(पाईकाचे अभंग)
3639.
(पाईकाचे अभंग)
जातीचा पाईक ओळखे पाईका । आदर तो एका त्याचे ठायी ॥१॥
धरितील पोटासाठी हतियेरे । कळती ती खरे वेठीचींसी ॥धृपद॥
जीताचे ते असे खरे घायडाय । पारखिया काय पाशी लोपे ॥२॥
तुका म्हणे नमू देव ह्मुण जना । झालियांच्या खुणा जाणतसो ॥३॥
अर्थ :
जो खरा जातवान सेवक आहे तोच खऱ्या सेवकाला ओळखतो व त्याच्या एकाच्याच ठिकाणी त्याचा आदरही असतो. मग इतर सर्व शिपाई पोटासाठी हत्यार हातात धरतात त्यांनाही हे कळते की आपण केवळ बिगाऱ्यासारखेच काम करत आहोत. जे खरे जातीचे शिपाई आहेत त्यांनाच इतर शिपायाचे धाय डाय कळत असतात कारण ते खरे पारखे आहेत आणि जे खरे परीक्षक आहेत त्यांच्यापुढे ते कसे लपले जातील ? तुकाराम महाराज म्हणतात, सर्वत्र एक देव आहे सर्व लोकांमध्ये देव आहे हे आम्ही ओळखले आहे त्यामुळे आम्ही सर्व लोकापुढे नतमस्तक होऊ आणि या लोकांमध्येही कृतार्थ जे झाले आहेत त्यांचे लक्षण आम्ही ओळखू कारण आम्ही खरे परीक्षक आहोत.
