॥ श्रीएकनाथमहाराजकृत
3.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय तिसरा ॥
रावणसभेवर मारूतीचा पुच्छप्रयोग
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
बाजातपेठा, बिभीषणाचे मंदिर पाहूनही सीतेचा शोध लागला नाही :
शोधिता बिभीषणमंदिर । सुखी झाला तो कपीन्द्र ।
शुद्धि न लभेचि सीता सुंदर । तेणे वानर उद्वेगी ॥१॥
शोधिलें समस्त नगर । शोधिलीं हटकें घरोघर ।
शुद्धि न लभेचि अणुमात्र । तेणे वानर उद्वेगी ॥२॥
शोधिलें समस्त नगर जाण । जन आणि अवघे वन ।
स्वये शोधिलें सावधान । तेणे उद्विग्न वानर ॥३॥
सीताशुद्धर्थी उद्विग्न । अति चिंता कंपायमान ।
आता करी बुद्धि आपण । सीता चिद्रत्न तेणे लाभे ॥४॥
मारूतीची अभिनव योजना :
येथे शोधावया सीताशुद्धर्थ । कळी माजवूं नगराआंत ।
लागता निष्ठुर आघात । सीताशुद्धर्थ वदतील ॥५॥
रावण आज्ञा अति दारूण । त्याभेणें न सांगती जन ।
बुद्धि निर्धारी आपण । कलहो पूर्ण उत्पादी ॥६॥
आपण राहोनिया गुप्त । कळी लाविजे जेथिलें तेथ ।
वर्मे कर्मे आक्रंदत । सीताशुद्धर्थ वदतील ॥७॥
ऐसे विचारोनि जाण । प्रवेशला लंकाभुवन ।
राजद्वरीं संपूर्ण । करी विंदान कलहाचें ॥८॥
स्वतः गुप्त राहून शेपटीच्या साहाय्याने सर्वत्र कलह माजविला :
गुप्त राहोनि जनाआंत । वानर चेष्टा करी चेष्टित ।
कलहा माजवी जेथींचा तेथ । कथा अद्भुत अवधारा ॥९॥
हनुमान विनोदे पै जाण । निजपुच्छासी करी नमन ।
सीताशुद्ध्यर्थ आपण । साह्य संपूर्ण मज व्हावे ॥१०॥
घरोघरी पाणी साठलेल्या घागरींची आपटा-आपट व स्फोट :
पुच्छे गोवोनि फोडी घागरी । तीवरी पाडी दुसरी ।
सवेंचि ढकली तिसरी । चौथी तीवरी घटस्फोट ॥११॥
पांचवी जाण पै चांचरी । सहावीचा आधार धरी ।
शातानुशतें असंख्य नारी । फोडी घागरी निजपुच्छें ॥१२॥
कोण मेला गेला आम्हांआंत । रिघोनि घागरी फोडित ।
हनुमान पुच्छ भोवंडी नाकांत । नारी नाचत चमकोनी ॥१३॥
पुढिल्या चमकोनि नाचती । मागील दचकोनि झाडिती ।
नाकीं पुच्छ भोवंडी मारूती । नारी शिंकती खसखसा ॥१४॥
नारी शिंकती थटथटां । घागरी फुटती फटफटां ।
नगरी उदकाचा तोटा । लावी वेढा निजपुच्छें ॥१५॥
भरली घागरी नगराआंत । रिघो नेदिच हनुमंत ।
द्वंद मांडिले परी गुप्त । तोटा नगरांत उदकाचा ॥१६॥
राजा निमाला ये नगरी । घटस्फोट राजद्वारी ।
शंख करिती नरनारी । सीता सुंदरी क्षोभली ॥१७॥
सीतेला लंकेत आणल्यामुळे हा प्रसंग आला अशी नागरिकांची ओरड :
श्रीरामाची निजकांता । चोरोनि आणिलीसे सीता ।
तिणें उठविलें आकांता । लंकानाथा वधावया ॥१८॥
सीता क्षोभली दारूण । शोषिलें राक्षसांचे जीवन ।
