॥ श्रीएकनाथमहाराजकृत
30.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय तिसावा ॥
असाळीवधाचे वर्णन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
सीतेच्या आज्ञेला प्रमाण मानून त्याप्रमाणे वर्तन
हनुमंताचे युद्धकंदन । मुख्यत्वे वनविध्वंसन ।
घेवोनि सीतेचे आज्ञापन । फळभोजन मांडिलें ॥१॥
जोंवरी होय क्षुधाहरण । पडली फळे खाय वेंचोन ।
घातली श्रीरामाची आण । फळे तोडोन न खावीं ॥२॥
जानकीआज्ञा वंदोनि शिरी । वनाची करावया बोहरी ।
हनुमान जाऊनिया दूरी । फळाहारीं बैसला ॥३॥
काळाग्नि आव्हाहूनि जठरी । मग बैसला फळाहारी ।
वना आली महामारीं । वन संहारीं कपिपुच्छ ॥४॥
सीतेची आज्ञा प्रमाण । घातली श्रीरामाची आण ।
पुच्छे वृक्ष उपडोन । तळी झाडोन फळे खाय ॥५॥
पहिलें साकरेंचें टेंक । सव्यें सेवी पित्तशामक ।
वृक्षउपाडा केला अनेक । भक्षोनि वृक्ष झुगारी ॥६॥
हनुमान आपोशन न मोडी । बैसली बैसका न सोडी ।
पुच्छ पुरवी नाना परवडी । वनी वृक्ष उपडीं समूळ ॥७॥
कपिभोजन धर्मस्थिती । पहिलें द्विजां घाली तृप्ती ।
ते बैसविले दोही पंक्तीं । फळे अर्पीं अति प्रीती ॥८॥
द्विजशेष सेवी हनुमंत । तेणे होवोनिया तृप्त ।
धालेपणाचें ढेंकर देत । वनविघातें कपिपुच्छ ॥९॥
अनुसंधानावांचून । हनुमान नेघे अवदान ।
वनफळांचें भाग्य गहन । ब्रह्मार्पण कपिमुखें ॥१०॥
पिकलीं फळे रामार्पण । जारसीं करी कृष्णार्पण ।
हिरवी करी ब्रह्मार्पण । सावधान प्रतिग्रासीं ॥११॥
फळे खात गटगटां । मिटक्या देतसे मटमटा ।
वांकुल्या दावी सुरश्रेष्ठा । दावी आंगोठा दैत्यांसी ॥१२॥
पिकलीं खाय आवडीकरीं । हिरवी तोंडपालटावरीं ।
पिंपळी मिरें कोशिंबिरी । लोणच्यावारीं खातसे ॥१३॥
अलवणता वाटे ज्यासी । सामुद्रिक मेळवीं त्यासी ।
पुच्छ विध्वंसी वनासी । वृक्ष चौपासी उपडोनि ॥१४॥
ताळ तमाळ वृक्ष सरळीं । खर्जुरी पोफळी नारिकेळी ।
उपडोनि करी वडवाळी । रणकल्लोळीं हाणावया ॥१५॥
राक्षससैन्य आतुर्बळी । रणी करिता रवंदळी ।
हाणावया हातातळी । करी वडवाळी वृक्षांच्या ॥१६॥
वनकरांशी भांडण :
युद्ध होईल निश्चित । ऐसे जाणोनि हनुमंत ।
शिळा पाषाण वृक्ष पर्वत । आणिले तेथ युद्धार्थी ॥१७॥
वृक्ष उपडितां कपींद्रें । जागीं जालीं वनकरें ।
म्हणती मारा रे मारा रे । वन वांनरें भंगिले ॥१८॥
बोंब उठिली एकसरी । वन भंगिले चौफेरीं ।
शस्त्र घेवोनि वनकरीं । वानरावरी लोटले ॥१९॥
एक तळपती वोडणखांडें । एक विंधती लक्षोनि कांडें ।
एक हाणिती गोफणगुंडे । एक ते धोंडे टाकिती ॥२०॥
वन उपडिलें माकडें । सांगता रावो मानील कुंडें ।
यासी धरावे रोकडें । रावणापुढें न्यावया ॥२१॥
पुच्छ लांब आहे विशेष । टपोनि धरा म्हणती एक ।
एक म्हणती आवश्यक । घालूनि झडप धरूं यासी ॥२२॥
ऐसी वनकरांची मात । ऐकोनिया हनुमंत ।
त्यांचा करावया घात । मग कृतांत क्षोभला ॥२३॥
हाणिता पुच्छाचा पै साट । त्यांची शस्त्रे करोनि पीठ ।
अवघे कवळोनि एकवट । बांधिली मोट वनकरांची ॥२४॥
चौदा सहस्त्र वनकरा । पुच्छे बांधोनियां भारा ।
निक्षेपिले पै सागरा । मत्स्यमकरां आहारार्थ ॥२५॥
राक्षसी आटिती सीतेसी । तुवा संवाद केला ज्यासी ।
तेणे मारोनि वनकरांसी । केला वनासी विध्वंस ॥२६॥
एकी सुटला अधोवात । एकी फळफळा मूतत ।
एकी चळचळां कांपत । मूर्च्छागत पै एकी ॥२७॥
द्वंद्वा पिटला वानरू । तुज धरू चिरूं मारू ।
तुझ्या रक्ताचा घोट भरूं । गटका करू सगळाचि ॥२८॥
सीता गांजिता सुंदरी । हनुमान गुरूगुरी तयांवरी ।
भेणे पळाल्या निशाचरी । आपांपरीं ते ऐका ॥२९॥
भेणे पळाली देहस्मृती । नेसणीं गळालीं नाठवें चित्ती ।
नागव्या जावोनि रावणाप्रती । मग सांगती वनबोंब ॥३०॥
कैचें नेणो आले वानर । वन विध्वंसिले परिकर ।
चौदा सहस्त्र वनकर । पुच्छे समग्र मारिले ॥३१॥
किंकरांची योजना व त्यांचा संहार :
भरंवशाचे निधडे वीर । ऐशी सहस्त्र किंकर ।
रावणे धाडिले सत्वर । आणा वानरा बांधोनि ॥३२॥
रणी रगडोनि मारावी धूर । ऐसे ऐशीं सहस्त्र किंकर ।
शस्त्रे वर्षती अपार । शेखी वानर बूजिला ॥३३॥
हनुमान विचारी पोटांत । मज न रूतती शस्त्रघात ।
साहोनियां शस्त्रसंपात । काय समस्त करितील ॥३४॥
हनुमान निश्चळ शस्त्रांतळी । तंव किंकरीं पिटिली टाळीं ।
वानरे केली रणरांगोळी । महाबळी आम्ही रणमारे ॥३५॥
घायीं तुटला निवटला । बाणी तृणप्राय केला ।
ऐकोनि किंकरांच्या बोला । कपि कोपला रणरागें ॥३६॥
कपि पुच्छासी सांगे गोष्टी । आजि निर्दाळू राक्षसकोटी ।
हाणिता पुच्छाच्या आघाटीं । जीवा साटी किंकरां ॥३७॥
लागता पुच्छाचा आघात । त्यांच्या शस्त्रां करोनि भस्मांत ।
किंकर मारिले समस्त । कपि गर्जत जयरामें ॥३८॥
मी तंव श्रीरामाचा दूत । सीता शुद्धीसी आलो हनुमंत ।
सीता सांपडली येथ । आला अंत राक्षसा ॥३९॥
राक्षसा करोनि रगडा । झाडीन इंद्रजिताचा पादाडा ।
रावण गांजोनिया गाढा । राम रोकडा आणीन ॥४०॥
ऐकता हनुमंताची मात । बोंब उठली लंकेआंत ।
ऐकोनि किंकरांचा घात । लंकानाथ दचकला ॥४१॥
जंबुमाळीचा वध :
प्रहस्तसुत आतुर्बळी । रागे धाडिला जंबुमाळी ।
कपि बांधोनि गळसमेळीं । मजजवळी आणावा ॥४२॥
जरी येसी कपि न मारून । तरी तुझे मस्तका मूत्रवपन ।
शेखी नासिका छेदीन । खरारोहण विटंब ॥४३॥
जंबुमाळी क्रोधायमान । वर्षला शरधारा दारूण ।
पृथ्वी आकाश व्यापून । शरीं संपूर्ण कोंदलें ॥४४॥
माझ्या आंगी बाण न रूपती । शंका न मानीच मारूती ।
रामनामाच्या आवृत्तीं । निःशंकस्थिति विचरत ॥४५॥
पंचक्रोश शिळा प्रचंड । वानरे हाणितली वितंड ।
जंबु धनुर्वाडा अखंड । केली शतखंड बाणे एके ॥४६॥
कपि हाणिता वृक्षघाय । तोही केला तिळप्राय ।
हनुमान म्हणे धन्य माय । योद्धा होय जगजेठी ॥४७॥
माझे शिळाघाय वृक्षसमेळीं । निवारोनि महाबळी ।
योद्धा होय राक्षसकुळी । जंबुमाळी महावीर ॥४८॥
अर्धचंद्रबाणसमेळीं । कपींद्र विंधिला कपाळीं ।
बाण हिसळोनि ते वेळीं । लागला निढळीं जंबूच्या ॥४९॥
लागता बाणाचा आघात । जंबुमाळी पडे मूर्च्छित ।
हनुमान गदगदा हांसत । विपरीतार्थ येथे जाला ॥५०॥
मज न रूपती तुझे बाण । तुझाचि घेवो पाहाती प्राण ।
आता कायसे रे रण । जाय परतोन मी न मारीं ॥५१॥
ऐकोनि कपीचें वचन । जंबु विचारी आपण ।
परतलिया दंडील रावण । करू निर्वाण युद्ध यासी ॥५२॥
वनचामुंडावरददत्त । परिघ टाकिला घंटायुक्त ।
करावया हनुमंताचा घात । रागे सोडित राक्षस ॥५३॥
माझे परिघाचा घात । आजि निमाला हनुमंत ।
कैसेनि राखे रघुनाथ । रणपुरूषार्थ पाहो याचा ॥५४॥
परिघ येता आंगापासीं । हनुमान उडाला आकांशी ।
वरदसामर्थ्यशक्ति कैसी । लावी परिघासी कपिपाठीं ॥५५॥
सवेग जाता हनुमंतासी । परिघ न संडी पाठिलागासी ।
विस्मयो करी कपि मानसी । शस्त्राची ऐसी निजशक्ति ॥५६॥
विचारीं पडता वानर । स्वर्गी उठिला हाहाकार ।
परिघ सुटला दुर्धर । आजि कपींद्र वांचेना ॥५७॥
ऐशा ऐकता गोष्टी । परिघ येता देखोनि पाठी ।
कपिपुच्छे घातली आठी । चेपिली घांटी वनदेवतेची ॥५८॥
देवता म्हणे श्रीरामभक्ता । तुज मी शरण आले आता ।
शस्त्रदेवता समस्ता । शरणागता तुज होती ॥५९॥
शस्त्रशक्ति भूतशक्ती । मंत्रतंत्रयंत्रशक्ती ।
अवघ्या शरण तुज येती । मज मारूती वांचविल्या ॥६०॥
सोडूनि पुच्छाचे बंधन । शस्त्रदेवता वांचवून ।
शक्तिमंडळा लोटांगण । घाली आपण हनुमंत ॥६१॥
मारू नये शरणागता । म्हणोनि वांचविली शस्त्रदेवता ।
भूतीं देखोनि रघुनाथा । शक्ति समस्ता वंदिल्या ॥६२॥
उदो म्हणोनि समस्त शक्ती । हनुमंताते ओंवाळिती ।
राक्षसा विमुख आम्ही समस्ती । साह्य युद्धार्थी श्रीरामा ॥६३॥
सीता आमुची आदिशक्ती । तिसी गांजितो लंकापती ।
रणी राक्षसा लावोनि ख्याती । आम्ही युद्धार्थीं तुज साह्य ॥६४॥
हनुमान म्हणे पुच्छा जगजेठीं । युद्धी माझी राखोनि पाठी ।
साह्य शक्ती कोट्यनुकोटी । पुच्छासाठीं मज जाल्या ॥६५॥
करोनि पुच्छाची पै स्तुती । युद्धा परतला मारूती ।
परिघ देखोन त्याचे हाती । जंबूचे चित्ती चळकांप ॥६६॥
माझा परिघ हा तत्वता । गेला हनुमंताचे हाता ।
रावणाच्या अधर्मता । शस्त्रदेवता क्षोभलिया ॥६७॥
ऐसे जंबु जंव विचारीं । तंव परिघ वाजिंनला शिरी ।
रथसारथीचीं चकचुरी । जंबुची उरी नुरेचि ॥६८॥
रथ वारू ना सारथी । ना त्याचे शिर ना त्या अस्थी ।
पाहता त्याची न दिसे व्यक्ती । नेले अव्यक्ती वानरे ॥६९॥
अखयाकुमाराचा वध :
हनुमंते जंबुमाळी । घाये केली रवंदळी ।
बोंब गेली रावणाजवळी । क्रोधानळी भयभीत ॥७०॥
मारावया पै वानर । प्रधानपुत्र दश सहस्त्र ।
रागे धाडी दशशिर । महावीर रणयोद्धें ॥७१॥
ध्वज पताका रणप्रयुक्तीं । पुढे वाजंत्री वाजती ।
मागे माता शंख करिती । पुत्रसंतती निमाली ॥७२॥
प्रधानपुत्र गजभारीं । येता देखोनि महागजरीं ।
हनुमान गर्जे भुभुःकारीं । पुच्छ अंबरी तळपत ॥७३॥
पुच्छे कळवळोनि समस्त । हनुमान करी पर्वतघात ।
घाये निमाले समस्त । जाला प्राणांत समकाळे ॥७४॥
प्रधानपुत्रां केला घात । ऐकोनि धाके लंकानाथ ।
आतुर्बळी हनुमंत । काळकृतांत रणमारे ॥७५॥
रावण पडिला चिंतावर्ती । रणी नाटोपे मारूती ।
वीर मारोनि भद्रजाती । लाविली ख्याती राक्षसा ॥७६॥
रणकर्कश रणरगडे । पांच सेनानी निधडे ।
कपीसी मारावया रोकडे । धाडी वेगाढे युद्धासीं ॥७७॥
चौघे राहोनि चहू दिशांसीं । एक राहोनि आकाशी ।
मारावया हनुमंतासी । विकट विन्यासी विंधिती ॥७८॥
कपिपुच्छ महाबळी । त्यांचे शस्त्रा करोनि होळी ।
पांच जणांतें आकळी । पुच्छसमेळी कवळोन ॥७९॥
स्वये योगिया आपण । जेंवी निरोधी पंच प्राण ।
तेंवी कपिपुच्छे पांच जण । आकळोन राखिले ॥८०॥
विवेकवैराग्यसंपन्न । पंचविषयां करिती दमन ।
तेंवी कपिपुच्छे पांच जण । निर्बंधून राखिले ॥८१॥
पंचभूतांची निवृत्ती । गेलिया सुख पावे परमार्थी ।
पांचही मारोनि पर्वतघातीं । सुखें मारूती सुखावे ॥८२॥
एकेचि घाये कपी आपण । घेतला पांचांचाही प्राण ।
ऐकोनि दचकला रावण । सेना प्रधान कांपती ॥८३॥
रावणा कोप आला दुर्धर । रणी मारावया वानर ।
स्वये धाडिला अखया कुमर । रणचतुर दिव्यमारें ॥८४॥
अखया जाणे रणकंदनार्थ । शस्त्री अस्त्रीं अतर्क्य घात ।
निरालंबी चढवोनि रथ । मारी हनुमंत साटोपे ॥८५॥
आज्ञा देता दशानना । तुरे वाजती निशाणां ।
अखया आला अशोकवना । रथछत्रसेनागजदळें ॥८६॥
अखया शरसंपातीं । रणी आच्छादिला मारूती ।
वीर सिंहनाद करिती । मारिला म्हणती वानर ॥८७॥
अखयाविजयाची नवायी । वाजंत्र्यांची लागली एकचि घायी ।
ह्नुमंतें तिये समयी । केले कायी ते ऐका ॥८८॥
भोंवता पुच्छाचा पै साट । त्याचीं शस्त्रे करोनि पिष्ट ।
सैन्य मारिले समसगट । अखया उद्भट त्रासिला ॥८९॥
पुच्छे आकळितां अखयासी । रथ उडविला आकाशी ।
धरिता न धरवे हनुमंतासी । लघुलाघवेंसीं तळपत ॥९०॥
हनुमान अखया दोन्ही वीर । युद्ध करिती निराधार ।
विस्मयो करिती सुरवर । चक्राकारपरिभ्रमती ॥९१॥
क्षणैक क्षिती क्षणैक अंबरी । क्षणैक रथ दिसे सागरी ।
क्षणैक दिसे त्रिकूटावरी । अखया भारी लाघवी ॥९२॥
पुच्छ कोपोनि लागें पाठी । रथ पळतां दिक्पुटीं ।
पुच्छे बांधोनि कडकडाटीं । रागे आपटी भूतळीं ॥९३॥
रथ आपटितांचि क्षिती । वोडणखांडें घेवोनि हाती ।
अखया उसळोनि लघुगती । मारू मारूती धाविंनला ॥९४॥
मारावया हनुमंत । वोडणखड्गेंसीं तळपत ।
कपीचा करावया घात । गगनाआंत उसळला ॥९५॥
अखया उडता आकाशी । हनुमंते धरिला पायांसीं ।
गरगरा भोंवंडितां त्यासी । देहभावासी विसरला ॥९६॥
खड्ग पडिले मातेचे वाडा । मुकुट पडिला रावणापुढां ।
ओडण पडिले लंकेच्या कडां । केला नितोडा बळाचा ॥९७॥
आपटितांचि शिळातळीं । निधा उठिला पाताळी ।
दिग्गजांची बैसलीं टाळी । झाली रांगोळी हाडांची ॥९८॥
करिता अखया समाप्ती । हनुमंताची अगाध किर्ती ।
स्वर्गी सुरवर वानिती । वानिती क्षिती ऋषीश्वर ॥९९॥
मुकुट पडतांचि पुढे । वार्ता ऐकता रावण रडे ।
म्हणे म्यांच केले कुडे । पुत्र का पुढे ढाडिला ॥१००॥
रावणाचा शोकावेग व स्वतः जाण्याची तयारी :
वानरे अखया पाडिला धरणी । बोंब आली वनींहूनी ।
रावण धुळी घाली वदनी । पडिला धरणी मूर्च्छित ॥१०१॥
पुत्रशोकें कंपायमान । क्रोधे झाला सावधान ।
माझे जे अशोकवन । शोकस्थान ते झाले ॥१०२॥
रणी मर्दिलें वानरे । वीरी घेतलें घायवारे ।
अखयाचेनि कैवारें । धाडावया दुसरे दिसेना ॥१०३॥
घ्यावया अखयाच्या सुडासी । मीच जाईन वनासी ।
वानरा मारीन निश्चयेंसी । कास सरसी घातली ॥१०४॥
म्या मारिलिया तो वानरे । अखयाचा सूड पावला खरें ।
मज मारिलिया निर्धारे । सीता सुंदरी निर्मुक्त ॥१०५॥
ऐसा करोनि विचार । युद्धा निघाला दशशिर ।
तंव वेगे धांविला ज्येष्ठ कुमर । महावीर इंद्रजित ॥१०६॥
इंद्रजिताची इच्छा :
म्हणे एकले वनचर । केवळ जे का पालेखाइर ।
त्यावरी जाणे लंकेश्वर । श्रेष्ठ विचार हा नोहे ॥१०७॥
वीरी घेतला रणधाक । म्हणोनि जाणे दशमुख ।
मी तंव घरगुती सेवक । अवश्यक मज धाडीं ॥१०८॥
वाहतो सदाशिवाची आण । शिवतों स्वामी तुझे चरण ।
वानरा रणी न मारून । गळा बांधोन आणीन ॥१०९॥
निराहारी ब्रह्मचारी । तो इंद्रजिताते मारी ।
इंद्रजित न मारवे कपीच्या करी । हा फळाहारी यथेष्ट ॥११०॥
ऐसे विचारोनि रावण । इंद्रजितासी दिधले आज्ञापन ।
रणी वानरा गांजून । गळा बांधोन आणावें ॥१११॥
इंद्रजित युद्धा निघतां वेळीं । निशाणे त्राहाटिली ते काळी ।
कंगल टोप राघावळी । केली आरोळी महावीरी ॥११२॥
शायसीं प्रयुत मत्तहस्ती । कोट्यनुकोटी महारथी ।
अनिवार नेणो किती । वीर पदाती असंख्यात ॥११३॥
वीरां कवचें रत्नखचित । शस्त्रे सैन्य लखलखित ।
पाखरा तेजीं झळकत । वीर गर्जत सिंहनादे ॥११४॥
तडक फुटले एकसरें । भिंडिमाळांचे पांगोरे ।
खाखाइलीं रणतुरें । निजगजरें चालिले ॥११५॥
इंद्रजिताला झालेले अपशकुन, ब्रह्मदेवाचे भविष्य
इंद्रजित निघतां उल्हासेंसी । नग्न कुमारी शिंके पाठीसी ।
आशंका पडली इंद्रजितासी । रावणासी चळकांप ॥११६॥
चिन्ह पुसतां ब्रह्मयासी । भविष्य कळले तयासी ।
तोही तैसांचि सांगे त्यासी । अति गुह्यासीं गुह्योक्ति ॥११७॥
युद्ध करिता वानरांसी । अपेश यशी यश अपेशीं ।
इंद्रजित बांधोनि कपीसी । तुजपासी आणील ॥११८॥
ऐकोनि ब्रह्मयाचें वचन । जयजयकारें स्वये गर्जोन ।
इंद्रजिते केले नमन । पुढील कथन अवधारा ॥११९॥
येता देखोनि इंद्रजित । आनंदें नाचे हनुमंत ।
पुरवावया युद्धमनोरथ । श्रीरघुनाथ तुष्टला ॥१२०॥
पुच्छ नाचवीत रणी । चौफेरेंसीं सैन्य आकळोनि ।
रणी मारोनि वीरश्रेणीं । रूधिरें धरणी न्हाणीन ॥१२१॥
कपिपुच्छ विचक्षण । भूतां दिधले आमंत्रण ।
मांसभक्षण रूधिरपान । रणभोजन करावे ॥१२२॥
वधोनि राक्षसांच्या कोडी । ज्याचे पोटी जे आवडी ।
ते ते पुरवीन परवडी । वाढावाढी रणमारे ॥१२३॥
आतांचि हे भाजीभाकरी । तुम्ही करावी न्याहारी ।
पुढे श्रीराम नरकेसरी । पंचधारीं निववील ॥१२४॥
असाळीचे विदारण :
इंद्रजित येता सहदळीं । पुढे धांविंनली असाळी ।
जेणे मारिला अखया बळी । त्याची होळी मी करीन ॥। १२५ ॥
ठाकोनि आली अशोकवन । पुढा हनुमंते लक्षोन ।
विकट वटारिले नयन । विक्राळ वदन पसरोनी ॥१२६॥
एक जाभाडें भूतळी । दुजे लाविले नभोमंडळी ।
कराळ विक्राळ दांताळी । जिव्हा काळी लवथवित ॥१२७॥
अणुप्रमाण होवोनि तेथ । जिव्हा दांतां नातळत ।
वेगी रिघाला घशांत । गेला उदरांत मारूती ॥१२८॥
मुखीं रिघाला मारूती । नातळेचि जिव्हादांतीं ।
असाळी विस्मयो मानी चित्ती । ठकिले निश्चिती वानरे ॥१२९॥
गोड कडु की खारट । आंबट तिखट की तुरट ।
कांही चवी न कळे स्पष्ट । अहा कटकट राक्षसी ॥१३०॥
कपि न मरेचि माझे हाती । वानर गेला अतर्क्यगती ।
पुढे काय करील ख्याती । जीवी धाकली असाळी ॥१३१॥
इंद्रजितासी करावया रण । हनुमंतांसीं आवडी पूर्ण ।
तिच्या उदरी न राहे एक क्षण । केले विंदाण ते ऐका ॥१३२॥
काळीज उपडोनि सदेंठ । बेंबीपासी फाडोनि पोट ।
हनुमान रिघोनियां स्पष्ट । केला उद्भटा भुभुःकार ॥१३३॥
असाळियें गिळीला हनुमंत । कथा विस्तारिली लोकाआंत ।
चुकला इंद्रजिताचा अनर्थ । युद्धकंदनार्थ सैन्याचा ॥१३४॥
पूर्वींच गिळीती वानर । तरी का मरता अखया कुमर ।
वनकर किंकर प्रधान पुत्र । जंबुवीर वांचता ॥१३५॥
रावणा हरिखें सांगे दूत । असाळियें गिळीला हनुमंत ।
सवेंच दुसरी बोंब सांगत । केला निःपात असाळीचा ॥१३६॥
क्रौंचां मारिली पडलंकां । विटंबिली शूर्पणखा ।
आता मारिली असाळिका । कोण कोण दुःखा मी सोसूं ॥१३७॥
जो रिघोनि उदरांआत । करी राक्षसिणींचा निःपात ।
तो इंद्रजिताचा करील घात । चळी कांपत रावण ॥१३८॥
एकाजनार्दना शरण । जाले असाळीनिर्दळण ।
पुढे इंद्रजितहनुमद्रण । सावधान अवधारा ॥१३९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
ब्रह्मलिखितहनुमन्नसाळीवधो नाम त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३०॥
॥ ओव्या १३९ ॥ श्लोक - ॥ एवं संख्या १३९ ॥
