(वारकरी परत आल्या नं
3600.
(वारकरी परत आल्या नंतरचे अभंग)
आजिचिया लाभे ब्रह्मांड ठेंगणे । सुखी झाले मन कल्पवेना ॥१॥
आर्तभूत माझा जीव जयांसाठी । त्याच्या झाल्या भेटी पायासवे ॥धृपद॥
वाटुली पाहाता सिणले नयन । बहु होते मन आर्तभूत ॥२॥
माझ्या निरोपाचे आणिले उत्तर । होईल समाचार सांगती तो ॥३॥
तुका म्हणे भेटी निवारला ताप । फळले संकल्प संत आले ॥४॥
अर्थ :
आज जे मला लाभ झाला आहे त्या लाभापुढे ब्रम्हांड देखील ठेंगणे झाले आहे. माझ्या मनाला जे आज सुख झाले आहे त्या सुखाची कल्पनाही मला होत नाही. माझा जीव ज्या वारकऱ्यांसाठी उतावीळ झाला होता त्या वारकऱ्यांच्या पायाशी आज माझ्या भेटी झाल्या. त्यांची वाट पाहून माझे डोळे थकले होते माझे मन अतिशय उतावीळ झाले होते. मी त्यांच्याकडे माझ्या निरोपाचे पत्र माझ्या मायबापाकडे म्हणजे पाडूरंगाकडे पाठविले होते त्याचेच उत्तर ते घेऊन आले आहेत आणि त्याविषयी सर्व समाचार ते मला आता सांगतील. तुकाराम महाराज म्हणतात, संत आले व त्यांच्या भेटीने माझ्या त्रिविधतापाचे शमन झाले आणि मी केलेला संकल्प फळाला आला.
