जोहार मायबाप जोहार ।
345.
जोहार मायबाप जोहार । मी विठोबारायाचा महार ।
हिशेब देतो तारोतार । लंबे बाकीचा कारभार ।
मज नफराचे शिरी की जी मायबाप ॥१॥
सकाळींच मी निजून उठतो । आईबापाचे नांवे पांच ग्रास घेतो ।
झाडोनी पाटी दरबार आणितों। अविद्या केर पुंजा की ॥२॥
आवास जेवा सांगोन येतो । रखुमाईस तुकडा मागून खातो ।
सारी रात गवरापाशी जागतों। बीज सेवितो प्रेमाचे की ॥३॥
मी नफर चोरू नेणे आंग । हाती वागवितो धन्याची ढांग ।
यमदूत देखता सुमाग । त्यांचे ढुंगावरी लगबगे हाणतो की ॥४॥
माझे धन्याचे हाती । अठरा पगड निपजल्या याती ।
सात वार सत्तावीस नक्षत्रे पंधरा तिथी । दिनरात वर्षाचे किती की ॥५॥
येवढे तरी जगड्व्याळ । ब्रह्मयाने केले विशाळ ।
परी ते काय गा परवांचे बाळ । माझे धन्याचे कमळ ।
नाळा माजी बुळबुळ करित होते की ॥६॥
कायसी ब्रम्हयाची कहाणी । महादेव सेवितो पायवणी ।
महा थोर बैसले खेचर ध्यानी । परी तो मनी न सांपडे की ॥७॥
आम्हांसी ना कळे म्हणाल जरी । तरी खेळवितो पंचतत्वांची दोरी
पाप पुण्याचा निवाडा करी । दवेत राक्षत संहारी की ॥८॥
चारी खाणी चारी वाणी । चौऱ्यांशी लक्ष जीव योनी ।
स्थावर जंगम अणुरेणूचा धणी । करणी करून वेगळा की ॥९॥
येवढी याची आटणी दाटणी । ऐसी याची नका करू घोकणी ।
यमाजी मारील ढुसणी । काढील तांबडे पाणी । बोलू नेदी की ॥१०॥
देहपूर पाठणीचे ठाणे । यमाजी दूताचे झालिया धांवणे ।
मग जिवाजी मर्दमाने । कोठे चुकवोनी पळतील की ॥११॥
विठूरायाचा मर्द निजबीज । आहे मी नफर सरदाज ।
कानी ऐकता आवाज । आलो महाराज जवळ की ॥१२॥
वैकुंठाहुनी माझ्या धन्याची उडी । नरसिंहरूपे सोडी ।
ढूस मारून पोट फोडी । या हिरण्यकश्यपाचे की ॥१३॥
नरसो बाबाजी स्वता खंब । त्याचा कारभार वेगळेचि थोंब ।
मोठा रागीट एकचि बोंब । रोडगे बंब मागतो की ॥१४॥
परी तो आमुचा आहे सखा भाऊ । एकमेकांचे आवडते जीऊ ।
ऐसे ध्यान पहावया जाऊ । नफराचा ठाऊ नुरे की ॥१५॥
विठोबाची करितो चाकरी । खावया मागतो भाकरी ।
अखंड चोखा महाद्वारी । कृपा दीनांवरी करा की जी मायबाप॥१६॥॥
