(निर्याणाचे अभंग)
3617.
(निर्याणाचे अभंग)
पैल आले हरी । शंख चक्र शोभे करी ॥१॥
गरुड येतो फडत्कारे । ना भी ना भी म्हणे त्वरे ॥धृपद॥
मुगुटकुंडलांच्या दीप्ति । तेजे लोपला गभिस्त ॥२॥
मेघश्यामवर्ण हरी । मूर्ती डोळस साजिरी ॥३॥
चुतर्भुज वैजयंती । गळा माळ हे रुळती ॥४॥
पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥५॥
तुका झालासे संतुष्ट । घरा आले वैकुंठपीठ ॥६॥
अर्थ :
अहो खरोखर मला पलीकडे हरी येताना दिसत आहे त्यांच्या हातामध्ये मला शंख चक्र अगदी शोभून दिसत आहे. गरुडाच्या पंखाचा आवाज फडफड येत आहे जणू काही तो म्हणत आहे की ‘भिऊ नकोस भिऊ नकोस हरी त्वरेने तुझ्याकडे येत आहे’. मुकूट आणि कुंडल याचे इतके दैदीप्यमान तेज पडले आहे की त्यापुढे सूर्य देखील लोपला आहे. मेघ मेघाप्रमाणे व शामवर्ण असलेल्या हरीची मूर्ती अतिशय डोळस व साजिरी दिसत आहे. त्या हरीचे चतुर्भूज रुप आणि गळयामध्ये वैजयंती माळ अतिशय शोभून दिसत आहे. त्या हरीचा पितांबर कसा झळकत आहे पाहा त्या पितांबराच्या तेजाने दाही दिशा उजळल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, वैकुंठाधीश घरी आले त्यामुळे मी संतुष्ट झालो आहे.
