(बाळक्रीडा अभंग)
3847.
(बाळक्रीडा अभंग)
तीर देखोनिया यमुनेचे जळ । कांठींच कोल्हाळ करिताती ॥१॥
कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासि ओढी भय मागे ॥२॥
मागे सरे माय पाउला पाउली । आपलेच घाली धाके अंग ॥३॥
अंग राखोनिया माय खेद करी । अंतरीचे हरी जाणवले ॥४॥
जाणवले मग देवे दिली बुडी । तुका म्हणे कुडी भावना हे ॥५॥
अर्थ :
कृष्ण यमुनेच्या डोहात बुडाला त्यावेळी कृष्णाला वाचवण्यासाठी कोणीही यमुनेच्या डोहात उडी मारली नाही. केवळ यमुनेच्या तीरावर उभे राहूनच सर्वजण आरडाओरडा, कोल्हाळ करु लागले. कोणीही कृष्णाला वाचवण्यासाठी यमुनेच्या डोहात उडी मारायला धैर्य करत नव्हते. भीतीपोटी स्वत: आपोआप पाय मागे ओढत होते. कृष्णासाठी रडणारी यशोदा माता देखील पावलापावलाने मागे सरकू लागली भीतीपोटी तर तिने अंगच खाली जमिनीवर टाकून दिले. स्वत:ची माय देखील स्वत:चे अंग राखून खेद करत आहे हे हरीला अंत:करणातून जाणवले. तुकाराम महाराज म्हणतात, देवाने सर्वांचे अंत:करण जाणले होते म्हणूनच यमुनेच्या डोहात उडी टाकली होती.