आता कैसेनि वांचती प्राण । जीवनेंवीण जिणें कैंची ॥१९॥
आंगोळ्या मोडिती नरनारी । क्षोभे क्षोभली सीता सुंदरी ।
आता राक्षसा नुरे उरी । करील बोहरी लंकेची ॥२०॥
राजद्वारी घटस्फोट । खापरें पडली घनदाट ।
बुजाली राजद्वाराची वाट । विघ्न दुर्घट लंकेसी ॥२१॥
ऐसा हा घटस्फोटवृत्तांत । वेगळा बैसोनि हनुमंत ।
कलहो माजवी नगराआंत । सीताशुद्ध्यर्थ शोधावया ॥२२॥
राजभवनाकडे जाणार्या मानकर्यांवर शेपटीचा प्रयोग,
अश्वारूढ, गजारूढ, रथारूढ व शिबिकेतील स्वारांची दैना, दुर्दशा :
राजसन्मानी महावीरी । अश्वीं चढोनि राजद्वारी ।
होहो मामा जीजीकारीं । नानापरीं नाचविती ॥२३॥
पुच्छ गोवोनि अश्वपायांत । वीरा तोंडघसी पाडित ।
दांत घालोनि घशांत । करी आरक्त मुख त्याचे ॥२४॥
पुच्छ आश्वाचें पाय उखळित । वीरांमुखीं अशुद्ध वाहत ।
ऐसे योद्धे असंख्यात । पडले कुंथत अति दुःखी ॥२५॥
ऐशिया वीरांच्या कोडी । उचऊचकूं त्यांची घोडीं ।
राजद्वारी घाली उपडीं । दांत पाडी वीरांचे ॥२६॥
तोंडे ठेंचली अश्वपती । तैसीच गजारूढांची गती ।
पुच्छे दंडिले मारूती । तीही ख्याती अवधारा ॥२७॥
राजयोद्धे महाशूर । चरणी ब्रिदांचा तोडर ।
माथा धरूनि आतपत्र । राजद्वारी ठाकले ॥२८॥
गजद्वारीं प्रवेशती । पुच्छे खुंटोनि गजगती ।
मागील ओढोनियां हस्ती । हाणी दांतीं पुढिल्यातें ॥२९॥
माझ्या हस्तीवरी हस्ती । का रे आणिला उद्धतीं ।
वीर वीरांते हाणिती । गज भिडती गजांसी ॥३०॥
गजदंतांची खणखण । शस्त्रे सुटती सणसण ।
राजद्वारी महारण । अति दारूण मांडिले ॥३१॥
पुढील पडलिया माहुता । पार्श्वदूतीं पुढे बैसता ।
गज गजासी जुंझतां । अत्यद्भुत गजयुद्धे ॥३२॥
वीर विजयो पावू पहात । गुप्त पुच्छाचा वाजे घात ।
गज गडबडीं जैसे प्रेत । वीर कुंथत रगडोनि ॥३३॥
ऐसे नेणो किती हस्ती । गुप्त पुच्छाचे आघाती ।
लोळविले ते कुंथती । गजपंक्तीं गांजोनी ॥३४॥
रथी बैसोनि राजकुमर । कनकदंड ढळती चवर ।
पुढे वाजंत्र्यांचे भार । राजद्वारा ठाकिले ॥३५॥
गुप्तगतीं थोकिलीं घोडीं । पुच्छे सारथियांतें ओढी ।
लागवेगें ध्वज आसुडी । कुमर पाडी क्षितीसीं ॥३६॥
महावीर पडता क्षिती । त्याचा रथ त्यावरी उलथी ।
चारी घोडीं होता पालथीं । कुमर कुंथती दडपोन ॥३७॥
वारू सारथी महारथी । एक वेळीं ते पडती ।
वाजंत्री शंख करिती । क्षिती लोळती चवरधर ॥३८॥
ऐसिया रथांच्या कोडी । हनुमान गुप्तघातें मोडी ।
पुच्छ नाचविल्या बुडी । रथाचीं घोडीं फडफडतीं ॥३९॥
ऐसे वीर नेणो किती । पडिले राजद्वारी हुंबती ।
खाट दांडिया उचलोनि नेती । तेही भीती गुप्तघाता ॥४०॥
मागिला मागे ये पांपरी । पुढिला पुढे रणभरी ।
