॥ श्रीएकनाथमहाराजकृत
34.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय चौतिसावा ॥
कुंभाचा वध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
श्रीरामसैन्य शरबंधनातून मुक्त झाले :
स्वये बिभीषण बोलत । हनुमान वीर अति विख्यात ।
शरबंधी श्रीरघुनाथ । सैन्यासमवेत ऊठिला ॥१॥
अंगद सुग्रीव राज्यधर । जुत्पतींसमवेत वानर ।
येणे उठविले समग्र । वीर शूर स्वामिभक्त ॥२॥
मारुतीस मानी श्रीराघव । मारुतीस मानी सत्य सुग्रीव ।
मारुतीस मानिती वीर सर्व । कीर्ति अभिनव येणे केली ॥३॥
निमिषे आणोनि पर्वत । वानर उठवोनि समस्त ।
ठेवोनि आला जेथींचा तेथ । श्रीरामभक्त हनुमंत ॥४॥
ततो ऽ ब्रवीन्महातेजा सुग्रीवो वानराधिपः ।
अर्थ्यं विज्ञापयन्नेवं हनूमन्तमिदं वचः ॥१॥
येतो हतः कुंभकर्णः कुमाराश्च निषूदिता ।
नेदानीमुपनिर्हारं रावणः कर्तुमर्हति ॥२॥
लंकामभिपतंत्वाशु प्रगृह्योत्काः प्लवंगमाः ।
ततोस्तंगत आदित्ये रौद्रे तस्मिन्निशामुखे ॥३॥
लंकामभिमुखा जग्मुः सोल्कास्ते हरियूथपाः॥४॥
सुग्रीवाचे हनुमंताला धन्यवाद :
देखोनि हनुमंताची ख्याती । सुग्रीव सुखाचोनि चित्ती ।
काय बोले वीरांप्रती । धन्य मारुति प्रतापी ॥५॥
ऐके बापा पवनपुत्रा । ज्याचा भरंवसा दशशिरा ।
त्या मारिले रावणकुमरा । परिवारासंगम ॥६॥
देवांतक नरांतक वीरा । मारिला अतिकाय त्रिशिरा ।
यापरी त्या रावणकुमरां । रणी समग्रा निर्दळिले ॥७॥
रावण कपट करील म्हणून लंका जाळून टाकण्याचा सुग्रीवाचा सल्ला :
येणे दुःखे दशकंठ । करील नानाविध कपट ।
तंवचि वानरी उद्भट । लंकात्रिकूट जाळावें ॥८॥
ऐकतांचि सुग्रीववचन । रातोराती वानरगण ।
अग्निचूडी घेवोनि जाण । लंकादहन मांडिलें ॥९॥
हाती घेवोनि अग्निचूडी । वानरवीरांचिया कोडी ।
लंकेमाजी घालोनि उडी । आगी धडाडी लाविती ॥१०॥
उल्काहस्तैर्हरिगणैः सर्वतः समभिद्रुताः ।
आरक्षस्था विरुपाक्षा राक्षसाः संप्रदुद्रुवुः ॥५॥
गोपुराट्टप्रतोलीषु चर्यासु विविधासु च ।
प्रासादेषु च संहृष्टाः ससृजुस्ते हुताशनम् ॥६॥
तेषां गृहसहस्त्राणि ददाह हुतभुक्तदा ।
तेषां शतसहस्त्राणि रक्षसां पुरवासिनाम् ॥७॥
अदहत्पावकस्तत्र जज्वाल च पुनः पुनः ॥८॥
वानरसैन्याची लंकादहनाची कामगिरी :
उल्काहस्ती वानरवीर । जाळूं आले लंकापुर ।
देखोनि राखले निशाचर । अति सत्वर पळाले ॥११॥
ठेवोनि राक्षससैन्यासी । नगर रक्षितां विरुपाक्षासीं ।
येता देखोनि वानरांसी । तोही धाकेंसीं पळाला ॥१२॥
पळतां देखोनि निशाचर । पाठी लागती वानर ।
येता मारिले घरटीकार । जाळिले अपार जागेकरी ॥१३॥
जेथे जेथे जागेकरांची घरे । तेथे तेथे आग लविती वानरे ।
बाहेर निघावया निर्गम न पुरे । जाळिता वानरे समग्रें ॥१४॥
घरे मंदिरे धवळारें । रम्य वाडिया गोपुरे ।
प्रसाद पौळी शिखरें । जाळित वानरे अति क्षोभे ॥१५॥
शरबंधी बांधले राघवेंद्र । अति नष्ट हे निशाचर ।
इंद्रजित जाळूं दशशिर । लंकापुरा पुरदाहो ॥१६॥
ऐसे बोलोनि वानर । जाळूं आदरिलें नगर ।
सहस्रसंख्या लक्षांतर । असंख्या कारगृहदाहो ॥१७॥
माणिकनिबद्ध अवनी । रत्नजडित स्तंभश्रेणी ।
मुक्ताफळें मंडपाभरणीं । उत्तमां भवनी महादाहो ॥१८॥
लहानसहान घरे । आगी न लाविती वानरे ।
सुंदर भवने सुप्रकारें । तीचि आदरे जाळिती ॥१९॥
सुंद्र मनोहर गृहांसीं । शोधून जाळिती साक्षेपेंसी ।
वानर पडले द्वंद्वासीं । आगी चौपासी लाविली ॥२०॥
हनुमंते जाळिलेनगर । तेव्हा दिवसा होता दिनकर ।
हा रात्रिंदाहो निर्धार । स्त्रिया कुमर कळकळती ॥२१॥
आगी लाविली चौफेरी । पळती राक्षसांच्या हारी ।
आकांत होत नरनारी । आपांपरी नगरस्थां ॥२२॥
दंपत्यें निजसेजेसीं । निद्रिस्थ असता दोहींसी ।
जळोनियां जैसी तैसी । गृहदाहेंसीं भस्मात ॥२३॥
नाना सामग्री उपकरण । शस्त्रास्त्र अंगत्राण ।
धनुष्यबाणेंसी वोढण । वस्त्राभरण जाळित ॥२४॥
पुरुष उठविता स्त्रियेसीं । ते म्हणे सुखें भोगा कामासीं ।
आगी लागली गृहासी । नीघ वेगेंसीं निस्संगे ॥२५॥
जेथींच्या तेथे घरोघरी । राक्षस जळती निद्राभरीं ।
बहुता रिघु न पुरे बाहेरी । अग्नीमाझारी कोंडलीं ॥२६॥
हाका देती शंखस्फुरणें । आक्रंदती अति सत्राणे ।
दुर्धर अग्नीचें जाळणें । कोणांसी कोणे राखावे ॥२७॥
आगी कोंडोनी चौफर । महायोद्धे दहा सहस्र ।
जळोनि मेले निशाचर । घोरांदर आकांत ॥२८॥
अग्नि खवळला अनिष्ट । चहूंकडे धडधडाट ।
लंकेमाजी न चले वाट । कलकलाट राक्षसा ॥२९॥
शरबंधी करोनि कपट । श्रीराम बांधिला वरिष्ठ ।
त्याचे फळ हे अनिष्ट । होत तळपट राक्षसा ॥३०॥
शयनेषु महार्हेषु प्रसुप्तानां प्रियैः सह
लंकादहनामुळे जनतेची दुर्दशा : ।
त्रस्तानां गच्छतां चैव पुत्रानादाय सत्वरम् ॥९॥
धूमजालपरीतांगा बहवो परमार्दिताः ।
राक्षसा विनदंति स्म वन्हिज्वालाभयाकुलाः ॥१०॥
घरोगरीचीं समस्त । महामंचकी सुनिश्चित ।
स्त्रीपुरुषें निद्रान्वित । अग्नि तेथ पोळित पावे ॥३१॥
स्त्रिया पुत्र घेवोनि पळती । पुरुष गजबजिले आक्रंदती ।
घरोघरी हाका देती । धूमाकुलित आरडत ॥३२॥
धूमाकुलित न दिसे वाट । अग्नि पोशित चटचट ।
राक्षसांसी भवंत आट । अति कष्ट स्त्रीबाळां ॥३३॥
राक्षस पडले ज्वलनावर्ती । ज्वालाकुलित झाली क्षिती ।
सहसा निर्गम न पावती । हाका देती आक्रोशे ॥३४॥
जे जे राक्षस बाहेर येती । ते ते उचलोनि जुत्पती ।
अग्नीमाजी निक्षेपिती । द्वंद्वावृत्तीं वानर ॥३५॥
शरबंधी धरिला रामचंद्र । तेणे रागे पै वानर ।
जाळूं आदरिले निशाचर । लहान थोर कवळोनी ॥३६॥
श्रीराम परब्रह्म स्पष्ट । त्यासी राक्षसी केले कपट ।
त्यांचे करावे तळपत । द्वंद्वा कर्कंट पेटले ॥३७॥
जे राक्षस वाहेर येत । त्यांस कपि घालिती अग्नीत ।
राहू जाता लंकेआत । ज्वलनावर्त जाळित ॥३८॥
ऐसा राक्षसा आकांत । आरंभिला लंकेआंत ।
हाकबोंबेचा आवर्त । प्रळयांत नगरस्थां ॥३९॥
उष्ट्रैर्मुक्तैर्गजैर्मुक्तैर्मुक्तैश्च तुरगैरपि ।
बभूव लोको लंकायां भ्रांतग्राह इवार्णवः ॥११॥
अपरे हेमकाक्षाश्च संनद्धा वरवारणाः ।
त्रस्ता बंधात्समाक्षिप्य येन केन प्रदुदुवुः ॥१२॥
पानीयं पातुमिच्छंतः परिभ्रमणतर्षिताः ।
प्रतिबिंबं जले दृष्ट्वा तमग्निमिति मेनिरे ॥१३॥
देखोनिया दहनावर्त । हस्ती घोडे कर्अहे मुक्त ।
अग्निभये अति भ्रांत । परिभ्रमत अव्हासव्हा ॥४०॥
अवघी जळतृषातृषित । उदकप्राशर्थ येत ।
अग्निप्रतिबिंब जळांत । देखोनि पळत माघारीं ॥४१॥
जळ नव्हे तो मानूनि अग्नी । पळती उदक न घेऊनी ।
ऐसी परी लंकाभुवनीं । अग्निदहनीं आकांत ॥४२॥
धनुष्य सज्जोनि लक्ष्मण । विधोनियां अग्निबाण ।
करिता राक्षसा कंदन । लंकाभुवन कळकळित ॥४३॥
भेदितां सौमित्राच्या शरीं । आक्रंदती नरनारी ।
बोंब सुटली निशाचरीं । आपांपरी राक्षसा ॥४४॥
लंकानगरीतील दुर्दशा पाहून श्रीराम लंकादहन थांबवितात :
ऐसे देखोनिया कंदन । कृपेनें द्रवला रघुनंदन ।
निवोरोनि लक्ष्मण । बोले आपण सुग्रीवासी ॥४५॥
विंधोनियां अग्निबाण । निद्रितांचें करिता दहन ।
आम्हांसी पुरुषार्थ कोण । निद्य लक्ष्मण क्षात्रधर्मा ॥४६॥
दहनीं घालोनि लंकाभुवन । जाळिता निद्रितादि जन ।
तरी काय मारिला दशानन । निंद्य लक्षण क्षात्रधर्मा ॥४७॥
रात्रीमाजी द्वंद्व जे करणे । चोरोनियां अग्नि लावणें ।
ही तंव अधर्माचीं चिन्हें । लाजिरवाणे क्षात्रधर्मा ॥४८॥
बाहेर आल्या रणांगणी । मारीन विरांचिया श्रेणी ।
धडमुंडाकित धरणी । अर्धक्षणी मी करीन ॥४९॥
मज असता श्रीरामचंद्रा । कासया राक्षसांचा दरारा ।
विंधोनियां बाणधारा । दशशिरा निवटीन ॥५०॥
निवारोनियां लक्ष्मण । वर्जोनियां वानरगण ।
न जाळावे निद्रित जन । लंकाभुवन न जाळांवे ॥५१॥
निद्रित जाळितांचि देख । अंगी लागे महापातक ।
ते वर्जोनि रघुकुळटिळक । युद्ध संमुख करु इच्छी ॥५२॥
संमुखा संमुखी अति निर्वाण । करावया रावणासीं रण ।
सैन्य सज्जावें संपूर्ण । रघुनंदन आज्ञापी ॥५३॥
ऐकोनि श्रीरामवचन । सुग्रीव घाली लोटांगण ।
हरिखें गर्जोनि आपण वानरगण निमित ॥५४॥
आदिष्टा वानरेंद्रास्ते सुग्रीवेण महात्मना ।
आसन्नं द्वारमाविश्य प्लवंगा युद्धकांक्षिणः ॥१४॥
यश्च वो वितथं कुर्यात्तत्र शत्रावुपस्थिते ।
स हन्तव्योऽभिसंहत्य बलवान्यः पलायते ॥१५॥
अंगदाची घोषणा :
रावणासीं करावया रण । श्रीरामे नेमिलें आपण ।
सुग्रीवाआज्ञा अति दारुण । वानरगणनियमार्थी ॥५५॥
आजिंचे करिता रणांगण । वेंचावा श्रीरामाकाजीं प्राण ।
मागे पळता तो जाण । अंगदे आपण मारावा ॥५६॥
मातुळ मावसा मेहुणा नातू । चुलता पुतण्या बंधु सुतु ।
स्त्रियेचा बंधु अत्यंत आप्तु । करावया घात रणीम् सरतां ॥५७॥
श्रीरामकाजीं वंचकपण । त्यासी मारावें आपण ।
त्याचा घेतल्याही प्राण । दोष दारुण बाधेना ॥५८॥
अंगद बोलिला हांसोन । पळल्या देवोनि अभयदान ।
मी मारीन दशानन । रणविंदान पहा माझे ॥५९॥
ऐकोनि अंगदाची मात । संतोषला श्रीरघुनाथ ।
टाळी पितली वानरांत । रणी लंकानाथ वधावया ॥६०॥
दिवस उगवतांचि जाण । देखोनि लंकादहन ।
कोपा चढला दशानन । खात दशन अति रागे ॥६१॥
कुंभकर्णाचे कुमर । कुंभानिकुंब महाशुर ।
युद्धा धाडिले सत्वर । नरवानर मारावया ॥६२॥
कुंभ निकुंभ दोघे जण । वाढिवे गर्जत आपण ।
वानर बापुडे ते कोण । रामलक्ष्मण निर्दुळूं ॥६३॥
लंकेयं निर्ययुर्द्धारान्नदंतो भीमाविक्रमाः ।
कुंभकर्णात्मजौ वीरौ परिगृह्य समंततः ॥१६॥
बहुसैन्यैः परिवृतौ शीघ्रं रावणनोदितौ ।
भीमं च रथमातंगहयवाहनसंकुलम् ॥१७॥
तद्दृष्टवा बलमायातं राक्षसानां महत्तदा ।
संचचाल कपीनां तु बलमुच्चैर्ननाद च ॥१८॥
कुंभ व निकुंभ ससैन्य लंकेमधून बाहेर पडले :
कुंभ निकुंभ दोघा वीरी । सैन्य सज्जोनि समग्रीं ।
निघाले लंकेबाहेरी । वीर गजरीं गर्जती ॥६४॥
रथाश्वेंसीं मत्त मातंग । सन्नद्ध बद्ध चतुरंग ।
कुंभकर्ण पुत्र चांग । वीर निर्व्यंग युद्धार्थीं ॥६५॥
रावणाचे आज्ञेवरी । नाना वाद्यांचे गजरीं ।
दोघे निघतांचि बाहेरी । येता वानरी देखिले ॥६६॥
देखोनि राक्षसांचें दळ । रणी खवळले गोळांगुळ ।
युद्धा मिसळले तत्काळ । रणकल्लोळ माजविला ॥६७॥
रामनामाचा गजर । वानरी केला भुभःकार ।
सिंहनादे निशाचर । घोरांदर गर्जती ॥६८॥
कात्या तोमर त्रिशूळ भालें । राक्षस युद्धा मिसळले ।
वृक्षपर्वत शालतालें । वानर बळे भिडताती ॥६९॥
वानर आणि निशाचर । युद्धा पेटले दुर्धर ।
नोकोनियां येरा येर । घाय निष्ठुर हाणिताती ॥७०॥
राक्षस आणि वानरगण । ज्याची जैसी आंगवण ।
युद्ध करिती भिन्न भिन्न । रणप्रवीण रणयोद्धे ॥७१॥
युद्ध करिता निशाचर । पाठीराखे येरा येर ।
तैसेचि योद्धे कपिकुंजर । येरा येर रक्षिती ॥७२॥
प्रवरानभितो जघ्नू रक्षसामंतरे स्थितान् ।
घ्नंतमन्यं जघानान्यः पतितोन्यमपातयत् ॥१९॥
गर्हमाणं जगर्हान्यो दशंतमपरोऽदशत् ।
देहीत्यन्यो ददात्यन्यो ददामीत्यपरः पुनः ॥२०॥
राक्षसां दशसप्तेति वानरा जघ्नराहवे ।
वानरानपि सप्ताष्टौ दश राक्षसपुंगवाः ॥२१॥
राक्षस व वानरसैन्यांचे युद्ध :
मथून राक्षसव्यूहसंबंध । वाढिवा लाठिवा वीर प्रबद्ध ।
त्यांसीं वानरी द्वंद्वयुद्ध । अति सुबद्ध आदरिलें ॥७३॥
महावीर रणप्रवीण । अंगी प्रबळाची आंगवण ।
येरयेरांतें पाचारुन । नामे घेऊन भिडती ॥७४॥
आम्ही श्रीरामाचे दूत । रामनामे घाया हाणित ।
तैसेच राक्षस विख्यात । रणी भिडत रणमारे ॥७५॥
एक एकाते घाय हाणित । तोही घाया घाय देत ।
एक एकातें तळी पाडित । तोही पडत उलथोनी ॥७६॥
वानर अशक्त पालेखाइर । तुम्हांसीं युद्धी कैंचा धीर ।
तुम्ही महापापी निशाचर । चोरटी धूर परद्वारी ॥७७॥
चोरीमारी परद्वारी । इतुकीं पापें दशशिरीं ।
त्याचे तुम्ही सहाकारी । पापाचारी अशक्त ॥७८॥
पापें मारिले तुम्हांसी । मारणें न लगे आम्हांसी ।
ऐसे निंदून राक्षसांसी । कपि आवेशी भिडती ॥७९॥
श्रीराम स्वये सोज्वळ । नित्य निष्पाप निर्मळ ।
तुमची धूर कष्मळ । पापी केवळ परदारी ॥८०॥
त्या पाप्याचे होवोनि दूत । संग्रामासी आलेति येथ ।
जयो न पावां निश्चित । रणी समस्त मराल ॥८१॥
राक्षसा डसती वानर । वानरा डस्ती निशाचर ।
पुच्छे ठोकोनि सत्वर । फोडिती वक्त्र राक्षसांचे ॥८२॥
घाये करोनि दंत भग्न । भूमीं पाडोनि दशन ।
राक्षसांसी करोनि कंदन । कपिगण गर्जती ॥८३॥
एक म्हणे राहे साहें । दुजा म्हणे पुढे पाहे ।
माथा हाणिती दुर्धर घाये । रुधिर वाहे भडभडा ॥८४॥
दे दे म्हणती निशाचर । घाय देती वानर ।
अशुद्धाचा वाहे पूर । घोरांदर रणमार ॥८५॥
राहे साहें धरी धीर । घाय साहे तो महाशूर ।
नोकोनियां येर येर । करिती मार रणमारे ॥८६॥
एवं राक्षस गोळांगूळ । युद्धी भिडती अति तुंबळ ।
रणी खवळला रणवेताळ । हलकलोळ रणांगणी ॥८७॥
वानरवीर रणाआंत । राक्षस दहा पांच सात ।
एक वेळे करिती घात । रणोन्मत्त महामारें ॥८८॥
याचि परी राक्षसवीर । सप्ताष्टदश वानर ।
घाये मारिती निशाचर । रणी दुर्धर गर्जोनी ॥८९॥
ऐशापरी रणांगणी । वीरां वानरा झोंटधरणी ।
होता देखूनियां नयनी । आला गर्जोनि अंगद ॥९०॥
प्रवृत्ते संकुलेऽत्यर्थ तस्मिन्वीरवरक्षये ।
अंगदोऽकंपनं वीरमाससाद रणोत्कटः ॥२२॥
आहूय सोंऽगदं कोपात्ताडयामास वेगतः ।
गदयाकंपनः श्रीरामान्स पपाताचलोपमः॥२३॥
अंगदाच्या शिळाप्रहाराने अकंपनाचा वध :
कुंभनिकुंभाचा प्रधान । मुख्य सेनानी अकंपन ।
त्यासी उत्कट करावया रण । अंगद आपण पाचारी ॥९१॥
अंगद येतांचि गर्जत । अंकपनें गदाघात ।
हाणोनि पाडिला मूर्च्छित । जेंवी पर्वत वज्रघातें ॥९२॥
मूर्च्छा सांवरोनि सत्वर । उठोनिया अंगद वीर ।
रागे हाणोनि शिळाशिखर । केला शतचूर अकंपन ॥९३॥
न मांगता प्यावया पाणी । अकंपन पाडिला रणी ।
राक्षससैन्या जाली भंगाणी । गेले पळोनी कुंभाप्रती ॥९४॥
राक्षसांचे सैन्यसंभार । धाके पळोनि सत्वर ।
कुंभ निकुंभ महावीर । आले समग्र त्यांपासी ॥९५॥
अकंपनाचा केला घात । हांक वाजली सैन्याआंत ।
तेणे कुंभ क्रोधान्वित । शरचापयुक्त चालिला ॥९६॥
आपतंतीं च वेगेन कुंभस्तां सांत्वयन् चमूम् ।
तेन हाटकवर्णेन पत्रिणा चित्रवाससा ॥२४॥
आकर्णकृष्टमुक्तेन विव्याध द्विविदं बली ।
स तयाभिहतस्तेन विप्रमुक्तपदः स्फुटम् ॥२५॥
निपपाताद्रिकूटाभा विव्हलो गाढवेदनः ।
कुंभमम्यपतत्क्षिपं ग्रगृय महतीं शिलात् ॥२६॥
तां शिलां सलताजालां तस्मै चिक्षेप रक्षसे॥२७॥
कुंभराक्षसाचा क्रोधाने अंगदावर हल्ला :
मारिलिया अकंपन । पळत आले राक्षससैन्य ।
त्यासी कुंभे आश्वासून । निघे आपण संग्रामा ॥९७॥
कुंभ योद्धा महाशूर । श्रेष्ठ श्रेष्ठ वानरवीर ।
शोधोनियां विंधी वीर । लहानथोर मारीना ॥९८॥
वानरसैन्यीं नाना व्यक्ती । त्यांते कुंभ न धरी हाती ।
श्रेष्ठ श्रेष्ठ जे जुत्पती । बाण त्यांप्रती विंधित ॥९९॥
द्विविद व मैंद कुंभाकडून मूर्च्छित पडले :
धनुष्यबाण स्वये सज्जूनी । आकर्णांत वोढी काढूनी ।
द्विविद विंधोनियां बाणी । पाडिला रणी मूर्च्छित ॥१००॥
बाणी विंधिता सुदृढ । द्विविद पाडिला गाढ मूढ ।
वीरशूरयुद्धकैवाड । रणसुरवाड संग्रामी ॥१॥
मूर्च्छित पडतांचि द्विविद । बंधु क्षोभला महामैंद ।
कुंभासीं करावया युद्ध । सन्नद्ध बद्ध चालिला ॥२॥
वृक्षवल्ली द्रुम सकळा । सपर्वत उपडोनि शिळा ।
घालिता कुंभाच्या कपाळां । तेणे तत्काळ छेदिली ॥३॥
विंधोनियां पांच बाण । शिळा छेदून केली शतचूर्ण ।
मैंदासी शर दारुण । विंधी आपण साटोपे ॥४॥
वक्षस्यापि च तेनासौ मैदं विव्याध राक्षसः ।
रुधिरानुगतो भूमौ निपपात हि मूर्च्छितः ॥२८॥
ततोंऽगदस्तौ पतितौ मातुलावभिजग्मिवान् ।
अभिदुद्राव वेगेन कुंभमुद्यतकार्मुकम् ॥२९॥
तमापतंतं विव्याध कुंभः पंचभिरायसैः ।
त्रिभिश्चान्यैस्त्रिभिर्बाणैर्मातंगमिव तोमरैः ॥३०॥
अंगद – कुंभ युद्ध :
मैंदे सोडिला शिळा पर्वत । कुंभें छेदोनि समस्त ।
सुवर्णपत्री बाण युक्त । हृदयाआंत विंधिला ॥५॥
हृदयी भेदतां तो शर । वमून रुधिरांचे पूर ।
मूर्च्छित मैंद वानर । रणी सत्वर पाडिला ॥६॥
मैंद द्विविद वीर प्रबळ । दोन्ही अंगदाचे मातुळ ।
रणी पडता अति विव्हळ । अंगद तत्काळ क्षोभला ॥७॥
करावया कुंभाचा घात । अंगदे उपडोनि पर्वत ।
धांविन्नला त्वरान्वित । रणी गर्जत साटोपे ॥८॥
कुंभें विंधोनि पांच बाण । येता पर्वत केला चूर्ण ।
अंगदासी तीन बाण । अति सत्राण विंधिले ॥९॥
अंगद वीर अति विख्यात । जरी बाणी जाला जर्जरित ।
तरी कुंभाचा करावया घात । सवृक्षहस्त स्वये आला ॥११०॥
पर्वतामागें पर्वत । वृक्षामागें वृक्ष वर्षत ।
कुंभ करिता अस्ताव्यस्त । तोही सावचित्त रणमारीं ॥११॥
कुंभवीर रणाभिनिवेशीं । तोडोनि वृक्षपर्वतांसी ।
अगद विंधिला भ्रूपदेशीं । रुधिर त्यासी सुटलें ॥१२॥
गज आवरिजे अंकुशेंसीं । तेंवी अंगद बाणेंसीं ।
नावरेचि युद्धाभिनिवेशीं । शालहस्तेंसी लोटिला ॥१३॥
अंगदः पाणिना नेत्रे विमृज्य रुधिरोक्षितः ।
शालमासन्नमेकांते परिजग्राह पाणिना ॥३१॥
तमिंद्रकेतुप्रतिमं शालं शालभुजो बली ।
उत्ससर्जांगदो वेगात्तं दूरादन्ववैक्षत ॥३२॥
अंगदाला मूर्च्छा :
अंगदकपाळीं विंधिला शर । प्रवाहें अशुद्धाचा पूर ।
नेत्रींचें पुसोनियां रुधिर । अंगद सत्वर धांविन्नला ॥१४॥
जैसा इंद्राचा इंद्रकेत । तैसा शोभे शालहस्त ।
लाता हाणोनि सारथि रथ । केला निःपात रणभूमी ॥१५॥
आम्ही म्हणो हे वानर । हीन दीन पालेखाइर ।
तंव हे निधडे महाशूर । पूर्ण जुंझार रणरंगी ॥१६॥
शाल हाणिता सत्वर । कुंभ निधडा धनुर्धर ।
सतेज विंधोनियां शर । शाल समग्र छेदिला ॥१७॥
हेमपुंखी सरले शर । धगधगीत तेजाकार ।
अंगद विंधिला वानर । वज्रधार दृढ बाणी ॥१८॥
सबळ अंगदाचें उड्डाण । हृदयी भेदतां वज्रबाण ।
क्षिती पडला मूर्च्छापन्न । आपणा आपण विसरला ॥१९॥
युवराजा पडता क्षिती । कोपे खवळले जुत्पती ।
युद्ध करावया कुंभाप्रती । कोट्यनुवृत्ती चालिले ॥१२०॥
अंगदं व्यथितं दृष्ट्वा सीदंतमिव कुंजरम् ।
दुराधर्षं राजपुत्रं धूम्रो हभ्यवपद्यत ॥३२॥
अथ धूम्रः शिलाहस्तः कोपसंरक्तलोचनः ।
रिरक्षिषंतोऽभ्यपतन्नंगदं वानरर्षभाः ॥३४॥
धूम्र व जांबवंताकडून अंगदाचे रक्षण :
अंगद युवराजा विख्यात । रणी पडतांचि मूर्च्छित ।
कुंभ होवोनि हर्षयुक्त । त्यासी नगरांत नेऊ पाहे ॥२१॥
भंगिला रथ सारथी । अंगद न्यावा कैशा रीती ।
कुंभ विचारी जंव चित्ती । तंव धूम्राची अवचितीं उडी आली ॥२२॥
धूम्र वीर तयेकाळीं । आरक्त नयन क्रोधानळी ।
पर्वत झेलीत करतळी । कुंभाजवळी पातला ॥२३॥
बाणापिसारियाचा वारा । धूम्र उडविला अंबरा ।
तेणे हाहाकार वानरा । निशाचरां आल्हाद ॥२४॥
धूम्र ज्येष्ठ बंधु जांबवंतां । त्यासी रणी कुंभे गांजितां ।
नाही अंगदासी रक्षिता । तेणे जांबवंता कोप आला ॥२५॥
जांबवंत निघे आपण । सवे निघाला सुषेण ।
वेगदर्शीं वानर जाण । करावया रण चालिला ॥२६॥
येता देखोनि वानरांसी । कुंभ वीर रणभिनिवेशीं ।
बाणी खुंटले कपिमार्गासी । अंगदापासी येवो नेदी ॥२७॥
वर्षोनिया शरौघ । कपिप्रताप केला मोघ ।
बाणी खिळिलें सर्वांग । रणोद्योग चालेना ॥२८॥
जेंवी का वायु आकाशासी । तोडोनि ने मेघजालासी ।
तेंवी कुंभे वानरांसी । बाणभिनिवेशी वारिले ॥२९॥
अंगद धरिला राजकुमर । रणी उठला हाहाकार ।
ते देखोनि सुग्रीव वीर । कोपे दुर्धर चालिला ॥१३०॥
सांडोनि कुंभबाणमार्गासी । अलक्ष उडोनि आकाशी ।
सुग्रीव आदळला अंगेंसीं । अंगद पाठीसी घालोनी ॥३१॥
कुंभस्य धनुराच्छिद्य बभंजेंद्रायुधोपमम् ।
अवप्लत्य ततः शीघ्रं कृत्वा कर्म च दुष्करम् ॥३५॥
अब्रवीत्कुपितः कुंभं भग्नशृंगमिवर्षभम् ।
कृतं कर्म परिश्रांतो विश्रांतः पश्य मे बलम् ॥३६॥
तेन सुग्रीववाक्येन सावमानेन मानितः ।
ततः कुंभः समुत्पत्य सुग्रीवमभिपत्य च ॥३७॥
सुग्रीव – कुंभ मुष्टियुद्ध :
सुग्रीवे घालोनि उडी । कुंभाचें धनुष्य आसुंडी ।
रागे मोडोनि कडाडी । आदळला प्रौढी अंगसी ॥३२॥
जैसे इंद्रचाप आकाशी । तैसे धनुष्य कुंभापाशीं ।
सुग्रीवे मोडून आवेशी । काय त्यासी बोलत ॥३३॥
तुवा घेऊन धनुष्यबाण । रणी त्रासिले वानरगण ।
ते म्या चाप भंगिल्या जाण । आता आंगवण तुज कैंची ॥३४॥
भग्नशृंग वृषभासी । जेंवी न करवे संग्रामासी ।
तेंवी भंगिल्या चापासी । प्रौढी युद्धासी तुज कैंची ॥३५॥
आजवरी म्या रणी । वीर मारिला नाही कोणी ।
प्रथम करीन तुझी बोहणी । पुढे वीरश्रेणी मारावया ॥३६॥
ऐसे सुग्रीवाचे उत्तरी । कुंभासीं कोप आला भारी ।
कोपे मुष्टि उरावरी । वज्रप्रहारीं हाणितली ॥३७॥
फोडोनि देहींच्या चर्मासीं । मुष्टि पावली अस्थीपासीं ।
भेदून अंगीच्या वर्मासी । अति आवेशी हाणिता ॥३८॥
येवढी कुंबाची मुष्टी । सुग्रीवे नेली तृणासाठीं ।
अशुद्धे डवरला जगजेठी । रणसंतुष्टी डुल्लत ॥३९॥
जैसा गेरुका मिरवे मेरु । का वडवाग्नी सागरु ।
अशुद्धे डवरला वानरु । राणीं परम शोभत ॥१४०॥
स तथाभिहतस्तेन सुग्रीवो वानरेश्वरः ।
मुष्टिं संवर्तयामास वज्रवेगां महाबलः ॥३८॥
मुष्टिं संपातयामास कुंभस्योपरि वानरः ।
मुष्टिनाभिहतस्तेन निपपात स राक्षसः ॥३९॥
कुंभराक्षसाचा वध :
कुंभ महाबळी वीर । मुष्टी हाणिता निष्ठुर ।
डंडळेना सुग्रीव वीर । वानरेश्वर प्रतापी ॥४१॥
सुग्रीवे वळोनि वज्रमुष्टी । कुंभास हाणिता उठाउठी ।
फोडोनि मस्तकाची कवटी । पाडिला सृष्टी निष्प्राण ॥४२॥
कुंभ पडिला महावीर । विजयी झाला वानरेश्वर ।
वानर करिती जयजयकार । नामे अंबर गर्जत ॥४३॥
स्वये उठोनि श्रीरघुनाथ । आलिंगिला वानरनाथ ।
सुग्रीव होवोनि लज्जान्वित । काय बोलत ते ऐका ॥४४॥
कुंभ कायसे बापुडे । रणी मारिले म्या किडे ।
ते यश मिरवूं तुजपुढे । हे तंव कुडे मजलागी ॥४५॥
रावणाच्या दहाही शिरांसी । मुरडोनि आणीन पायांपासीं ।
तेचि मी करीन सेवेसी । पुरुषार्थेंसीं सुग्रीव ॥४६॥
ऐसे सुग्रीवाचें वचन । उल्लासे मानी रघुनंदन ।
एका जनार्दना शरण । कुंभनिर्दळण रणी झाले ॥४७॥
कुंभाचा रणी केला घात । क्षोभला निकुंभ विख्यात ।
त्यासी मारील हनुमंत । कथावृत्तांत अवधारा ॥१४८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
कुंभवधो नाम चतुस्त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३४॥
ओंव्या ॥१४८॥ श्लोक ॥३९॥ एवं ॥१८७॥
