वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ५८. वानरांचा सत्कार

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088145 · अभंग क्र. ५८

58.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय अठ्ठावन्नावा ॥
रावणाच्या यज्ञाचा विध्वंस

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

वानरांनी संकल्प मोडला ; पण ते महामोहाच्या आवरणामध्ये अडकून पडले :

अति दुस्तर संकल्पावरण । जेणे व्यापिले त्रिभुवन ।
ते निरसोनि हरिगण । करीत किराण चालिले ॥१॥
सद्‌गुरुचे कृपेपुढें । संकल्प कायसे बापुडे ।
जेंवी रवीपुढें मेहुढें । तेंवी उडे अभावत्वें ॥२॥
निरसून दुस्तर आवरण । करीत रामनामगर्जन ।
अति बळियाढे वानगण । देत किराण चालिले ॥३॥
केउता आहे लंकापती । काळमुखा त्रिजगती ।
चोरोनि आणिली सीता सती । तेणेंचि शांती झाली त्याची ॥४॥
भस्म झालिया आवरणे । आता काय करावे रावणे ।
जीव घेवोन पळोन जाणे । अन्यथा जिणें दिसेना ॥५॥
वृक्ष झेलिती वानर । एक पर्वतशिखर ।
करीत रामनामाचा गजर । वीर वानर चालिले ॥६॥
तंव अति दारुण । महामोहाचें आवरण ।
त्यांत पडिले वानरगण । मोहनिमग्न होवोनि ठेले ॥७॥
पडली गडधूप अंधारी । न देखती परस्परीं ।
वृत्ति झाली पै घाबिरी । अपांपरी वानरा ॥८॥
न दिसे स्वसैन्य परसैन्य । मोडले सन्मार्गदर्शन ।
भ्रांत होवोनि ठेले मौन । गमनागमन स्वरेना ॥९॥
निजदेहो नाठवे सर्वथा । तेथे कोण जाणे सन्मार्गता ।
आचरावया कर्माची सामर्थ्यता । स्वधर्मता तेथे कैची ॥१०॥
बुद्धि होवोनि ठेली अंध । चित्त झाले पै स्तब्ध ।
निजाभिमाने पडले गडद । कर्मानुवाद नाठवे ॥११॥
आम्ही एक रामभक्त । आज्ञा घेवोनिया येथ ।
आलो मिळोनिया समस्त । तो कार्यार्थ विसरलो ॥१२॥
होम विध्वंसोनि तत्वता । बाहेर काढोन लंकानाथा ।
भेटवावे रघुनाथा । हेंही सर्वथा विसरलो ॥१३॥
आळसें व्यापिले शरीर । देती जांभया करकरा ।
चांचरी जाताती सैरा । मोहे वानरा व्यापिले ॥१४॥
विसरले कारण । विसरले धर्माचरण ।
विसरले रघुनंदन । वानरगण आपणा विसरले ॥१५॥
उभे उभ्या खाती झोंके । उभेचि घोरती एके ।
निद्रा व्यापिली सकळिकें । वानरे असंखयें पाडिलीं ॥१६॥
मोहाचे बळ बहुवस । निजों न दे सावकाश ।
पडिल्याचि स्वप्नविलास । असम साहस देखती ॥१७॥
द्रव्यदाराममता फार । माझी स्त्री माझे पुत्र ।
स्वप्नीं माडिती घराचरा । पुत्रपौत्रविवाह ॥१८॥
माझे व्याही माझे भाई । सोयरे धायरे जांवई ।
ममता बहु लेंकीचे ठायी । उचितें पाही दाटत ॥१९॥
मी स्वगृहीं नांदत । उदीम व्यवसाय करीत ।
सोयरियांसीं उदासभूत । ते गृहस्थ पै काय ॥२०॥
ऐसी उचितांची सांकडी । स्वप्नीं पडे अरडीदरडी ।
जागृती कैंची उसंत घडी । मोह कडाडीं आदळला ॥२१॥
चिंतासागरीं बुडाले । उचिताचे सांकडीं पडिले ।
सवेंचि निद्रा व्यापिले । घोरों लागले घरघरां ॥२२॥
एक उठोन वोसणती । एक तयांसी दडपिती ।
तंव तेही मोहे व्यापिजेती । स्वये बरळती मी माझे ॥२३॥

मोहामधून वानरांची हनुमंताकडून सुटका :

त्या मोहाचा निवर्तक । वैराग्ययुक्त विवेक ।
तेणे हनुमान सबळ देख । मोह निःशेष उडविला ॥२४॥
विवेकवैराग्यसमेळीं । देता नामाची आरोळी ।
महामोहाची झाली होळी । वानर तत्काळी सोडविले ॥२५॥
गुरुकृपावलोकने देख । वैराग्य झाले सत्वात्मक ।
विवेक उपजला निष्टंक । तेणे सकळिक सावधान ॥२६॥
महामोहाचें मूळ तत्वता । अहंता आणि ममता ।
तिच्या करावया घाता । सविवेकता वैराग्य ॥२७॥
गुरुसंप्रदाये जाण । स्वस्थ बैसले हरिगण ।
स्वस्थ बैसले हरिगण । स्वस्थ करोनि अंतःकरण ।
निजविवंचन स्वये करिती ॥२८॥
गुर्वाज्ञा पूर्ण ऐसी । जे देहातीत आपणासी ।
देखोनिया यथार्थेसी । निजस्वहितासी विनटावें ॥२९॥
तै विसरोनि गुरुवचन । वृथा पडिले असावधान ।
पुढे ओढवल्या पतन । सोडवी कोण आम्हासी ॥३०॥
जो गुरुवचनासी विसरे । कामातुरें अति भरे ।
का आळसे कांही न स्मरे । निद्राभरे अति भ्रांत ॥३१॥
गुरुसी न स्मरोनि जाण । विषयी लुब्धजा पूर्ण ।
तो तंव नागवला । नाही स्मरण गुरुचें ॥३२॥
कामातुरा नरक दारुण । निद्रिता उभय लोक शून्य ।
आळसी तो वृथा जाण । करी पोषण देहाचें ॥३३॥

आहारनिद्राभयमैथुनं च समानमेतत्पशुभिर्नराणाम् ।
ज्ञानं नराणामधिको विशेषो ज्ञानेन हीनाः पशुभिः समानाः ॥१॥

नेणे कर्माची वेळ । न म्हणे सकाळ सांजकाळ ।
निद्रा घोरले प्रबळ । अळूमाळ स्मरेना ॥३४॥
आहार निद्रा भय मैथुन । पशूंच्या ठायी समसमान ।
तैसेचि देही पशु जाण । पुच्छेंवीण दाढीचें ॥३५॥
पशु भेडवितां परता पळे । विषयी नरकभयें न कंटाळे ।
घोर नरक अंगी आदळे । तरी खवळे अधिकचि ॥३६॥
भोगिलिया विषयापाठी । पशुसी अल्पही ममता नुठी ।
विषयिजनांची नवलगोष्टी । घाली मिठी अधिकाधिक ॥३७॥
सकृद्विषयभोगेंकरुण । पशु न पाहे परतोन ।
विषयिजनांचे नवल कोण । सगर्व जाण सोडीना ॥३८॥
पशु विषय भोगू जाये । मागुता परतोनि न पाहे ।
विषयिजनांचें अपूर्व आहे । नवल काय सांगू मी ॥३९॥
प्रीती जंव जंव भोग घडे । तंव तंव ममता अधिक वाढे ।
मोथडबुथडभरी चुडे । अलंकारकोडें घडवित ॥४०॥
विषयी संतति झाली । तरी अधिकेंचि गुंती पडली ।
ममता अधिक खवळली । सुदृढ जडली जन्मवेढी ॥४१॥
चित्ता सांकडी पडे । तेणे अधिकाधिक डांव चढे ।
ऋणा माजी सफाई बुडे । नरक पुढे अनिवार ॥४२॥
एका विषयाची ऐसी गती । अहंममता नागविती ।
आळसी निद्रिस्थाची स्थिती । तेही संकळिती सांगेन ॥४३॥

आयुषः क्षण एकोपि न लभ्यो हेमकोतिभीः ।
स चेद्विफलतां याति का हानिस्तु ततोधिका ॥२॥

नरदेहाची बहुमोलता :

कोटि वेंचिता सुवर्ण । नरदेहीचें आयुष्य जाण ।
न मिळे न मिळे अर्धक्षण । नाना साधने करितांही ॥४४॥
शिणतां नाना साधनी । सहसा नरदेह या जनी ।
न मिळे पै त्रिभुवनी । त्याची हानी होतसे ॥४५॥
स्वेच्छा वेंचे विषयसेवनीं । उसंत नाही क्षणोक्षणीं ।
विपायें उरे शेष म्हणोनी । ते ने हिरोनी सुषुप्ती ॥४६॥
नेणे कर्माची वेळ । न म्हणे सकाळ संध्याकाळ ।
निद्रा घोरले प्रबळ । कांही अळुमाळ स्मरेना ॥४७॥
नाठवी गेल्या आयुष्या । नाथवी स्वधर्म सहसा ।
फुंपत पडे सर्प जैसा । नाठवे सहसा हृदयस्थ ॥४८॥
विपायें चुकल्या सुषुप्ती । तरी आनाडी भरे वृत्ती ।
स्वेच्छा सारिपाट खेळती । नातरी मांडिती बुद्धिबळें ॥४९॥
स्वर्गींचे चिंतिती सुरवर । कर्मभूमी नरशरीर ।
पावतां चुके येरझार । ऐसा थोर नरदेहो ॥५०॥
ऐसी नरदेहाची योग्यता । दुर्लभ ब्रह्मादिका समस्ता ।
ते देह पाहोनि तत्वता । विषयी सर्वथा नाडेले ॥५१॥
आम्ही श्रीरामाचे गण । सद्‌गुरु हनुमंताचे कृपेंकरुन ।
पावलों आता रघुनंदन । ते मोहनिमग्न केंवी झालो ॥५२॥
अतर्क्य भगवंताची माया । विश्व संपूर्ण भुलविले तया ।
बाप रावणाची कपटचर्या । सेना वानरांचिया मोहित ॥५३॥
तथापि भगवंताचें वरद । हरिभक्ता न बाधी द्वंद्व ।
निरसोनि मायेचा बाध । स्वरुप शुद्ध भोगिती ॥५४॥

मामेव ये प्रपद्यंते मायामेतां तरंति ते ॥३॥

माझ्या निजभक्तांकडे । न पडे मायेचें सांकडें ।
मी आपुल्यातें आपुल्याकडे । नेई निवाडे निजपदा ॥५५॥
सूर्यासी उगवता तम । अल्पहि न पडे दुर्गम ।
तेंवी अभक्तां माया दुर्गम । अति सुगम हरिभक्ता ॥५६॥
सुगम म्हणता साच दिसे । परि सत्यत्वे निःशेष नसे ।
निजभ्रमें तेथे आभासे । निद्रावशें स्वप्न जेंवी ॥५७॥
सूर्यकिरण न पडे दृष्टी । तै मृगजळाचा पूर दाटी ।
स्वस्वरुपी विन्मुख होता शेवटी । भरत दाटी तमाची ॥५८॥
तेंवी रावणाचे कपटतमें जाण । क्षण एक मोहिले हरिगण ।
पडता विवेकरविकिरण । उडालें पूर्ण अभावतम ॥५९॥
उदया येता बोधार्क । अज्ञानतम निःशेख ।
उडोनि गेले एकएक । ज्ञान‍उखा देख उजळली ॥६०॥

रामभक्ती आणि तिचे नाममाहात्म्य :

बोधार्काच्या किरणें देख । भ्रम उडाला निःशेख ।
सावध झाले सविवेक । अपूर्व आणीक पुढे झाले ॥६१॥
विज्ञानमय कोश जाण । केवळ तमाचें आवरण ।
भेदितांचि हरिगण । पुढीलहि जाण भेदिले ॥६२॥
नामबळें असमसाहस । करिता विवेक सावकाश ।
झाला तमाचाही र्‍हास । स्वप्रकाश त्रिजगती ॥६३॥
विवेकाच्या निजनेटीं । निजकारणेंसीं त्रिपुटीं ।
उडोनि गेला उठाउठी । जेंवी रविदृष्टीं मृगजळ ॥६४॥
द्रष्टा दृश्य दर्शन । ज्ञाना ज्ञेय निजज्ञान ।
कर्ता कार्य आणि कारण । यांचे भान उडालें ॥६५॥
भोग्य भोग भोक्ता । वाच्य वचन वदता ।
ध्येय ध्यान आणि ध्याता । अभावो सर्वथा त्रिपुटीचा ॥६६॥
बोधार्काचा उदय जाण । स्वप्रकाशी त्रिभुवन ।
सबाह्य झाले आनंदघन । वानरगण सुखरुप ॥६७॥
आनंदमय झाली वृत्ती । विसरले ते बाह्यस्फुर्ती ।
निगाले होते रावणघातीं । तेही स्थिती विसरले ॥६८॥
विसरले कार्यकारण । विसरले वैरी रावण ।
विसरले रघुनंदन । वानरपण विसरले ॥६९॥
निजकार्यालागीं जाण । रावण अति विचक्षण ।
रचिले आनंदावरण । होम निर्विघ्न साधावया ॥७०॥
परी ते नव्हे अखंड । भेद्रें केले खंडविखंड ।
विषयाकारणें उदंड । अति प्रचंड विस्तार ॥७१॥
जे जे रसीं जो जो भरे । तेथोनि मागे न सरे ।
रावणे मोहिलीं वानरे । सुखोद्‍गारें डुल्लती ॥७२॥
सकळ रसाचे निजसार । ब्रह्मरस परिकर ।
विवेक पावले वानर । गुरुकृपासारनिजबळें ॥७३॥
त्याहिमाजीं अतर्क्य जाण । बैसला असे अहंरावण ।
तेणे साधोनि विंदान । करी हवन अति यत्‍ने ॥७४॥
त्यासी देखतांचि दृष्टी । सारसावल्या वानरकोटी ।
निरसितां आवरणकोटी । रावण दृष्टी देखिला ॥७५॥
जेंवी गळामाजी दगड । दिसे गुळाचिसारिखा गोड ।
तोंडी घालिता अवघड । करीत उपाड दातांचा ॥७६॥
अथवा आंब्याच्या पोटी । असती रसाची कोटी ।
त्याहिमाजीं अति संकटीं । असे गांठी अति निवर ॥७७॥
तेंवी कर्म रावणाचे । बाह्यावरण आनंदाचे ।
अंतरी भाव कपताचे । घोर त्याचे आवरण ॥७८॥
अहंमुखी आनंदघन । ऐसे जेथे स्फुरे स्फुरण ।
ते जाणावें अभिमानजन्य । तेणे हरिगण मोहिजेती ॥७९॥
तंव ते निजनिष्ठा सावध । छेदोनी अहंसोहं यांचे बांध ।
पावले ते अगाध बोध । अहंरावणकंद छेदावया ॥८०॥
दृष्टी देखताचि रावण । सरसावले वानरगण ।
घृती खवळे हुताशन । तेंवी वानरगण खवळले ॥८१॥
माथा वाहोनि पुच्छाटी । प्रवेशले यज्ञवाटीं ।
रावण देखोनिया दृष्टी । दोनी मुष्टी वळियेल्या ॥८२॥

तथान्ये चोदकं हव्यं दर्भान्पात्राणि चापरे ।
बलिंच निर्विकीर्याणाः खमुत्पत्य प्लवंगमाः ॥४॥

खवळले वानरकटक । कुंड विझविती एक ।
प्रणीतापात्रीं भरिले उदक । ते कुंडी निःशेष रिचविलें ॥८३॥
इध्माबर्हि परिस्तरण । ते विखुरती वानरगण ।
होमद्रव्यें भरिलें भाण । घेवोनि गगनि उपरमती ॥८४॥
रावण निजकार्यार्थी । सावधान अहोरातीं ।
आवरोनी बाह्यवृत्ती । श्रीरामघातीं मंत्र जपे ॥८५॥
वधावया रामसौ‍मित्र । मंत्र जपतां अव्यग्र ।
मंत्रदेवता भयातुर । स्वये विचार करीतसे ॥८६॥
मंत्राधीन माझी शक्ती । जायकाची कार्यस्थिती ।
साधावया शीघ्र गती । जप करिती सावध ॥८७॥
भाग्यानुसार जाण । मंत्रदेवता प्रसन्न ।
रावणाचे विचित्र चिन्ह । श्रीरघुनंदनवधार्थ ॥८८॥
श्रीरामे जगाची उत्पत्ती । श्रीरामे जगाची स्थितिगती ।
जगाची निजविश्रांती । जाण निश्चिती श्रीरामे ॥८९॥
मंत्रदेवता समस्ता । रामसामर्थ्ये सामर्थ्यवंता ।
कैसेनि होय त्याच्या घाता । मूर्ख तत्वता रावण ॥९०॥
राम जगाचे जीवन । त्याचे करिता हनन ।
भाग्य विमुख झाले जाण । स्वये रावण मरेल ॥९१॥
आणिकाची असो गती । राम आमची जीवनस्थिती ।
केंवी प्रवर्तो त्याचे घातीं । लंकापति भ्रमलासे ॥९२॥
निजमूळातें छेदून । वृक्ष केंवी राहे आपण ।
तुटल्या तळ्याचें जीवन । वांचे मीन हे न घडे ॥९३॥
श्रीराम जगाचा पिता । त्या पवर्तला पितृघाता ।
यासी द्यावया प्रायश्चित्ता । याच्या घाता प्रवर्तावें ॥९४॥

रावणाची शोचनीय अवस्था :

पितृघातका प्रायश्चित्त । वेद बोलला देहांत ।
तोचि साधावया कार्यार्थ । करु घात रावणाचा ॥९५॥
म्हणोनि खुंटली वचनावळी । नुच्चारे मंत्रशैली ।
स्वयेंचि बैसली दांतखिळी । दुःखे तळमळी रावण ॥९६॥
प्राप्तकाळ आला समीप । तंव विझोनि गेला वाग्दीप ।
वर्ण उच्चारेना स्वल्प । कोण पाप ओढवले ॥९७॥
शंकरे प्रसन्न । मज दिधले वरदान ।
शेंखीं उच्चारिना वर्ण । दारुण विघ्न ओढवले ॥९८॥

वानरांच्या आक्रमणाने यज्ञात विघ्न :

होमपात्रें फोडिली समस्त । त्रिसधानें तोडिली तेथ ।
स्रुवां हातींचा आंसुडत । नामे गर्जत वानर ॥९९॥
पंचकोश पंचावरण । भेदोनिया अति दारुण ।
अंगी आदळले हरिगण । तरी रावण ढळेना ॥१००॥
अंतरी निग्रहिली वृत्ती । येवो नेदी ब्राह्यस्थिती ।
वानर इतस्ततां ओढिती । तरी स्थिति ढळेना ॥१॥
अंगी आदळतां वानरांसी । रावण विचारी मानसी ।
विघ्न उठिलें होमासीं । सर्वथा त्यासी मी न मानी ॥२॥
आटक दुर्ग त्रिकूटाचे । उग्रावरण पंचकोशांचें ।
भोंवते राखण महावीरांचें । भय तयांचे यमकाळा ॥३॥
त्याहिमाजी अतर्क्य स्थिती । शस्त्रे गुप्त नभोगती ।
सर्वथा कोणी न लक्षती । पारख्या निवटिती क्षणमात्रें ॥४॥
येथे यावया वानरगण । सर्वथा नाही आंगवण ।
निमेषमात्रे सांडिती प्राण । अर्ध क्षण न लागता ॥५॥
दिसतांही वानरकोटी । विघ्न उठलें यज्ञवाटी ।
यासी सर्वथा मी नाणी दृष्टी । म्हणोनि निमटी निजनयन ॥६॥
गर्वाचा ताठा अंतरी । तेणे नेत्रासीं अंधारी ।
नेण हरिगणाची थोरी । केली बोहरी निजगर्वे ॥७॥

सालस्यो गर्वितो निद्रः परहस्तेन लेखकः ।
अल्पविद्यो विवादी च पडेते चात्मघातकाः ॥५॥

कष्टीं तपश्चर्या करिता । प्राप्तकाळ समीप येता ।
आळस उपजला चित्ता । तरी निजघाता स्वये केले ॥८॥
गर्वाचा ताठा चढला । तेणे विवेक बुडविला ।
त्रिमदें अति मातला । घात केला स्वयेंचि ॥९॥
धनमद पानपाद । अति मान्यतेचा राजमद ।
तेणे प्राणी होय अंध । कार्यानुवाद नाठवे ॥११०॥
निद्रातुराच्या ठायी । कार्य स्मरेना पाही ।
सकळ सांजवेळ नेणे काही । नाडला पाही निजहिता ॥११॥
उपजली मंत्राची आर्ती । लेहूं जाता आणिका हाती ।
व्यंग लिहिल्या वर्ण व्यक्ती । विघ्नप्राप्ती होय सद्य ॥१२॥
विद्येचे न साधता ज्ञान । करु जाता आराधन ।
मंत्रदेवता क्षोभून । सद्य विघ्न पै करिती ॥१३॥
ज्ञान नाही निश्चयात्मक । वाद करु बैसती एक ।
निजघात तेणेंचि देख । विचार आणिक असेना ॥१४॥
तैसा निजगर्वे भुलला । हरिगणातें न गणी वहिला ।
निजगर्वे नागविला । होमाचा केला निःपात ॥१५॥
इतस्ततां वानर । ओढिताती सैर ।
नेत्र उघडी दशशिर । म्हणे थोर विघ्न उठलें ॥१६॥

तरीही रावण अगदी निश्चळ :

होमकुंडाची झाली शांती । पात्रें नेलीं भस्मांतीं ।
यज्ञोपचार विध्वंसिती । परी लंकापति डंडळीना ॥१७॥
घोरकर्मीं रावण । सर्वथा डंडळीना मन ।
सुखावला तारानंदन । निधडी आंगवण लंकेशा ॥१८॥
युद्धी श्रीरामासंमुख । केवी जाय दशमुख ।
म्हणोनिया युवराजा देख । मंत्र अलोलिक योजिला ॥१९॥

मंदोदरीला पीडा देण्याची अंगदाची युक्ती :

जवळी देखिली मंदोदरी । तीस पीडितां झडकरी ।
ध्यान सांडोनि दशशिरीं । महामारी उठेल ॥१२०॥
काढोनि नेऊ रामापासी । राम निवटील रावणासी ।
कार्य साधेल अनायासीं । म्हणोनि केशीं धरियेली ॥२१॥

दृष्ट्वाथ रावणं सर्वमिदमाहांगदो वचः ।
इमां मंदोदरीं पार्श्वे नयामि तव पश्यतः ॥६॥
या ते शक्तिर्बलं वीर्यं तेन तिष्ठ त्वमग्रतः ।
कृत्वा शिरसि पादं ते नयाम्येनां स्त्रियं तव ॥७॥

वानर करता आकर्षण । डंडळीना तो रावण ।
तेणे अंगद क्षोभून । केले विंदान ते ऐका ॥२२॥
हाका मारोनि वेगेंसीं । बोलता झाला रावणासी ।
मंदोदरी धरानि केशीं । श्रीरामापासीं पै नेतो ॥२३॥
रावणा ऐके तत्वता । तुझ देखता तुझी कांता ।
धरोनि नेईन मी आता । करी साटोपता युद्धासी ॥२४॥
श्यामवदन लंकापती । लांछन लागले तुझे शक्ती ।
चोरोनि आणिली सीता सती । वीरवृत्ती न करवेचि ॥२५॥
तैसे मी करी जाणा । तुज देखता तुझी अंगना ।
नेईन करीन विटंबना । श्रीरघुनंदनासमीप ॥२६॥
मी रामाचा दूत । निंद्य कर्म न करी निश्चित ।
तुझा माथा देवोनि लाथ । नेईन ओढित पै आता ॥२७॥
सामर्थ्य असेल शरीरी । तरी सोडीवीं मंदोदरी ।
नाककाना करोनि बोहरी । नेतो अंतुरी मी तुझी ॥२८॥
म्हणोनि केले खस्ताव्यस्त । झोंटीं धरोनि ओढित ।
तेणे ते झाली दुःखित । आक्रंदत अति थोर ॥२९॥

ततो मंदोदरी दीना रावणं वाक्यब्रवित् ।
कि न पश्यसि मां राजन्ननाथां त्वयि जीवति ॥८॥

मंदोदरीच्या आक्रोशाने रावणाचा संताप :

वानर करिता खस्ताव्यस्त । मंदोदरी आक्रंदत ।
रावणाप्रति सांगत । कासया भ्रांत झालासी ॥१३०॥
जेंवी जळामाजील लता । गज रिघोनि मदीं समस्ता ।
वानरे तेंवी करिता खस्ता । प्राण तत्वता जाईल माझा ॥३१॥
जळो तुझी शौर्यशक्ती । जळो तुझी निजकीर्ती ।
जळो तुझी यज्ञस्थिती । झांकिसी किती निजनयनां ॥३२॥
वानरी घेतलें घर । दुर्गी विचरती अति सैर ।
विध्वंसिले यज्ञोपचार । पात्रें समग्र फोडिली ॥३३॥
तुज करिता खस्ताव्यस्त । सावध नव्हे तुझे चित्त ।
रामविरोधें केले भ्रांत । कांही स्वहित स्फुरेना ॥३४॥
चोरोनियां सीता सती । व्यर्थ द्वेषिला रघुपती ।
जीवित्वाची खुंटली गती । केली शांती निजकर्मे ॥३५॥
पुत्र प्रधान मारविले । सैन्य सेनानी जीवे गेले ।
वंधूंसीं विटंबन केले । जीवे घेतलें कुंभकर्णा ॥३६॥
दुर्धर बाणींकरुन । तुज निवटिता रघुनंदन ।
न लगे रे अर्ध क्षण । आता हवन ते काय ॥३७॥
असो तुम्ही मरणगोष्टी । मज वानरी घातली मिठी ।
कोणाप्रति सांगो गोष्टी । कोण संकटीं सोडवील ॥३८॥
तू जीत असता शिरावरी । मज दीन केले वानरी ।
ओढिती धरोनि केशग्रीं । पीडा भारी करिताती ॥३९॥
शिरावरी असता कांत । ज्याची अंगना अनाथ ।
जळो त्या पतीचें जीवित । अति निंदित लौकिकी ॥१४०॥
जीत असता इंद्रजित । रणकंदन करिता येथ ।
दावोन निजपुरुषार्थ । मज त्वरित सोडविता ॥४१॥
जीवे निमाला रावण । म्हणोनि मजलागी जाण ।
पीडिताती वानरगण । अति गर्जोन आक्रंदे ॥४२॥
जरी असता जीवे जीत । तरी करोनि पुरुषार्थ ।
मज सोडविता येथ । रावण निश्चित निमाला ॥४३॥
म्हणोनि आक्रंदे गोरटी । वानरी बांधिली शकुनगांठी ।
पतिव्रतेच्या वाक्पुटी । निगाली गोष्टी ते सत्य ॥४४॥
म्हणोनि देती आरोळी । गर्जती नामाच्या कल्लोळीं ।
तेणे रावणाची दांतखिळी । उखळली तत्काळ ॥४५॥

स्त्रीमोहाचे दुष्परिणाम :

स्त्रियांचे मोहक बोली । कोण कोणा न पडे भुली ।
सिद्ध मिळविले धुळी । विकल्पबोलीं स्त्रियेच्या ॥४६॥
भस्मासुरासी मोहिनी । भेटोनियां तत्क्षणीं ।
क्षणे मारिला मोहोनी । न मागतां पाणी निमाला ॥४७॥
श्रीशुकाची अगाध स्थिती । वचनमात्रे निश्चिती ।
क्षणे नेलीं भस्मांती । निमेषगती न लगतां ॥४८॥
तेथे रावण बापुडे ते किती । क्षणे आणिले बाह्यवृत्ती ।
मोकळी झाली वचनोक्ती । तेही स्थिती अवधारा ॥४९॥
रामनामाच्या कल्लोळीं । मंत्रदेवता मुक्त झाली ।
तिणें झोडिली वचनावळी । बोलावया बोली पैस झाला ॥१५०॥
मग उठिला सत्वर । दांत खातसे करकर ।
नेत्र दिसती रक्तांबर । अति भ्यासुर भासती ॥५१॥
क्रोधे बोले अंगदासी । स्त्रियेसी धरोनिया केशीं ।
व्यर्थ कारे ओढितोसी । अधम होसी वीरांत ॥५२॥
जेणे स्त्रियेसी दंडणें । त्यासी वीर कोण म्हणे ।
धिक् धिक् त्याचे जिणें । वृथा पीडणें स्त्रियेसी ॥५३॥

अंगदाचे प्रत्युत्तर :

ऐकोनि त्याचिये गोष्टीसी । अंगद निर्भत्सीं तयासी ।
मुख दाखविता न लाजसी । उंच बोलसी नाकाडें ॥५४॥
भिकेचेनि मिषे तत्वता । चोरोनि नेतां पै सीता ।
मार्गी घोळसिलासि पै येता । लाज सर्वथा तुज नाही ॥५५॥
माता म्हणसी जियेसी । तिसी भोगू पहासी ।
पापें मेळविलें धुळीसी । पुत्रसैन्यासी मारविलें ॥५६॥
ऐशा अंगदाच्या उत्तरीं । रावण पोळला अंतरी ।
धरिली देखता मंदोदरी । क्रोध शरीरी चढिन्निला ॥५७॥

तच्छ्रत्वा रावणः कुद्धो दृष्ट्वा रुद्धां प्रियां तदा ।
अंगदं मुष्टिना जघ्ने मूर्ध्नि सद्यः पपात ह ॥९॥

मुष्टी वळोनि आवेशी । धांव घेवोनि वेगेंसीं ।
माथा हाणिता अंगदासीं । मूर्च्छा तयासीं पै आली ॥५८॥
ते देखोनि मारुती । अंतरिक्षनभोगती ।
तो येवोनियां लंकापती । भुजांतराप्रती ठोकिला ॥५९॥

रावणाच्या यज्ञाचा विध्वंस व रावणाला मूर्च्छा :

तेणे गेला चांचरी । डोळियां आली अंधारी ।
आंग जातसे भंबेरी । रावण धरेवरी पडों पाहे ॥१६०॥
मूर्च्छा भांजोनि अंगद । तत्काळ झाला सावध ।
हृदयी दाटला आनंद । कार्य सिद्ध पै झाले ॥६१॥
विध्वंसिले यागासी । उठविले रावणासी ।
आता नेल्या रामापासी । क्षणार्धेसीं निवटील ॥६२॥
श्रीरामनामें गर्जत । अति बळियाढे रामभक्त ।
रावण केला सावचित्त । याग समस्त नासोनी ॥६३॥
एका जनार्दना शरण । विध्वंसिला रावणयज्ञ ।
करोनि मंदोदरीशांतवन । युद्धा रावण निघाला ॥६४॥
रसाळ कथानिरुपण । अति रम्य रामायण ।
एका विनवी जनार्दन । श्रोती अवधान मज द्यावे ॥१६५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावण यज्ञविध्वंसनं नाम अष्टपंचाशत्तमोऽध्यायः ॥५८॥
ओंव्या ॥१६५॥ श्लोक ॥९॥ एवं ॥१७४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग