नका मजपाशी । वदो प्र
3313.
नका मजपाशी । वदो प्रपंचाचे विशी ॥१॥
आता नाइकावे कानी । मज देवाविण वाणी ॥धृपद॥
येऊनिया रूपा । कोण पाहे पुण्यपापा ॥२॥
मागे आजिवरी । झाले माप नेले चोरी ॥३॥
सांडियेली पाने । पुढे पिका अवलोकने ॥४॥
पडो नेदी तुका । आड गुंफू काही चुका ॥५॥
अर्थ :
हे जनहो तुम्ही प्रपंचाविषयी माझ्याजवळ काहीही बोलू नका. वाणीने देवाविषयी बोलणे ऐकावेसे वाटते या वाचून दुसरे काहीही मला कानाने ऐकावेसे वाटत नाही. जन्माला येऊन कोण पाप पुण्य पाहात बसणार आहे ? या पूर्वीपासून ते आतापर्यंत जे पाप पुण्याचे माप माझ्याकडून झाले ते काळरुपी चोराने चोरुन नेले आहे. धान्य पेरले की त्याला कोंब फुटतात मग ते बारीकसे कोंब पाहून आनंद वाटते परंतू ते छोटे कोंब मोठे होऊन त्याचे मोठे मोठे पाने होतात व त्याला पीक येते मग पीकाविषयी आवड निर्माण होते पानाविषयी आवड संपते अगदी त्याप्रमाणे मी माझ्या मागच्या पापपुण्याला सोडून दिले आहे व हरीची प्राप्ती करुन घेण्यासाठी पुढे सरसावलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, यापुढे मी कोणतीही चूक करणार नाही व कशात गुंतूनही राहाणार नाही.
