उठा पांडुरंगा आता दर
27.
उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा । झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ॥१॥
संत साधु मुनी अवघे झालेती गोळा । सोडा सेजसुख आता पाहु द्या मुखकमळा ॥२॥
रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी । मन उतावीळ रूप पाहावया दृष्टी ॥३॥
राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया । सेजे हालउनि जागे करा देवराया ॥४॥
गरुड हनुमंत पुढे पाहती वाट । स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट ॥५॥
झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा । विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा ॥६॥
