(सीताशोक)
3640.
(सीताशोक)
रामा वनवास । तेणे वसे सर्व देश ॥१॥
केले नामाचे जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥धृपद॥
वनांतरी रडे । ऐसे पुराणी पवाडे ॥२॥
तुका म्हणे ॠषिनेम । ऐसा कळोनि का भ्रम ॥३॥
अर्थ :
श्रीरामचंद्रांनी दंडकारण्यामध्ये वास केला त्या निमित्ताने तेथे खूप लोकांची वस्ती झाली आहे. त्यांनी आपल्या पितृआज्ञेचे पालन करुन आपल्या नामाचे रक्षण केले समर्थ कधीही आपण दिलेले वचन मोडत नाही त्याचे रक्षण करतो. सीतेकरता श्रीराम वनामध्ये रडत होते असे पोवाडे पुराणात आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, काही लोक म्हणतात की सीतेसाठी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र वनामध्ये रडत होते पण वाल्मिकी ऋषींनी जसे रामायण लिहिले तसेच वर्तन प्रभूंना करणे गरजेचे होते हे तुम्हाला सर्व माहित असतानाही प्रभू रडत होते याविषयी भ्रम का धरता ?
