ज्याचे गर्जता पवाडे
1632.
ज्याचे गर्जता पवाडे । कळिकाळ पाया पडे ॥१॥
तो हा पंढरीचा राणा । पुसा सहा चौ अठरा जणा ॥धृपद॥
चिंतिता जयासी । भुक्तीमुक्ती कामारी दासी ॥२॥
वैकुंठासी जावे । तुका म्हणे ज्याच्या नावे ॥३॥
अर्थ :
ज्याचे पोवाडे गर्जुन केले असता कळिकाळ देखील शांत बसतो, तो दुसरा तिसरा कोणीही नसून पंढरीराया आहे. आणि याच्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर सहा शास्त्र, चार वेद, आठरा पुराणांना तुम्ही विचारून पहा. त्याचे चिंतन केल्यावर भक्ती व मुक्ती या काम करणाऱ्या दासी होतात. तुकाराम महाराज म्हणतात असा हा पांडुरंग आहे त्याचे नांव जरी घेतले तरी वैकुंठ प्राप्त होते.
