तळवे तळहात टेंकीत ।
117.
तळवे तळहात टेंकीत । डाव्या गुडघ्याने रांगत ।
रंगणी रंगनाथ । तो म्या देखिला सये ॥१॥
गवळण जसवंती पै सांगे । आले या कृष्णाचेनि मागे ।
येणे येणे वो श्रीरंगे । नवनीत माझे भक्षिले ॥२॥
एक्या हाती लोण्याचा कवळु । मुख माखिले अळुमाळु ।
चुंबन देता येतो परिमळु । नवनीताचा गे सये ॥३॥
येणे माझे कवाड उघडिले । येणे शिंके हो तोडिले ।
दह्यादुधाते भक्षिले । उलंडिले ताकाते ॥४॥
ऐसे जरी मी जाणते । यमुनापाणिया नव जाते ।
धरूनि खांबासी बांधिते । शिक्षा लाविते गोविंदा ॥५॥
ऐसा पुराण प्रसिद्ध चोर । केशव नाम्याचा दातार ।
पंढरपुरी उभा विटेवर । भक्त पुंडलिकासाठी ॥६॥