एवढा वळसा कोण करी । निजनिर्धारी लक्षेना ॥४१॥
क्षोभली श्रीरामांची कांता । तिणें सोडिले अति उत्पाता ।
करील राक्षसांचे घाता । लंकानाथासमवेत ॥४२॥
प्रधानवर्ग राजसन्मानी । बैसोनि येता सुखासनीं ।
पुच्छ भोवंडितां भोयांचे कानी । दोघे चमकोनि पाहती ॥४३॥
भोई नाचतीं तडतडां । कान झाडिती फडफडा ।
पुच्छे लावितांचि वेढा । पालखीं पुढा आदळली ॥४४॥
धरणी आदळतां पालखी । दांडी मोडोनि वाजे मस्तकी ।
प्रधानवर्ग झाले दुःखी । अधोमुखी आदळत ॥४५॥
इतर मानकर्यांवरही त्याप्रमाणेच प्रयोग :
बोभाट केला सेवकी । एक शिंपती उदकी ।
सावधान होता एकाकीं । हांसिजे लोकी लंकेच्या ॥४६॥
रावणापासी अति सन्मान । त्यासी राजद्वारी अपमान ।
हांसता देखोनिया जन । क्षोभायमान त्यावरी ॥४७॥
सघृत त्याते नित्य चौशेरीं । यावेगळें भोजन घरी ।
रचित वेतन देता करी । राजद्वारी पडियेले ॥४८॥
भोयांसी देता बुक्या लाता । ते म्हणतीं का मारिता वृथा ।
भूत चेतवी श्रीरामकांता । अपमानता तेणे तुम्हा ॥४९॥
ऐशिया पालखियांच्या हारी । हनुमान उलथी पुच्छेंकरी ।
अवकळा करोनि भारी । धुळीमाझारीं मेळविलें ॥५०॥
पालखी मोडली नये कामासी । खाटदांडी प्रधानांसी ।
कुंथत धाडिलें घरासीं । अपमानासीं राजवर्गीं ॥५१॥
लंकेमाजी आहे सीता । ऐकोनि आल्हाद हनुमंता ।
तिचे साधावया इत्यर्था । कळी कलहार्था उपपादी ॥५२॥
मल्लांचा संघर्ष; वारेवाले, वाजंत्री, वेदपाठक व इतर :
पुढे ब्रिदाचे माल जात । मागेंही माल येती उन्मत्त ।
हनुमान उचलोनि त्यांची लात । वेगी हाणित पुढलियां ॥५३॥
का रे हाणितों लाता । तो म्हणे चांचरलो अवचिता ।
तू तरी मातलासी सर्वथा । तुझिया घाता मी करीन ॥५४॥
दांत खावोनि सवोष्ठीं । भिंवया चढवोनि नाकाटीं ।
येरयेरा हाणिती मुष्टी । क्रोधदृष्टी खवळोनि ॥५५॥
उरीं शिरी मुंडपीं देखा । बाहु आंसडोनि लाविती धडका ।
परस्परें हाणिती झडका । गुडघा ढका हाणोनि ॥५६॥
तळवे हाणिती रागेंकरीं । उफराटिया निजकरीं ।
वर्मी हाणिता कोंपरी । शिरी उरीं चंडघातें ॥५७॥
वेगे आणावया तळासीं । दोघें उडती आकाशी ।
शिर हाणोनि शिरासीं । निजबाहूसीं आफळी ॥५८॥
एक रिघे एकातळीं । तंव तो त्यासी चेंपी भूतळीं ।
वरील उलथोनि तत्काळी । धरी नळी निमटावया ॥५९॥
नळी चेपिता प्रबळ । पायांमाजी लावी कळ ।
तेणे होवोनि विव्हळ । नळी तत्काळ सोडिली ॥६०॥
सवेंचि धरोनि दोहों पायी । उपटावया दोन्ही बाही ।
बळे आदळितां भुयीं । तळपोनि ह्रदयीं हाणी लाता ॥६१॥
ऐसी मल्लविद्या गाढी । दोघांची समान घडमोडी ।
झोंबी घेता कडोविकडी । समपरवडी दो वीरां ॥६२॥
