संसारचि नाही येथे या
542.
संसारचि नाही येथे या कारणे ।
नाहीच जन्मणे मरणे कैचे ॥१॥
भास तोही नासताहे कैचे निराकाश ।
सर्वी समरस परब्रह्म ॥२॥
जागृति या स्वप्न तेचि ते आले ।
अंतरी बिंबले निश्चयेसी ॥३॥
शार्वरी प्रकाश काहीच नाठवे ।
अदृश्य सुईजे दृश्य जाले ॥४॥
बापरखुमादेविवर विठ्ठल तन्मय ।
ब्रह्मी ब्रह्ममय दिसे त्यासी ॥५॥
अर्थ :
येथे म्हणजे ब्रह्मस्वरूपांच्या ठिकाणी या कारणे म्हणजे अज्ञान सत्य नसल्याने प्रतिती ला येणारा संसार व त्यातील जन्ममरण सत्य कसे असणार. जो आज भासत आहे हा संसार ही अधिष्ठानरूप ब्रह्मांत लय पावणारा आहे. मग परब्रह्म ही एकच वस्तु विश्वांत भरलेली आहे. म्हणून जागृतीत आगर स्वप्नांत तरी तिच्या वांचून दुसरे काय असणार अंतरमनांत तीच वस्तु (ब्रह्म) बिंबून राहिले आहे. रात्रीच्या प्रकाशात म्हणजे मायेच्या यथार्थ ज्ञानांत दृश्य अदृश्य होऊन काही दिसेनासे होते. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल म्हणतात जे ब्रह्मरूप झाले आहेत. त्यांना ब्रह्मात्म स्वरूपाच्या ठिकाणी सर्व ब्रह्मरूपच दिसणार असे माऊली सांगतात.
