का जी कृपावंत झालेति
1119.
का जी कृपावंत झालेति निष्ठूर ।
नाईका उत्तर करुणेचे ॥१॥
काय अजामेळा होती पुण्यरासी ।
नेला वैकुंठासी नामोच्चारे ॥२॥
गणिका ते वेश्या काय आचरली ।
राम म्हणता नेली निजधामा ॥३॥
जराव्याधे पायी विधीयला बाण ।
तो तुम्ही आपण तारियेला ॥४॥
निषाद तो कोळी श्रीरामासन्मुख ।
येता दिले सुख निवविला ॥५॥
पूतना ते पाजी विष स्तनपानी ।
ते सायोज्यसदनी बैसविली ॥६॥
गजेंद्र तो काय तप आचरला ।
धावा म्हणता नेला सोडवुनी ॥७॥
वैरियाचा बंधु केला लंकापती ।
चिरंजीव पध्दती बैसउनी ॥८॥
निळा म्हणे माझा नाही पुरविला ।
हेतचि राहिल दर्शनाचा ॥९॥
