॥ श्रीएकनाथमहाराजकृत
13.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अरण्यकाण्ड
॥ अध्याय तेरावा ॥
रावण व मारीच यांची भेट :
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
रावण व मारीच यांची भेट :
सीताप्राप्त्यर्थ उद्विग्न । रथारुढ रावण ।
मारीचाश्रमा ठाकोन । आला आपण सवेग ॥१॥
तत्र कृष्णानिजधरं जटामंडलधारिणम् ।
ददर्शं नियताहारं मारीचं नाम राक्षसम् ॥१॥
तं रावणः समागम्य विधिवत्स्वेन तेजसा ।
कुशलं परिपृच्छ्यार्थ ययाचे तेज पूजितः ॥२॥
मारीचातें देख रावण । जटाधारी वल्कलाजिन ।
आणि नेमस्थ फळाभोजन । एकांतस्थान वनवासी ॥२॥
ऐसा मारीच रावणे देखोन । दोघीं दिधले आलिंगन ।
मग त्यासी कुशळ पुसोन । केले पूजन यथाविधि ॥३॥
आलेल्या संकटांचे मारीचाला निवेदन व सीता हरणाची इच्छा :
मग बैसवून एकांती । रावण सांगे मारीचाप्रती ।
रामे गांजिलें बहुता रीती । सांगू किती तुजपायीं ॥४॥
पद्मपुराणीं माझे ठाणांतर । दूषण त्रिशिरा आणि खर ।
चवदा सहस्र निशाचर । अति दुर्धर तिही लोकी ॥५॥
श्रीरामे वर्षोनि शर । मारिला खर दुषण त्रिशिर ।
चवदा सहस्र निशाचर । बाणाधारा निवटिले ॥६॥
आणि शूर्पणखा भगिनी धाकटी । सकर्ण नासिके ते केली नकटी ।
लाजविल्या राक्षसकोटी । लाज मोठी हे आम्हा ॥७॥
कर्णनासापहारेण भगिनी मे विरुपिता ।
अस्य भार्यां जनस्थानात्सीतां सुरसुतोपमाम् ॥३॥
आनयिष्यामि विक्रम्य सहायस्तत्र मे भव ।
त्वया ह्यहं सहायेन पार्श्वस्थेन महाबल ॥४॥
भ्रातृभिश्चासुरान्सर्वान्नाहमत्राभिचिंतये ।
तत्सहायो भव त्वं मे समर्थो ह्यसि राक्षस ॥५॥
एतदर्थमहं प्राप्तस्त्वत्समीपं निशाचर ।
शृणु तत्कर्म साहाय्ये यत्कांर्य वचनान्मम ॥६॥
सौवर्णस्त्वं मृगो भूत्वा चित्रो रजतबिंदुभिः।
आश्रमे तस्य रामस्य सीतायां प्रमुखे चर ॥७॥
शूर्पणखेचें नासिक कर्ण । छेदोनि केले विरुपपण ।
तितें मी व्हाया उत्तीर्ण । करीन हरण श्रीरामकांता ॥८॥
सीता स्वरुपवर्णन :
सीतासौंदर्याची थोरी । मज पाहता चरचरीं ।
तीसमान नाही दुसरी । परम सुंदरी श्रीरामप्रिया ॥९॥
सीता लावण्यमंजरी । उमा रमा न पवे सरी ।
माझ्या अंतरंगींची नारी । तिच्या नखाग्री खद्योत ॥१०॥
मुख्य मंदोदरी जाण । नव्हे तिच्या अंगुष्ठासमान ।
तिंचे मी करु पाहे हरण । तरी सहाय आपण मज व्हावे ॥११॥
मारिचाकडे साहाय्याची मागणी व त्याची दिशा :
तुजपायीं विचित्र गती । धरु जाणसी नानाव्यक्ती ।
सुवर्णमृगाची आकृती । धरुन सीतेप्रती त्वा जावे ॥१२॥
सीता सांडोनि पंचवटी । सुवर्णमृगवधार्थदृष्टी ।
राम धांवेल पाठोपाठी । ऐसी गोष्टी साधावी ॥१३॥
दूरी नेवोनिया राघव । हाक मारावी अति अपूर्व ।
लक्ष्मणां वेगी धांव पाव । हेंहीं लाघव साधावे ॥१४॥
मारीच श्रूयतां तात वचनं मम भाषत ।
आर्तोऽस्मि मम चार्तस्य भवान्हि परमा गतिः॥८॥
मारीचा तू माझा निजमंत्री । तुझी मी जाणे अगाध थोरी ।
तू मज जालिया सहकारी । मी चराचरी निजविजयी ॥१५॥
सीताहरणी मी अति आर्त । तरी आर्त पुरवावया तू समर्थ ।
माझे पुरवावे मनोरथ । कृतकार्यार्थ साधावा ॥१६॥
तू साह्य जालिया संपूर्ण । देव दानव दैत्यगण ।
जिणों शकें मी रावण । तेथे श्रीराम कोण बापुडे ॥१७॥
तरी पर्णकुटिका सांडोन । तुवा नेलिया रामलक्ष्मण ।
मागे मी करीन सीताहरण । मग नको कोण मज म्हणे ॥१८॥
राहुग्रासी चंद्रकळा । तैसी हरीन जनकबाळा ।
मारिचसाह्याचा सोहळा । मी कळिकाळा नाटोपें ॥१९॥
मारीचावरची प्रतिक्रिया :
ऐकता श्रीरामाचे नांव । मारीचाचा दचकला जीव ।
विसरला वाग्वैभव । भयोद्भव अनिवार ॥२०॥
तस्य रामकथा श्रुत्वा मारीचस्य महात्मनः ।
शष्कमासीच्च वदनं परित्रस्तो बभूव सः ॥९॥
वना आला रघुनंदन । ऐकता मारीच भ्रांतमन ।
तोडीचें पाणी गेले पळून । मूर्च्छापन्न तो पडिला ॥२१॥
नांव ऐकोनि रघुनाथा । मारीचास प्राणांतावस्था ।
मग बोलणें चालणें खुंटली वार्ता । तेणे लंकानाथा आश्चर्य ॥२२॥
मारीच महावीर शूर । रणामाजी रणरंगधीर ।
योद्ध्यांमाजी मुख्य जुझार । विचारसमुद्र पै मारीच ॥२३॥
भय ओढवल्या थोर । मज मारीचाचा आधार ।
याचेनि बळे म्या सुरासुर । चराचर जिंकिले ॥२४॥
कार्य मांडल्या अति अवघड । समूळ साधी अर्थ गूढ ।
तैसाचि निधडा योद्धा दृढ । विचारप्रौढ विवेकी ॥२५॥
त्याचे कारण :
धावो फार न लगतां । केवळ श्रीरामनाम ऐकता ।
मारीचास मरणावस्था । भयकंपता का जाली ॥२६॥
श्रवणी ऐकता श्रीरघुनंदन । धाके चेतना गेली पळोन ।
निर्जीव भासे प्रेतवदन । प्राणस्फुरण पळाले ॥२७॥
जैसा जड मूढ पाषाण । तैसा मारीच मूर्च्छापन्न ।
त्यासी वेगी दशानान । सावधान स्वये करी ॥२८॥
मारिचास पुसे लंकानाथ । न लागातां घावो ना आघाअ ।
नांव ऐकता श्रीरघुनाथ । मुर्च्छा मरणात का आली ॥२९॥
रावणास कळकळीचा उपदेश, शूर्पणखेचा धिक्कार :
मारीच होवोनि सावधान । रावणासी घाली लोटांगण ।
श्रीरामासी विरुद्धपण । सर्वथा आपण न करावे ॥३०॥
क्षोभलिया श्रीरामचंद्र । ससैन्य सबंधु सपुत्र ।
सप्रधान निशाचर । तुजसहित निर्दळील ॥३१॥
सहितसैन्य चवदा सहस्र । जैसे वधिले त्रिशिरा खर ।
तैसे तुम्हांसी समग्र । बाणी रघुवीर बधील पै ॥३२॥
सुटल्या श्रीरामाचा बाण । तुम्हांमाजी निवारील कोण ।
राक्षसकुळाचें निर्दळण । न लागता क्षण तो करील ॥३३॥
तरी तुझे सद्बुद्धीचे हरण । कोणे क्रूरें केले संपूर्ण ।
जे श्रीरामाचे दारहरण । केंवी आपणा करवेल ॥३४॥
शेषमाथीचा निजमणी । आणू शकेल सांग कोणी ।
तेंवी सीता श्रीरामापासोनी । केंवी आमुचेनि आणवे ॥३५॥
श्रीसूर्याची प्रभावळी । हरुं न शके महाबळी ।
तेंवी श्रीरामावेगळी जनकबाळीं । न करवेची पै आम्हा ॥३६॥
जैसी सर्वांगी पडली व्योमा । वेगळीं न करवे नीळिमा ।
तेंवी सीता वेगळी श्रीरामा । सर्वथा आम्हा न करवे ॥३७॥
ऐसेनि करिता सीताहरण । आम्हा तुम्हा आले मरण ।
सकळ कुळाचें निर्दळण । होईल जाण लंकेशा ॥३८॥
नकटीं होवानियां आधी । ससैन्येंसी खरु वधिला युद्धी ।
तरी शूर्पणखेची मूढ बुद्धी । ऐकता त्रिशद्धीं निमशील ॥३९॥
परस्त्रीहरणाचे दुष्परिणाम :
सहस्रबाहु गर्वेकरी । ऋषींची धेनु बळे हरी ।
त्याते ब्रह्मचारी मारी । क्षणामाझारी ससैन्य ॥४०॥
करिता परदारहरण । अवश्य आम्हा आले मरण ।
म्हणोनि मारीच रावणचरण । धरी तंव रावण क्षोभला ॥४१॥
रावणाचा क्षोभ व मारीचावर राग :
दोघें माणसे वनवासी । नाही सैन्यसामुग्री त्यांसी ।
त्यांचे भय मज दाविसी । तरी तू जालासी नपुसंक ॥४२॥
तू तंव बळिष्ठ संपूर्ण । ते काय जाली आंगवण ।
होता श्रीरामनामस्मरण । कंपायमान का होसी ॥४३॥
मी तंव रावण दुर्धर । बंदीं घातले ग्रह सुरवर ।
श्रीराम बापुडे किंमात्र ॥४४॥
त्याचे भय थोर धुरा । तेथे कोण पाड श्रीरामचंद्रा ।
धाकुटा हाही निशाचरा । धरी धीर पुरा मारीचा तू ॥४५॥
ऐकोनि रावणाचे वचन । मारीच जाला हास्यवदन ।
रावणा न धरी गर्वाभिमान । पूर्ण कथन अवधारी ॥४६॥
पुरा वीर्यादहं राजन्पर्यटन्पृथिवीमिमाम् ।
बलं नागसहस्त्रस्य धारयन्पर्वतोपंमः ॥१०॥
अवजानन्न संमोहाद्वालोऽयमिति राघवम् ।
विश्वामिरस्य तां वेदिमभ्यधावं कृतत्वरः ॥११॥
मारीच स्वतःचा अनुभव सांगतो :
तुझ्याच ऐसा लंकानाथा । मज पूर्वी बळदर्प होता ।
जे बाळ मानोनि रघुनाथा । त्याच्या विघाता करु गेलों ॥४७॥
अंगी नागायुतबाळ । श्रीरम सगळें गिळीन बाळ ।
विश्वामित्रादि ऋषी सकळ । मारोनि तत्काळ भक्षीन ॥४८॥
ऐसी धरोनिया हांव । आश्रमी घेतली धांव ।
तंव निःशंक धनुर्वाडा राघव । बाणलागव अनिवार ॥४९॥
मारीच सुबाहु महावीर । सवे निधडे निशाचर ।
मारुं जाता श्रीरघुवीर । बाण दुर्धर सुटले ॥५०॥
राक्षस देखोनिया क्रूर । डळमळीना श्रीरामचंद्र ।
सुटला बाणांचा महापूर । वीरे वीर खोंचले ॥५१॥
माझा मुद्गल केला कूट । सुबाहूचें ओढणें केले पीठ ।
वीर पाडिले उद्भट । ऐसा रणसुभट श्रीराम ॥५२॥
श्रीरामे बाण सोडिला तिधारा । तो म्या तोडिला खर्गधारा ।
भल्लानें सुबाहु केला पुरा । मज पिसारा लागला ॥५३॥
पिसारा लागला ब्रह्मांडी । तेणे डोळा आली झांपडी ।
अंगी भोवंडी अशुद्ध नाकीं तोंडीं । बळे भुरकुंडी हाता पाया ॥५४॥
बाण पिसार्याचा दुर्धर वारा । घाये उडविले अंबरा ।
शतयौजनें समुद्रतीरा । मूर्च्छापन्न पुरा पाडिलों ॥५५॥
बटारिले नेत्रवाट । घरघरीत वाजे कंठ ।
धाके धुकधुकितसे पोट । प्राणसंकट मज आले ॥५६॥
अर्धोन्मीलित जाले नयन । प्राण जाला अति सुलीन ।
शरीर जाले अचेतन । बाणार्धखंडें मरण मज आले ॥५७॥
उरला होता आयुष्यकण । तेणे मी जालो सावधान ।
घाये गेली आंगवण । धैर्य संपूर्ण पळाले ॥५८॥
श्रीरामबाणाचा भेदरा । थोर लागला दशशिरां ।
सर्वत्र देखोनि श्रीरामचंद्रा । चराचरामाझारीं ॥५९॥
वृक्षे वृक्षे हि पश्यामि चीरकृष्णाजिनांवरम् ।
गृहीतधनुषं रामं पाशहस्तमिवान्तकम् ॥१२॥
अपि रामसहस्राणि भीतः पश्यमि रावण ।
राभूतमिदं सर्वमरण्यं प्रतिभाति मे ॥१३॥
राममेव हि पश्यामि रहिते राक्षसेश्वर ।
दृष्ट्वा स्वप्नगतं राममुभ्द्रमामीव चेतनः ॥१४॥
चीरकृष्णाजिनांबर । जटामुकुटधर्नुधर ।
देखे वृक्षोवृक्षीं श्रीरामचंद्र । प्रळयरुद्र मारक ॥६०॥
भयभीत चकितदृष्टी । श्रीराम देखे कोट्यनुकोटी ।
श्रीराममय ही सृष्टी । धाक पोटी बाणाचा ॥६१॥
पक्षी सावज वनी फडके । श्रीराम म्हणोनी मी वचकें ।
लहान थोर जे जे देखे । ते ते श्रीराम देखे धगधगीत ॥६२॥
देखता वृक्षाची दाटी । श्रीरामचि देखे दृष्टी ।
धाके गजबजिलो पोटी । ऐसी श्रीरामे पाठी पुरविली ॥६३॥
स्वप्नाचिये परिपाटीं । श्रीराम देखे दृष्टी ।
श्रीरामाचा धाक पोटी । श्रीरामे पाठी पुरविली ॥६४॥
श्रीरामबाणाचा पिसारा । तेणे ऐसा लाविला भेदरा ।
तरी विरोधितां श्रीरामचंद्रा । उरी निशाचरा उरेना ॥६५॥
श्रीरामधाक मज मानसी । त्या मज धाडिता रामापासी ।
जीव जाईल देखता त्यासी । निश्चयेंसी रावणा ॥६६॥
रकारादि वर्णजल्प । ऐकता मजला थोर कंप ।
श्रीरामनामाचा अलाप । तेणे सकंप सर्वदा ॥६७॥
रावणाला परावृत्त करण्याचा कळकळीने प्रयत्न :
श्रीरामाच्या पूर्वार्धबाणे । जीव चांचला दैवगुणें ।
आता त्यांपासी जाणे । तै तो मज प्राणें सोडीना ॥६८॥
जै मज मागे विधिला बाण । तै रामा होते बाळपण ।
आता रारुण्य संपूर्ण । घाये प्राण घेईल ॥६९॥
देखतांचि श्रीरघुनाथ । माझे जिवित्वाचा अंत ।
मी सर्वथा नवचें तेथ । त्रिसत्य सत्य मद्वाणी ॥७०॥
रावणाचे प्रलोभन :
ऐसे सांगोनि रावणासी । मारीच रडे उकसाबुकसीं ।
मग रावणे धरोनि पोटासी । काय त्यासी बोलत ॥७१॥
मनुष्य खाजुकें आम्हांसी । त्या रामातें तू का भीसी ।
सीता साधल्या मजसी । अर्धराज्यासी देईन ॥७२॥
जैसा माझा ज्येष्ठ कुमरु । त्याहूनि करीन राजधरु ।
तुज मी देईन छत्र चामरु । सैन्यसंभारु गज वाजी ॥७३॥
साडी रामभयाची धुकधुक । अर्धराज्य देईन देख ।
निधडा होई निःशंक । माझी भाक तू घेई ॥७४॥
मारीचाचे उत्तर :
तरी मेल्यामागें पिंडदान । ते भक्षिती कागश्वान ।
श्रीरामे घेतलिया माझा प्राण । राज्य कोण भोगील ॥७५॥
तुझी बुद्धि ऐकता जाण । ना मारीच ना रावण ।
ऐसे करीन श्रीरामबाण । कुळनिर्दळण राक्षसा ॥७६॥
नकटीची केवळ दुर्बुद्धी । तिणें भेदिली तुझी बुद्धी ।
परदारहरणविधी । करी तो त्रिशुद्धि महामूर्ख ॥७७॥
देखता नकटीचा मुखवट । तत्काळ बुद्धीस होय पालट ।
जालासी परदारलंपट । शठ नष्ट महापापी ॥७८॥
होता नकटीचें दर्शन । निमाला त्रिशिरा खर दुषण ।
आता निर्दाळावया रावण । नकटें वदन आणिले ॥७९॥
स्वयंवरी वरावया सीतेते । धनुष्य वाहता अति स्वार्थें ।
धनुष्य न उचलतां तूतें । ते श्रीरामे भंगिले ॥८०॥
तै काय झाली आंगवण । का न केले सीताहरण ।
सभेसी जाले काळे वदन । घेवोनि प्राण पळालासी ॥८१॥
तू पळसी विराधाभेणे । तो श्रीरामे मारिला न लागता क्षण ।
तेथे तू बापुडे रावण । मशक कोण संग्रामी ॥८२॥
शूर्पणखेची दृष्ट बुद्धीं । श्रीरामदारहरणविधी ।
बाणी दाही मस्तकें छेदी । तेणे त्रिशुद्धी निमशील ॥८३॥
स्वामीची वासना पुरवित । संवादीं मिळतील बहुत ।
परी यथार्थ धर्म परमार्थ । सांगता आप्त दुर्लभ ॥८४॥
ऐक बापा लंकनाथा । म्या सांगितले यथार्थता ।
ते जै न माने तुझीया चित्ता । तै माझी कथा अवधारी ॥८५॥
होता श्रीरामदर्शन । तत्काळ जाईल माझा प्राण ।
तेथे मी न वचे वाहिली आण । तेणे रावन क्षोभला ॥८६॥
रावणाचा संताप व मारीचाला ठार करण्याचा मानस :
श्रीराम तुझा घेईल प्राण । ती मी मारिता राखेल कोण ।
वर्मी खोंचला रावण । तुझे निर्दळन माझेनी ॥८७॥
आज्ञाभंगो नरेंद्राणां । राजाज्ञेचें उल्लंघन ।
करिता राये करावे हनन । संदेह जाण न करावा ॥८८॥
सेवक मोडी स्वामिचें वचन । यदर्थ शास्त्रविधिविधान ।
सेवकासी करावे हनन । हे तुझे मुख्य मरण माझेनि ॥८९॥
श्रीराम मानव रंक तापसी । त्याचे भय मज दाविसी ।
तो मी गिळीन एका घासीं । लक्ष्मणासीं समवेत ॥९०॥
मी तंव क्षोभल्या रावण । धाके निमती राम लक्ष्मण ।
मग सीतेचे पाणीग्रहण । मी करीन प्रतापें ॥९१॥
मारीचाचा कराव्या घात । कोपे खवळला लंकानाथ ।
तंव मारीच पडला विचारांत । उभयथा मृत्यु मज आला ॥९२॥
रामादपि च मर्तव्यं मर्त्यव्यं रावणादपि ।
उभाभ्यामपि मर्तव्य वरं रामो न रावणः ॥१५॥
रावणाच्या हस्ते मरण्यापेक्षा श्रीरामांच्या हातून मरण येणे उत्तम म्हणून मारीचाची कबुलीः
जाता पंचवटीआंत । अवश्य वधील श्रीरघुनाथ ।
आणि तेथे न वचता अनर्थ । लंकानाथ वधील ॥९३॥
रावणाचे हातें मरण । तै मज जाले अधःपतन ।
आणि लागता श्रीरामबाण । कृतकल्याण मज तेणे ॥९४॥
अति दुर्धर श्रीरामबाण । घाये वारील जन्ममरण ।
ज्यासी लागें तो सुखसंपन्न कृतकल्याण रामबाणें ॥९५॥
ऐसे विचारोनि चित्ता । मारीच म्हणे लंकानाथा ।
बोलिलो श्रीरामभयाची वार्ता । तुझ्या पुरुषार्था पहावया ॥९६॥
करावया श्रीरामासी रण । तुझी कैसी आंगवण ।
तू तंव अति पुरुषार्थी रावण । तरी साह्य पूर्ण मी तुज ॥९७॥
हरावया श्रीरामकांता । सर्वस्वें वेंचीन जीविता ।
निमेषें प्रलोभोनि सीता । मृगवेषतावैभवे ॥९८॥
ऐसे ऐकोनि मारीचवचन । सुखावला दशानन ।
मग धांवोन दिधले आलिंगन । आणि कंठाभरण अर्पिले ॥९९॥
ऐशा दोघीं करोनि गुजगोष्टीं । ठाकोनि आले पंचवटी ।
श्रीरामजगजेंटठी जे ठायी ॥१००॥
मागे ठेवोनि सारथि रथ । दोघे आले वनाआंत ।
मग मारिचासी म्हणे लंकानाथ । कृतकार्यार्थ साधावा ॥१॥
कामीकमनीय मृग रुपता । धरोनि सवेग प्रलोभोनि सीता ।
दरी न्यावे श्रीरघुनाथा । सौमित्रभ्रात्यासमवेत ॥२॥
येता देखोनि रामबाणासी । अदृश्य व्हावे लाघवेंसीं ।
तव मी हरीन जानकीसी । मग लंकेसी जाऊ दोघे ॥३॥
ऐसी आप्तवें सागोनि गोष्टी । हरिखें त्याची पाठी थापटी ।
परम प्रीती धरोनि पोटी पंचवटीं प्रवेशले ॥४॥
करीतां जानकीचे हरण । धाकती मारीच आणि रावण ।
एकाजनार्दना शरण । कथाविंदान अवधारा ॥५॥
पुढील श्रीरामचरित्र । अति गुह्य आणि विचित्र ।
श्रवणें पातकी होती पवित्र । चिदचिन्मात्र श्रीराम ॥६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
मारीचरावणपंचवट्यागमनं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥१३॥
॥ ओंव्या १०६ ॥ श्लोक १५ ॥ एवं १२१ ॥
