॥ श्रीएकनाथमहाराजकृत
74.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय चौर्याहत्तरावा ॥
श्री शंकर - हनुमंत भेट -
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
श्रीरामाचे निजचरित्र गहन । सांगता सौमित्र विचक्षण ।
ऐकती जानकी सावधान । सर्वांगश्रवण करोनी ॥१॥
धन्य श्रवणार्थीं सादर सीता । धन्य धन्य तो सौमित्र वक्ता ।
धन्य चरित्र रामकथा । अनागतवक्ता वाल्मीकी ॥२॥
कलियुगीं धन्य जन ते । अखंड गाती रामचरित्रातें ।
धन्य धन्य ते सादर श्रोते । कथामृत सेविती ॥३॥
श्रवणद्वारें कथामृत । सेविता अंतर निर्वृत ।
प्रकटोनियां रघुनाथ । उद्धरीत जडजीवां ॥४॥
श्रीरामाचे चरित्र गहन । क्रमें संपलें सेतुबंधन ।
पुढे रामेश्वराचे आख्यान । वर्णी कोण साकल्यें ॥५॥
अनंत कथा सेतुमाहात्म्यीं असती । तितुकी आकळावया कैंची मती ।
किंचित सांगेन कथासंगती । क्षमा श्रोती करावी ॥६॥
क्षमा करा म्हणावयालागीं । सामर्थ्य कैंचे माझ्या अंगी ।
जनार्दनकृपा सत्संगीं । केलो जगी पै सरता ॥७॥
तेणे एका एकपणा । पैठा जालो संतचरणां ।
तये धीटवेकरोनि जाणा । निःशंक विनवणा करीतसे ॥८॥
सेतुमाहात्म्यात आलेली रामेश्वराच्या निर्मितीची पूर्वकथा :
किष्किंधेहूनि श्रीरघुवीर । सवे वानरांचा भार ।
नामे गर्जती अपार । मुमु कार गोळांगुळी ॥९॥
भुभुःकार जयकारध्वनी । वानरांच्या उड्डाणकिराणी ।
राम निघाला गजरेंकरोनी । खांदी बैसोनी हनुमंताच्या ॥१०॥
हनुमंत झाला श्रीरामवाहन । मज अंगदे उचलोन । ?
खांदीं घेतलें प्रीति करून । आले ठाकून समुद्रतीरा ॥११॥
अपूर्व झाले तेये ठायी । श्रीरामा शिवदर्शनाचा नेम पाही ।
समुद्रतीरी ते नाही । न चले कांही सर्वथा ॥१२॥
गुंती पडली फळआहारा । तटस्थ सर्वही वानरा ।
संमुख येती रघुवीरा । वाग्व्यापारा न करवे ॥१३॥
शिवदर्शनावाचून रामांचे भोजनादि व्यवहार थांबले :
शिवदर्शनेंवीण जाण । श्रीराम न करी फळभोजन ।
गुंती पडली दारुण । कांही विंदाण चाळेना ॥१४॥
जरी स्वये आत्माराम । तरी स्थापावया भजनधंर्म ।
शिवदर्शनाचा नित्य नेम । अति नि सीम चालविता ॥१५॥
सकळ तीर शोधिता पाही । प्रतिमालिंग न दिसे कांही ।
तेणे सचिंत होवोनि अवघेही । करणी काही चालेना ॥१६॥
जरी स्वये आत्माराम । तरी स्थापावा भजनधर्म ।
स्वये करिताहे कर्म । पुरुषोत्तम आपण ॥१७॥
सचिंत होवोनि अवघे । विचार करिती निजभावें ।
स्वतां युक्ती न संभवे । हे पुसों जावे श्रीरामा ॥१८॥
कैसेनि होईल लिंगप्राप्ती । कोण उपाव कैशा स्थिती ।
हे न पुसता रघुपती । आणीक युक्ती स्फुरेना ॥१९॥
सर्वांची मारुतीला प्रार्थना :
पुसावया श्रीरघुनंदना । येवढी आंगवण कोणा ।
तुजवांचून वायुनंदना । आणिका वदन पै कैंचे ॥२०॥
मिळोनिया सकळ जुत्पती । विनविते झाले मारुती ।
आहारासीं पडली गुंती । विचार रघुपती पुसे वेगी ॥२१॥
ऐकोनिया ते वचन । पुढे झाला वायुनंदन ।
लोटांगणी रघुनंदन । कर जोडून विनविला ॥२२॥
ऐके स्वामी रघुनाथा । अवघे वीर विचारिता ।
शिवलिंग नाही सर्वथा । त्यासी आता काय करणे ॥२३॥
खुंटल्या वानरांच्या युक्ती । बुद्धि न स्फुरे लिंगार्थी ।
स्वामी सांगती जया स्थितीं । त्याच रीती साधेल ॥२४॥
गुरुमुखें तत्वता । वस्तुनिश्चय दृढ न होता ।
कोटि जन्म फेरे खाता । न पवे सर्वथा कल्पांती ॥२५॥
ऐसे विनविता हनुमंता । अति संतोष नाथा ।
हृदयी आलिंगोनि तत्वता । होय सांगता लिंगप्राप्रि ॥२६॥
सेतुबंधाची ख्याती । विस्तारावया त्रिजगती ।
जडजीवां उद्धारगती । करावया युक्ती योजिली ॥२७॥
नाही वेदशास्त्रव्युत्पत्ती । गाठीं नाही तपःसंपत्ती ।
गंध नाही सत्संगती । त्यांसी गती कैसेनि ॥२८॥
ऐसी पुढिलांची चिंता । उपजली श्रीरघुनाथा ।
तये कृपेस्तव तत्वता । होय योजिता उपाव ॥२९॥
अति प्रीती हनुमंताप्रती । सांगता होय रघुपती ।
अति कठिण लिंगप्राप्ती । दुर्गम स्थिति तयाची ॥३०॥
स्थावर लिंगासी चळण । सर्वथा करो नये जाण ।
म्हणोनि मांडिलें कठिण । दुर्गम जाण लिंगप्राप्ति ॥३१॥
श्रीरामांनी शिवदर्शन घेऊन येतो असे म्हणताच सर्वजण भयभीत :
तुम्ही समस्तीं रहावे येथे । मी जाईन शिवदर्शनातें ।
पूजोनिया सदाशिवातें । शीघ्र येथे येईन ॥३२॥
ऐकता श्रीरामवचन । हनुमान झाला मूर्च्छापन्न ।
हातींचा गेलिया रघुनंदन । वृथा जीवोन भूमिभार ॥३३॥
कठिण ऐकता वचनार्थ । सुग्रीवादि समस्त ।
वानर झाले मूर्च्छाभूत । मजही तेथ मूर्च्छा आली ॥३४॥
कांही न चले विवंचन । सकळ झाले मूर्च्छापन्न ।
ते देखोनिया रघुनंदन । स्वये आपण कळवळला ॥३५॥
कुरवाळूनि अमृतहस्ती । रामे उठविला मारुती ।
लिंगप्राप्तीसीं एक युक्ती । माझ्या चित्ती स्कृरलीसे ॥३६॥
परी ते कष्ट तुम्हांसी । म्हणोनि शंका मानसी ।
काल आणिले सीताशुद्धीसी । अति कष्टेसी रणमारे ॥३७॥
सवेंचि आजि दुसरे । संकट घालावे एकसरे ।
म्हणोनि सांगता न सरे । मन घाबिरें होतसे ॥३८॥
रामाज्ञा पाळणे ही मारुतीची उत्कंठा :
ऐकोनिया ते वचन । हनुमान पाली लोटांगण ।
देह तुझे कृपेंकरून । वर्तत जाण श्रीरामा ॥३९॥
तुझिया नामस्मरणापुढें । संकट कायसे बापुडे ।
फोडून काळाचे दाभाडे । नामे माकडें अनिवारा ॥४०॥
वैकुंठ कैलास सत्यलोक । पाटां वाटीनमृस्तुलोक ।
लिंगप्राप्तीलागीं देख । पाताळलोका भेदीन ॥४१॥
आज्ञा करिता रघुपती । जैशा रीती होय प्राप्ती ।
तैसी तैसी साधीन युक्ती । नामे मारुति गर्जत ॥४२॥
पाडून काळाचे दांत । ख्याती करीन त्रैलोक्यांत ।
आज्ञा करिता श्रीरघुनाथ । शोधीन समस्तब्रह्मांडा ॥४३॥
तुझे नामे रघुपती । कोण दुष्कर त्रिजगती ।
आज्ञा द्यावी शीघ्रगती । लिंगप्राप्ती होय कैसी ॥४४॥
मारूतीला काशीविश्वेश्वराचे माहात्म्य सांगतात :
ऐकोनिया ते वचन । संतोषला रघुनंदन ।
हृदयी धरिला आलिंगून । दुंर्लंध्य कोण तुज लागीं ॥४५॥
आनंदवन महाश्मशाना । अविमुक्त वाराणसीस्थान ।
मोक्षपुरींमध्ये मणि जाण । वेदपुराणसंमत ॥४६॥
तये काशीपुरीमाझारीं । कृपाळु राजा त्रिपुरारी ।
तारक ब्रह्माच्या निजगजरीं । जन उद्धरी चतुर्विध ॥४७॥
अंडज जारज स्वेदज पूर्ण । चौथे उद्भिज पै जाण ।
तितुके शिवकृपे करून । मोक्षसद्गन पावे ॥४८॥
महापापे हो का पतित । देह ठेवितां काशी आंत ।
यमयातने देवोनि लात । नित्य निर्मुक्त स्वये होती ॥४९॥
अगाध वाराणसीची थोरी । शिवे धरिली त्रिशूळावरी ।
लागली दिसताहे वसुंधरी । अलिप्त निर्धारी धरेसीं ॥५०॥
देव पदाभिमानें शिणले । ते मोक्ष पावावया वहिले ।
शंकरासी शरण गेले । धरणे केले आनंदवनी ॥५१॥
ब्रह्मा विष्णु मरूद्गण । लोकपाळेंसीं पाकशासन ।
सनकादिकसिद्ध जाण । ऋषिगण वसिष्ठादि ॥५२॥
यक्ष किन्नर सिद्ध चारण । वाराणसीचे किंकर जाण ।
शोभा कैलांसाहून गहन । वैकुंठ जाण पुढे सरेना ॥५३॥
क्षेत्रपाळांचें नित्य रक्षण । अहर्निशी सावधान ।
विघ्नांसी प्रवेश तेथे कैसेन । दारुण शासन दंड पाणीचें ॥५४॥
काशीला जाऊन शंकरांना दंर्शनार्थ लिंग देण्याची
विनंती करण्यास श्रीराम हनुमंताला सांगतात :
येथे जावोनि आपण । सदाशिवासी लोटांगण ।
अति प्रीती घालोनि पूर्ण । माझे विनवण सांगावे ॥५५॥
सीताशुद्धीचे कार्यार्थ । साधावया श्रीरघुनाथ ।
वानरसैन्यासमवेत । आला त्वरितसमुद्रतीरा ॥५६॥
शिवदर्शनावीण तत्वता । फळमूळ श्रीरघुनाथा ।
नाही घेणे सर्वथा । तरी पाहता शिवलिंग न मिळे ॥५७॥
म्हणोनिया स्वामीप्रती । मज पाठविले लिंगप्राप्ती ।
ऐसे सांगता शिवाप्रती । लिंग निश्चित देईल ॥५८॥
ऐसे जरी योजेल । तरी लिंगप्राति होईल ।
अन्यथा श्रमचि उरेल । परी न होईल लिंगप्राप्ती ॥५९॥
ऐसे सांगता रघुनाथा । आवेश आला हनुमंता ।
नमन करोनिया तत्वता । होय विनविता श्रीराम । ॥६०॥
हनुमंताची काशीस जाण्याची तत्परता :
तुझेनि प्रतापें रघुनाथा । कोणे पदार्थी दुर्गमता ।
आम्हा नाही गा सर्वथा । जाईन आता क्षणमात्रें ॥६१॥
कोणीकडे ते काशीपुर । मज सांगावे सत्वर ।
कृपा करोनि रघुवीर । आज्ञा सत्वर मज देई ॥६२॥
ऐकता हनुम्याचे वचन । संतोषला रघुनंदन ।
अति-प्रीती आलिंगून । निजविवंचन सांगत ॥६३॥
येथोनि थेट उत्तरेसी । विंध्याद्रीचे पैलदेशीं ।
अति विशाळ नगर काशी । तेथे विश्वेश्वरासी निवास ॥६४॥
मारुतीच्या आवेशपूर्ण उड्डाणाने चराचर आंदोळले :
अयोध्येचा निजप्रदेश । अंतर त्यासी योजनेवीस ।
ऐकतांच वानरेश । केले सावेश उड्डाण ॥६५॥
नमन करिता तयेवेळीं । पिंजारल्या रोमावळी ।
मस्तक नेला मुंडपातळीं । विचित्र शैली नेत्रांची ॥६६॥
भुभुःकार देता वानरे । बैसली काळांची दातेरें ।
दिग्गज झाले पै घाबरे । टाळी एकसरें बैसली ॥६७॥
ऐकतांचि भुभुःकारासी । धाके शारें आले मेघांसी ।
दांतखिली बैसली त्यांसी । गडगर्जनेसी विसरले ॥६८॥
वळोनि पुच्छाचा आंकोडा । उडतां आवेश माकडा ।
सागर खळबळिला गाढा । पडिला तडा पृथ्वीसीं ॥६९॥
जवळी होता रघुनाथ । म्हणोनि भ्याला अंगवात ।
तेणे वानर जीवे जीत । राहिले स्वस्थ रामबळें ॥७०॥
वृक्षा लागता तो वारा । वेगे उडाले अंबरा ।
भ्रमण करिता गरगरा । विस्मयो रघुवीरा उड्डाणे ॥७१॥
मागे सांडोनि चंद्र । गगना उसळला कपींद्र ।
लोकपतीचेंही नगर । अति सत्वर डावलिलें ॥७२॥
शेषाद्रि आणि श्रीशैलगिरी । किष्किंधाद्रि प्रस्रवणगिरी ।
मागे सांडोनिया सह्याद्री । ब्रह्मगिरी ओलांडिला ॥७३॥
मारुती काशीत येऊन रामनाम संकर्तिन
करीत विद्यनाथाच्या दर्शनार्थ निघाला :
विंध्याद्रिआदि सकळ गिरी । क्षणमात्रें कपिकेसरी ।
लंघोनियां झडकरी । काशीपुरी पावला ॥७४॥
रामनामाचे कल्लोळ । ऐकता तटस्थ झाले रक्षपाळ ।
देखतांचि गोळांगुळा । आश्चर्य सकळ मानिती ॥७५॥
श्रीरामनाम ऐकता । निषेध न करवे सर्वथा ।
सकळा झाली तटस्थता । कपि देखता विस्मित ॥७६॥
पाहता दिसे वानर । मुखी रामनामोच्चार ।
पराक्रमें महावीर । कालाग्निरुद्र दिसताहे ॥७७॥
आमुच्या स्वामीचे ध्येय जाण । याच्या मुखी त्याचे स्मरण ।
यासी निषेधिता आपण । शिव संपूर्ण क्षोभेल ॥७८॥
ऐसे जाणोनि समस्त । उगेच राहिले तटस्थ ।
हनुमान निघाला नगरांत । श्रीविश्वनाथदर्शना ॥७९॥
वाराणशीचे सौंदर्य वर्णन :
हाटवटिया चौबारे । सप्तखणांची दामोदरे ।
पंचप्रकारे विचित्रे । रचिली शंकरे त्रिशूळावरी ॥८०॥
प्रतिराउळीं परिकरीं । कोठडिया बाह्यांतरीं ।
प्रतिहारिका नवनारी । निगमागम साचारीं द्वारे नव ॥८१॥
सुंदर उभवणी चिंतामणींची । घरी दुभती कामधेनूंची ।
वने उद्यानें कल्पतरूंचीं । शोभा नगरीचीं अनुपम ॥८२॥
तेथीचे जे निजजन । त्यां अखंड शंकराचे ध्यान ।
रुद्राक्षांचें आभरण । भस्मोद्धूलन सर्वांगी ॥८३॥
शिवनामाची मुद्रा सार । सुखरूपचि व्यवहार ।
शिवनामे निरंतर । गर्जती नर सर्वदा ॥८४॥
तेथे राजा श्रीशंकर । मथूनिया श्रुतिसागर ।
उपनिषद्वनीतसार । वेगवत्तर काढिले ॥८५॥
तेंचि उपनिषद्नवनीत । बोधाग्नी करोनि तप्त ।
रामनाम सार घृत । परमामृत जीवांसीं ॥८६॥
पायं पायं श्रुतिचलकितं रामनामामृतं यद्-
ध्यायं ध्यायं मनसि सततं ब्रह्म तत्तारकाख्यम् ।
जापं जापं प्रकृतिविकृतौ प्राणिनां कर्णमूले
वीथ्यां वीथ्यामटति जटिल: कोपि काशीनिवासी ॥१॥
श्री शिवशंकरांची रामप्रीती :
जटाधारी दिगंबर । उमाकांत कर्पूरगौर ।
काशीपुरीं श्रीशंकर । राजा निरंतर नांदत ॥८७॥
तेणे रामनाम परमामृत । श्रुतीच्या चुळी प्राशूनि प्रीतियुक्त ।
काशीच्या बिदोबिदीं धांवत । पुकारित डांगोरा ॥८८॥
श्रीराम परम कल्याण । पूर्णब्रह्म चैतन्यघन ।
माझे जीवींचें निज गुह्य पूर्ण । समाधान मज तेणे ॥८९॥
श्रीरामे जीवा जीवपण । श्रीरामे शिवा शिवपण ।
जीव:शिवांची बोळवण । चैतन्यघन श्रीराम ॥९०॥
ते माझे निजगुह्य पूर्ण । निजकृपेंकरोन जाण ।
सांगतसे हाक फोडून । अति प्रीतीनें निजभक्ता ॥९१॥
प्रकृतित्यागाचे अंती । श्रवणी उपदेशी एकांती ।
ब्रह्म तारक ज्यातें म्हणती । ते हे निश्चिती रामनाम ॥९२॥
श्रवणद्वारें करिता प्राशन । चित्ताचे होय चैतन्यघन ।
मन तेचि उन्मन जाण । अहं ते सोहं संपूर्ण श्रीरामे ॥९३॥
बुद्धि तेंचि समाधिधन । इंद्रियांचें मोडले भान ।
अनुभवितां पै चिद्धन । परिच्छिन्नपण मग कैचें ॥९४॥
एवढा उपदेशाचा बडिवार । देवचतुष्टयाचा संहार ।
वचनमात्रे साक्षात्कार । चिदचिन्मात्र स्वये होणे ॥९५॥
कृमिकीटकपतंगादि पहाहो । काशीमाजीं सांडितां देहो ।
सांडोनिया देहभावो । परब्रह्म पहाहो स्वये होती ॥९६॥
अगाध स्मरणाचा बडिवार । देखतांचि तो वानर ।
करिता रामनामाचा भुभुःकार । दर्शना सत्वर चालिला ॥९७॥
श्रीरामभजनी अति आदर । नित्य सावधान शंकर ।
पळें पळें एकाकार । ध्यान निरंतर रामाचे ॥९८॥
बाप ध्यानाचा बडिवार । येरे वेधियेला येर ।
ध्यानबळें पै साचार । वर्ण सत्वर पालटले ॥९९॥
महादेव तमोगुण । मेघश्याम त्याचा वर्ण ।
श्रीरामाचे करिता ध्यान । झाला पूर्ण कर्पूरगौर ॥१००॥
श्रीराम शुद्ध सत्वात्मक निर्मळ । तो शंकरध्यानें प्रबळ ।
मेघश्यामता अविकळ । बाणली तत्काळ श्रीरामा ॥१०१॥
श्रीशंकरांचे स्वरूपवर्णन :
तैसा श्रीरामध्याने प्रबळ । शिवगोक्षीरधामधवळ ।
पंचवक्त्र जटाविशाळ । दीप्ति प्रबळ त्रिनेत्रा ॥१०२॥
दशमुजा अति विस्तीर्ण । श्मशानरजउधळण ।
सर्वांगी पन्नगभूषण । त्याचेंही लक्षण अवधारी ॥१०३॥
विषयत्यागे जी साचार । सर्वेद्रियें निर्विकार ।
तेचि शिवाअंगीं अलंकार । अति परिकर शोभत ॥१०४॥
निवडूनि अह गजासुर । सोहं चर्म सनखाग्र ।
काढोनि प्रीतिपुरःसर । बहिर्वस्त्र प्रावरणा ॥१०५॥
सिद्ध साधका नागवे पूर्ण । क्षणे नागवती तपोधन ।
तो निवटोनि क्रोधपंचानन । शांतिचर्म जाण काढिले ॥१०६॥
सबाह्मभ्यंतरी अढळ शांती । सनख चर्म निश्चिती ।
तेंचि प्रावरण पशुपती । अंतरस्थिती अंतरवास ॥१०७॥
श्रीशंकरांच्या दहा आयुष्यांचे रूपकात्मक वर्णन :
दशभुजांसीं परिकर । दशायुधें अति विचित्र ।
नांवे सांगेन सविस्तर । श्रोते सादर परिसोत ॥१०८॥
त्रिगण त्रिपुर अति दारुण । त्यासी निवटिता संपूर्ण ।
बोधाचा त्रिशूळ जाण । अति तीक्ष्ण तिधारा ॥१०९॥
मूळ वेद तोचि डमरु । अनुहताचा नाद गंभीरु ।
सात्विकाचे निज अंतरु । प्रीतिपुरःसरु जागवित ॥११०॥
समूळ आशा छेदी सत्वर । द्वैतदळणी सतेज धार ।
असिलता मुष्टीसी परिकर । सुरासुर कांपती ॥१११॥
स्वानुभवाचे वोडण जाण । सर्वेद्रियी सावधान ।
अन्य भासों नेदी भान । संरक्षण निजबळे ॥११२॥
आच्छादोनि स्वपक्षासी । शोधोनि निरासी द्वैतासी ।
वोडणखड्गांची कळा ऐसी । विपक्षासी उरो नेदी ॥११३॥
पाषांडी सैरा भरती रान । त्यांसी भक्तिपाशीं आकळून ।
स्वधर्मा आणोन पूर्ण । भावफरशें खंडन तर्कांचे ॥११४॥
सायुज्याचा मेढा संपूर्ण । अनुसंधानाचा तीश्ण बाण ।
निजसामर्ध्ये करोनि जाण । करीत कंदन अनंगाचें ॥११५॥
प्रमादें अधःपातासी । जाता कृपेच्या अंकुशासीं ।
ओढून आणी निजपदासी । छेदी दोषांसी खट्वांगें ॥११६॥
मनोहर दिगंबरशैली । अर्धांगी शैलबाळी ।
नंदिकेश्वर दृष्टीतळीं । मेढा वळी आसनस्थ ॥११७॥
चंडीशादि भृंगी बाण । सकळा मुख्य गजवदन ।
महाविध्नांचें निवारण । नामस्मरण केलिया ॥११८॥
श्रीशिवशंकर -हनुमंताची भेट :
ऐसे देखता हनुमंतासी । आल्हाद झाला निजमानसीं ।
गर्जोनिया जयजयकारासी । लोटांगणासी घातले ॥११९॥
शिवे जाणोनि निजव्रत । उठोनि आलिंगिला हनुमंत ।
होय साचार रामदूत । हद्गत सर्व कळले ते ॥१२०॥
माझा स्वामी रघुनाथ । तेणे पाठविला दूत ।
म्हणोनि आलिंगिला हनुमंत । प्रेमा अद्भुत श्रीरामी ॥१२१॥
हनुमान सहज श्रीरामभक्त । शंकरा सबाह्य रघुनाथ ।
दोघांही प्रेम अद्भुत । दोघेही मूर्च्छित पडियेले ॥१२२॥
हनुमान रुद्राचा अवतार । स्वये तोचि श्रीशंकर ।
उभयध्येय श्रीरामचंद्र । रूपे साचार अद्वय ॥१२३॥
आपआपणां खेव पडिले । आपुलेनि सुखे सुखावले ।
आपआपणा विसरले । बुडोनि गेले निजरूपीं ॥१२४॥
गूळ भेटे गोडीसीं । दीप आलिंगी प्रभेसीं ।
कनकाअंगीं कांती जैसी । भेटी तैसी दोघांसी ॥१२५॥
येरयेरा विसरले । गणसमुदाय तटस्थ ठेले ।
कोणी कोणासी न बोले । अवघे राहिले चित्ररूप ॥१२६॥
देखोनिया निजचिन्ह । गिळून समाधि उत्थान ।
शंकर नित्य सावधान । प्रभावेंकरून रामाच्या ॥१२७॥
श्रीशंकरांनी मारुतीचा सत्कार करून, येण्याचे कारण विचारले :
तेणे चेतविली चेतना । सावध केले वायुनंदना ।
करोनिया पूजाविधाना । विवंचना होय पूसता ॥१२८॥
कोठोनि येणे जाले स्वामी । कवण देश कवण भूमी ।
कवण तुमचा निजस्वामी । कवणे हेतू तुम्ही बीजे केले ॥१२९॥
तनु दिसताहे वानर । मुखीं रामनामोच्चार ।
तुम्ही वनचर तो परात्पर । केंवी उच्चार नामाचा ॥१३०॥
हनुमंताने श्रीरामकार्याचा पूर्ववृत्तांत निवेदन केला :
ऐकती श्रीशंकरवचन । हनुमान पाली लोटांगण ।
माथा वंदोनि आज्ञापन । यथामति जाण सांगत ॥१३१॥
जो सृष्टीपूर्वी सनातन । सृष्टिरूपें जो आपण ।
सुष्टीच्या अवसानी अनवच्छिन्न । उरे परिपूर्ण अद्वय ॥१३२॥
जो नामरूपातीत । पूर्णब्रह्म सदोदित ।
तोचि झाला मूर्तिमंत । निजभक्तकैवारा ॥१३३॥
पौलस्तीचा रावण । लंकापति दारुण ।
राक्षसी तनु उन्मत्त पूर्ण । बंदी सुरगण घातले ॥१३४॥
विरोध केला सकळांसी । उच्छेदिले गोब्राह्मणांसी ।
पीडों आदरिलें अवनीसी । शरण रामासीं ते आली ॥१३५॥
जो सच्चिदानंदघन । जो अरूप अपार निर्गुण ।
ज्यातें ध्याती योगिजन । त्याचे अभिधान श्रीराम ॥१३६॥
जो सच्चिदानंदघन दुर्गम । ज्यासी निजरूपीं आराम ।
ज्ञानरूप ज्ञानगम्य । त्याते श्रीराम बोलती ॥१३७॥
तो भक्तकामकल्पद्रुम । नियत करोनि वैकुंठधाम ।
नांदतसे आत्माराम । अविश्रम समेसहित ॥१३८॥
मिळोनिया सुरगण । त्यासी आले अनन्य शरण ।
सकळा अपराधी रावण । त्याचे निर्दळण करावया ॥१३९॥
अत्यंत भाकितां करुणा । कृपा उपजली रघुनंदना ।
आश्वासिलें सुरगणा । वध रावण मी करीन ॥१४०॥
तुम्ही सकळ सुरवर । रूपे व्हावे वानर ।
मूळमाया कलहसूत्र । जानकी सत्वर होईल ॥१४१॥
मी स्वये सूर्यवंशाप्रती । नामे श्रीराम दाशरथी ।
अवतरेन शीघगतीं । निमेषगतीं न लागता ॥१४२॥
रावण करील सीताहरण । तोचि अपराध ठेवोनि जाण ।
क्षणे निवटीन रावण । ऐकता वचन सर्व सुखमय ॥१४३॥
जो व्यक्ताव्यक्तातीता । पूर्णब्रह्म सदोदित ।
तो अवतरला रघुनाथ । सूर्यवंशात दाशरथी ॥१४४॥
पितृआज्ञेकरोनि जाण । दंडकारण्या वनप्रयाण ।
तेथे त्रिशिग खर दूषण । विंधोनि बाण निवटिले ॥१४५॥
मुक्त करोनि जनस्थान । श्रीरामे द्विजां दिधले दान ।
तेणे तळमळिला रावण । करोनि छळण सीता नेली ॥१४६॥
श्रीरामाचे दृष्टी पडता । तरी क्षणे निवटिता लंकानाथा ।
संन्यासिरूपें परोक्षता । चोरोनि सीता पै नेली ॥१४७॥
श्रीरामापासीं दुर्धर बाण । परंतु एकला न मारीच रावण ।
करावे सकळनिर्दळण । म्हणोनि प्राण राखिले ॥१४८॥
दर्भशिखेभेणें देखा । काक हिंडविला तिही लोका ।
तेथे मारिता दशमुखा । रघुकुळटिळका काय नवल ॥१४९॥
मारिलिया लंकानाथ । सकळ खंडेल वनवासव्रत ।
म्हणोनि राखिला हात । बहुत कार्यार्थ वनवासी ॥१५०॥
सीताशुद्धीचेनि मिषे जाण । सकळ उद्धरावें दंडकारण्य ।
म्हणोनि चालिला रघुनंदन । जगदुद्धरण करावया ॥१५१॥
जटायु उद्धरिला पक्षी । वनस्पति अनेकी ।
गुल्युलता सकळिकी । तृणपाषाण शेखी उद्धरिले ॥१५२॥
शरभंग आणि शबरी पहाहो । रामे उद्धरिला ऋषिसमुदावो ।
ब्रह्मराक्षसांचा क्रूर भावो । तेही रामरावो उद्धरी ॥१५३॥
सीतेचेनि स्पर्शें विराध । त्याचा श्रीरामे केला वध ।
ताटिका संकळमार्गरोध । करोनी वध उद्धरिली ॥१५४॥
पायी उद्धरिली शिळा । गुरूचा याग सिद्धी नेला ।
हनुमान सांगता भुलला । जाश्वनीळा देखूनी ॥१५५॥
जो राम तोचि शकर । तेणे हनुमत प्रेमा थोर ।
सांगता विसरला चरित्र । पूर्वापर नाठवेचि ॥१५६॥
स्वस्थ करोनिया चित्ता । सिंहावलोकनें रामकथा ।
सांगता उल्लास हनुमंता । होय सांगता मागुतेनि ॥१५७॥
तुझे चाप त्रिपुरारी । भार्गवे ठेविले जनकमंदिरी ।
जानकीच्या स्वयंवरी । पण निर्धारी हाचि राया ॥१५८॥
भार्गाव आज्ञेकरोनि पहाहो । स्वयंवर मांडी जनकरावो ।
मूळे पाठविलीं पहा वो । दिग्मंडळीचे रावभूपाळां ॥१५९॥
स्वयंवर मांडिलें कोडे । पणास चाप आणविलें पुढे ।
ज्याचेनि हातें यासी गुण चढे । जानकी रोकडे वरील त्यासी ॥१६०॥
विश्वामित्राची प्रीति थोरी । जनक त्यासी मूळ करी ।
तोही पातला झडकरी । समयासारी ठाकोनी ॥१६१॥
परिवारला ऋषिगणीं । शिष्यवर्गाची मांडणी ।
त्यांमाजी बंधु हे दोन्ही । राम आणि सौमित्र ॥१६२॥
तेथे पातला रावण । गर्वनिधी अतिदारुण ।
पुसोनि धनुष्याचा पण । स्वये आपण सज्जूं पाहे ॥१६३॥
आणविली नोवरी । गजस्कंधी सालंकारी ।
देखता विस्मयसुखकरी । रावण धरी अभिलाष ॥१६४॥
खेचर भूचर विखार । जानकीवरणीं तत्पर ।
रावण दुरात्मा दुराचार । विषयबुद्धीं पामर अभिलाषी ॥१६५॥
जानकीभांगींचा वहिला । शेंदुरचर्चित तीक्ष्ण भाला ।
रावणहृदयीं खोंचला । तेणे तो झाला विव्हळ ॥१६६॥
विश्वार्चित विश्वमाता । विषयबुद्धीं अभिलान्नितां ।
दुर्दशा आली लंकानाथा । भ्रम तत्वता चढिन्नला ६७ ॥
भ्रमाचे मदें जाण । चापी चढवूं जाय गुण ।
तेणे क्षोभला त्रिनयन । विपरीत चिन्ह पै झाले ॥१६८॥
माथा राहिला तळवटीं । तळ धरिला वरिले मुष्टी ।
कोपे क्षोभला धूर्जटी । गर्वे दृष्टी अंध झाली ॥१६९॥
अभिलाषितां विश्वमाता । विमुख झाली इंद्रियदेवता ।
धनुष्य बळे फिरवूं जाता । पडिले तत्वता उरावरी ॥१७०॥
चंद्री लागली नेत्री विसी । खरसी आली दशमुखांसी ।
प्राण रोधिला कंठदेशीं । दुःख कोणासी न सांगवे ॥१७१॥
कृपाळु जनक चक्रवर्ती । तेणे काढविलें शीघगतीं ।
उठवोनि लंकापती । उदक सिंपिती मुखावरी ॥१७२॥
दुर्दशा देखोनि लंकापती । राजे माथा तळी करिती ।
अभिलाषिता सीतासती । घात निश्चिती दिसतसे ॥१७३॥
रायांकडे पाहे नृपती । तंव ते माथा नुधविती ।
तेणे उद्वेगला भूपती । वीर निश्चिती दिसेना ॥१७४॥
निर्वीर हे उर्वीतळ । ऐसे बोलता भूपाळ ।
आवेशला घननीळ । स्फुरण प्रबळ चालिले ॥१७५॥
बाहु थरकती आवेशी । रोम उभारिले वेगेंसी ।
आला पुसोनि गुरूसी । होय धनुष्यासी उचलितां ॥१७६॥
आधींच शिवहस्तें पुनीत । वरी धरिता झाला रघुनाथ ।
तेणे होवोनि कृतार्थ । जीवन्मुक्त पै झाले ॥१७७॥
हाती धरोनि रघुनंदन । धनुष्या चढवितां गुण ।
स्वये मोडले कडकडोन । नादें त्रिभुवन गर्जिन्नले ॥१७८॥
संतोष झाला सकळा । कुढाविले भूपाळा ।
जनक स्वये संतोषला । जनकबाळा आनंदली ॥१७९॥
गज पेलोनि पुढारा । माळ घातली रघुवीरा ।
आनंद झाला सुरवरा । सुमनसंभारा वर्षती ॥१८०॥
जनकनंदिनी साधोन । विजयी झाला रघुनंदन ।
ते देखतांचि रावण । हदयीं बाण खोंचला ॥१८१॥
झाला अत्यंत लजायमाना । नुघडीच काळे वदना ।
अधोवदनें केले गमन । हृदयी बाण खोंचलें ॥१८२॥
ते देखोनि संतापला । रावणा संनिपात झाला ।
कामाभिलाषें भुलला । बरळों लागला सीते सीते ॥१८३॥
तिये देखोनि अहर्निशी । आधि लागली रावणासी ।
आले ऐकोनि पंचवटीसी । करी कपटासी साक्षेपे ॥१८४॥
निजमातुळा मारीचासीं । मृगवेष देवोनि त्यासी ।
सीता त्वचा मागे कंचुकीसीं । श्रीराम त्यासी मारू गेला ॥१८५॥
सौमित्र गेला श्रीरामापासीं । सीता एकली गुंफेसी ।
रावण येवोनि संन्यासवेषीं । बळे जानकीसीं घेवोनि गेला ॥१८६॥
जानकहिरणादि वृत्तांत । सांगीतला कबंधवधपर्यंत ।
पुढे वाळीचा केला निःपात । तोही वृत्तांत अवधारी ॥१८७॥
वाळी सुग्रीव बंधु वानर । राज्यलोभें दोघा वैर ।
सुग्रीवाची हरोनि दार । राज्यभ्रष्ट पै केला ॥१८८॥
स्त्रीराज्याचेनि दुःखे देखा । शरण आला रघुकुळटिळका ।
पावला देखोनि अति दुःखा । कृपापीयूखीं शिंपिलें ॥१८९॥
विलग मरण वाळीचे । विषम ताल कूर्मपृष्ठींचे ।
छेदिलिया मरण त्याचे । ऐसे वरदाचें महिमान ॥१९०॥
तितुके छेदोनि राघवें । वाळी निवटिला बाणलाघवें ।
सुग्रीव स्वदारेंशीं राज्यपावे । कृपावैभवें रामाच्या ॥१९१॥
तेणे झाला कृतोपकारा । ससैन्य सुग्रीव वीर ।
झालों श्रीरामाचे किंकर । हनुमान वीर नाम माझे ॥१९२॥
तेथोनि सीताशुद्धिविचार । युवराज वाळिकुमर ।
पाठविला अंगद वीर । सवे वानर देवोनी ॥१९३॥
वेगी शुद्धि आणिली तिही । मग चालिले लवलाही ।
समुद्रतीरा येवोनि पाही । उपाय कांही योजिला ॥१९४॥
काढोनियां अग्निबाण । सागर शोषावा संपूर्ण ।
चरणचालीं वानरगण । समुद्र लंघन करावया १९५ ॥
म्हणोनि क्षोभला श्रीरघुवीर । तंवशरण आला सागर ।
सेतुबंधनप्रकार । सविस्तर सांगितला ॥१९६॥
शिळीं बांधला सेत । ऐकता सुखावे रधुनाथा ।
वानरी आणोनि पर्वत । निमेषें सेतु बांधिला ॥१९७॥
पुढेंकरोनियां फळहार । उतरावया परपार ।
शिवपूजेलागी सादर । श्रीरघुवीर पै झाला ॥१९८॥
शिवलिंगदर्शन न झाल्यामुळे राम भोजनाविण खोळंबले आहेत :
मारुती: शोधिता उभय तीरांतें । स्थावर लिंग न दिसे तेथे ।
अवघी झालीं सचिंते । राम फळहारातें नेघे ॥१९९॥
शिवदर्शनालागीं जाण । श्रीराम करू पाहे गमन ।
तेणे गजबजिले वानरगण । वचनें प्राण जाऊ पाहो ॥२००॥
सुग्रीवादि सकळ वानरगण । शरणागत बिभीषण ।
घालोनिया लोटांगण । रघुनंदन प्रार्थिला ॥२०१॥
कोणेपरी लिंगप्राप्ती । होय ते सांगावी स्थिती ।
उपाय योजू तदर्थी । कृपामूर्ती श्रीरामा ॥२०२॥
श्रीरामांनीच मला तुमच्या भेटीसाठीं पाठवलें आहे मारुती :
तेणे कळवळोनि मानसी । सांगीतलें उपायासी ।
जावोनिया वाराणसीसी । विश्वेश्वरासी भेटाचे ॥२०३॥
होवोनियां वानरवेषी । भाग्य उद्भट आम्हांसी ।
श्रीरामसेवा आली फळासी । शिवचरणासी पावला ॥२०४॥
फळहारालागीं रघुनाथ । बैसला असे तिष्ठत ।
विचारोनियां कार्यार्थ । आज्ञा त्वरित मज द्यावी ॥२०५॥
म्हणोनि घाली लोटांगणा । शीघ्र करावी सूचना ।
विलंब करिता नये जाणा । रघुनंदन जाणा तिष्ठत ॥२०६॥
रामकथा श्रवणाने शिवपार्वती आनंदरूप झाले :
ऐकानि ते वचन । संतोषला त्रिनयन ।
आलिंगोनि वायुनंदन । प्रीती करोन पूजिला ॥२०७॥
नित्य करीत ज्याचे स्मरण । आला देखोनि त्याचा गण ।
आनद उथळला पूर्ण । उचलोन नाचत ॥२०८॥
विसरोनि देहभावासी । नाचतां देखोनि शंकरासी ।
हर्ष दाटला गणांसी । ते प्रीतीसी नाचती ॥२०९॥
प्रेम उथळले उमेसीं । तेही नाचो लागली कैसी ।
विसरोनि देहभावासी । उल्लासेंसी नाचत ॥२१०॥
गणांसी नाठवे गणपण । उमा विसरली उमापण ।
शिव भुलला शिवपण । रघुनंदन निजनामे ॥२११॥
अगाध स्थिती सदाशिवाची । अगाध प्रीति पार्वतीची ।
अगाध भक्ति हनुमंताची । कीर्ति रामाची वानितां ॥२१२॥
एका शरण जनार्दनासी । तिघे विसरले तीनपणासी ।
अद्वैतबोधें झाली पिसी । एकत्वेंसीं डुल्लत ॥२१३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
हनुमंतशंकरदर्शनं नाम चतुःसप्ततितमोऽध्यायः ॥७४॥
ओंव्या २१३ ॥ श्लोक ॥१॥ एवं ॥२१४॥
