(प्रकरण. १)
1565.
(प्रकरण. १)
ओम नमो सिध्दासी नमस्कार केला ।
ग्रंथारंभ झाला ज्याचे कृपे ॥१॥
त्याचिये कृपेचे अदभुत सामर्थ्य ।
दावी सिध्दपंथ चालावला ॥२॥
चालविला ग्रंथ ज्ञानदेवाभेटी ।
आले उठाउठी चांगदेव ॥३॥
चांगदेव जन्मविदयेचा आयास ।
आणि योगाळयास मूळकथा ॥४॥
कथा हे विचित्र करिता श्रवण ।
पुण्यपरायण होती श्रोते ॥५॥
नारायणडोहो पुण्यक्षेत्र ग्राम ।
वस्ती गृहस्थाश्रम मुधोपंत ॥६॥
ग्रामलेखनवृत्ति यजुर्वेदी ब्राम्हण ।
पंचमहायज्ञ कुळशीळ ॥७॥
धर्मपत्नी झाली गर्भाते धरिती ।
गर्भाधाम रीती संस्कारे ॥८॥
आणूनि कुळगुरु केले पुंसवन ।
आले मरुदगण उदरासी ॥९॥
होता नवमास प्रसूतीचा काळ ।
उपजला बाळ कुळदीप ॥१०॥
स्वरुपे सुंदर सभार लक्षणी ।
देखता लोचणी मनोहर ॥११॥
अनुलोभन केले सीमंतनयन ।
जातीकर्म विधान नामकरण ॥१२॥
बहुतचि चांगले चांगा म्हणउनी ।
जनिता जननी नाम ठेवी ॥१३॥
निष्क्रमण आणि अन्नप्राशन झाले ।
पुढे आरंभिले चौलोपनयन ॥१४॥
व्रतबंध दीक्षा अनुग्रह गायत्री ।
संध्या वेदमंत्री संपादिली ॥१५॥
प्रज्ञाशीळ बुध्दि गुरुमुखे ऐकता ।
संध्या संपादिले ॥१६॥
चारी वेद साही शास्त्रे अभ्यासिली ।
अर्थे विचारिली स्वानुभवे ॥१७॥
उपवेद आणि उपशास्त्रे घोकिली ।
पुराणे अवगमिली अष्टादश ॥१८॥
व्रते उदयापने कथानके वो वसे ।
अध्यात्मे इतिहासे निपुण जाला ॥१९॥
क्षुल्लकादिकमंत्र क्षुल्लकादिक विदया ।
आभ्यासिल्या सध्या चमत्कृता ॥२०॥
चौदा विदया आणि चौसष्टीही कळा ।
अध्ययनी आगळा दुजा नाही ॥२१॥
अतीथि ब्राम्हण येती दर्शनासी ।
वंदुनी चांगयासी करिती पूजा ॥२२॥
म्हणती विदयासिध्द अवतार जाहला ।
नेणो ब्रम्हा आला येणे वेषे ॥२३॥
सकळांसी हा पूज्य सकळांसी वंदय ।
सकळांसी हा अदय गुरु होय ॥२४॥
ऐसा स्तुतिवाद करिती ब्राम्हण ।
समर्पिती धन कनक वस्त्रे ॥२५॥
अमर्याद धन चांगया बहुमान ।
म्हणती कन्यादान दयावे यासी ॥२६॥
सत्पात्र जोडले निज भाग्ययोगेसी ।
करिती मुधोपंतासी विज्ञापना ॥२७॥
वरासी दक्षिणा देऊ शें होन ।
तव दुजा म्हणे व्दिगुण देईन मी ॥२८॥
एक म्हणती सहस्त्रमुद्रांचा संकल्प ।
करितो तरी अल्प् यथाशक्त्या ॥२९॥
महानाम्नी व्रत महाव्रत गोदान ।
जाहले उपनयन चतुर्दश ॥३०॥
तव वेदमूर्ती गुरु बैसवुनी पंगती ।
पूजन करुनि स्तविती चांगदेव ॥३१॥
या उपरी करा लग्नाचा विचार ।
हमणती लहान थोर आप्तवर्ग ॥३२॥
विनवित अती नम्र पुसती सकळांसी ।
उदईक प्रारंभासी ग्रळा कोण ॥३३॥
