वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ५. सुन्दरकाण्ड - अध्याय ४२ › ३१. सीतेचा पुनः निरोप

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088233 · अभंग क्र. ३१

31.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय एकतिसावा ॥
इंद्रजिताचा अपमान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लक्ष्मण पुढील वर्णन वाचतो

इंद्रजित युद्धा निघतां आवेशी । असाळी उठिली विवशी ।
श्रीरामे निरसिले तियेसी । अति उल्हासीं हनुमंत ॥१॥
गजदळेंसी अति उन्नद्ध । सैन्य देखोनिया सन्नद्ध ।
हनुमंतासी अति आल्हाद । श्रीराम गोविंद तुष्टला ॥२॥
राक्षस मारावया अति अद्‌भुत । वनउपाडा पाहे सुमूहूर्त ।
इंद्रजित गांजोनिया तेथ । गर्वहत करीन मी ॥३॥
माझे पुरावावया मनोरथ । आजि तुष्टला श्रीरघुनाथ ।
इंद्रजित आला सैन्यासमवेत । हनुमान नाचत स्वानंदे ॥४॥
पुच्छ नाचतें पै रणी । मारोनियां वीरश्रेणी ।
पूजू चामुंडा चवंडायणी । भूतां देऊं धणीं मांसाचीं ॥५॥
अखया कुमराची बोहणी । प्रथम केली म्या रणांगणी ।
येथोनि वीरांचिया श्रेणी । मारीन रणांगणी रणमारे ॥६॥
हनुमान पुच्छासी करी एकांत । जो जो आला रणाआंत ।
परतोनि न जावा नगराआंत । करावा घात अवघ्यांचा ॥७॥
जो जो येईल शरण । त्यासी येवो न द्यावे मरण ।
याचि नांवे दादुलेपण । येरा मर्दन रणमारे ॥८॥
पुच्छा आलिंगोनि पोटी । हनुमंताची गोड गोष्टीं ।
पुच्छे कवळोनि सैन्यासंकटी । राक्षसकोटी मारीन ॥९॥
स्वामिवचन मानोनि शिरी । पुच्छ रक्षण लंकाद्वारीं ।
मागे परतल्य निशाचरीं । महामारी मारावया ॥१०॥
कपिपुच्छसंवादमेळीं । करावया वीरां रणरांगोळी ।
युद्धानंदीं पिटीन टाळी । आतुर्बळी खवळलें ॥११॥
ऐकोनि कपिपुच्छसंवाद । वानरा वाढिवेचा आल्हाद ।
ऐकावया हनुमंतयुद्ध । अति सावध स्वानंदे ॥१२॥
सुग्रीवे उठोनि आपण । धरिले लक्ष्मणाचे चरण ।
इंद्रजितहनुमंतांचें रण । सांग संपूर्ण वाचावें ॥१३॥
उगे रहावया अवघे जण । घातली श्रीरामाची आण ।
वानर वीर सावधान । हनुमद्रण परिसावया ॥१४॥
परिसावया युद्ध उद्‌भट । टवकारोनि नेत्रवाट ।
वळोनि पुच्छाचा पै साट । वीर मर्कट सावध ॥१५॥
कैसे पत्र वाचितों पुढे । लक्ष्मणाच्या तोंडाकडे ।
पहात ठेलीं पै माकडें । युद्धचाडें श्रवणार्थी ॥१६॥
परिसावया कपीचा पुरूषार्थ । अति उल्हासला श्रीरघुनाथ ।
लक्ष्मण वाची ब्रह्मलिखितार्थ । युद्धकंदनार्थ कपीचा ॥१७॥
ऐसे ऐकता वानरी सकळीं । हर्षानंदे पिटीली टाळी ।
जे आमुचे ह्रदयकमळी । तेंचि सुखमेळीं रामाच्या ॥१८॥
ऐसियापरी वानरगण । ऐकावया हनुमद्रण ।
अवघे बैसले सावधान । पत्र वाचणें सौमित्रा ॥१९॥

नंतर इंद्रजित युद्धासाठी पुढे येतो

ऐकोनि असाळीचा घात । कोपे खवळला इंद्रजित ।
कपीचा करावया घात । रथ त्वरित प्रेरिला ॥२०॥
तडक फुटला अति दुर्धर । निशाणे भेरी शृंगाकार ।
इंद्रजित आला गडगजर । रणतुरें वाजती ॥२१॥
एकले एक पै वानर । त्यावरी येता असंख्य वीर ।
चळीं कांपती महाशूर । दुर्धर मार कपीचा ॥२२॥
जाणोनि सैन्याचा वृत्तांत । इंद्रजिते रथ प्रेरिला त्वरित ।
पुढे लक्षोनी हनुमंत । शर वर्षत पै आला ॥२३॥
धनुष्याचा करिता टणत्कार । दुमदुमिले गिरिकंदर ।
नादे कोंदलें अंबर । वीर दुर्धर इंद्रजित ॥२४॥
कपीनें करिता भुभुःकार । खळबळिले सप्तसागर ।
ध्यानीं दचकला पंचवक्त्र । सुरासुर कांपती ॥२५॥
नक्षत्रे तुटोनि पडती तळी । तेंचि रणरंगी रणरांगोळी ।
भूते कांपती कपिआरोळी । भद्रकाळी आश्वासीं ॥२६॥
याचिया रणमाराआंत । अति कृपाळु हनुमंत ।
मेदमांसे करील तृप्त । भय निश्चित तुम्हा नाही ॥२७॥

दोघांची तुलना व वर्णन :

ऐकता कपिगिराजगजर । मरणोन्मुख निशाचर ।
खळबळिले रथ कुंजर । निधडे वीर कांपती ॥२८॥
इंद्रजिते युद्धाचे कडाडीं । रथ प्रेरिला लवडसवडीं ।
कपि पुच्छाची उभवोन गुडी । नाचे आवडी रणमारा ॥२९॥
एक रावण कुमरराज । दुजा रामदूत वानर ।
येर राक्षसी राक्षसेंद्र । दुजा कपींद्र कपिकुळी ॥३०॥
दोघे वीर अति प्रबळ । समान बळ समान शीळ ।
दोघे संग्रामकुशळ । दोघे चपळ रणमारा ॥३१॥

ते द्वंद्वयुद्ध पाहाण्यासाठी स्वर्गस्थ देवांचे आगमन

दोघें भिडतां महावीर । पाहू आले सुरवर ।
सिद्ध गंधर्व विद्याधर । नाग किन्नर ऋषी पाहती ॥३२॥
सावित्रीसहित चतुर्मुख । उमेसहित पंचमुख ।
शक्तिसहित षण्मुख । आला देवमुख्य हव्यवाट ॥३३॥
शचीसहित सुरेंद्र । विकेटसहित वीरभद्र ।
सिद्धिबुद्धींसीं गणेंद्र । युद्धी कपींद्र पाहू आले ॥३४॥

उभयतांचे युद्ध चालू :

दोघे खवळलें महावीर । काळ कृतांत अति दुर्धर ।
दोघे जैसे काळाग्निरूद्र । युद्धा सत्वर मिसळले ॥३५॥
एक त्रिपुर एक शंकर । एक मदन एक शंकर ।
अनिरूद्ध बाणासुर । जेंवी सूकर हिरण्याक्ष ॥३६॥
एक गज एक केसरी । एक सर्प एक सर्पारी ।
वृत्र आणि वज्रधारी । ऐसियांपरी मिसळले ॥३७॥
एक मरू एक मुरारी । एक त्रिपुर एक त्रिपुरारी ।
सहस्त्रबाहु वज्रधारी । जेंवी नरहरि हिरण्यकशिपूसीं ॥३८॥
एकासीं रथाची रथगती । दुजिया निजपुच्छ सारथी ।
दोघे भिडती वीर्यार्थीं । रणव्युत्पत्ती महामारें ॥३९॥
क्षणैक भिडती भूतळीं । क्षणैक भिडती नभोमंडळी ।
क्षणैक भिडती समुद्रजळी । कुळाचळीं पै दोघे ॥४०॥
जैसी इंद्रजिताची पै गती । त्याहूनि सवेग हनुमंती ।
न चले शक्ति ना छ्ळणोक्ती । रणी मारूती नाटोपे ॥४१॥
इंद्रजित म्हणे दुर्धर घात । हनुमान विटावी फळे खात ।
कांखा पिटोनि घुलकावित । मग दावित आंगोठा ॥४२॥
इंद्रजित खवळोनि रणी । वर्षलासें दुर्धर बाणी ।
हनुमान वर्षला पाषाणीं । रणांगणी गर्जोनियां ॥४३॥
बाणी पाषाण करी तो कूट । पाषाणीं बाण होती पीठ ।
दोघा जणा समसकट । कडकडाट युद्धाचा ॥४४॥
विंधी सुवर्णपुंखें भाळी । वानर हाणी सबळ शिळीं ।
भाळीं करोनि रांगोळी । मुकुटतळी पाडिला ॥४५॥
इंद्रजित तेव्हा मुक्तकेशीं । शस्त्रे हाणी अति आवेशी ।
जे ते तोडोनियां पुच्छी । इंद्रजितासी गणीना ॥४६॥
रागे हाणी चेंडूचक्र । वानर हाणी शिळाशिखर ।
सवेग हाणिता तोमर । पर्वताग्रें टाकिलीं ॥४७॥
इंद्रजित वर्षे चक्रकांडे । वानरा वर्षे पर्वतधोंडें ।
उडोनि हाणिता पै खांडें । ठोकिला तोंडीं चडकणा ॥४८॥

मारूतीच्या व पुच्छाच्या पराक्रमाने इंद्रजित व सैन्य जर्जर

इंद्रजित गांजिला पुरा । मुखी सुटल्या रूधिरधारा ।
मारावया पै वानरा । निर्वाण शस्त्रा घेतलें ॥४९॥
साटोपे हाणिता शूलशक्ती । जाजावला अति पर्वती ।
इंद्रजित थोंटावला चित्ती । रणी मारूती नाटोपे ॥५०॥
यंत्रादि शस्त्रे हाणिता तवके । वानरे ढिलाविला खडकें ।
फुटले इंद्रजिताचे धैर्यमडके । पडिले अटकें पुच्छाचे ॥५१॥
इंद्रजिताची रणव्युत्पत्ती । फावल्या रणी लावी ख्याती ।
नाटोपतां पळे मागुती । पुच्छाप्रतीं ते न चाले ॥५२॥
सैन्यासभोंवतीं चहूंकडां । पडिला पुच्छाचा पै वेढा ।
सरों नये मागा पुढा । वानरे वेढा लाविला ॥५३॥
मेघांकित इंद्रजितासी । पळोनि जावे मेघापाठीसीं ।
कपिपुच्छ तळपें आकाशी । पळावयासी वाट नाही ॥५४॥
इंद्रजित हाणी निर्वाणघात । वानर वर्षे गिरिपर्वत ।
सैन्यासी चकचुरी होत । अति आकांत महावीरां ॥५५॥
बोंब सुटली सैन्याआंत । इंद्रजित मेला किंवा जीत ।
वानरे केला पर्वतघात । रणी हुंबत राक्षस ॥५६॥
वानर न धरवे बळे । जरी धरावा कपटमेळें ।
कपट निर्दळी लांगूळें । गोळांगुळे लाजविलें ॥५७॥
कपि नाटोपें शस्त्रघातीं । अस्त्रे शस्त्रे धाके गळतीं ।
रणी नाकळे मारूती । चिंतावर्तीं इंद्रजित ॥५८॥
न चले शस्त्रांस्त्रांची शक्ती । मागे न पळवे पुच्छहाती ।
पुढे नाटोपे मारूती । चिंतावर्ती इंद्रजित ॥५९॥
चिंताग्रस्त देखोनि त्याते । हनुमान म्हणे इंद्रजिताते ।
शिळा शिखरें न हाणी तूतें । न हाणीं पर्वतें भाक माझी ॥६०॥
इंद्रजित नांवाचा बडिवार । जिही बाणी त्वा जिंतिला इंद्र ।
तिही बाणी दंडोनि वानर । करी गजर विजयाचा ॥६१॥
जया बाणांच्या कडाडीं । देव घातले बांधवडी ।
ते बाणी मज विंधोनि प्रौढी । उभारीं गुढी विजयाची ॥६२॥
ऐसे बोलता वानर । इंद्रजित कोपला दुर्धर ।
निर्वाणशस्त्रांचा विविध मार । महाघोर मांडिला ॥६३॥
रणा पाडिल्या मारूती । मंत्रयुक्ती शरणशक्ती ।
इंद्रजित विंधी व्युत्पत्ती । कपिप्रयुक्ती ते ऐका ॥६४॥
इंद्रजित विंधी मारका शक्ती । हनुमानाचे रणव्युत्पत्ती ।
रामनामाच्या आवर्ती । निःशंकस्थिति वानर ॥६५॥

इंद्रजिताचेच बाण त्याच्यावरच परतविण्याचा हनुमंताचा विक्रम

निर्वाणबाण वीर मोकली । हनुमान वरचेवरी झेली ।
पुच्छे करोनि गटांगुळी । दावी गोळांगुळ वांकुल्या ॥६६॥
कोपे भडका उठोनि पोटी । इंद्रजित वर्षे बाणकोटी ।
हनुमान सावधान दृष्टी । शरवृष्टी झेलिली ॥६७॥
कवळोनियां त्याचे बाण । हनुमान गगनी उसळोन ।
त्याचेंनि बाणे त्यासचि जाण । रणकंदन मांडिले ॥६८॥
कपीनें करिता बाणसंपात । इंद्रजित कासावीस होत ।
सैन्य पडिले बहुत । जाले विपरीत संग्रामी ॥६९॥
हनुमंतेसीं करिता रण । इंद्रजित भुलला संपूर्ण ।
आपुले सैन्य मारी आपण । निर्वाणबाण वर्षोनी ॥७०॥
धनुष्यबाण कपीपासीं । हे सामुग्री नाही त्यासी ।
आलीसे भुली इंद्रजितासी । निजसैन्यासीं मारित ॥७१॥
माझे निर्वाणीचें बाण । वानरे कवळोनि संपूर्ण ।
आमच्या बाणी आम्हांसी जाण । रणकंदन मांडिले ॥७२॥
माझे सुटलिया शर । भेणे पळती सुरासुर ।
निःशंक निधडा हा वानर । बाण समग्र झेलिले ॥७३॥
आमचीं शस्त्रे आम्हांवरी । परतलीसे महामारी ।
आता राक्षसा कायसी उरी । कपिकेसरी नाटोपे ॥७४॥
कपिपुच्छाची व्युत्पत्ती । धनुष्य भंगी हातीचे हाती ।
रथ उपडितांचि क्षिती । वारू सारथी निमाले ॥७५॥
इंद्रजित उडोनि सत्वर । तेणे सांडिला रहंवर ।
रणी उठिला हाहाकार । राजकुमार मारिला ॥७६॥
रामनामाच्या निजशक्ती । निधडा निःशंक मारूती ।
इंद्रजितासी लाविली ख्याती । केला विरथी रणरंगीं ॥७७॥

सारथी व रथाचा संहार :

बाण मंत्र शक्तियुक्त । रणी वानरे केले व्यर्थ ।
मारिला सारथी भंगिला रथ । तेणे धाकत इंद्रजित ॥७८॥
दिव्य अस्त्रे एकैक । वानरे केली निरर्थक ।
इंद्रजिते घेतला धाक । जीवी धुकधुक लागली ॥७९॥
न चले शस्त्रांची खटपट । न चले मंत्रास्त्रनेट ।
न चले कपिपुच्छासी कपट । रणी उद्‌भट मंत्रास्त्रनेट ।
न चले कपिपुच्छासी कपट । रणी उद्‌भट गांजिंले ॥८०॥

नंतर उभयंताचे मल्लयुद्ध, इंद्रजित मूर्च्छापन्न :

खुंटली शस्त्रास्त्रांची युक्ती । वानर विचारीत चित्ती ।
मल्लविद्येची व्युत्पत्ती । शरीरशक्ती पाहू याची ॥८१॥
इंद्रजित पडला अति संकटीं । तव वानर झोंबिंनला कंठी ।
दोघा झाली लटापटीं । धिंगामस्ती मिसळले ॥८२॥
उरींशिरीं आणि कोपरीं । तडवें हाणिती परस्परीं ।
कळा लावोनि भुजांतरीं । हाणिती उरीं चपटेघात ॥८३॥
सदा तू सेविसी घृतक्षीर । आतुर्बळिया राजकुमार ।
मी वानर पालेखाईर । मजसमोर राहे पा ॥८४॥
ऐसे बोलोनि हनुमंत । मल्लव्युत्पत्ती हाणी लात ।
जे जंव चुकवी पिलंगत । तंव ठोकित तळवेनी ॥८५॥
जो जंव चुकावी आघात । तंव तळपोनियां हनुमंत ।
उरीं शिरी ललाटीं घात । स्वये हाणित अनुबंधें ॥८६॥
करिता मल्लविद्यामार । रणी गांजिला निशाचर ।
भवंडोनियां सांडी चक्राकार । जीवे वानर न मारीच ॥८७॥
इंद्रजित रूधिर वमून । रणी पडिला मूर्च्छापन्न ।
त्यासी न मारीच आपण । श्रीलक्ष्मण यासी हंता ॥८८॥
भूतळीं समस्त ऋषीश्वर । गगनी सुरनर किन्नर ।
अवघे करिती जयजयकार । विजयी वानर श्रीरामे ॥८९॥
रणी इंद्रजित मूर्च्छापन्न । स्वये होवोनि सावधान ।
अतिशयेंसीं लज्जायमान । अति उद्विग्न इंद्रजित ॥९०॥

इंद्रजिताचा उद्वेग व भीती :

हनुमंताची धैर्यवृत्ती । हनुमंताची शौर्यशक्ती ।
हनुमंताची संग्रामगती । अतर्क्य स्थिति तर्कवेना ॥९१॥
रणी इंद्रातें जिंकोन । पावलों इंद्रजित अभिधान ।
वानरेंसीं करिता रण । तृणासमान मज केले ॥९२॥
मी एक गाढा वीर सृष्टी । ऐसा फुगारा होता पोटी ।
कपिपुच्छे पुरवोनि पाठी । तृणासमान मज केले ॥९३॥
जळो माझी वीर्यवृत्ती । जळो माझी शौर्यशक्ती ।
रणी नाटोपे मारूती । कीर्ति अपकीर्ति मज माझी ॥९४॥
कोणी एखादी युक्ती । न चले वानरासी निग्रहार्थी ।
जळो माझी यश कीर्ती । चिंतावर्ती इंद्रजित ॥९५॥
माझ्या वरदाची वरदोक्ती । मारू न शके मज मारूती ।
धरोनि नेलिया रामाप्रती । विटंबिती वानर ॥९६॥
रावणे आणिले सीतेसी । बदला मज नेईन रामापासी ।
तेथे करिता अपमानासीं । वानरांसी कोण वारी ॥९७॥
रावण होवोनि भिकारी । चोरोनि आणिली सीता सुंदरी ।
वानरे करोनि जुंझारी । मज निर्धारी नेईल ॥९८॥
पूर्वी अंगद पाळण्यासीं । खेळणें बांधिले रावणासी ।
पौलस्तीनें मागतां त्यासी । अपमानेंसी सोडिले ॥९९॥
मुंडोनियां खांडमिशी । मसी लावोनि दशमुखांसी ।
पांच पाट काढोनि शिरासीं । ऐसा लंकेसी झुगारिला ॥१००॥
पडता लंकेचे चौबारां । हुरो लाविला दशशिरा ।
कोण आंवरी लहानथोरां । लंकेश्वरा अति लाज ॥१०१॥
मज धरोनि नेल्यापाठीं । माझीही होईल ऐशीच गोष्टी ।
वानर नाटोपे जगजेठीं । पुच्छे पाठी पुरविली ॥१०२॥
पुच्छी बांधोनि तत्वता । मज हनुमंते धरोनि नेतां ।
धांवण्या कोणी न ये सर्वथा । परम चिंता इंद्रजिता ॥१०३॥
अख्याच्या कैवारासीं । कोणा न येववे वानरापासीं ।
मज बांधोनि नेतां पुच्छी । धाके धांवण्यासी कोणी न ये ॥१०४॥

इंद्रजित बिळात लपतो :

ऐसा धाक घेवोनि पोटी । रणी वानरा देवोनि पाठी ।
इंद्रजित पळे उठाउठी । पुच्छासाठीं धाकोनी ॥१०५॥
पळतां न पळवें पुढे । पडिले पुच्छाचे बिरडें ।
तेथिले विवरामाजी दडे । बहु माकडे गांजिलें ॥१०६॥
दुस्तर धाक घेवोनि मनी । गुप्त विवर अशोकवनी ।
इंद्रजित तेथे गेला पळोनी । अति दडोनी राहिला ॥१०७॥

पुच्छाने केलेला सैन्यसंहार व सर्वत्र हाहाःकार

लागों न ये पळत्यापाठीं । हे तंव स्वधर्मयुद्धगोष्टी ।
इंद्रजिता मारणें नाही पोटी । यालागी पाठी न लागेचि ॥१०८॥
पुच्छ म्हणे गा कपिनाथा । कोंडोनि राखिलें सैन्या समस्ता ।
तू भागलासी इंद्रजित दमितां । मज युद्धार्था दे आज्ञा ॥१०९॥
हनुमान म्हणे तुझेनि बळे । म्या महावीर मारिले खळ ।
आता निर्दाळूं हे दळ । रणकल्लोळ विचारूनी ॥११०॥
मी जाते तू घालीं वैरण । ऐसे भरडूं राक्षससैन्य ।
डोळे जे उरती सघन । रणकंदन करू यांसी ॥१११॥
करावया सैन्यसंहार । कपि पुच्छासी करोनि विचार ।
मग दिधला भुभुःकार । राक्षसभार खवळला ॥११२॥
येता देखोनि हनुमंत । राक्षसवीर समस्त ।
होवोनियां एकभूत । शस्त्रे वर्षत समकाळ ॥११३॥
बाणी खिळीलें पृथ्वीसीं । शस्त्रे न समाती आकाशी ।
शस्त्री बुजिले हनुमंतासीं । वीरी राक्षसी गर्जोनी ॥ ११४ ।
हनुमान युद्धी निगरघट । राक्षस हाणिती भट सुभट ।
हाणिता शस्त्रे होती पीठ । अहा कटकट राक्षसा ॥११५॥
हनुमंत निधडा वीर । साहोनि त्यांचा शस्त्रसंभार ।
करावया सर्व संहार । रणी वानर खवळला ॥११६॥
अश्वीं अश्वांतें मारित । गजीं गजा संहारित ।
रथी रथांतें उपटित । वारूनि मत्त सारथींसी ॥११७॥
पायींचा पायी रगडित । वीरे वीर पै झोडित ।
ध्वज शस्त्रे छत्रे मोडित । रणी पाडित महामारे ॥११८॥
हनुमान युद्ध करी भिन्न । पुच्छे करी भिन्न कंदन ।
तेंही ऐका सावधान । रणमर्दन पुच्छाचे ॥११९॥
शायशीं प्रयुते मत्त हस्ती । पुच्छे उपटोनि मारूती ।
हस्तींच्या पिष्ट केल्या अस्थी । रणसमाप्ती गजदळा ॥१२०॥
विदारितां कुंभस्थळा । विखरा होय गजमुक्ताफळां ।
त्याचि रणरंगी रंगमाळा । अति सोहळा युद्धाचा ॥१२१॥
पुच्छ रिघोनि सैन्यातळीं । महावीरां बांधोनि मोळी ।
उपडी त्यासी भूतळीं । करी रांगोळी तळिल्यांची ॥१२२॥
अश्वतर खर उष्ट्र । पुच्छी बांधोनि अपार ।
तळी उभे अश्वसंभार । घायीं चकचूर करी त्यांचा ॥१२३॥
कपिपुच्छाचा महामार । रणी उठिला हाहाकार ।
येरीकडे हनुमान वीर । करी रणमार तो ऐका ॥१२४॥
रागे हाणिता थापडी । वीर मारीत लक्षकोडी ।
कोट्यनुकोटी पायी रगडी । मुष्टिपडिपाडीं असंख्य ॥१२५॥
बहुत चिरफाळी नखाग्री । एके मारिलीं जानुचक्रीं ।
जानुवा अपाना बहुता मारी । अर्धचंद्री पै एके ॥१२६॥
आंवळोनि उरावरी । वीर मारीत शतसहस्त्रीं ।
तडवे हाणोनि उपराउपरीं । लक्षांतरी मारित ॥१२७॥
देता भुभुःकार प्रबळ । रणी उठिला हलकल्लोळ ।
भेणेंकरोनि मूत्रमळ । प्राण तत्काळ सांडिला ॥१२८॥
हनुमंताचे गिरागजरें । आक्रंदोनि वाजिकुंजरें ।
रणी निमाली अपारे । लक्षांतरें वीरश्रेणीं ॥१२९॥
भोंवता पुच्छाचा आंवर्त । मध्ये मारितो हनुमंत ।
जाला सैन्याचा अंत । आला प्राणांत राक्षसा ॥१३०॥
पुच्छे पुरविलीसें पाठी । होवो नेदी कुटुंबभेटी ।
लंका पाहू नेदी दृष्टी । जीवासाठी राक्षसा ॥१३१॥
रणी महामारी हनुमंत । पुच्छ पळो नेती नगरांत ।
जो तो लपे प्रेताआंत । मिथ्या मूर्च्छित वीरश्रेणीं ॥१३२॥
एक घाये घाबरली वेडीं । एक नागवी उघडीं ।
एक पडिली उपडीं । मेलीं मढी होवोनि ठेली ॥१३३॥
झाडिला इंद्रजिताचा पादाडा । केला सैन्याचा नितोडा ।
रामनामे हनुमान गाढा । केला झगडा निजनेयें ॥१३४॥
युद्ध झाले अति कर्कशीं । रणी निर्दळिलें समस्तासीं ।
हाव न बाणे हनुमंतासी । राक्षसांसी मारित ॥१३५॥
रथ भंगिले कोट्यनुकोटी । मारिल्या अश्वगजांच्या थाटी ।
छत्रे भंगिली ती सृष्टी । ध्वजा कोटी विखरल्या ॥१३६॥
अशुद्ध वाहत गडगडाडीं । तेचि रणनदी गाढी ।
जालिया प्रेतांच्या दरडी । गजकरवडी महाग्राह ॥१३७॥
तीर वाहती सपिच्छी । तेचि मासे रणनदीसीं ।
वोडणें वाहती कासवें जैसी । सर्प सपुच्छीं रणभाले ॥१३८॥
मेद मांस अति दुर्गम । तेचि दोही तीरींचा कर्दम ।
विक्राळ शिसाळें विक्रम । सुसरी परम दोही भागीं ॥१३९॥
मोक्षसुखाची सुरवाडी । रणनदी वाहे पूराडीं ।
सर्वस्वात्यागे जो घाली उडी । त्याचिये जोडी तो जोडे ॥१४०॥
ध्वजेंसी वाहे रंहवरू । तेंचि शिडेंसहित तारूं ।
येथे तारक श्रीरामचंद्रू । परपारू पाववी ॥१४१॥

भूतादि शंखिणी, डाखिनी देवतास आनंद :

उदो म्हणोनि भद्रकाळी । घेवोनि आली भूतावळी ।
खाती मांसाच्या वडवाळी । रूधिरांजुळी प्राशिती ॥१४२॥
यक्षिणी बहुकाळाच्या वृत्ती । लाखोली काळिजें घेवोनि हाती ।
शंखिणी डाकिनी वाणे देती । मग भक्षिती स्वानंदे ॥१४३॥
आनंदे नाचे क्षेत्रपाळ । शिरें चौडकें वाहे वेताळ ।
भूते मिळोनिया सकळ । रणगोंधळ नाचती ॥१४४॥
बहुता दिवसांचे धरणे । दिधले हनुमंते पारणे ।
अवघे घालिती लोटांगणें । विजयी होणे रणरंगीं ॥१४५॥
पीक पिकलें रणचत्वरीं । राक्षसदांतांच्या राशी थोरी ।
भूते मोविती कुडवेंकरी । कौलकरी हनुमंत ॥१४६॥
देव ब्राह्मण भैरवासी । बलुतें देती वेताळासी ।
खळेंदान ते भूतासी । महाकाळीसी राजभाग ॥१४७॥
खळमातेरें मारकोसी । मेसको तिचे घरची दासी ।
वेसी पेंढी ते सटवाईसी । पाळभारियासीं काळिका ॥१४८॥
अग्रिम पिकाची व्युत्पत्ती । विभागली स्वये मारूती ।
पश्चिम धान्याची महाख्याती । श्रीरघुपती विभागील ॥१४९॥

ते वर्णन ऐकून वानर सैन्यात हर्ष :

कुडवें दांत मेविजेती । ऐसी हनुमंते केली ख्याती ।
हर्षानंदें कपी गर्जती । स्वये उपरमती आल्हादे ॥१५०॥
आमुचा हनुमान आतुर्बळी । रणी राक्षसा केली रांगोळीं ।
वानरी पिटोनियां टाळी । सुखसमेळी नाचती ॥१५१॥
सुग्रीव राजा तये वेळीं । आणोनियां द्रव्यांजुळी ।
हनुमंतावरी ओंवाळी । ह्रदयकमळी आलिंगी ॥१५२॥
तू विसावा कपिकुळासी । सुखी केले श्रीरामासी ।
वांचविलें वानरांसी । यश आम्हांसी तुझेनि ॥१५३॥
स्फुरण आले अंगदासी । खांदी घेवोनि हनुमंतासी ।
हरिखे नाचता चौपासी । कळिकाळासी विटावी ॥१५४॥
धरिल्या हनुमंताचे चरण । कळिकाळ बापुडे ते कोण ।
करोनि हनुमंताचे स्फुरण । मरणा मारीन मी आता ॥१५५॥

श्रीरामांना आनंद व विस्मय, मारुतीला आलिंगन

हनुमंताचे अगाध चरित्र । ऐकोनिया ब्रह्मलिखित ।
श्रीराम होवोनि समस्त । आलिंगीत हनुमंता ॥१५६॥
परमामृते अभिषिंचन । नेत्रद्वारा रघुनंदन ।
हनुमंतासी करी आपण । स्वर्गी सुरगण विस्मित ॥१५७॥
कृपा करील रघुनंदन । हनुमंताचे भाग्य गहन ।
स्वमुखे वानी त्रिनयन । भेरी निशाण लावोनी ॥१५८॥
आलिंगितां हनुमंता । राम विसरे श्रीरामता ।
कपि विसरे वानरता । एकात्मता आल्हाद ॥१५९॥
सांडोनिया मीतूंपण । देवा भक्ता आलिंगन ।
खुंटला बोल तुटले मौन । सुखसंपन्न श्रीरामे ॥१६०॥
निबिड आणि नित्य निघोट । सुख कोंदले घनदाट ।
नाही आदि मध्य शेवट । न चले वाट वेदवादा ॥१६१॥
जेथे मौनावल्या श्रुती । तेथे पावला मारूती ।
सार्थक हनुमंताची भक्ती । पावन कीर्ति तिही की ॥१६२॥
स्वये सुखावे रघुनंदन । ऐसे हनुमंताचे भजन ।
पाया लागे ब्रह्मज्ञान । एकाजनार्दना उपदेश ॥१६३॥
नित्य श्रीरामस्मरण । नित्य श्रीरामनामभजन ।
एकाजनार्दना शरण । ब्रह्मज्ञान हरिभजनीं ॥१६४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
ब्रह्मलिखितइंद्रजित अपमानहनुमंत पराक्रमवर्णनं नाम एकत्रिंशत्तमोऽध्यायः ॥३१॥
॥ ओव्या १६४ ॥ श्लोक ७ ॥ एवं संख्या १७१ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग