वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ५. सुन्दरकाण्ड - अध्याय ४२ › २३. पाच सेनापतींचा वध

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088219 · अभंग क्र. २३

23.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय तेविसावा ॥
सीतेचा शोध करून हनुमंताचे आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लंकादहन झाल्यावर सीतेची आज्ञा घेऊन मारूती परत येण्यास निघाला :

आश्वासोनि श्रीरामकांता । भेटावया श्रीरघुनाथा ।
हनुमंत होय निघता । तेचि कथा अवधारा ॥१॥
लंकादहन करोनि संपूर्ण । हनुमंतासी करिता गमन ।
घ्यावया सीतेंचें दर्शन । आला परतोन तीपासीं ॥२॥
सीता सर्वांगी अक्षत । पाहोनिया सावचित्त ।
हनुमंत हर्षयुक्त । निघे त्वरित ते ऐका ॥३॥
घ्यावया श्रीरामाची भेटी । हनुमंतासी त्वरा मोठी ।
वंदोनि सीता गोरटी । उठाउठी निघाला ॥४॥
वेगी उल्लंघावया सागर । चौफेर अवलोकी वानर ।
देखिला अरिष्ट गिरिवर । तेथे सत्वर वळंघला ॥५॥
सकळ असिष्टां आधार । यालागी अतिष्ट गिरिवर ।
अनुवादती ऋषीश्वर । त्याचा विस्तार अवधारा ॥६॥

अरिष्ट पर्वतावरून उड्डाण, त्या दडपणामुळे पर्वत जमीनदोस्त झाला

दश इंद्रियीं विक्षेपकता । दशयोजन रूंदी पर्वता ।
वासनविस्तार ऊर्ध्वता । शतयोजनता ते उंची ॥७॥
जागृति स्वप्न सुषुप्तिता । श्रीरामस्मरण हनुमंता ।
यालागी चढला अरिष्टमाथां । हाणी लाता नामनेटें ॥८॥
पूर्ण कृपा श्रीरघुनाथा । पूर्ण प्राप्ती ते हनुमंता ।
चढोनि अरिष्टाचे माथा । हाणी लाता नामनेटें ॥९॥
हनुमंताचे नामनेट । उड्डाणाचा कडकडाट ।
पृथ्वींत रूपला अरिष्ट । केला सपाट भूमिसम ॥१०॥
वृक्षशिखरें समसगट । भूमीं दाटला गिरिकूट ।
श्रीरामभजनी निजनिष्ठ । केला सपाट हनुमंते ॥११॥
हनुमान रामनामे आतुर्बळी । उड्डाणाच्या कल्लोळी ।
अरिष्ट मेळविला धुळी । करोनि रांगोळी नामनेटें ॥१२॥

भगवद्‌भजनमहिमा :

स्वये अरिष्टाचिये माथा । निर्दळणें हाणोनि लाता ।
हे ब्रीद साजे हनुमंता । श्रीरघुनाथाचेनि भजनें ॥१३॥
परम भाग्याची भाग्यस्थिती । मनुष्यजन्मातें नर येती ।
शोधितसत्वाची सत्ववृत्ती । जन्म पावती ब्राह्मणाचा ॥१४॥
तेथेंही वेदशास्त्रव्युत्पत्ती । जेणे परब्रह्म आतुडे हाती ।
ती सांडोनि मूढमती । बुद्धि यदर्थीं अति योग्य ॥१५॥
मुक्तत्वाचा निजाभिमान । वाग्वादीं अति निपुण ।
नाही भगवद्‌भावभजन । अलोट पतन तयांसी ॥१६॥
येवोनि ब्रह्मप्राप्तीचे घरा । मुक्ताभिमान नागवी नरा ।
भार भगवद्‌भजनीं पाठिमोरा । ऐशिया नरा अधः पात ॥१७॥
भगवद्‌भजनीं जो पाठिमोरा । त्यासी जन्ममरणयेरझारा ।
कोट्यनुकोटि योनिद्वारा । अधः पात खरा त्या नांव ॥१८॥
करेनि पत्रावलंबन । परीक्षा म्हणे माझे ज्ञान ।
हे ज्ञान की ज्ञानाभिमान । अधः पतन तयासी ॥१९॥
अहंसोहं कोहं अभिमान । भक्त न धरती अति सज्ञान ।
त्यासी बंधू न शके विघ्न । विघ्नासी दमन श्रीरामनाम ॥२०॥
रामनामाच्या निजशक्ती । भक्त विघ्नमाथां चढती ।
शेखी विघ्न निर्दाळिती । नित्यनिर्वृती रामनामे ॥२१॥
चारा घालोनि मुखाआंत । जेंवी पक्षिणी पिलीं पोशित ।
तेंवी आपुले निजभक्त । रक्षी भगवंत अहर्निशी ॥२२॥
विघ्न न येचि नामापासीं । ते केवी ये भक्तापासीं ।
भगवंत रक्षी अहर्निशी । विघ्न भक्तांसी निर्विघ्न ॥२३॥
विघ्न करू ये छळनार्थ । विघ्नाचा आत्मा तो भगवंत ।
विघ्न निर्विघ्न होय तेथ । भूते भगवद्रूप भक्तांसीं ॥२४॥
सर्वभूती भगवद्‌भाव । तेथे विघ्नासीं कैंचा ठाव ।
विघ्नीं विघ्नत्वा अभाव । विघ्न स्वयमेव देव झाला ॥२५॥
भगवद्‌भावे चालता भक्ता । विघ्ने ओढविती मांथा ।
ऐसी हरिभक्ति हनुमंता । श्रीरघुनाथाचेनि नामे ॥२६॥

व अशा रीतीने अरिष्ट पर्वत परब्रह्मी प्रविष्ट झाला :

श्रीरामनामे हनुमान बळीं । अरिष्ट पर्वत पायांतळी ।
करोनिया पै रांगोळी । मिळविला धुळी हरिनामें ॥२७॥
अरिष्टाचें भाग्य श्रेष्ठ । लागता हनुमंताचा अंगुष्ठ ।
विरोनिया गिरिकूट । जाला प्रविष्ट परब्रह्मा ॥२८॥
अरिष्टाची भाग्यावळी । हनुमंताचे पायांतळी ।
नुरेचि भूतळीं पाताळीं । मिनला तत्काळी परब्रह्मा ॥२९॥
दशशतयोजन विस्तार । नामे अरिष्ट गिरिवर ।
हनुमंते हाणोनि पादप्रहार । केला उद्धार अरिष्टाचा ॥३०॥
कपीनें हाणोनि पांपरा । जडत्व दवडोनि भूधरा ।
ऐक्य केले धराधरा । गिरिवरा अरिष्टा ॥३१॥
करावया अरिष्टाचा उद्धार । श्रीरामभक्त हनुमंत वीर ।
जो करी जडाचा उद्धार । तोचि साचार हरिभक्त ॥३२॥
धरा धरी तो धराधर । त्यासी अरिष्टाचा ऐक्याकार ।
श्रीरामभजने करी वानर । जगदुद्धार हनुमंते ॥३३॥
पुढील कथेची संगती । समुद्र लंघावया मारूती ।
चढला अरिष्ट पर्वती । तेही उपपत्ती अवधारा ॥३४॥

त्याचा व या कथेचा संबंध :

हनुमान उडतां महाबळी । पर्वत दडपला पायांतळी ।
सर्प दडपती पाताळी । वमिती ते काळी विषगरळा ॥३५॥
भारें दडपला पर्वतु । श्वेत पीत आरक्त धातु ।
स्त्र्वोनि निजशोभा शोभतु । जेवी वसंत निजसुमनीं ॥३६॥
जेंवी पर्वत पक्षमेळीं । जैसा कपि जातसे नभोमंडळी ।
असे अडकली बाहुमूळी । वक्षःस्थळीं कपीच्या ॥३७॥
उत्तरीयवास राजलीळा । वानरा आली राजकळा ।
सुनीळ भासतसे नीळा । घनसांवळा मारूती ॥३८॥
अभ्रें अडकली हनुमंता । आंगा आली घनश्यामता ।
पावला श्रीरामसारूप्यता । भासे समस्ता सुरसिद्धा ॥३९॥
देखोनिया महेंद्रगिरी । हर्ष कोंदला वानरी ।
प्रळयांबुदगिरागजरीं । भुभुःकारीं गर्जिन्नला ॥४०॥
श्रीरामचापीं सुटला शर । तैसा लंघीत सागर ।
सवेग जातसे वानर । सुरासुर विस्मित ॥४१॥
नाद कोंदला अंबरीं । नाद कोंदला सागरी ।
नाद कोंदला कपींद्रीं । जे महेंद्रीं राहविलें ॥४२॥

