॥ श्रीएकनाथमहाराजकृत
17.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय सतरावा ॥
हनुमंताचे रावणसभेत आगमन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
इंद्रजिताची दैन्यावस्था, ब्रह्मदेवाचे स्मरण
रणी पाठी देवोनि वानरा । लपाला असता विवरा ।
परम लज्जा राजकुमरा । काय महावीरां मुख दावूं ॥१॥
माझी वीरवृत्ति अति लाठी । इंद्रजितनामाची ख्याती मोठी ।
वानरे नेली पुच्छासाठीं । रणसंकटीं गांजोनी ॥२॥
कपिपुच्छाचा दुर्धर मार । रणी गांजिला राजकुमर ।
सैन्या जाला समूळ मार । काय करू मी आता ॥३॥
कैसेनि भेटो महावीरां । केंवी मुख दावू राक्षसेंद्रा ।
आता न वचे लंकापुरा । लाजेचें वीरा अति दुःख ॥४॥
वाहिली सदाशिवाची आण । शिवलों रावणाचे चरण ।
प्रमाणे जालीं अप्रमाण । वानरे पूर्ण गांजिलें ॥५॥
मज रणी येते मरण । तरी पावतो कृतकल्याण ।
अवकळा वांचले प्राण । वरदान जळो माझे ॥६॥
अवकळेचें जे जिणें । त्याहूनि श्रेष्ठ रणी मरणें ।
जळोत माझी वरदवचनें । वरदाने नागविले ॥७॥
पोटी घालावयापुरतें । शस्त्र नुरेचि माझे हातें ।
जे जीव द्यावा येथे । वरदान माते मरों नेदी ॥८॥
रणी गांजिलें माकडें । कांही उपाय न चले पुढे ।
इंद्रजित खळखळां रडे । अति सांकडें ओढवले ॥९॥
मुख दावूं नये लाजेहातीं । मरण नये वरदोक्तीं ।
इंद्रजित पडला अति आकांतीं । तंव ब्रह्मोक्ती आठवली ॥१०॥
गळा बांधोनि मारूती । इंद्रजित आणील लंकेप्रती ।
ऐसे बोलिला प्रजापती । त्यासी निश्चिती पाचारूं ॥११॥
मिथ्या नव्हे ब्रह्मवाणी । तरी का मी भंगलो रणी ।
हनुमान न बांधवे बंधनीं । सत्यवचनी केंवी ब्रह्मा ॥१२॥
पाचारावया चतुरानन । धाडावया नाही सेवकजन ।
बाहेर निघतां आपण । रोकडें मरण कपिपुच्छे ॥१३॥
मज बाहेरी निघतां । पुच्छ करील माझे घाता ।
हनुमंत लागला मजभोंवता । नेदी विधाता मज भेटो ॥१४॥
माझ्या पित्याचे पित्याचा पिता । कैसेनि भेटे मज विधाता ।
ऐसी इंद्रजित करिता चिंता । आला अवचिता परमेष्ठी ॥१५॥
ब्रह्मदेवाचे आगमन, इंद्रजिताची दुर्बलता :
ब्रह्मा देखोनि अवचिता । हर्ष इंद्रजिताच्या चित्ता ।
चरण वंदोनियां माथा । होय सांगता उल्लासे ॥१६॥
स्वामी बोलिलेति वचनोक्ती । गळा बांधोनि मारुती ।
तू आणिसील लंकेप्रती । मज उपहति का जाली ॥१७॥
तो राक्षसराजसुत । स्त्रष्ट्याप्रति असे पुसत ।
कैसेनि बांधवे हनुमंत । त्यासी निग्रहार्थ मज सांगे ॥१८॥
हनुमान हरिहरा अवध्य । तया माझे न करवे बंध ।
कपीसी न चले माझा क्रोध । वाक्य अबद्ध बंधनीं ॥१९॥
इंद्रजिताचे निजहस्तीं । बंधन पावोनि मारूती ।
आणिजेल लंकेप्रती । ते वचनोक्ती सत्य करा ॥२०॥
असत्य न व्हावे ब्रह्मवचन । कपीस ब्रह्मापाशबंधन ।
नारदे सांगितले आपण । ते आठवण मज जाली ॥२१॥
स्वामीनें कृपा करून । द्यावे ब्रह्मपाशबंधन ।
तेणे मी हनुमंता बांधोन । मग श्लाघ्यता वाढिवी ॥२२॥
यासी ब्रह्मपाश नेदिता । मिथ्या मानी ब्रह्मवाक्यता ।
दिधल्या न बांधवे हनुमंता । प्रत्ययार्था दिधले ॥२३॥
इंद्रजित ब्रह्मपाश घेऊनी । मोकली मारूती लक्षोनी ।
कपि न लिंपे पाशबंधनी । निर्बंधनी ब्रह्मपाशा ॥२४॥
इंद्र यम वायु वरूण । यांचे हनुमंता वरदान ।
शशी सूर्य वन्हि ईशान । यांचें वरदान हनुमंता ॥२५॥
हरिहरांचें वरदान । ब्रह्मयाचें ब्रह्मवरदान ।
कपीस ब्रह्मपाश-बंधन । न बांधी जाण वरदाने ॥२६॥
कर्मपाश धर्मपाश । ब्रह्मयाचें ब्रह्मपाश ।
बांधूं न शके जन्मपाश । नित्य निर्दोष हनुमंत ॥२७॥
हनुमांन सबाह्य निराश । निरपेक्षाचे हरिहर दास ।
त्यासी कैसेनि बांधिती पाश । नित्यनिराश हनुमंत ॥२८॥
पाश न लागती हनुमंता । इंद्रजितासी परम चिंता ।
ब्रह्मपाश गेले वृथा । तेचि श्लोकार्था अनुवादे ॥२९॥
इंद्रजित ब्रह्मपाश घालिता । ते न लागती हनुमंता ।
वानरे महाकर्म केले वृथा । जघन्यता मज आली ॥३०॥
जेथे न चले माझी मंत्रशक्ती । न चले ब्रह्मपाश ब्रह्मशक्ती ।
तेथे राक्षसमंत्रियुक्ती । कैसेनि रीती सरेल ॥३१॥
माझी अस्त्रशस्त्रशक्ती । ब्रह्मपाश ब्रह्मशक्ती ।
अवघी वृथा केली मारूतीं । राक्षसयुक्ती अति मिथ्यां ॥३२॥
ज्यासी बांधीना ब्रह्मपाशशस्त्र । त्यावरी न चले आणिकाचे अस्त्र ।
वानर सर्वार्थीं दुर्धर । यासी कपींद्र नाटोपे ॥३३॥
ब्रह्मयाने दिधली खोटी शक्ती । म्हणोनि न बांधवे मारूती ।
इंद्रजित कोपला प्रजापती । दुष्टमति आम्हांवरी ॥३४॥
तू आमुचा मूळपुरूष । तुवांचि मांडिला आमुचा द्वेष ।
रणी मारावे राक्षस । देशी उपदेश वानरा ॥३५॥
ब्रह्मदेवावर दोषारोप करताच ब्रह्मदेवाने सांगितले की राक्षसांच्या
कपटवृत्तीमुळे माझा पाश प्रभावी रीतीने मारूतीला पकडू शकत नाही :
ब्रह्मा म्हणे तू विकल्पमूर्ती । ब्रह्मद्वेष तुझ्या चित्ती ।
तुज नातळे ब्रह्मशक्तीं । रणी मारूती केंवी बांधवे ॥३६॥
निष्कपट निर्मळवृत्ती । शम दम नित्य शांती ।
त्याचेनि हातें ब्रह्मशक्ती । विजयाप्राप्ती स्वानंदे ॥३७॥
माझी शक्ती दे मजप्रती । बांधोन देईन मी मारूती ।
तुमच्या न चलती युक्ती । तुम्हा मारूती न बांधवे ॥३८॥
मापेंवीण करांच्या राशी । न मोजवती आणिकांसी ।
राक्षसी पीडावे भूतांसी । हनुमंतासी न बांधवे ॥३९॥
डोळा देखे सर्वरूपासी । देखो न शके आपणासी ।
जीवपीडा राक्षसांपासीं । हनुमंतासी न बांधवे ॥४०॥
पाशशक्ति घेवोनि हाती । सन्मुख येवोनि प्रजापती ।
स्वये बोले हनुमंताप्रती । तेही उपपत्ती अवधारा ॥४१॥
पाशात अडकण्याविषयी ब्रह्मदेवाची मारूतीला विनंती :
ब्रह्मा म्हणे हनुमंतासी । तुज न बांधवे ब्रह्मपाशीं ।
माझे वचन सत्यत्वासी । मानी आपणांसी पाशबंध ॥४२॥
असत्यवाद माझे माथा । येवो नेदीं हनुमंता ।
ब्रह्मवाक्यें बंधनता । पाशबंधनता मानावी ॥४३॥
ब्राह्मणाचें ब्रह्मवचन । नुल्लंघिसी अणुप्रमाण ।
माझे पाळोनियां वचन । पाशबंधन मानावे ॥४४॥
साधना ब्रह्मयाचे वचन । हनुमंत घाली लोटांगण ।
तुझेनि बोले देह त्यागीन । पाशबंधन ते किती ॥४५॥
ऐसे बोलोनि हनुमंत । ब्रह्मापाशीं पडे मूर्च्छित ।
धरणीवरी निचेष्टित । धकधकित जेंवी भ्याडा ॥४६॥
विनंती मान्य करून हनुमंताने बांधून घेतले :
ब्रह्मपाशी हनुमंत । पडला दिसे निचेष्टित ।
परी तो बंधमोक्षातीत । नित्यनिर्मुक्त रामभक्त ॥४७॥
ब्रह्मपाशीं हनुमंत । निश्चयेंसी नित्य निर्मुक्त ।
ब्रह्माज्ञे बद्धत्व दावित । प्राकृत मानित बांधला ॥४८॥
जेंवी रवि थिल्लरांत । लोक मानिती थिल्लरस्थ ।
तेंवी कपि ब्रह्मपाशांत । बांधला दिसत परी मुक्त ॥४९॥
विजयी वीर इंद्रजित । ब्रह्मपाशीं बांधला हनुमंत ।
ऐशा गोष्टी लंकेआंत । सांगती मात घरोघरी ॥५०॥
ब्रह्मपाशें बांधला हनुमंत । परी तो ब्रह्मबंधातीत ।
देखोनि इंद्रजित विस्मित । तेंचि बोलेन श्लोकार्थीं ॥५१॥
पाशबद्ध झालेल्या मारुतीशी राक्षसांच्या चेष्टा व त्याची ओढाताण :
क्षितितळीं निश्चेष्टिंत । पडिला देखोनि हनुमंत ।
राक्षस धाम्वोनि समस्त । त्यासी बांधित वेलवाखीं ॥५२॥
एक तृणवेंठी वळिती । एक वृक्षासाली काढिती ।
एक द्रुम चिरफाळिती । रणी मारूती बांधावया ॥५३॥
एक आणिती चर्हाटें । एक वळिती सलंब फांटे ।
देखोनि हासिजे मर्कटे । बंधन खोटे मज न लागे ॥५४॥
राक्षसें बापुडीं वेडीं । व्यर्थ करिती ओढाओढी ।
फोडीन लंकेच्या उतरंडी । पाडीन दरडी दुर्गाच्या ॥५५॥
रावणा देखोनिया दृष्टी । यांचा घावो साहोनि पृष्ठीं ।
तो घावो नेवोनि तृणासाठीं । लंका उठाउठी जाळूं आजी ॥५६॥
ऐसा आवांका धरोनि पोटी । द्रुमचीरबंधन मानूनि कंठी ।
घ्यावया रावणाची भेटी । जातो जगजेठी हनुमंत ॥५७॥
जाता हनुमंता प्रती । भेणे पळाली ब्रह्मपाशीं ।
ब्रह्मपाशी मुक्त मारूती । चिंतावर्ती इंद्रजित ॥५८॥
जो बांधवेना ब्रह्मपाशीं । तो केंवी बांधवे द्रुमपाशीं ।
बंधनमिसें जातो लंकेसी । रावणासी गांजावया ॥५९॥
बंधन नाही हनुमंता । मिथ्या मानोनि बंधनता ।
स्वये लंकेसी जातो आता । लंकानाथा गांजावया ॥६०॥
आम्हांसी गांजिल अशोकवनी । रावणा गांजील लंकाभुवनीं ।
परमचिंता इंद्रजिताचे मनी । अपेश जनीं मज आले ॥६१॥
इंद्रजिते हनुमंत । बांधोनि आणिला लंकेआंत ।
हेंची लोकी विरूढली मात । करील अनर्थ ते नकळे ॥६२॥
अशा रीतीने मारूतीचा लंकेत प्रवेश :
ब्रह्मयाने सांगितले कानी । ते हनुमंते धरोनि मनी ।
प्रवेशला लंकाभुवनीं । इंद्रजिताचे मनी चळकांप ॥६३॥
इंद्रजित म्हणे राक्षसांसी । हनुमान बांधा ब्रह्मपाशी ।
ब्रह्मपाशें बंधन नाही त्यासी । तो तुम्हांसी न धरवे ॥६४॥
राक्षस म्हणती वानर किती । सांपडलें आमुच्या हाती ।
आम्ही याची करू शांती । तू का चित्ती भितोसी ॥६५॥
मत्तमातंग महाबळी । वृथा बांधिजे कमळमृणालीं ।
तेंवी हनुमंत महाबळी । बांधिजे सकळीं वृक्षशाखा ॥६६॥
एक बांधितीं रज्जुबंधनी । एक बांधिती वाक वळूनी ।
एक बांधिती मुंज चिरूनी । कपि धरोनि आणिला ॥६७॥
एक ओढिती पूर्वेसी । एक ओढिती पश्चिमेसी ।
एक ओढिती उत्तरेसी । दक्षिणेसी एक पै ॥६८॥
एक रागे हाणिती बुक्की । जो हाणी तो होय दुःखी ।
मणगटें मोडोनि तवकी । महाशंख वामहस्ते ॥६९॥
एक आक्रोशे हाणिती मुसळ । मुसळ पिष्ट होय तत्काळ ।
हाणी त्याचा हात उखळे । पडे तत्काळ मूर्च्छित ॥७०॥
एक धांवोनि टोला हाणित । घाये रूधिर स्त्रवे हात ।
हनुमान गदगदा हांसत । व्यर्थ पुरूषार्थ राक्षसांचा ॥७१॥
ओढाओढी हनुमंतासी । राक्षस करिती कासाविसी ।
कपि कुंथत लौकिसेंसीं । निजमानसीं उल्लास ॥७२॥
धरोनि नेला रावणाप्रती । मी गांजीन लंकापती ।
राक्षस माझा घात करिती । वानरचित्तीम नाही शंका ॥७३॥
राक्षस अट्टहासे गर्जती । अखयाचा हा जीवघाती ।
सांपडला आमुच्या हाती । प्राणाहुती करू याची ॥७४॥
हनुमान पुढे नेइजेत । धरोनि इंद्रजिताचा हात ।
ब्रह्मा त्यामागें पै जात । मंत्र जपत तो ऐका ॥७५॥
गृहा वै प्रतिष्ठासूक्त । ब्रह्मा स्वानंदे जपत ।
रामराज्य लंकेआंत । हनुमंत प्रवेशे ॥७६॥
वेगे आणिला रावणापासी । कोप आला दशमुखासी ।
रागे सांगे राक्षसांसी । भक्षा यासी सगळाचि ॥७७॥
रावण दांत खाय करकरा । मज देखता शस्त्रधारा ।
वानरा तिळप्राय करा । निशाचरा प्रेरिलें ॥७८॥
कोट्यनुकोटि पार्षद । धांविन्नले गदायोध ।
घाव हाणिती सुबुद्ध । करावया छेद कपीचा ॥७९॥
बाण सुटती सणसण । शस्त्रे वाजती खणखण ।
घाय हाणिती दणदण । कपीचा प्राण घ्यावया ॥८०॥
एक खोचिती सबळ शूळे । एक हाणिती सबळ मुसळें ।
एक हाणिती काती त्रिशूळें । गदामुद्गळें पै एक ॥८१॥
आलगाईत कोइतेकार । अढाउ चव्हाण चेंडूचक्र ।
फरश पशिट्टश तोमर । हाणिती वानरा जमदाढा ॥८२॥
वानरासी सवतोडी । हाणिती भाले ओढण खांडीं ।
एक हाणिती लहुडी । प्रचंड धोंडी पै एक ॥८३॥
जीवे मरावया वानर । मिळोनि अवघे निशाचर ।
वर्षती शस्त्रांचे संभार । अति निष्ठुर निर्घातें ॥८४॥
ऐशिया शस्त्रघातीं हाणित । शस्त्रे मोडली समस्त ।
एकाचे उखळले हात । वीरी दांत समसगट ॥८५॥
एकएकें समस्त । वीर पडियेले मूर्च्छित ।
हनुमंतासी न लागे घात । लंकानाथ क्षोभला ॥८६॥
हनुमंताचे अभ्यंतरीं । श्रीराम नांदे सबाह्यान्तरीं ।
शस्त्रे न रूपती तिळभरी । वीर महामारीं मूर्च्छित ॥८९॥
रावणाचा खड्गप्रहार मारूतीने निष्फळ केला :
नव्हेचि हनुमंताचा घात । सारथी वीर समस्त ।
पडिले देखोनि मूर्च्छित । कोपे कृतांत रावण ॥९०॥
क्षोभोनिया लंकानाथ । चंद्रसेन खड्गा घाली हात ।
कोपे हाणिता हनुमंत । कपि हांसत गदगदा ॥९१॥
मारूतीचे हास्य व रावणाचा त्याला प्रश्न :
घावो हाणिता प्रचंड । त्याने दणाणिलें ब्रह्मांड ।
सरलें रावणाचे बळबंड । खालतें तोंड तेणे केले ॥९२॥
रावण म्हणे गा हनुमंता । तू हांसलासि कवणे अर्था ।
कपि म्हणे लंकानाथा । ऐक आता सांगेन ॥९३॥
रावणाला उत्तर :
राक्षसस्वामी तू लंकानाथा । तुझिया बळाचा मज भ्रम होता ।
घावो हाणोनि त्वा आता । केला वृथा पुरूषार्थ ॥९४॥
राक्षसघायाचा समेळ । जैसी पिसाची बुळबुळ ।
तुझा घावो अति निर्बळ । जैसी पेळ कापसाची ॥९५॥
रावण निर्बळी हीन दीन । केंवी रामासीं करिसील रण ।
जगी निर्लज्ज तू एक जाण । हास्य संपूर्ण तेणे मज ॥९६॥
सैंवरी पाहता हरकोदंड । तुझे झाले काळे तोंड ।
श्रीरामे ते केले दुखंड । युद्ध वितंड केंवी त्यासी ॥९७॥
संमुख न येववे श्रीरघुनाथा । चोरोनि पळालासी घेवोनि सीता ।
त्यासी युद्ध करीन म्हणता । निर्लज्ज तू रावणा ॥९८॥
तुझे शुभचिन्ह कळलें आता । भीक लागली चोरिता सीता ।
त्यासी तुझी राज्यसत्ता । नुरे सर्वथा रावणा ॥९९॥
तुझा हात गा हळुवट । घावो अतिशयों पोंचट ।
माझी लोम न तुटे स्पष्ट । अहा कटकट राक्षसा ॥१००॥
प्रहस्त प्रधानाकडून मारूतीला प्रश्न :
संमुख बैसोनि लंकानाथा । निःशंक बोलता हनुमंता ।
चिंता रावणाच्या चित्ता । अवध्यता वानरी ॥१०१॥
अवध्य जाणता वानरासी । प्रहस्ताहाती पुसवी त्यासी ।
तू कोण कोणाचा कैंचा आलासी । वन भंगिले किमर्थ ॥१०२॥
मारूतीचे कथन :
रावण राजा प्रतापराशी । भेटी न घडे वानरासी ।
म्हणोनि भंगिले वनासी । दशमुखासी भेटावया ॥१०३॥
राक्षस आले मारावयासी । म्हणोनि युद्ध केले त्यांसी ।
वांचवावया निजदेहासी । राक्षसांसी मारिले ॥१०४॥
रावणाचा उपहास, धिक्कार, त्याच्या समोर मारूतीच्या चेष्टा :
ऐसे सांगोनि प्रहस्तासी । हनुमान बोले निजवृत्तांतासी ।
दृष्टी नाणी प्रहस्तासी । राक्षसांसी गणीना ॥१०५॥
दशमुखाचे संमुख । पुच्छासनीं बैसला देख ।
हनुमंत अतिशयेंसी निःशंक । नव्हे साशंक रावणा ॥१०६॥
रावणासंमुख हनुमंत । बैसल्या वांकुल्या दावित ।
सवेंचि डोळे मिचकावित । अंगोठा दावित नोकूनी ॥१०७॥
हनुमंत न भी राक्षसांसी । दृष्टी नाणी प्रधानासी ।
रावण जाणोनि मानसी । स्वमुखें त्यासी पुसतसें ॥१०८॥
रावण-मारूती प्रश्नोत्तर :
रावण हेळसोनि बोले उत्तर । अरे तू कोणाचा वानर ।
ऐक रे रावणा प्रत्युत्तर । सत्य साचार सांगेन ॥१०९॥
मारिले बनकर किंकर । जंबुमाळी निशाचर ।
रणी मारिले प्रधानकुमर । तो मी वानर महावीर ॥११०॥
पंच सेनानी मारिले शूर । निर्दळिला सैन्यसंभार ।
रणी मारिला अखया कुमर । तो मी वानर महावीर ॥१११॥
मारिलासे अखया सुत । ज्येष्ठ गांजिला इंद्रजित ।
त्याच्या सेने केला निःपात । तो मी हनुमंत महावीर ॥११२॥
वनविध्वंस कवण्या चाडा । जैसे उपडिले म्या झाडां ।
तैसे राक्षसकुळउपाडा । करू रोकडा मी आलो ॥११३॥
तू कोणाचा कैंचा कोण । येथे यावया काय कारण ।
ऐसा पुसिला जो प्रश्न । तयाचे उत्तर अवधारी ॥११४॥
सुबाहुताटकानिर्दळण । त्रिशिरा मारिला खर दूषण ।
त्या श्रीरामाचा दूत मी जाण । तुझा प्राण घेवो आलो ॥११५॥
चौदा सहस्त्र रक्षोगण । वधूनि घेतलें जनस्थान ।
त्या श्रीरामाचा दूत मी जाण । तुझा प्राण घेवो आलो ॥११६॥
विराध मारिला विंधोनि बाणे । मारीच कपटी मारिला जेणे ।
त्या श्रीरामाचा भक्त मी जाणे । तुझा प्राण घेवो आलो ॥११७॥
कोदंडधारियां दीक्षागुरू । सूर्यवंशी श्रीरामचंद्रु ।
त्याचा दूत मी वानरू । तुझा संहारू करू आलो ॥११८॥
दंडधारिया परम गुरू । कामक्रोध वधी रघुवीरू ।
त्याचा दूत मी वानरू । तुझा संहारू करू आलां ॥११९॥
म्हणसी वधावया रावण । तुज कैंची रे आंगवण ।
माझे बळ असाधारण । नाही प्रमाण रणमारा ॥१२०॥
लागता बाहुबळचपेट । मेरूमांदार होती पीठ ।
रावण दशमुख कीट । लंकात्रिकूट ते किती ॥१२१॥
दशमुखांचिया हारी । शिरें छेदीन नखाग्री ।
जेंवी पतंग अग्नीवरी । तैसी परी राक्षसा ॥१२२॥
रावणा ऐसे दशकंठी । मिनलिया कोट्यनुकोटी ।
त्याते निर्दळीन वामांगुष्ठी । लंकात्रिकूटीसमवेत ॥१२३॥
जळो ती रावणा तुझी पुरूषार्थ थोरी । जळो तो राजा तो होय भिकारी ।
जळो ते कर्म करणे चोरी । परनारी पतिव्रता ॥१२४॥
जळों ते रावणा तुझे कुळ । जळों ते रावणा तुझे शीळ ।
जळों ते रावणा तुझे बळ । पापी तू केवळ परद्वारी ॥१२५॥
धिक् धिक् रावणा राक्षसजाती । धिक् धिक् रावणा तुझी ख्याती ।
धिक् धिक् रावणा तुझी कीर्ती । झाली अपकीर्ती तिही लोकी ॥१२६॥
धिक् धिक् रावणा तुझी श्रीमंती । धिक् धिक् रावणा तुझी शक्ती ।
धिक् धिक् तो खड्गा तुझ्या मुष्टी । लव मारूतीची न तुटे ॥१२७॥
धिक् धिक् रावणा तुझे जन्म । धिक् धिक् रावणा तुझा धर्म ।
धिक् धिक् रावणा तुझे कर्म । निंद्य परम तिही लोकी ॥१२८॥
धिक् धिक् जीवित्व तुझी ख्याती । धिक् धिक् रावणा तुझी शौर्यवृत्ती ।
परोक्ष हरिली सीता सती । बाणभयें भीसी श्रीरामा ॥१२९॥
माझ्या स्वामीची चोरिली नारी । तू तंव माझा प्रत्यक्ष वैरी ।
मी तंव सीतेचा धांवणेकरी । तुजला मारीन मी आता ॥१३०॥
तुजसी प्रत्यक्ष व्हावया भेटी । वनी वृक्षा केली अटाटी ।
राक्षस मारिले कोट्यनुकोटी । तुज दृष्टी देखावया ॥१३१॥
तुज म्या देखावया दृष्टी । बंधना लावूं दिधले कंठी ।
लत्ता टोले साहोनि मुष्टी । तुझिये भेटी मी आलो ॥१३२॥
तुझे भेटीचे हेंचि फळ । तुज म्या मारावे तत्काळ ।
सिद्धि नेवोनि श्रीरामसळ । जनकबाळ सोडवावी ॥१३३॥
त्या तुज मज जाली भेटी । तुवा पुसिली जी गुह्यगोष्टी ।
ते म्या सांगितली परिपाटी । मरण शेवटी उरलेसें ॥१३४॥
तुझ्या आंगी सबळ बळ । सैन्य सेनानी प्रधान प्रबळ ।
मज मारोनी तत्काळ । जनकबाळ भोगावी ॥१३५॥
राक्षसा देखता स्पष्टा । तुझे मर्दीन मी ओष्ठा ।
तुझ्या छेदावया दशकंठां । आलो मी वांटा रामाचा ॥१३६॥
ऐसे बोलता महाबळी । फिंदारल्या रोमावळी ।
लांगूल त्राहाटिले भूतळीं । वटारिलें निराळीं कपिपुच्छा ॥१३७॥
माथा शेंडी थरथराट । वाटरिले नेत्रवाट ।
तंव कांपिंनला दशकंठ । समसगट राक्षसा ॥१३८॥
करावया सर्व संहार । जैसा वाढे प्रळयरूद्र ।
तैसा वाढला वानर । निशाचर कांपती ॥१३९॥
मी तंव एकके एक वानर । श्रीरामाचा निजकिंकर ।
तुझे कोट्यनुकोटि झुंझार । मजसमोर करी उभे ॥१४०॥
मशकें कोट्यनुकोटी झुंझार । मज मारिता दशशिर ।
कोण राखेल निशाचर । सुरासुर पाहो पा ॥१४१॥
क्षोभला देखोनि हनुमंत । इंद्रजित चळाचळा कांपत ।
आजि निमाला लंकानाथ । करील घात वानर ॥१४२॥
निश्चये रावणा आला अंत । ऐसे इंद्रजित चिंतित ।
तंव बोलिला हनुमंत । राही वृत्तांत अवधारा ॥१४३॥
रणी मारोनि रावण । करोनि सीतासोडवण ।
श्रीरामापासीं नेतां जाण । मज कोण निवारी ॥१४४॥
इतुके करिता न लगे क्षण । परी श्रीरामे वाहिली आण ।
दक्षिणहस्ते विंधोनि बाण । रणी रावण मारणें ॥१४५॥
मारोनियां दशशिरा । स्वस्थ करीन वसुंधरा ।
सुखी करावे चराचरा । श्रीरामचंद्रा निजनेम ॥१४६॥
सोडावी देवांची बांधवडी । तोडावी नवग्रहांची बेडी ।
उभारावी रामराज्याची गुढी । मर्यादा गाढी श्रीरामे ॥१४७॥
श्रीराम बळवंतांचें बळ । श्रीरामबळे वीर सबळ ।
श्रीरामाचे सत्य शीळ । प्रतिज्ञा अढळ रामाची ॥१४८॥
रामे मारावें लंकानाथा । सत्य प्रतिज्ञा श्रीरघुनाथा ।
माझ्यानें न करवे अन्यथा । केंवी मी आता तुज मारू ॥१४९॥
संमुख देखिल्या दशानन । वानरे उडोनि घ्यावा प्राण ।
रागे वाचंविला रावण । स्वहस्तें आपण न मारावें ॥१५०॥
मारूतीच्या भाषणाने इंद्रजितास चिंता :
श्रीराम प्रतिज्ञेची पाखर । तेणे वांचविला दशशिर ।
रावणा न मारीच वानर । मर्यादामेरू नुल्लंघी ॥१५१॥
रावणा तुज मी मारीन आता । ऐसे बोलता हनुमंता ।
इंद्रजितासी परम चिंता । आला लंकानाथा अपघात ॥१५२॥
बिभीषणास सांगणे :
इंद्रजित बिभीषणा सांगत । आजि निमाला लंकानाथ ।
क्रोधे खवळला हनुमंत । उपाय येथे चालेना ॥१५३॥
न चले शस्त्र अस्त्र सकळ । न चले वानरासी बळ ।
न चले कपटविद्याछळ । बळे प्रबळ वानर ॥१५४॥
मंत्रशक्ती तंत्रशक्ती । नातळे आक्रमविद्याशक्ती ।
न चले मायामोहनशक्ती । रणी मारूती नाटोपे ॥१५५॥
वानर नाटोपे सैन्यासी । शेखी नाटोपे ब्रह्मपाशीं ।
तो केंवी आटोपे रावणासी । बिभीषणासीं सांगत ॥१५६॥
जे जे बांधावें बंधन । वानर ना म्हणे आपण ।
तृणासमान त्यासी मरण । निर्बंधन पाशबंधीं ॥१५७॥
बिभीषणाची रावणाला सूचना :
ऐसे इंद्रजिते सांगता । बिभीषण म्हणे लंकानाथा ।
वानर अवध्य तत्वता । तुज वधितां वधवेना ॥१५८॥
वानर न वधवे सर्वथा । ऐसे कळले लंकानाथा ।
श्रीरामा अर्पोनि सीता । शरण रघुनाथा निघावे ॥१५९॥
श्रीरामा निघालिया शरण । आम्हांसी नाही जन्ममरण ।
त्रिसत्य सत्य रावणा जाण । विचार आन न करावा ॥१६०॥
अन्यथा विचार करू जाता । रोकडें हनुमंत करील घाता ।
उपाय न चले सर्वथा । लंकानाथा भुलूं नको ॥१६१॥
श्रीरामाचे एक वानर । आम्हा नाटोपे साचार ।
कोपोनि आलिया श्रीरघुवीर । रण दुर्धर कोण साहे ॥१६२॥
अर्पोनियां जानकीतें । काया वाचा चित्ते वित्ते ।
शरण निघालिया रघूत्तमातें । कल्याणातें पावाल ॥१६३॥
एकाजनार्दना शरण । सत्त्वबुद्धि बिभीषण ।
ते बुद्धि न मानी रावण । गर्वाभिमान तो ऐका ॥१६४॥
वानरा वनचराचे भेण । रिघतां श्रीरामासी शरण ।
ते मज आले उणेपण । जगी जघन्य वाढिवे ॥१६५॥
मरण पुसोनि कपिनाथा । त्याचेनि बोले त्याचे घाता ।
बुद्धि विचारूनि हनुमंता । कुबुद्धितां रावणी ॥१६६॥
जटायूने केला कासाविसी । सिंतरोनि म्या मारिले त्यासी ।
तैंसेंचि करीन हनुमंतासी । रावणापासी कुबुद्धि ॥१६७॥
एकाजनार्दना शरण । पुसतां हनुमंतासी मरण ।
दहाही मुखें होरपळून । करील दहन लंकेचें ॥१६८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
रावण सभाहनूमदागमनं नाम सप्तदशोऽध्यायः ॥१७॥
॥ ओव्या १६८ ॥ श्लोक १८ ॥ एवं संख्या १८६ ॥