विनवीत अती नम्र पुसती सकळांसी ।
उदईक प्रारंभासी ग्रंथ कोण ॥३४॥
तव ते विस्मित होउनी बोलती ब्राम्हण ।
कुळासी मंडण जन्म तुझा ॥३५॥
आता नाही पहावया उरला ।
एक तो रहिला योग्याभ्यास ॥३६॥
तरी उपदेशा म्हणती चांगदेव ।
दयावा अनुभव त्याचा स्वामी ॥३७॥
तेवढीच विदया राहाते ते काय ।
पुरुष प्रश्ना नव्हे श्लाघ्यपण ॥३८॥
तव ते म्हणती आम्ही नेणो योगमार्ग ।
नाही तो प्रसंग विचारिला ॥३९॥
काय आम्हा चाड तया योगेवीण ।
करु संध्यास्नान जपादिपत ॥४०॥
युक्त आहारी जे का इंद्रियांचे जती ।
तेचि योग्य होती मार्गी ॥४१॥
मितले बोलणे मितले चालणे ।
मितले ज्यार घेणे अन्नरसा ॥४२॥
नैराश्य निर्लोभ लौकिकाविरहित ।
तेचि प्रवर्तत अभ्यासी या ॥४३॥
हठयोगे करिता प्राणनिरोधन ।
तो आव्हाटा भरोन विटंबी देहा ॥४४॥
मग हा ना तोसा ठावो नपवोनि साधक ।
पावती निष्टंक क्षीणता देहे ॥४५॥
काळासी वंचन करिता क्षोभे काळ ।
मग तो नेदी स्थळ विश्रांतीचे ॥४६॥
नाना विघ्ने लय विक्षेप कशाय ।
रसस्वादने अपाय रची त्यासी ॥४७॥
सिध्दीचा संभ्रम घालूनिया आड
करी त्याचा नाड स्वहिताचा ॥४८॥
ऐशिया संकटी बळिया तोचि पावे ।
इतरासी नागवे दुर्जय पवन ॥४९॥
तरी म्हणती सुज्ञा ऐकावे वचन ।
आहे ते कारण निस्पृहाचे ॥५०॥
जे अखंड एकांती शुचिष्मंत चित्ती ।
तेचि दृढावती योगासनी ॥५१॥
तरी ते योगी कोठे आहेती स्वामीया ।
सांगा जाईन पाया शरण त्यांच्या ॥५२॥
तव व्दिज हमणती योगी नाहीत स्वदेशी ।
असती वाराणसीमाजी विरुळे ॥५३॥
तरी म्हणती चांगदेव जाऊ महाक्षेत्रा ।
योग आणि यात्रा उभय कार्यी ॥५४॥
मग तीर्थरुपा आज्ञा मागोनि यात्रेसी ।
करिती मुहूर्तेसी स्वस्त्ययन ॥५५॥
क्षौरादिक विधी केले घृतस्नान ।
दक्षिणा भोजन देउनी व्दिजा ॥५६॥
गणपती पूजन पुण्याहवाचन ।
केले आवाहन पूर्वजांचे ॥५७॥
पूजियेली मातापिता उभयता ।
आप्तवर्गा गोता गौरविले ॥५८॥
समर्पिले तया पुरे ऐसे धन ।
होय पुनरागमन आपुले तो ॥५९॥
क्षेत्र प्रदक्षिणा पूजिंले ब्राम्हणा ।
वंदिले चरणा शिष्टांचिया ॥६०॥
निघाले बाहेरी मुहूते प्रस्थान ।
आले बहुत जन बोळवित ॥६१॥
ऐकोनि प्रांतवासी आखमदीन जने ।
विनविती स्तवने चांगयासी ॥६२॥
म्हणती आम्हा नाही घडली वाराणसी ।
आणि हेत तो मानसी बहूत काळ ॥६३॥
तरी चला समागमे क्षणती चांगदेव ।
होईल निर्वाहो सर्वाविशी ॥६४॥
मग अनाथे दुर्बळे निघाली बाहेरी ।
चालिली परिवारी लक्षावत ॥६५॥
खर्चा वेचा तया देती चांगदेव ।
आणि सांभाळिती सर्व मागे पुढे ॥६६॥
सुसंग जोडला म्हणती सकळ जन ।
नलगे घेणे ऋण संगे याच्या ॥६७॥
भागल्या श्रमल्या जाणे हा उपाय ।
रोगे येऊ नये याचे दृष्टी ॥६८॥
चालता मारगी सामोरे जन येती ।
ऐकोनि कीर्ति अलौकिक ॥६९॥
महाव्याधी हरी अंधळयासी डोळे ।
वांझा पुत्रफळे पंगुसी पाय ॥७०॥
जे जे रोगी येती तयांसी उपाय ।
करिती तया काय उणे मग ॥७१॥
प्रार्थनी करिती पूजा समर्पिती धने ।
तोषविती स्तवने नारीनर ॥७२॥
भरिल्या गाडया धने वस्त्रांच्या समृध्दी ।
जाती राजपदी मिरवत ॥७३॥
ऐसे आले वाराणसी एकोनि व्दिजवर ।
क्षेत्रवासी भार पाहो आले ॥७४॥
देखोनि योग्यता सकळिकी पूजिला ।
बहुमान जाहला महाक्षेत्री ॥७५॥
केला तीर्थविधी यथाशास्त्रन्याये ।
पूजिले समुदाये ब्रम्हवृंदा ॥७६॥
ग्रहप्रवृत्तिदाने मठभिक्षा दिधली ।
अष्ट तीर्था केली प्रदक्षिणा ॥७७॥ म
ग गंध अक्षता व्दिजा करुनी पूजन ।
आर्तीचे वचन अनुवादती ॥७८॥
म्हणेती कोणा आहे योगाची धारणा ।
ते म्हणती आपणा गम्य नाही ॥७९॥
वेदाध्ययनी आम्ही स्वधर्मी निरत ।
नेणो कैसी मात योगाची ते ॥८०॥
यज्ञाचार आम्हा षटकर्मांचा धंदा ।
नेणो उदावादा पवनाभ्यास ॥८१॥
महा विवरी एक आहे योगिराज ।
ऐकतसो सहज कर्णोकणी ॥८२॥
परी ते स्थळचि परम गुप्त अवघड भयंकर ।
करवे संचार कोणा तेथे ॥८३॥
तरी म्हणती चांगदेव जाऊ दर्शनासी ।
केले स्तंभनासी व्याघ्रसर्पा ॥८४॥
पंचाक्षरी विदया भारियेली भूते ।
केली शरणागते वेजाळादी ॥८५॥
तव प्रार्थिती व्दिजवर नवजावे आपण ।
काय त्या योगेविण खेळंबले ॥८६॥
सर्व विदया तुम्हा आहेती स्वाधीन ।
कोणेविशी न्युन पडिले सांगा ॥८७॥
तया म्हणती चांगदेव जी एवढीच उणीव ।
येते येर सर्व आलोटिले ॥८८॥
तरी म्हणती देवा ऐकावे वचन ।
जीवासी येतन तेथे जाता ॥८९॥
दरकुटी विशाळ आहे भयानक ।
जाता सकळ लोक मुकती प्राणा ॥९०॥
पिशाचे बहुवस असती विंचु सर्प ।
माजी गडदधुप अंधकार ॥९१॥
घरामाजी घरे व्दारामाजी व्दारे ।
विवरांत विवरे लक्षवरी ॥९२॥
गेलीया निर्गम नव्हेचि कोणासी ।
वर्जितो स्वामीसी याचिलागी ॥९३॥
समागमी सर्व येती काकूलती ।
अहो कृपामूर्ती चांगदेवा ॥९४॥
नवजावे आपण कदा विवरांत ।
सांगती आघात सर्व तेथे ॥९५॥
परी चांगदेवा साधणे हदगत ।
ते नाईकती मात कोणाचीही ॥९६॥
म्हणती आम्हा आहे खर्चावया धन ।
एक मास पाहेन जावे मार्ग ॥९७॥
करुनिया संचार शोधिले विवर ।
गेले योगेश्रवर जेथे होता ॥९८॥
लागोनिया चरणा वेदाक्षरी स्तविला
प्रसन्न तो केला तपोराशी ॥९९॥
तो म्हणे बाळका कैसा तू आलासी ।
संचार पवनासी नसता येथे ॥१००॥
येरु म्हणे स्वामी आपुल्रूा प्रसादे ।
आला आशिर्वादे चरणांपाशी ॥२॥
संसारे पीडिलां जहलो खेदक्षीण ।
म्हणोनि शरण आलो देवा ॥३॥
स्वामीच्य वचने कजन्मांतरे फेरे ।
चुकती आणि दुस्तरे हरती कर्मे ॥४॥
करोनिया कृपा म्हणावा जी आपुला ।
सेवक धाकुला नेणता मी ॥५॥
नुपेक्षावा कदा आला शरणागत ।
हे तो धर्मनीत स्वमी खरी ॥६॥
हदगत हे माझे पाववावे सिध्दी ।
अहो कृपानिधी गुरुराया ॥७॥
मज शरणागता करावा उपदेश ।
सांगा योगाभ्यास करीन मी ॥८॥
विचारिती गुरु आपुल्या मानसी ।
म्हणती अनुतापेसी शरण आला ॥९॥
अव्हेरिता यासी येईल दृशण ।
विरक्त हा पूर्ण् मुमुक्षू जाला ॥१०॥
अनुतापाचे लेणे लेऊनिया अंगी ।
जाहालासे विरागी देहगेहा ॥११॥
वये तो लहान दिसतो सगुण ।
अध्ययने संपन्न वेदवेत्ता ॥१२॥
सच्छिष्य विरळा जोडे भाग्ययोगे ।
महिमा ज्याच्या संगे गुरुत्वासी ॥१३॥
देउनी आलिंगन आश्रवसिला कृपा ।
म्हणती केला बापा अंगिकार ॥१४॥
यथा सांप्रदाये आज्ञा समावेश ।
दावियेल सौरस परंपरे ॥१५॥
बैसउनी सन्मुख घालविले आसन ।
कळा स्थान मान उपदेशिती ॥१६॥
कृपावंत गुरु म्हणती यमनियम ।
करी प्राणायाम प्रत्याहार ॥१७॥
ध्यान हे धारणा आसन हे मुद्रा ।
साधवी शिष्येंद्रा सिध्दीलागी ॥१८॥
रेचक पूरक कुंभक त्राहाटक ।
पवनाभ्यास ऐक स्थिरबुध्दि ॥१९॥
सगर्भ अगर्भ दिविले प्रकार ।
करी पवन स्थिर मनेजये ॥२०॥
देह शीतल पडता करी अग्निधारण ।
सोमधारण उष्णे पडिता देह ॥२१॥
प्राणनिरोधन सोहंमंत्रे जाण ॥
करी प्राणापान ऐक्य दोघा ॥२२॥
षटचक्रांचे भेद दाविले विषद ।
मुक्त ब्रम्हरंघ्र जेणे ॥२३॥
काकीमुख अग्निचक्र औटपी॥ गोल्हाट ।
सहस्ऋदळ श्रीहट पावावया ॥२४॥
नाद बिंदू कळा ज्योतीचा अनुभव ।
जेणे साधे सर्व ते ते आंगे ॥२५॥
जालंधर भेद आंताळी अभ्याळी ।
भ्रमरगुंफा कंकाळी पावे जेणे ॥२६॥
ऐकता सादर मुद्रा ठसावली ।
समाधि लागली चांगयासी ॥२७॥
सद्गुरुच्या वचने ऐके ज्या ज्या खुणा ।
पावे त्या त्या स्थाना तेचि क्षणी ॥२८॥
परी ते सविकल्प समाधी काष्ठा म्हणती तीसी ।
नावडे संतांसी मूर्च्छा म्हणोनी ॥२९॥
वासनेचा क्षय नव्हे ऐशा रीती ।
न चुके पुनरावृत्ति जडत्व ते ॥३०॥
देखोनि त्याची प्राप्ति विस्मय करिती गुरु ।
म्हणती हा चमत्कारु थोर झाला ॥३१॥
एकाचि क्षणे कैसा झाला या अनुभव ।
प्रज्ञा अभिनव बाळकाची ॥३२॥
बहुत दिवस मीही करितो अभ्यास ।
परी न लभेचि सौरस याच्या ऐसा ॥३३॥
नवल हे देखिले एकाचि उपदेशे ।
भेदियेली निमिषे चौदा चक्रे ॥३४॥
भ्रमरगुंफेमाजी केला रहिवास ।
गिळोनि नि:शेष दशहि प्राण ॥३५॥
ऐशी सप्त वरुषे समाधि भोगिली ।
सत्रावी शोषिली अमृतकळा ॥३६॥
जिंकोनिया काळ घातला तोडरी ।
उभविली गुढी विजयाची ॥३७॥
झाली योगसिध्दि मांडिले व्युत्थान ।
केले उन्मज्जन इंद्रियांचे ॥३८॥
देखोनि गुरुदेव आलिंगन देती ।
आणि अनुभव मागती समाधीचा ॥३९॥
वचने तयासी अवस्था लाविली ।
कसोटी दाविली सिध्दाईची ॥४०॥
घेऊनि अनुभव निघाले बाहेरी ।
ते आले घाटावरी मनकर्णिके ॥४१॥
तव त्या देखियेले तीरींच्या ब्राम्हणी ।
ते लागले चरणी्र धवोनिया ॥४२॥
म्हणती समागमी बहू झाले चुकूर ।
नव्हता सत्वर तुमचे येणे ॥४३॥
क्षेत्रवासी ब्राम्हणी करुनिया खेद ।
म्हणती प्रमाद थोर झाला ॥४४॥
गेले ते सांगती तुमचे ग्रामासी ।
न येता तुम्ही रुदन करित ॥४५॥
नेले क्षेत्रामाजी वादयांच्या गंजरी ।
घोष जयजयकारी करुनि हर्षे ॥४६॥
बाणली असुमाई आंगी योगकळा ।
गुरुत्वे आगळा भसे लोका ॥४७॥
उपरम झाला सकळ इंद्रिया ।
स्वरुपी विलया मन गेले ॥४८॥
ऐसिया स्वानंदे बुझाविवले चित्त ।
राहिली अवचित वदनी वाचा ॥४९॥
अष्टही आविर्भाव उरले आंगी ।
प्राणी प्राणरंगी निजवासे ॥५०॥
वेदत्रयी ठसा पडिला शरीरा ।
वृत्ती गेली घरा निजाचिया ॥५१॥
निमोनिया गेले शब्दाचे बोलणे ।
पवनुची प्राणे शोषियेला ॥५२॥
ऐसा सुखासुखी पावला विश्रांती ।
पदपिंडा समाप्ती करुनिया ॥५३॥
देशोदेशी वार्ता विस्तारली ऐसी ॥
ते येती दर्शनासी सिध्दाचिया ॥५५॥
राजे भेटी येती अनुग्रहीत होती ।
आशीर्वाद इच्छिती लहानथोर ॥५६॥
जया जे जे पाहिजे ते ते विदया देती ।
म्हणोनी शरण येती प्राणीमात्र ॥५७॥
नाना उपासना शिकती बीजे न्यास ।
मंत्रादि यंत्रांस करिती साध्य ॥५८॥
वेदांची अध्ययने शास्त्रांची परिज्ञाने ।
शिकती रसायने चिकित्सा नाडी ॥५९॥
ज्योतिष आयुर्वेद निघंट घेकिती ।
कोश विचारित पंचाक्षरा ॥६०॥
जारणमारणादि सप्तही प्रयोग ।
एक ते आगम योग करिती साध्य ॥६१॥
गारुडाचे दंश नृत्य संगीतास ।
घेती बहुत शिष्य विदया ॥६२॥
असो आता ऐसे शिष्य लक्षवत ।
झाले शरणागत करिती सेवा ॥६३॥
यावरी व्दितीय प्रकरणींची कथा ।
परिसावी ते श्रोता देउनी चित्त ॥६४॥
निळा म्हणे पुढे ज्ञानेश्वर आख्यान ।
अदभुत महिमान सिध्दाईचे ॥६५॥
॥ इति श्रीचांगदेवचरित्रे जन्मकर्म विदयायोगाभ्यासकथनं नाम प्रथम प्रकरणं समाप्तम ॥