मारूतीच्या उड्डाणाचा नाद ऐकून महेंद्रा पर्वतावरील वानरांना हर्ष

ऐकोनि गिरागजर । महेंद्रीं राहिले होते वानर ।
तेही सावधान होती समग्र । तैसे गंभीर गर्जिन्नला ॥४३॥
गजर ऐकोनि अत्यद्‌भुत । वानरा सांगे जांबवंत ।
पैल आला रे हनुमंत । सीताशुद्ध्यर्थ लक्षोनी ॥४४॥
साधोनियां सीताशुद्ध्यर्थ । हर्षे गर्जे हनुमंत ।
अंगदादि वानरांआंत । सांगे जांबवंत दूतचिन्ह ॥४५॥
कार्य न साधिता जाण । मुख्य दुश्चित्त म्लानवदन ।
त्याचे वाचेसीं पडे मौन । गिरागर्जन त्या कैंचें ॥४६॥
सीताशुद्धीचा इत्यर्थ । साधूनि आला हनुमंत ।
तेणे आल्हादे गर्जत । केला निश्चायार्थ जांबवंते ॥४७॥
ऊरूवेग बाहुवेग । हनुमंताचा लागवेग ।
कार्य साधोनिया सांग । येतो सवेग मारूती ॥४८॥
ऐसा जांबवंती इत्यर्थ । ऐकोनि वानर समस्त ।
अत्यंत आल्हादे नाचत । सीताशुद्ध्यर्थ साधला ॥४९॥

सर्व वानरांकडून हार्दिक स्वागत :

साधूनि सीताशुद्ध्यर्थ । पैल आला रे हनुमंत ।
इंद्रकीळ नीळपर्वत । तैसा शोभत मारूती ॥५०॥
येता देखोनि हनुमंत । वानरवीर हर्षयुक्त ।
उभे ठाकले समस्त । उभय हस्त जोडोनी ॥५१॥
फळी पुष्पी वृक्षयुक्त । महेंद्रगिरि सुशोभित ।
हनुमंत स्ववेगें आला तेथ । वानर जेथ उभे असती ॥५२॥
एके उड्डाणे हनुमंत । समुद्र लंघोनि समस्त ।
वेगे आला महेंद्रांत । वानर जेथ उभे असती ॥५३॥
धावतां हनुमंताचेनि वेगे । वायु टणकोनि राहिला मागे ।
मनोवेगाहूनि वेगे । आला सवेग मारूती ॥५४॥
नाही लागली पै धाप । नाही स्वेद नाही कंप ।
श्रीराम स्मरता चिद्रूप । आला सुखरूप हनुमंत ॥५५॥
जैसा श्रीरामाचा बाण । कार्य साधोनि संपूर्ण ।
परतोनि हाता ये आपण । तैसे आगमन कपीचें ॥५६॥
नळ नील जांबुवंत । अंगदादि वीर समस्त ।
त्यांते देखोनि हनुमंत । नाम गर्जत आनंदें ॥५७॥
श्रीराम जयराम या गजरीं । हनुमान गर्जत अंबरीं ।
वानरी गर्जविला गिरी । नामोच्चारी जय जय राम ॥५८॥
श्रीराम जय राम नाम । गर्जताती प्लवंगम ।
नादें गर्जवीत व्योम । आला सप्रेम हनुमंत ॥५९॥
नामे कोंदलें अंबर । नामे कोंदलें गिरिकंदर ।
करीत नामाचा गजर । आला वानर हनुमंत ॥६०॥
देखोनिया वानरगण । करीत श्रीरामाचे स्मरण ।
हनुमान घाली लोटांगण । वंदीत चरण सर्वांचे ॥६१॥
साधोनि आलो सीताशुद्ध्यर्थ । गर्व नाही हनुमंतांत ।
ज्यातें त्याते अभिवंदित । भूतीं भगवंत देखोनि ॥६२॥
वृद्धत्वें जांबुवंत गुरू । प्रथम त्यासी नमस्कारू ।
अंगद जो का राजकुमरू । केला नमस्कारू तयासी ॥६३॥
एवं युक्तपरंपरा । हनुमान वंदित वानरा ।
तेणे आल्हाद समग्रां । पवनपुत्रा देखोनि ॥६४॥
सन्मानोनि हनुमंताते । मध्ये बैसवोनि तयाते ।
वानर बैसले सभोंवते । सीताशुद्धीतें पुसावया ॥६५॥
जांबुवंतादि पूज्य समस्त । तिही पूजिला हनुमंत ।
तेणे आल्हादे सांगत । सीताशुद्ध्यर्थ साक्षेपे ॥६६॥
लंका नगरी वसे सागरी । तेथे रावण राज्य करी ।
तेथील प्रवेश अंटक भारी । सुरासुरी दुर्धर ॥६७॥
रामनामाचे निजनेटें । उड्डाण करोनिया नेटे ।
लंका शोधिली त्रिकूटें । समसगटें पुरगृहें ॥६८॥
रावणाच्या निजभवनीं । सीता भेटली अशोकवनी ।
तिये धाडिलें खूण देउनी । मस्तकमणि हा सीतेचा ॥६९॥
मणि देखोनि अलंकार । वानरी केला जयजयकार ।
रामनामाचा गजर । नामे वानर गर्जती ॥७०॥
सीता भेटली साचार । मणि मस्तकालंकार ।
ते देखोनिया वानर । केला भुभुःकार स्वानंदे ॥७१॥

वानरांचा हर्षातिरेक व लीळा वा हनुमंताची भेट

वृक्षींहोनि वृक्षांतरी । पर्वताहोनि पर्वतावरी ।
हरीखें उडिजे वानरी । सीता सुंदरी सांपडली ॥७२॥
श्वेत सुनीळ आरक्त । शाखा कपिपुच्छीं पुष्पित ।
जैशा वस्त्रगुढिया गगनाआंत । तैसी शोभा कपिपुच्छीं ॥७३॥
फळित पुष्पित शाखांवरीं । पुच्छगुढिया गगनांतरी ।
उभवोनि नाचिजे वानरी । सीता सुंदरी सांपडली ॥७४॥
सीतामस्तकींचे मणिरत्‍न । पहावया अवघे जण ।
हरिखें करोनि उड्डाण । वानरगण दाटले ॥७५॥
मस्तकमणि देखोनि डोळा । हरिख वानरा सकळा ।
पुच्छ उभविती अंतराळां । स्वानंदलीळा नाचती ॥७६॥
येरयेरा हाणिती धडका । येरयेरा लाविती चडका ।
येरयेरा देती धक्का । पाडिती देखा येरयेरा ॥७७॥
येरयेरा दाविती वांकुल्या । येरयेरा गटांगुळिया ।
येरयेरा गुदगुदलिया । कर्णांगुळिया येरयेरा ॥७८॥
येरयेरा कौतुकीं । जानुघातें हाणिती ढक्की ।
येरयेरा हाणिती बुक्की । वानर हर्षी उपरमोनी ॥७९॥
येरयेरा निंखंदिती । येरयेरा उपहासती ।
येरयेरा निर्भत्सिती । वीर गर्जती आल्हादे ॥८०॥
एक कळकिळती वानरजाती । एक रामनामे गर्जती ।
एक भुभुःकार देती । सीता सती सांपडली ॥८१॥
अधीं मधी हनुमंता । कोण वंदील पाहो आता ।
उडिया टाकोनि असंख्यता । चरणी माथा ठेविती ॥८२॥
जीव देणे हे गोड गोष्टी । हनुमान वीर जगजेठी ।
शुद्धि आणिली उठाउठी । वानरकोटी नाचती ॥८३॥
विचित्र शाखा धरोनि पुच्छाग्रीं । पुच्छ उभवोनि अंबरीं ।
वानर नाचती सुखोद्गारीं । सीता सुंदरी सांपडली ॥८४॥
वानरी मिळोनि एकमेळीं । रामनामाच्या कल्लोळी ।
अवघी पिटोनिया टाळी । हनुमानाजवळी मिनले ॥८५॥
वानरी मिळोनि समस्त । हनुमंताची स्तुति करित ।
अनुक्रमे आलिंगित । अभिवंदित स्वानंदे ॥८६॥

