(पंढरीस जाणाऱ्या वार
3551.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
धरितो वासना परी नये फळ । प्राप्तीचा तो काळ नाही आला ॥१॥
तळमळी चित्त घातले खापरी । फुटतसे परी लाहीचिया ॥धृपद॥
प्रकार ते काही नावडती जीवा । नाही पुढे ठावा काळ हाती ॥२॥
जातो तळा येतो मागुता लवकरी । वोळशाचे फेरी सापडलो ॥३॥
तुका म्हणे बहु करितो विचार । उतरे डोंगर एक चढे ॥४॥
अर्थ :
देवा मी तुझ्या प्राप्तीची खूप वासना मनामध्ये धरतो परंतू मला फळ काही मिळत नाही यावरुन असे लक्षात येते की तुझ्या प्राप्तीचा काळ अजून आलेला नाही. देवा माझे चित्त तापलेल्या खापरामध्ये धान्य टाकल्यावर जशा लाह्या फुटतात अगदी तसे तळमळत आहे. देवा तुझ्या प्राप्तीवाचून मला दुसरे कोणतेही भोग आवडत नाहीत आणि तुझी भेट केव्हा होईल हे मला माहित नाही काळ तर माझ्या हातात नाही. देवा मला तुझी प्राप्ती केव्हा होईल या विचारचक्रात माझा जीव सापडला आहे तुझ्या भेटीची आशा संपली की मन निराशेच्या तळाला जाते व पुन्हा भेटीची आशा निर्माण झाली की मन परत माघारी येते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझ्या भेटीविषयी खूप विचार करत आहे जशा एखादा डोंगर उतरावा आणि दुसरा चढावा अगदी त्याप्रमाणे.
