व्योमाचा पाऊल शिरेंव
815.
व्योमाचा पाऊल शिरेंवीण पांगुरले ।
मस्तकेंवीण तुरंबिले सुमन वो ॥१॥
सुखाचे सुख निजसुख नव्हे ।
नव्हे ते होय म्या गिळिले गे माये ॥२॥
नेणोनी शहाणे झाले चौघेजण ।
अठरांसी खुण बाणली माये ॥३॥
रखुमादेविवरु जीवनींजीवनु ।
त्याहुन माझे मनु परते देवा ॥४॥
अर्थ :
आपल्याला ब्रह्मानुभव आला तो प्रकार असा झाला की डोक्यावांचून आकाशाचा पदर पांघरला. घ्राणावांचून फुलांचा वास घेतला. ज्या सुखाच्या ठिकाणी सुख म्हणणेपणाही नाही. असे सुख मी गिळून टाकले. त्या परमात्म तत्त्वाला चारी वेदांनी विषय करून न जाणता वेद शहाणे झाले याची खुण अठरा पुराणांना उत्तम समजली आहे. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल सर्व जीवांचे जीवन असलेला तो सोपाधिक असल्यामुळे त्याचे जे निरूपाधिक स्वरूप त्याठिकाणी माझे मन स्थिर झाले. असे माऊली सांगतात.