अंगादाची सविस्तर वृत्त निवेदन करण्याची विनंती

अंगदयुवराज प्रज्ञावंत । नळ नीळ पनस जांबवंत ।
गज गवय गवाक्षयुक्त । जुत्पती समस्त बैसले ॥८७॥
मध्ये बैसविला हनुमान वीर । घायीं सर्वांग जर्जर ।
ते देखोनि वीर झुंझार । विस्मयो थोर पावले ॥८८॥
हनुमंत हा वज्रदेही । तोही ओरखडला घायीं ।
दारूण युद्ध जाले पाही । कपीतें कांही सांगेना ॥८९॥
आणिकही वानरभार । देखोनि हनुमान घायी जर्जर ।
म्हणती युद्ध घोरांदर । अति दुस्तर येणे केले ॥९०॥
ऐकावया हनुमंताचे रण । वानरा येतसे स्फुरण ।
करोनि सीताशुद्धिप्रश्न । रणकंदन पुसावे ॥९१॥
हा तंव बलाढ्य स्वये । हनुमंते युद्ध केले आहे ।
हनुमंताचे निजघाये । कोण साहे रणरंगीं ॥९२॥
सिंह बोराटी ओरबडे । तैसे शस्त्रांचे वरखडे ।
हनुमंताचे मागेंपुढें । चहूंकडे दिसताती ॥९३॥
आपुलें युद्धाची निजख्याती । स्वमुखें न सांगे मारूती ।
सीताशुद्धीच्या प्रश्नोक्तीं । युद्धव्युत्पत्ती पुसावी ॥९४॥
अंगद जो का युवराजा । वार्ता पुसे पवनात्मजा ।
कैसेनि भेटली रामभाजा । समूळ ओजा मज सांगे ॥९५॥
कोणे भुवनीं कोणे स्थानी । तुज भेटली सीता जननी ।
कैसेनि दिधला मस्तकमणी । समूळ कहाणी मज सांगे ॥९६॥
ऐकोनि अंगदाचा प्रश्न । हनुमंत परम विचक्षण ।
सीताशुद्धीचें लक्षण । स्वमुखें आपण सांगत ॥९७॥

हनुमंताचे संक्षेपाने कथन :

अंगदाचें शुभवचन । ऐकोनि हनुमंत हास्यवदन ।
सीताशुद्धीचें लक्षण । करोनि गौरवा सांगत ॥९८॥
अंगद युवराजा समर्थ । नळ नीळ जांबुवंत ।
ऐका वानरवीर समस्त । सीताशुद्ध्यर्थ संक्षेपे ॥९९॥
लंकादुर्ग अति दुर्धर । सभोंवता समुद्र दुस्तर ।
त्यामाजी रावणाचे नगर । लंकापुर ज्या नांव ॥१००॥
तेथे रिघतां अति दुर्घट । मीहि पावलों परम कष्ट ।
नामे निरसोनि संकट । विघ्नें सपाट रामनामे ॥१०१॥
त्याहीमाजी रावणभुवन । त्याहीमाजी राणिवसा गहन ।
त्याहीमाजी अशोकवन । सीताचिद्रत्‍न त्यामाजी ॥१०२॥
सीते पासीं संरक्षण । कराळ विक्राळ दारूण ।
भयानका राक्षसी रक्षण । तेथे कोण रिघो शके ॥१०३॥
दुष्ट दुर्मुख दारूण । ब्रह्मराक्षस रक्षोगण ।
सप्तावर्तीं भ्यासुर पूर्ण । तेथे कोण रिघो शकें ॥१०४॥
अशोकवन अति दुर्घट । वारया तेथे न फुटे वाट ।
तेथेंही रिघालों करूनि कष्ट । अनेक संकटें सोसूनी ॥१०५॥
सीता स्वयमेव देखिली दृष्टी । तरी घेवो न शके भेटी ।
भोंवती राक्षसांची घरटी । वृक्षसंपुटी मी लपालो ॥१०६॥
सीतानिजदुःखदर्शन । नाही आस्तरण ना प्रावरण ।
एक वस्त्र परिधान । अति मळिणा मळगंधी ॥१०७॥
नाही स्नान ना भोजन । उपवासे कृश दीन ।
वेणी वळिली जटाबंधन । मंगलस्नान असेना ॥१०८॥
तरी धन्य सीता सती । श्रीरामभजनी अति प्रीती ।
जागृती स्वप्न आणि सुषुप्तीं । श्रीरामस्मृती विसरेना ॥१०९॥
सीता सती सावधान । करिता श्रीरामस्मरण ।
वृक्ष वल्ली तृण पाषाण । श्रीरामभजन जपताती ॥११०॥
धन्य सीतेची रामभक्तीं । सर्वेंद्रियीं श्रीरामस्फूर्तीं ।
राम देखे सर्वा भूतीं । त्रिजगती रामनामे ॥१११॥
ऐसी असता सहजस्थिती । श्रीरामभेटीची अत्यासक्ती ।
मजलागी ये काकुळती । श्रीरघुपति भेटवी ॥११२॥
म्या सांगितली गुह्य गोष्टी । श्रीरामा तुझी आवडी मोठी ।
मज धाडिलें शुद्धीसाठी । सीता गोरटी कोठे आहे ॥२१३॥
तुझी ठायी पडलिया शुद्धी । घेवोनि वानरांची मादीं ।
श्रीराम येईल त्रिशुद्धी । दिधली मुदी रामाची ॥२१४॥
मुद्रिका देखतांचि दृष्टी । हरिखली सीता गोरटी ।
हरिखें माझी पाठी थापटी । जाई उठाउठी शुद्धी सांगे ॥२१५॥
सखा जिवलग मज तू आता । तुझे चरणी ठेवितें माथा ।
शीघ्र जावोनि हनुमंता । श्रीरघुनाथा आणावे ॥२१६॥
शीघ्र करावया गमन । म्या मागितले अभिज्ञान ।
मस्तकमणि घेवोनि खूण । आलो धांवोनि तुम्हांपासीं ॥२१७॥
लंकेसी आहे सीता सती । शुद्धि म्या आणिली निश्चिती ।
विकल्प न धरावा चित्ती । चला रघुपतीला शुद्धि सांगों ॥२१८॥
ऐकोनि हनुमंताचे वचन । वानरा तळमळ पूर्ण ।
न सांगेचि युद्ध दारूण । बुद्धि कोण करावी ॥२१९॥
ऐकोनि हनुमंताचे वचन । अंगद सुखावला आपण ।
सीताशुद्धि तुवा आणून । रामाचा प्राण वांचविला ॥१२०॥
वानरांच्या कोट्यनुकोटी । पडल्या होत्या प्राणसंकटीं ।
तुवा वांचविल्या उठाउठी । शुद्धिसाठीं सीतेच्या ॥१२१॥
धन्य जीवित्व हनुमंता । शुद्धि आणिली तत्वता ।
हर्ष सांगावया रघुनाथा । उल्लासता अंगदा ॥१२२॥
तंव बोलिला जांबवंत । निधडा वीर हा हनुमंत ।
कैसेनि भेटला लंकानाथ । युद्धकंदनार्थ का जाला ॥१२३॥

हनुमंताच्या शरीरावर शस्त्रांचे घाव
दिसल्यावरून जांबुवंत युद्धाचा वृत्तांत विचारतात

जांबुवंत म्हणे हनुमंता । तू वज्रदेही तत्वता ।
तुझे अंगी देखो शस्त्रघाता । त्या युद्धार्था सांगावे ॥१२४॥
रावण क्रूर आणि कपटी । कैसी त्यासी जाली भेटी ।
सीता भेटली संकटीं । त्या गुह्य गोष्टी सांगाव्या ॥१२५॥
तुवा गांजिला इंद्रजित । पिता पवन होता सांगत ।
त्या नीळासीं एकांत । पुत्रपुरूषार्थ तो वदला ॥१२६॥
त्या युद्धाची समूळ कथा । कृपेनें सांगावी हनुमंता ।
समुद्रलंघनाची वार्ता । तेही तत्वता सांगावी ॥१२७॥
येचिविशीं हनुमंती । पूर्वी बुद्धि स्फुरली होती ।
वार्ता पुसलिया श्रीरघुपती । स्वमुखें कीर्ति नये सांगों ॥१२८॥
स्वामीनें पुशिलिया जाण । वार्ता वंचू नये आपण ।
वंचितांचि लागे दूषण । बुद्धि कोण करावी ॥१२९॥
स्वमुखें सांगों नये कीर्ती । वंचू नये स्वामीप्रती ।
ऐसिये संकटीं मारूती । प्रजापती विनविला ॥१३०॥

स्वतः चा पराक्रम स्वमुखाने वर्णन करणे अप्रशस्त म्हणून
हनुमंताचे विनंतीवरून ब्रह्मदेवाने पराक्रम वर्णनाचा लेख लिहिला

वंदोनि ब्रह्मयाचे चरण । हनुमंत विनवी पै आपण ।
लंकेमाजी झाले वर्तन । पत्र एल्होन मज द्यावे ॥१३१॥
स्वामीपासीं निजपुरूषार्थ । जो सांगे तो मूर्खोन्मत्त ।
वंचितां पावे अधः पात । हा शास्त्रार्थ स्वामीचा ॥१३२॥
नाही दुसरा सांगाती । तो सांगता माझी कीर्ति ।
मज माझी पडली गुंती । पत्र तदर्थीं मज द्यावे ॥१३३॥
माझा समस्तही पुरूषार्थ । ब्रह्महस्तींचें ब्रह्मलिखित ।
सत्य मानील श्रीरघुनाथ । निश्चितार्थ मज माजा ॥१३४॥
ऐकोनि हनुमंताचे वचन । हासिंन्नला चतुरानन ।
परम प्रीती आलिंगून । पत्र लेहोन दिधले ॥१३५॥
वीर शूर गुणगंभीर । शास्त्रवेत्ता आणि चतुर ।
समयोचित जाणोनि विचार । निधडा वीर हनुमंत ॥१३६॥
उल्लासोनि प्रजापती । आदरे स्तवोनि मारूती ।
अत्यंत कपीची ख्याती । पत्र प्रीती दिधले ॥१३७॥
तेंचि ब्रह्मपत्र घेवोनि हाती । उल्लासे उडोनि मारूती ।
वंदोनियां सीता सती । वानरांप्रतीं स्वये आला ॥१३८॥

त्या लेखाचा अर्थ कळणार नाही म्हणून त्याचे वाचन
श्रीरामांशिवाय करणे अयोग्य म्हणून तो तसाच ठेविला

जांबवंते पुसता ख्याती । ब्रह्मलिखित दिधले हाती ।
रिसासी नव्हे अर्थप्राप्ती । पडली गुंती गुणगुणित ॥१३९॥
लक्ष्मणासीं वाचनशक्तीं । तो तंव शेषावरतारमूर्तीं ।
का अर्थ जाणे श्रीरघुपती । येरांची युक्ति सरेना ॥१४०॥
जांबवंताची बुद्धि कैसी । अर्थ न कळे आपणासी ।
कळो नेदीच वानरांसी । युक्ति विशेषी चालविली ॥१४१॥
ब्रह्मलिखित संपूर्ण । श्रीरामावांचोन आपण ।
वाचितां लागे दूषण । पत्र घेवोन तेथे जावे ॥१४२॥
बैसवोनि श्रीराममूर्ती । बैसवोनि सुग्रीव कपिपती ।
पत्र देवोनि सौमित्राप्रती । अर्थयुक्तीं वाचावें ॥१४३॥
युक्ति मानली समस्ता । शुद्धि सांगोनिया सीता ।
अवश्य भेटावे श्रीरघुनाथा । मग पत्रार्था वाचावें ॥१४४॥
ऐसा करोनि संप्रधार । उठिला वानरांचा भार ।
अवघी केला जयजयकार । श्रीरामचंद्र लक्षोनी ॥१४५॥
एकाजनार्दना शरण । हनुमंतासी रामदर्शन ।
आनंदें ओसंडले गगन । सुखसंपन्न श्रीराम ॥१४६॥
वाचितां ब्रह्मलिखितार्थ । उल्लासेल श्रीरघुनाथ ।
वानरा वानरा उल्लास अद्‌भुत । तो कथार्थ अवधारा ॥१४७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
सीताशुद्धिहनुमदागमनं नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः ॥२३॥
॥ ओव्या १४७ ॥ श्लोक ३५ ॥ एवं संख्या १८२ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग