वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २९. सदगुरु तुकाराम महाराजांचे वर्णन

वंदूनि तुकया सद्गुरु

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088549 · अभंग क्र. १५८०

1580.
वंदूनि तुकया सद्गुरुचे चरण ।
बहमानंदे गर्जोनि पूर्ण ।
स्वानुभवभरे हाकारुन ।
औषध घ्या घ्या म्हणतुसे ॥१॥
निजात्मनगरीहुनी धडफुडा ।
वैदय आलो गा या तुमच्या चाडा ॥
तोडीन नाना व्याधींचा झगडा ।
करीन रोकडा अमरा ऐसा ॥२॥
जे औषधीचेनि सुवासमेळे ।
व्दैतरोग उठोनि पळे ।
अहं कुपिताचे पेटाळे ।
उमळोनिया सगळे तात्कळ पडे ॥३॥
घेता माझी दिव्य औषधे ।
सनकादिकासि निघाली दोंदे ।
महर्षि मातले ब्रम्हानंदे ।
जाणिजे नारदे प्रतीत हे ॥४॥
अहंविषानळे घेरला ।
सदाशिवही झिजणी पडिला ।
त्रिविध तापे होता आहाळला ।
तो म्या उपचारिला निजात्मवैधे ॥५॥
देऊनि स्मरणाचे रसायण ।
हरिले बध्दतेचे कठीणपण ।
देहातीत करुनिया जाण ।
ठेविला करुन पूर्वी जैसा ॥६॥
क्षराक्षरातीत वृक्षाची मुळी ।
ते म्या प्रल्हादचिये हदयकमळी ।
घातली होती म्हणोनि विषकल्लोळी ।
वांचला अग्निज्वाळी शस्त्रघाती ॥७॥
ऐसे एकैक स्वानुभव ।
सांगता नवल त्याची ठेव ।
कैचा उरेल अहंभाव ।
जाईल ठाव सांडोनिया ॥८॥
ऐशा नानाप्रकारच्या दिव्य औषधी ।
देऊनि उपचारिली लक्षावधी ।
भ्रमे भ्रमलीयांचिये शुध्दी ।
उपाव त्रिशुध्दी मज हाती ॥९॥
म्हणोनिया आलो गा धावत ।
विश्वास पहावया दया हो हात ।
नाही नाडीलेति केला घात ।
फुटली घात ईतकरे अहंकारे ॥१०॥
विषय कुपथ्याचेनी भरे ।
त्रिविधतापे तापलेती ज्वरे ।
अहंममतेचे लागले स्यारे ।
बध्दता थोरे देहबुध्दी ॥११॥
ममाभिमानेंसी कुंथत ।
भेदबुध्दिचेनि विकारे बरळत ।
मी माझे लटिकेंचि बोलत ।
पडिलेति लाळत शुध्दि नाही ॥१२॥
विधीचा न साहेचि वारा ।
अविधि जातसा चाचरा ।
तेणेचि सन्निपात विकारा ।
प्रबळ शरीरा वाढली तृष्णा ॥१३॥
न चलवे ऐक्याचिया भूमिके ।
विपरीत ज्ञानाचे खातसे झोंके ।
अंधारी पडिलेती देखोनि निके ।
सत्यातेचि लटिके मानुनी ॥१४॥
तयासी एकचि विचार ।
क्षणमात्रेंचि होईल उतार ।
घ्या माझे वचन हे साचार ।
व्दैत कल्पना संचार न करावा ॥१५॥
एक चमत्कारिक औषध देईन ।
वैराग्यवल्लीचे रसायन ।
वरी माझिये अभेदमात्रेसी सेवन ।
चिदैक्यभावे करावे ॥१६॥
सांडुनी रसने रसाची गोडी ।
नित्यानित्यविवके आवडी ।
प्रत्यगावृत्ति धारण फुडी ।
निरसेल गाढी भ्रमभावना ॥१७॥
पथ्येंसी असावे निरंतर ।
हो नेदावा विपरीत ज्ञानाचा संचार ।
माझीये वचनी विश्वास धर ।
धरिता साचार हरेल व्यथा ॥१८॥
मागे म्या थोराथोरांकारणे ।
दिधली होती ही रसायने ।
नांवे सांगो तरी शास्त्रे पुराणे ।
उदडं व्याख्याने गर्जताती ॥१९॥
अर्जुन वांचविला नाना सांकडी ।
उध्दव उपचारिला काढाकाढी ।
शुक वामदेवादिक परवडी ।
ऋषींची भवभयसांकडी निवारिली ॥२०॥
ऐसे उपचारिले बहुत जन ।
संख्यारहित विवक्षण ।
आतांही हे रसायन ।
सेविती ते होउनी आरोग्य ठाती ॥२१॥
निळा म्हणे वस्ताद माझा ।
शिरी असता सद्गुरुराजा ।
निवारीन रोग घेउनी पैजा ।
धरिता वोजा विश्वास मनी ॥२२॥
यापरि सादावूनिया सकळा ।
जातो आपुल्या निजात्मस्थळा ।
रामराम करुनिया म्हणे निळा ।
कृपा अखंडित असो दयावी ॥२३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग