गेला लक्ष्मण । रेखा ठेविली दृढ रक्षण ।
अत्यंत कष्टतां रावण । सीताहरण न करवे ॥७६॥
मारीच निमालासे देखा । आणि माझेनि नुल्लंघवे रेखा ।
वेगी आलिया रघुकुळटिळका । दाही मस्तकां छेदील ॥७७॥
ऐसिया विचाराच्या गोष्टी । उठल्या रावणाच्या पोटी ।
सीता देखोनि गोरटी । उपरमदृष्टि उपजेना ॥७८॥
अत्यंत भुकेचे ढोंग करुन रावण सीतेला त्या रेषेच्या बाहेर आणतो :
मग मांडिलें पूर्ण कपट । संन्यासी आलिया स्त्रियांनिकट ।
तो जाणावा महापापिष्ठ् । अति निर्दुष्ट यतिधर्मीं ॥७९॥
संन्यासधर्माचें लक्षण । निद्य स्त्रियांचे दर्श्न ।
निंद्य स्त्रियांसीं संभाषण । सान्निधान अतिं निद्य ॥८०॥
श्रीराम परमार्थी नेटका । तरी का धर्माआड ठेविली रेखा ।
याच विशींची आशंका । पाळें न देखा जावया ॥८१॥
या वनींचे राक्षस वासी । भीत भीअ आलो मी या वनीसी ।
तुम्हा देखोनि मनुष्यवेषीं । येथे भिक्षेसी मी आलो ॥८२॥
तू राक्षससुंदरी मनुष्यवेषी । भीतरी नेसी मारायासी ।
अत्यादरें बोलाविसी । सन्मान देसी भक्षावया ॥८३॥
ऐसे ऐकोनि अतिथिउत्तर । सीता म्हणे श्रीहरहर ।
आम्ही नव्हों गा निशाचर । नित्य किंकर अतिथींचे ॥८४॥
मग सीता आणावया रेखेबाहेरी । रावणे बुद्धि योजिली पुरी ।
क्षुधेने पीडलों हो भारी । डोळा अंधारी येतसे ॥८५॥
जरी कृपा आहे अतीतासीं । बाहेरी आणोनि भिक्षा देसी ।
तरी गंगातीरी सावकाशीं । निजआहारासी करीन ॥८६॥
गोड बोलसी जैसे पीयुख । परी न घालिसी ये वेळ भीक ।
माझेनि न साहवेचि भूक । तरी आता विमुख मी जातो ॥८७॥
मग सीता म्हणे स्वामिनाथा । विमुख न वचाव सर्वथा ।
रेखा उल्लंघोनि तत्वता । भिक्षा निजस्वार्था देईन ॥८८॥
विमुख जालिया अतीत । श्रीरामसौमित्र युद्धाआंत ।
जयो कदा न पावत । अतित विघात होईल ॥८९॥
सुखी केलिया अतीत । सुखी होईल श्रीभगवंत ।
श्रीरामलक्ष्मण युद्धाआंत । यशवंत होतील ॥९०॥
राखितां लक्ष्मणमर्यादारेख । अतीत होऊ पाहे विमुख ।
येणे पापें पावेल पति दुःख । भिक्षा आवश्यक मी घालीन ॥९१॥
ऐसा विचार मानसी । सीतेने करोनि निश्चयेसी ।
भिक्षा आणावया अतीतासी । स्वये गुफेसी रिघाली ॥९२॥
सीता भिक्षा आणण्यास आत गेली असता आश्रमात देवांचे आगमन :
तंव हडबड जाली देवांसी । स्वर्गी होती कासाविसी ।
सकळ देव आणि ऋषी । ब्रह्मयापाशीं स्वये आले ॥९३॥
जे सुटावी देवांची बांधवडी । आजिची आहे लग्नघडी ।
बुद्धि विचारावी गाढी । सुरसांकडी फेडावया ॥९४॥
भिक्षा देता रावणाप्रती । रावण सीता धरील हाती ।
क्षणार्धे भस्म करील सीता सती । आदिशक्ती जगादंबा ॥९५॥
जेंवी पतंग दीपाप्रती । आलिंगितां मरोन जाती ।
तेंवी सीता धरिता हाती । भस्मगति रावणा ॥९६॥
रावण जालिया भस्मी भूत । मग लंकेसी न ये रघुनाथ ।
देवबांधवडी समस्त । इंद्रजित सोडीना ॥९७॥
सुरगणांची भीती :
ऐसे विचारोनि जाण । गुंफेसी येऊनि सुरगण ।
धरिले सीतेचे निजचरण । भिक्षा आपण न घालावी ॥९८॥
अतीअ जाता विमुख । श्रीरामलक्ष्मण पावती दुःख ।
तुम्ही सर्वज्ञ देवलोक । हा विवेक मज सांगा ॥९९॥
मग देव सांगती आपण । अतिथिरुपें हा रावण ।
तुझे करु आला हरण । भिक्षा आपण न घालावी ॥१००॥
मग बोलिली सीता सती । रावणे मज धरिता हाती ।
त्यासी लावीन कल्पांतख्याती । भय किती मज त्याचे ॥१॥
रावण कायसे बापुडे । धा तोंडांचें ते किडे ।
त्यांचे भय मजपुढे । वाडेंकोडें काय सांगा ॥२॥
तंव देव म्हणती ऐक माते । रावणबंदीं आम्ही समस्ते ।
तुवा निर्दळिलिया रावणाते । इंद्रदित आमुतें सोडीना ॥३॥
करावया आमुचे बंधमोचन । तुम्हा दोघांचें अवतरण ।
तूंचि पाहे विचारुन । पूर्वविधान निजयोग ॥४॥
देवांना सीतेने रहस्य सांगून समाधान केले :
ऐकोनि देवांचे वचन । सीता जाली हास्यवदन ।
पावोनि मूळींची निजखूण । काय आपण बोलली ॥५॥
जरी मी राहिले गुप्तस्थिती । तरी रावण आलासे भिक्षार्थी ।
त्यासी काय कराल युक्ती । ते मजप्रती सांगावी ॥६॥
देव बोलती निजयोग्यता । रावणाच्या भिक्षार्था ।
आम्ही करुंमायिक सीता । तेणे जनक्दुहित स्वये हांसे ॥७॥
साकार आणि सचेतनता । मायिक रुपे श्रीरामकांता ।
करु न शके तो विधाता । तुम्ही तत्वता महामूर्ख ॥८॥
पर्जन्याची जळगार । करु न शकती अति चतुर ।
तेंवी ब्रह्मादिक सुरवर । कृत्रिम अवतार करु न शकती ॥९॥
जैसी माझी सगुण काया । तैसी मद्रूप माझी छाया ।
मी धाडितें भिक्षा द्यावया । सुरकार्या साधावया ॥११॥
ऐकोनि सीतेचे वचन । समस्तीं घातले लोटांगण ।
सीतेचे वंदोनि श्रीचरण । राहिले लपोन विमानी ॥१११॥
भीक्षा घालण्यासाठी स्वतः न जाता आपल्या छायेला पाठवले, मूळ रुपात व छायेत तंतोतंत साम्यः
भिक्षा घालावया लंकानाथा । सवेग छाया बाहेर येता ।
हेचि मुख्यत्वे सती सीता । सत्य समस्ता मानले ॥१२॥
ठाणमाण गुणलक्षण । रुपरेखा समसमान ।
सुर सिद्ध साध्य चारण । अवघ्यांही ज्ञान सत्य सीता ॥१३॥
यक्ष राक्षस दैत्य दानव । सत्य सीता मानितामानव ।
बाप जानकीचे लाघव । छाया सजीव पै केली ॥१४॥
सद्भावें समर्थ जानकी । स्वये राहोनि अग्निमुखीं ।
छाया धाडिली भिक्षेसी निकी । येता सकळिकीं देखिली ॥१५॥
भिक्षा घेवोनि वेगेंसी । उल्लघेनियां मर्यादरेखेसी ।
सीता आली रावणापासी । तंव येरु अभिलाषी हरणार्थ ॥१६॥
भिक्षा वाढीत असता रावणाने ति धरले व तो खर्या स्वरुपात प्रगटतो :
जेंवी छाया न राहे रुपापासीं । तेंवी उल्लंघोनिया मर्यादरेखेसी ।
भिक्षा देता रावणासी । तो आकर्षी सीतेते ॥१७॥
हस्ते हस्तं विनिक्षिप्य चकार सुमहव्दपुः ।
तच्च सौम्यं परित्यज्य भिक्षुरुपं स राक्षसः ॥६॥
भिक्षा देता अतीताप्रती । अतीतें सीता धरिली हाती ।
तंव येरी आंसडोनि हस्तगतीं । पडिला क्षिंती रावण ॥१८॥
जंव रिघे मर्यादरेखेआंत । तंव तो आकर्षी लंकानाथ ।
सांडून भिक्षुवेष समस्त । जाला अदभुत राक्षस ॥१९॥
दहा शिंरें वीस भुजा । मी तंव लंकेचा हो राजा ।
तुज मी करीन निजभाजा । भोगी माझा सुखभोग ॥१२०॥
सीतेजवळ रावणाचा अनुनय :
राम तापसी दीनवदनी । कष्टलीसी वसतां वनी ।
तुज करीन पट्टराणी । मुख्य विलासिनी मंदोदरी ॥२१॥
तुज बैसतां माझे अंकी । मंदोदरी मुख्य सेवकी ।
ऐशीं सहस्र राण्या आणखी । तुझ्या बटकी मी करीन ॥२२॥
मी ब्रह्मयाचा नातु प्रसिद्ध । कुबेराचा धाकता बंधु ।
माझा वंश अति सुद्धु । सांडी छंदु श्रीरामाचा ॥२३॥
वसंत वळगे शेजारें । सेज रचिजे कुसुमाकरें ।
चंद्र निववी शीतळ करे । करीन किंकरें सुर सिद्ध ॥२४॥
सुरश्रेष्ठ इंद्रादिक । तुझे वोळंगेच पायिक ।
मुख्य मी आज्ञेचा सेवक । अलोलिक भोग भोगी ॥२५॥
माझे देखिलिया अशोकवन । तुझे निवेल तन मन ।
धन्य म्हणसील दशानन । लंकाभुवन देखिलिया ॥२६॥
सीतेचा आक्रोश, रावणाला धाक देते :
सीता आक्रंदे राम राम । रावाण अत्यंत सकाम ।
तिचे प्राप्तीचा संभ्रम । आवडी खेंव देऊं पाहे ॥२७॥
सीता म्हणे रावणासी । वोळंबा चाखों पाहे अग्नीसी ।
तेंवी तू मज भोगू पाहसी । जळोन मरसी मत्कामें ॥२८॥
पतंग आलिंगी दीपकळी । तो तत्काळ होय होळी ।
तैसी भोगू जाता जनकबाळी । तू सकुळीं मरशील ॥२९॥
अहल्याभिलाष सुरेंद्रा । सर्वांगी भगें जाहली इंद्रा ।
तैसी अभिलाषितां रामदारा । बाणधारा निमसील ॥१३०॥
श्रीराम सूर्य रावण खद्योत । राव कांजी श्रीराम अमृत ।
तुझे ठायी जो भोगासक्त । ते निश्चित दंश मशक ॥३१॥
श्रीराम केवळ क्षीरसमुद्र । रावण मुताचे थिल्लर ।
त्याचे ठायी भोगतत्पर । ते शूकर नरदेही ॥३२॥
श्रीराम जगाचें जीवन । रावण डोंबाड परिच्छिन्न ।
तेथे रमती ढोंक हीन । साधु निमग्न श्रीरामी ॥३३॥
अतिथिवेषे अति कपटी । संन्यासिरुपें स्त्रीलंपटी ।
विषयगोडीचिया गोष्टी । आमिषासाठी मरे मासा ॥३४॥
मम भर्ता तदा ब्रह्मन्वयसा सर्प्तीवशकः ।
अष्टादश तु वर्षाणि ममायुर्वगम्यते ॥७॥
वयाचा विचार करताही त्याचा हा प्रयत्न निंद्य व दूषणास्पद :
वना निघतां श्रीरामचंद्रा । सत्ता वीस वर्षे त्या अवसरा ।
माझे वय वर्षे अठरा । वसिष्ठद्वारा ऐकिलें ॥३५॥
तू तंव बहुकाळाचा म्हातारा । विषय भोगितां आली जरा ।
तू माझिया अभिलाषद्वारा । निशाचरा का मरसी ॥३६॥
मज न्यावया कैंची शक्ती । वृथा वल्गतोसी धरुनि भ्रांती ।
धांवण्या येवोनि श्रीरघुपती । करील शांती बाणे एके ॥३७॥
सुटल्या श्रीरामाचे कुर्हाडे । केउते पळसी बापुडे ।
बाण सोडोनियां गाढे । धड दुधडें पाडील ॥३८॥
श्रीराम येईल त्रिशुद्धी । रावणे जाणोनिया दुर्बुद्धी ।
सीता घेवोनिया खांदीं । चपळपदीं निगाला ॥३९॥
तंव पिशाचवदन खरसंयुक्ता । सारथियें सन्मुख आणिले रथा ।
मग रावणे रथी वाहोनि त्वरिता । होय निघता लंकेसी ॥१४०॥
एकाजनार्दना शरण । रावणे केले जानकीहरण ।
आता ऐकोनि सीता आक्रंदन । जटायु दारुण युद्ध करील ॥४१॥
जटायु रावणातें दंडून । सीता सोडवील आपण ।
रावण करील जटायुच्छळण । तेंही निरुपण अवधारा ॥४२॥
स्वस्ति श्रीभावार्थ-रामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
जानकीरावणहरणं नाम षोडशोऽध्याय ॥१६॥
॥ ओंव्या १४२ ॥ श्लोक ७ ॥ एवं १४९ ॥
