कांही न करीजे ते तुझ
816.
कांही न करीजे ते तुझी सेवा ।
कांही न होसी ते तू देवा ॥१॥
नेणिजे ते तुझे रूप ।
जाणीजे तितुके पाप गा देवा ॥२॥
स्तुति करणे ते तुझी निंदा ।
स्तुति जोगा नव्हेसी गोविंदा ॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला ।
एवढा साभिलाषु का दाविला ॥४॥
अर्थ :
कांही एक न करणे हीच तुझी सेवा कारण कर्तृत्वभाव पत्करणे हाच जीवपणा होय. तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी द्वैताचा अत्यंतीक भाव असल्यामुळे दुसरेपणाचा संबंधच जेथे नाही. तेथे सेव्यसेवकभावाने द्वैत पत्करून कर्तव्यबुद्धीने सेवा केली. तर ती तुम्हाला आवडेल कशी ? ज्याला जे आवडेल ते करणे हीच त्याची सेवा तुम्हाला द्वैतभाव नाही. तो द्वैैतभाव पत्करून केली जाणारी सेवा ती सेवाच नव्हे. अद्वैतभाव स्विकारून कर्तव्यशून्य होणे हीच तुमची खरी सेवा. कारण कोणत्याही अनात्मधर्माने युक्त न होता सच्चिदानंदरूपाने असणारा तोच तू देव आहेस. ज्ञानाने जाणता येत नाही. तेच तुझे खरे स्वरूप आहे. असे असता द्वैत भाव पत्करून जेवढे जाणणे तेवढे सर्व पाप आहे. म्हणूनच शब्दाच्या सहाय्याने तुझी स्तुति करणे ही खरोखर निंदा आहे. कारण शब्दाला विषय होणारा असा तू नाहीस. अशी वास्तविक स्थिति असता माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला ही येवढे सेव्यसेवकभावाचा अभिलाषा का धरलीस हे काही समजत नाही असे माऊली सांगतात.
