माझे मज द्यावे । नाह
3314.
माझे मज द्यावे । नाही करवीत नवे ॥१॥
सहस्रनामाचे रूपडे । भक्त कैवारी चोखडे ॥धृपद॥
साक्षीविण बोले । तरी मज पाहिजे दंडिले ॥२॥
तुका म्हणे माल । माझा खरा हा विठ्ठल ॥३॥
अर्थ :
मी लोकांना नाम घ्यायला विठ्ठलाचे दर्शन घ्यायला सांगतो हे काही चूक नाही परंतू तुम्हाला चूक वाटत असेल तर ती माझी मलाच दयावी आणि मी तुमच्याकडून काही नवीन करुन घेतो असे देखील नाही. सहस्त्रनाम ज्याच्याकडे आहे व अनेक रुपे असे ज्याने धारण केले आहे असा तो भक्तांचा कैवारी खूप चांगला आहे. मी तुम्हाला जे सांगतो ते बोलणे जर वेद श्रृती संत यांच्या साक्षी शिवाय असेल तर मला तुम्ही दंड केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हाला विठ्ठलाचे नाम घ्यायला सांगतो कारण माझा विठ्ठलरुपी माल खरा आहे.
