मरण न येता सावधान व्
541.
मरण न येता सावधान व्हा रे ।
शोधूनी पावा रे निजवस्तू ॥१॥
अंतकाळी जरी करावे साधन ।
म्हणता नागवण आली तुम्हा ॥२॥
नाशिवंत देह मानाल शाश्वत ।
तरी यमदूत ताडितील ॥३॥
काळाचे खाजुके जाणिजे की काया ।
धरू नको माया सर्वथैव ॥४॥
अमोलिक प्राप्ती होत आहे तुज ।
धरूनिया लाज हित करी ॥५॥
मागुती न मिळे जोडले अवचट ।
सायुज्याचा पाट बांधुनी घेई ॥६॥
ज्ञानदेव म्हणे विचारा मी कोण ।
नातरी पाषाण होउनि राहा ॥७॥
अर्थ :
मरण येण्यापूर्वीच सावध व्हा व आत्म स्वरूपाचा शोध करून ती वस्तू मिळवा. मरणाच्या वेळी आत्मप्राप्तीचे साधन करू असे म्हणाल तर यातच तुमची नागवण झाली आहे. हा क्षणभंगूर देह कायम टिकणारा असे मानून विसंबाल तर यमदुत केंव्हा मारतील याचा नेम नाही. हा देह म्हणजे यमाचा खाऊ आहे म्हणून त्याचा लोभ धरू नका. तुला बहुमोल वस्तु प्राप्त होणार आहे. ती प्राप्त करून, न घेतल्यास मूर्ख ठरशील याची लाज धरून हित करून घे. हा मानव देह पुन्हा सहज मिळणार नाही, मोठ्या भाग्याने प्राप्त झाला आहे. तो पर्यंत सायुज्यमुक्तिरूप पाठ बघून घे. मी कोण याचा विचार करा नाहीतर दगडा सारखे खुशाल राहा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