घेता मल्लविद्धेचा झाडा । मृदंग्या लाविला वादु गाढा ।
त्यापुढे राऊतांचा झगडा । काधोनि जमदाढा हांकिती ॥६३॥
त्यापुढे ब्राह्मण वेदांती । घटपट बोलती युक्ती ।
कोठे आहे सीता सती । तेही नेणती निश्चये ॥६४॥
वेदपाठकांचा वेवाद । अक्षरे चुकलीं स्वर अबद्ध ।
सीताशुद्धिचा अनुवाद । तेही विशद न बोलती ॥६५॥
रावणाच्या सभेत हेरांचा वृत्तांत, सर्व ठिकाणी अंधार :
ऐसी लावितां नगरी कळी । ठायी न पडे जनकबाळी ।
आता रावणाचे जवळी । सभा समूळी शोधूं पा ॥६६॥
तंव झाली निशी तेथ । रावाणाचे सभेआंत ।
रिघता झाला पै हनुमंत । तोही प्रताप अवधारा ॥६७॥
सिंहासनी दशानन । सभेंसी राक्षस प्रधान ।
निजयुद्धी सावधान । पार्श्वदगण असंख्य ॥६८॥
सभेंसीं येवोनि घरटीकार । करूनि रावणासी जोहार ।
सांगती नगरींचा विचार । विघ्न दुर्धर दिसताहे ॥६९॥
जितुकी दृष्टि संचारी । तितुकी आजिच्या प्रथम प्रहरीं ।
अवघी उठली राजद्वारी । क्षयकारीं नृपनाथा ॥७०॥
पूर्वीच्यांनीं दुर्लक्ष केल्याचा परिणाम :
अमरवदें खटाटोप । ऐसी अरिष्टे मानिती अल्प ।
स्वये निमाला हिरण्यकशिप । सप्रताप अहर्निशी ॥७१॥
ज्याचे आमंत्रण घेऊन । त्याचे घरी अन्न खावोन ।
अधर्में हरी द्विजधन । सहस्त्रार्जुन निमाला ॥७२॥
त्याचे दुश्चिन्हांचें संधी । सहस्त्रभुजांचे खांदी ।
पुत्रांसहित सैन्यमांदी । त्याते वधी द्विजपुत्र ॥७३॥
मग सांगती ज्योतिषी । जावोनि सांगा रायापासीं ।
अधर्में आणिले सीतेसी । ते विघ्न नगरासीं पै आले ॥७४॥
अश्वपति गजपति । अतिरथी महारथी ।
राजद्वारी स्वये उलथती । घाये हुंबती दडपोनी ॥७५॥
कोणी न दिसतां आघाती । वीर मरणांत कुंथती ।
अश्व गज तळमळती । मूर्च्छा येती प्राणांत ॥७६॥
आणिक अरिष्टांची थोरी । घटस्फोट राजद्वारी ।
असंख्यांत शतसहस्त्री । करिती नारी महाशब्द ॥७७॥
पालखीपदस्थ आर्तुबळी । शिबिकाभंग मेळविले धुळी ।
म्हणती क्षोभली जनकबाळी । करील होळी नगराची ॥७८॥
अशा वार्ता आणेल त्याला कडक शासन :
रावणे ऐकोनि ही कथा । दुष्ट वदला हे वार्ता ।
म्हणे करा रे याचे घाता । द्वंद सर्वथा हा होय ॥७९॥
आणा संमुख बांधा हात । जिव्हा छेदा रे सदंत ।
कान कापोनि येथ । न्या नगरांत खरारोहें ॥८०॥
ऐकोनि रावणाचे वचन । हनुमान क्षोभला दारूण ।
असत्य मानितो विघ्नचिन्ह । सत्य त्यासी करूनि दाखवू ॥८१॥
विघ्न समस्त सत्य मानिती । रावण चळीं कोपे चित्ती ।
ऐसी सभेसी लावी ख्याती । कोपे मारुती खवळला ॥८२॥
माझी सर्व दुश्चिन्हें सांगता जरी । दंड पाविजे घरटीकारीं ।
तरी भूमिभार संसारी । आतांचि बाहेर भोवंडीन ॥८३॥
आयुष्य व्हावे माझिया पुच्छासी । रावणसभा हे कायसी ।
ख्याती लावीन सकळांसी । रावणासी गांजोनी ॥८४॥
मारूतीचा सभास्थानांवर प्रयोग, दिवे विझवणे :
सभासमवेंत प्रधानीं । रावण बैसला सिंहासनी ।
हनुमान ते काळी कोपोनी । केली करणी ते ऐका ॥८५॥
सुंगधतलैदीपिका अनेक । कर्पूरदीप अठरा लाख ।
दोही बाही लखलख । सभा सम्यक शोभत ॥८६॥
तंव हनुमंता आला तंवक । पुच्छ हाणोनियां देख ।
विझविल्या दीपिका सकळिक । चमकले लोक सभेचे ॥८७॥
सभेसी पडता अंधारी । हनुमंते मांडिली चोरी ।
मुकुट कुंडले छत्रे हारी । शस्त्रास्त्रीं नागविले ॥८८॥
एक म्हणती माझी नेली वस्त्रे । दुजा म्हणे माझी नेली शस्त्रे ।
भट म्हणे माझी नेली धोत्रे । सभा वानरे नागविली ॥८९॥
कुंडले घेता कान तोडी । वस्त्रे घेता डोळे फोडी ।
बाहुवटें घेता बाहु मोडी । केली धांदडी राक्षसा ॥९०॥
मुकुट घेता मस्तक फोडी । कटिसूत्रासी माज मोडी ।
मुद्रिका घेता आंगोळ्या उपडी । केली धांदडी राक्षसा ॥९१॥
कंठमाळा घेता कंठ मुरडी । पदका काढिता ह्रदय फोडी ।
नेसणें घेता लिंग तोडी । केलीं बापुडीं राक्षसे ॥९२॥
नेसणीं सांडा रे लौकरीं । नातरी लिंगा करील बाहेरी ।
नपुंसकता ये संसारी । कैशापरी सोसेल ॥९३॥
पायी बिद्रें वीरांसी पूर्ण । तयांसाठी मोडी चरण ।
बोंबलूं जाता छेदी घ्राण । फे फे वचन राक्षसा ॥९४॥
येरयेरा सांगती बुद्धी । बोंबलूं नका रे त्रिशुद्धी ।
बोंबलूं जाता नाक छेदी । निःशब्दवादी उगे राहा ॥९५॥
रावणाचे उरी शिरी । हनुमान सुबद्ध टोले मारी ।
तेणे त्यासी आली अंधारी । भयेंकरी न बोलवे ॥९६॥
अंधारीनें न दिसे व्यक्त । आंगी वाजती आघात ।
तेणे भये लंकानाथ । चळी कापत थरथरां ॥९७॥
वस्त्रे अलंकार जोडती पुढे । तैंसे नाक तंव न जोडे ।
ख्याति लाविली माकडें । येरू दडे येरामागें ॥९८॥
जो बोंबलिला घरटीकार । ते विघ्न आले दुस्तर ।
सीता क्षोभली साचार । दश शिरवधार्थीं ॥९९॥
जानकी कोपोनि अद्भुत । तिणे सोडिला पुच्छकेत ।
रावण मेला की जीत । कोणी मात न सांगे ॥१००॥
रावण निमाला अंधारी विघ्न आले त्यावरीं ।
बोंब पडली सभेमाझारी । ये पांपरी राक्षसा ॥१०१॥
मारिला इंद्रजित कुंभकर्ण । तयांमागें येथे रावण ।
आता धांवण्या धांवे कोण । राक्षसगण कांपती ॥१०२॥
पिता क्षोभिला पवन । दीपिका गेल्या विझोन ।
राक्षसा ओढवले कंदन । दशवदन निमाला ॥१०३॥
भंगले राजाज्ञेचें सूत्र । सभेमाजि रिघाले चोर ।
नागविले थोर थोर । निशाचर पळों पहाती ॥१०४॥
जो कोणी निघे सभेबाहेरी । त्यासी पुच्छ सुबद्ध मारी ।
अवघे दडाले अंधारी । ये पापरी राक्षसा ॥१०५॥
सीता क्षोभिली अति उद्धट । आम्हांसी आले अति संकट ।
बाहेर जाता न फुटे वाट । विघ्न दुर्घट ओढवले ॥१०६॥
पुढे रावणाचा मुकुट । अति बळे ओढी मर्कट ।
तेणे धाके दशकंठ । म्हणे शेवट मज आला ॥१०७॥
सत्य बोलती घरटीकार । विघ्न आले मज साचार ।
गुप्तघात अति दुर्धर । लागती निष्ठुर प्राणांत ॥१०८॥
हनुमान सांगे कानी बीजाक्षर । तुवा चोरिली सीता सुंदर ।
तुझे छेदावया शिर । आलो साचार रामदूत ॥१०९॥
रावणाची दाही शिरे । हनुमान छेदिता नखाग्रें ।
निवारलें हो श्रीरामचंद्रे । म्हणोनि वानरे राखिला ॥११०॥
तू जरी मारशील लंकानाथ । तरी माझा पुरूषार्थ जाईल व्यर्थ ।
ऐसे बोलिला श्रीरघुनाथ । तेणे हनुमंत न मारी ॥१११॥
वानरे लावितांचि हात । रावण झाला अति भ्रांत ।
कानी जो पडला गुप्तार्थ । लंकानाथ तो नेणे ॥११२॥
दीपिका आणितांचि तेथ । अवघे नागवे हळहळित ।
येरयेरा जै पहात । मग लाजत अधोमुखें ॥११३॥
एकाची वळली बोबडी । एक धाकधाके उबडीं ।
एक केवळ जाहली वेडीं । आला धाडी पुच्छकेत ॥११४॥
एका झाली दांतपाडी । एक केवळ झालीं मढी ।
एक धाकती बापुडी । आला धाडी पुच्छकेत ॥११५॥
एका झाल अधोवार्थ । एका सुटला कंपवात ।
सभेचा निमाला पुरूषार्थ । पुच्छकेत लागला ॥११६॥
रावणाचे सभेआंत । करोनि राक्षसा आकांत ।
नागवोनि गेला हनुमंत । लंकानाथ कालमुख ॥११७॥
राक्षस गांजिले उदंड । सभेचे निमाले बळबंड ।
रावणाचे काळे तोंड । तो ही वितंड गांजिला ॥११८॥
संमुख देखिला दशानन । सभेमाजी पडिले खान ।
अवघे हळहळती नग्न । दंतभग्न राक्षस ॥११९॥
सभेंसी बैसोनि हनुमंत । रावणराक्षसां अति आकांत ।
हनुमान महात्मा याचा अर्थ । व्यर्थ ग्रंथ न म्हणावा ॥१२०॥
एक श्लोकाचा श्लोकार्थ । इतुका आहे गुप्तार्थ ।
श्रोती पहावे सावचित्त । मी अपत्य संतांचे ॥१२१॥
जगाम चिन्तामपरां सीतांप्रति महाकपि : ॥
अपत्यभाग्य कैंचें मज । तंव त्यांचे चरणरज ।
ग्रंथार्थी निजओज । श्रीरघुराज स्वये वदवी ॥१२२॥
माझे भावार्थरामायण । त्याचे मूळ मायां दावावें कवण ।
श्रीराम मूळीं मूळकारण । कथार्थ गहन श्रीराम ॥१२३॥
श्रीराम माझे वदतें वचन । अक्षरीं अक्षरीं श्रीराम पूर्ण ।
माझे बुद्धीचे गुह्य ज्ञान । चैतन्यघन श्रीराम ॥१२४॥
ह्रदयी श्रीराम रिघोनि जाण । बळेचि करवी रामायण ।
ग्रंथाचें मूळीं श्रीरघुनंदन । ग्रंथार्थ गहन श्रीराम ॥१२५॥
नेणे वेद नेणे शास्त्रार्था । माझे अंगी अति मूर्खता ।
ग्रंथ आवडला श्रीरघुनाथा । वदनी वदविता श्रीराम ॥१२६॥
एकाजनार्दना शरण । रामे रम्य रामायण ।
रामे रम्य कथा गहन । कथा पावन श्रीरामे ॥१२७॥
॥ इति श्रीभावार्थरामयणें सुंदरकांडे एकाकारटीकायां
रावणसभालुंठनं नाम तृतियोऽध्यायः ॥
॥ ओव्या १२७ ॥ श्लोक - ॥ एवं संख्या १२७ ॥
