वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ५. सुन्दरकाण्ड - अध्याय ४२ › २७. रावणसभेत हनुमंत

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088221 · अभंग क्र. २७

27.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय सत्ताविसावा ॥
हनुमंतपराक्रमवर्णन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

ब्रह्मदेवाने लिहिलेल्या पत्राचे वाचन

धन्य धन्य ते ब्रह्मलिखित । धन्य धन्य आणिता हनुमंत ।
सौमित्र वाची सावचित्त । अर्थें रघुनाथ सुखावे ॥१॥
सौमित्र वाची ब्रह्मलिक्जित । ऐकता पत्रिकेचा अर्थ ।
श्रीराम स्वानंदे डुल्लत । हनुमंतचरित्र परिसोनी ॥२॥
शुद्धि न लभे सीता सती । कळी लाविली लंकेप्रती ।
सभा नागविली रात्रीं । हनुमंत ख्याती ते ऐका ॥३॥
हनुमंताचे आचारित । अचळ समूळ समस्त ।
ब्रह्मयाने लिहिले ब्रह्मलिखित । सावचित्त अवधारा ॥४॥

गुप्त राहून हनुमंताने नगराता केलेला हलकल्लोळ

गुप्त राहोनि नगरद्वारी । वानरचेष्टा नानापरी ।
कलहो लाविला निशाचरीं । कपिकुसरी ते ऐका ॥५॥
पुच्छी गोंवोनि नगरनारी । कलशस्फोट राजद्वारी ।
भरलिया जाऊ देना घागरी । तोटा नगरी उदकाचा ॥६॥
राजा - निमाला दशकंठ । त्याचेनि नावें घटस्फोट ।
राजद्वारी होती स्पष्ट । नारी व्यथिष्ट कळकळती ॥७॥
गजारूढ गजपती । त्या गजांची खुंटली गती ।
मागील महामत्त हस्ती । आणि त्यांप्रती संग्रामा ॥८॥
गज भिडती गजांसी । महावत महावतांसी ।
कपि गुप्तत्वे बांधोनि पुच्छांसी । दोनी तोंडघशीं आदळती ॥९॥
गज आदळतां तडफडती । वीर रगडले चरफडती ।
राजद्वारी ऐशा रीती । कलहप्राप्ती कपिपुच्छे ॥१०॥
अश्वस्वाराचिया हारी । हो हो मा मा जी जी करी ।
नाचती चंव पायांवरी । राजद्वारी कपि पाडी ॥११॥
अश्व पाडोनि ऐसे रीती । हनुमान गांजी कलहप्राप्ती ।
तैसेचि अतिरथी महारथी । गांजी मारूती गुप्तत्वे ॥१२॥
पुढील मल्लाची शेंडी ओढी । मागील मल्ल त्यावरी पाडी ।
मल्लविद्या कडोविकडी । केली बापुडी हनुमंते ॥१३॥
मल्ल अति बळे उन्मत्त । परस्परें कलहो होत ।
हनुमंते करोनि घात । पाडिले कुंथत राजद्वारी ॥१४॥
विवादती वेदपाठक । सानुनासिक अनुनासिक ।
रामस्मरणीं नाही विवेक । निर्नासिक कपि मानी ॥१५॥
अस्मात् कस्मात् उपपत्ती । विद्वांसी विवेकयुक्ती ।
नामस्मरणीं नाही मती । मानी मारूती भूभार ॥१६॥
प्रधान गर्वे अति सन्मानीं । बैसोनि येता सुखासनीं ।
हनुमान अत्यंतविंदानी । भोयांचे कानी भोवंडी पुच्छ ॥१७॥
भोई ओसरता दचकोनी । धूर आदळतां धरणी ।
धुळी निघालीसे वदनी । दंतभग्नी कुंथत ॥१८॥
रायापासीं अति सन्मान । त्यांसी राजद्वारी अपमान ।
हांसताती लंकेचे जन । तेणे प्रधाना क्षोभले ॥१९॥
सघृतभातें चौशेरी । उंच वरान्न भोजन घरी ।
आम्हांसी पाडिलें राजद्वारी । सुबद्ध मारी भोयांतें ॥२०॥
भोई म्हणती ऐका मात । व्यर्थ का करा आमुचा घात ।
सीतेनें सोडिला पुच्छकेत । दंतभग्नार्थ तेणे तुम्हा ॥२१॥
सीता आहे लंकेप्रती । नगरलोक अनुवादती ।
कोणे ठायी नेमे निश्चिती । शुद्धि मारूती न लभेचि ॥२२॥
ऐसे करिता जाली राती । शुद्धि साधावया सीता सती ।
निघाला रावणसभेप्रती । केली ख्याती ते ऐका ॥२३॥
सिंहासनी दशशिर । सभेंसीं निशाचर वीर ।
निकट प्रधान आणि कुमर । सभा सुंदर शोभत ॥२४॥
सभेंसीं येवोनि घरटीकार । करोनि रावणासी जोहार ।
सांगती नगरींचा समाचार । विघ्न दुर्धर दिसताहे ॥२५॥
मुख्य विघ्नांची पै थोरी । अतर्क्य कलहो राजद्वारी ।
गज रथ यांसी हारी । महावीरी अपमान ॥२६॥
राजगृहीं अति सन्मान । पालखीपदस्थ प्रधान ।
शिबिका राजद्वारी भंगोन । दंतभग्न पावले ॥२७॥
घटस्फोट राजद्वारी । कळकळती नरनारी ।
उदकाचा तोटा नगरी । घरोघरी आकांत ॥२८॥
लोक जल्पती समसकट । नगरी निमाला दशकंठ ।
त्याचेनि नांवे घटस्फोट । नारी यथेष्ट कळकळती ॥२९॥

दिवे मालवून सर्वत्र अंधार व त्याचे परिणाम

रावणे ऐकता उत्तर । कोपा चढला दुर्धर ।
धरा मारा घरटीकार । अपवित्र अनुवादती ॥३०॥
माझा सांगता विघ्नप्रकार । जरी मारिला घरटीकार ।
तरी मी हनुमान भूमिकार । केला चमत्कार तो ऐका ॥३१॥
सुगंधस्नेहदीपिका । कर्पूरदीपिका अनेका ।
अठरा लक्ष दोही बाही देखा । लखलखिता शोभत ॥३२॥
तंव वानरे पुच्छ हाणिता देख । विझविल्या दीपिका एकाएक ।
ऐसे पाहता जनलोक । सभा सकळिक गजबजिली ॥३३॥
सभेसीं पडता अंधार । जिंही बांधिला घरटीकार ।
ते धुमसोनि निशाचर । करी वानर मुक्त त्यासी ॥३४॥
घरटीकार करोनि मुक्त । सभेसी क्षोभला हनुमंत ।
जे जे केले अत्यद्‌भुत । सावचित्त अवधारा ॥३५॥
सभेसी पडता अंधारी । हनुमंते मांडिली चोरी ।
वस्त्रे अलंकारहारी । शस्त्रे वस्त्रे नागविलीं ॥३६॥
एक म्हणे नेलीं माझी त्वा वस्त्रे । तो म्हणे नेली माझी शस्त्रे ।
भट्ट म्हणती नेलीं धोत्रे । गुप्त वानरे नागविले ॥३७॥
कुंडले घेता कान तोडी । वस्त्रे घेता डोळे फोडी ।
बाहुवटे घेता बाहु मोडी । गांजी कडोविकडी राक्षसा ॥३८॥
मुकुट घेता मस्तक फोडी । कटिसूत्रासाठी माज मोडी ।
मुद्रिकानिमित्त आंगोळ्या तोडी । केली वेडीं राक्षसे ॥३९॥
कंठमाळा घेता कंठ मुरडी । पदकासाठीं ह्रदय फोडी ।
नेसणीं घेता लिंगें तोडी । केली बापुडी राक्षसें ॥४०॥
नेसणीं सोडा रे लौकरी । नातरीं लिंगा होय बाहेरी ।
नपुसंकता संसारी । कैशा परी सोसवेल ॥४१॥
पायी बिरूदें वीरांची पूर्ण । तयांसाठीं मोडी चरण ।
बोंबलूं जाता छेदी घ्राण । फे फे वचन राक्षसा ॥४२॥
येरयेरा सांगती बुद्धी । बोंबलूं नका रे त्रिशुद्धी ।
बोंबलूं जाता नाक छेदी । निःशब्दवादीं राहा उगे ॥४३॥
वस्त्रे अलंकार जोडती पुढे । तैसे नाक तंव ना जोडे ।
ख्याति लाविली माकडें । यरू दडे येरा मागे ॥४४॥
जे बोलिला घरटीकार । ते विघ्न आले साचार ।
सीता क्षोभली दुर्धर । दशशिरवधार्थी ॥४५॥
जानकीक्षोभ अत्यद्‌भुत । तिणें सोडिला पुच्छकेत ।
रावण मेला किंवा जित । कोणी मात सांगेना ॥४६॥
रावण निमाला अंधारी । विघ्न आले त्याचियेवरी ।
बोंब पडली सभेमाझारी । आपांपरी राक्षसा ॥४७॥
मारिला इंद्रजित कुंभकर्ण । तयामागें येथे रावण ।
आता धांवण्या धांवेल कोण । राक्षसगण कांपती ॥४८॥
पिता क्षोभला पवन । दीपिकांते जाय विझवोन ।
राक्षसा होताहे कंदन । दशानन निमाला ॥४९॥
भंगले राजाज्ञेंचें सूत्र । सभेमाजी निघाले चोर ।
नागविले थोर थोर । निशाचर पळो पाहती ॥५०॥
जो कोणी निघे सभेबाहेरी । त्यासी पुच्छ सुबद्ध मारी ।
अवघी दडालीं अंधारी । कोंडमारी राक्षसा ॥५१॥
सीता क्षोभली उद्‌भट । राक्षसा आले अति संकट ।
बाहेरी जावया न फुटे वाट । मरण दुर्घट ओढवले ॥५२॥
अंधारी रावणाचा मुकुट । पुच्छाग्रीं ओढी मर्कट ।
तेणे धाके दशकंठ । म्हणे मज शेवट पै आला ॥५३॥
रावणाच्या उरीं शिरी । हनुमान सुबद्ध टोले मारी ।
तेणे त्यासी आली अंधारी । धाकेंकरी न बोलवे ॥५४॥
अंधारी न दिसे पै व्यक्त । अंगी वाजती अति आघात ।
तेणे भयें लंकानाथ । चळीं कांपत थरथरां ॥५५॥
सत्य बोलिला घरटीकार । विघ्न मज आले साचार ।
गुप्त आघात दुर्धर । लागती निष्ठुर प्राणांत ॥५६॥
हनुमान सांगे दशशिर । तुवा चोरली सीता सुंदर ।
तुझे छेदावया शिर । आलो साचार मी रामदूत ॥५७॥

रावणावर प्रहार व त्याला ताकीद

रावणाची दश शिरे । हनुमान छेदिता नखाग्रें ।
परी वारिला होता श्रीरामचंद्रे । म्हणोनि वानरे सोडिला ॥५८॥
तुवा मारिल्या लंकानाथ । माझा पुरूषार्थ होईल व्यर्थ ।
ऐसे बोलिला रघुनाथ । तेणे हनुमंत न मारीच ॥५९॥
नागवोनि राक्षसपंक्ती । गांजोनिया लंकापती ।
सभेसीं लावोनिया ख्याती । मग मारूती निघाला ॥६०॥
वानरे लावितांचि हात । रावण झाला मूर्च्छाभ्रांत ।
कपि कानी जल्पिला गुह्यार्थ । लंकानाथ तो नेणे ॥६१॥
नांव ऐकता हनुमंत । एक फळफळां मुतत ।
एका सुटला अधोवात । जाला भ्रांत रावण ॥६२॥

श्रोत्यांचा हर्ष :

ऐसे वाचितां ब्रह्मलिखित । लक्ष्मण गदगदा हासत ।
वानरा मुरकुंडी वळत । हास्य करी श्रीराम ॥६३॥
गांजोनिया लंकापती । सभा नागविली काळे रातीं ।
ऐकता हनुमंताची कीर्ती । श्रीरघुपति सुखावे ॥६४॥
सुखावला लक्ष्मण । सुग्रीव सुखावे संपूर्ण ।
सुखावले वानरगण । गाढी आंगवण हनुमंता ॥६५॥

हनुमंत अशोकवनात जातो :

गांजोनि सभेचा पुरूषार्थ । रावणा करोनि हताहत ।
आला अशोका वनाआंत । हनुमंत महाबळी ॥६६॥
सीतेसी करावया एकांत । हनुमान वृक्षीं अति गुप्त ।
सीता विरहे विषयासक्त । लंकानाथ तेथे आला ॥६७॥

तेथे रावणाचे सीतेला आव्हान :

सीतेसी सांगे स्वये रावण । माझे करावे त्वा वरण ।
तुज मी महिषी करीन । आण प्रमाण शिव साक्षी ॥६८॥
श्रीराम वनवासी हीन । राज्यभ्रष्ट अति दीन ।
त्याचे सांडोनिया ध्यान । राजा रावण वरी सीते ॥६९॥
सीते तू तंव समूळ वेडी । पाहे माझी प्रतापप्रौढी ।
देव जे का तेहतीस कोटी । बांधवडी पै माझे ॥७०॥
इंद्र बारी चंद्र कर्हेरी । वसंत सेजेचा फुलारी ।
रावणा मारिल्या सीता सुंदरी । सुरासुरी वंदिजे ॥७१॥
मुख्य करोनि मंदोदरी । ऎंशी सहस्त्र माझ्या नारी ।
त्या करीन तुझ्या किंकरीं । आज्ञाधारी सेवेंसीं ॥७२॥
माझे करावया वरण । तुज मी होतो अनन्य शरण ।
तुझे वंदितो मी चरण । पाणिग्रहण करी माझे ॥७३॥
जो मी प्रतापी लंकानाथ । सुरनरां काळकृतांत ।
तुझा होतो शरणागत । त्यजीं रघुनाथ भजें मज ॥७४॥

रावणाला सीतेचे अत्यंत कडक शब्दात उत्तर

ऐकोनि रावणाचे वचन । सीता बोले हास्यवदन ।
जळो तुझे हे महिमान । काळे वदन लंकेशा ॥७५॥
स्वयंवरी वाहता हरकोदंड । तुझे जाहलें काळे तोंड ।
श्रीरामे केले दुखंड । वृथा बळवंड जल्पसी ॥७६॥
बाळपणी विंधोनि बाण । घेतला ताटकेचा प्राण ।
सुबाहु मारोनियां जाण । केला संपूर्ण गुरूयाग ॥७७॥
शूर्पणखा विटंबून । चवदा सहस्त्र राक्षसगण ।
मारिले त्रिशिरा खर दूषण । दिधले जनस्थान द्विजांसी ॥७८॥
नाही रघुनाथा सारथी । श्रीराम एकला पदाती ।
तेणे येव्हढी केली ख्याती । तुझी अपकीर्ति तू ऐके ॥७९॥
सहितभवानी त्रिपुरारी । आंदोळिला कैसालगिरी ।
तो तू श्रीरामभयेंकरीं । झालासी भिकारी सन्यासी ॥८०॥
कपटी होवोनि संन्यासी । शेखी परदारा चोरिसी ।
नाही पुरूषार्थ तुजपासी । वृथा जल्पसी वाढीव ॥८१॥
श्रीराम परब्रह्मपुतळा । रावणा तू काळा डोंबकावळा ।
सीता मानी त्याचे विटाळा । कल्पांतकाळी स्पर्शेना ॥८२॥
चोरिता श्रीरामनायिका । निंद्य जालासी तिही लोका ।
रावणा तू तव शूकरमुखा । तुज मी देखा नातळें ॥८३॥
वायसाचा पांथीकर । जेंवी नव्हेचि चंद्रचकोर ।
तेंवी सांडोनि श्रीरामचंद्र । दशवक्त्र स्पर्शेना ॥८४॥
लक्ष्मणाचिया मर्यादारेखा । तूतें नुल्लंघवेचि दशमुखा ।
श्वान शूकर काळमुखा । तुज मी देखा स्पर्शेना ॥८५॥

त्या उत्तरामुळे रावण संतप्त :

साधु सज्जन सौम्य संत । कदा विष्ठेसी न लावी हात ।
तेंवी तू अपवित्र लंकानाथ । तुज मी निश्चित स्पर्शेना ॥८६॥
ऐकोनि सीतेंचे वचन । वर्मी खोंचला दशानन ।
जिव्हा सांडा रे छेदून । निंद्य वचन दिसताहे ॥८७॥
बळेंचि इसी मज भोगितां । कोण निवारील आता ।
केंवी राखवेल रघुनाथा । सती परिव्रता पाहू कैसी ॥८८॥

ते पाहून हनुमंताचा क्षोभ :

ऐसे बोलता लंकानाथ । ऐकोनि क्षोभला हनुमंत ।
करावया रावणाचा घात । वृक्षाआंत खवळला ॥८९॥
टवकारिले नेत्रवाट । वळिला पुच्छाचा पै साट ।
छेदावया दशकंठकंठ । बळे उद्‌भट गुरगुरी ॥९०॥
मजदेखतां गांजी सीता । मी काय वार्तिकार आता ।
रडत जावोनि सांगू रघुनाथा । नपुंसकता मज आली ॥९१॥
सीतेसी लावितांचि हात । जीवे मारीन लंकानाथ ।
येणे बळे हनुमंत । वृक्षाआंत गुरगुरी ॥९२॥
त्याची ऐकता गुरगुर । कापिंन्नला दशशिर ।
सीतारक्षणीं श्रीरामचंद्र । अति सत्वर पातला ॥९३॥

मंदोदरीचे तेथे आगमन व तिच्यासह रावणाचे आपल्या भुवनात गमन

रावण पडिला विचारीं । तंव पातली मंदोदरी ।
लंकापति धरोनि करी । निजमंदिरी तो नेला ॥९४॥
गुज सांगे तयासी । अखंड राम सीतेपासीं ।
हात लाविता तियेसी । वृथा तू मरसी रावणा ॥९५॥

सीतेचा अनुताप व शोक पाहून मारूती श्रीरामांची मुद्रिका तिच्या पुढ्यात टाकतो

ऐसी सांगतांचि गोष्टी । रावणा धुकधुकी लागली पोटी ।
येरीकडे सीता गोरटी । वृक्षसंपुटीं विलपत ॥९६॥
लक्ष्मण छळितां श्रीरामभक्त । तेणे अंतरला श्रीरघुनाथ ।
मज आकळी लंकानाथ । भक्तच्छळण महापाप ॥९७॥
श्रीरामाज्ञेंचें रक्षण । मजपासी लक्ष्मण ।
त्याचे करिता म्या छळण । बंदीं रावण मज घाली ॥९८॥
छळवाद्याचे वदन । कदा न पाहे रघुनंदन ।
मज सांडिलें निंद्य म्हणोन । शोकनिमग्न छळणार्थीं ॥९९॥
श्रीरामभक्ताचें छळण । पंचमहापापांहूनि दारूण ।
मज क्षोभला रघुनंदन । बंदीमोचन कोण करी ॥१००॥
श्रीरामभाता दुर्धर शर । लंका विध्वंसी साचार ।
रावण निर्दळी सहपरिवार । मज रघुवीर कोपला ॥१०१॥
सुटल्या श्रीरामाचा बाण । मशक बापुडे ते रावण ।
मज क्षोभला रघुनंदन । सखा लक्ष्मण छळितांचि ॥१०२॥
न लागता निमेषमात्र । श्रीराम वधिता दशवक्त्र ।
म्या छळिला सखा सौमित्र । तेणे रघुवीर क्षोभला ॥१०३॥
दासासी दंडण शिरोमुंडण । स्त्रियेसी दंडण उपेक्षण ।
ऐसे बोलोनि आपण । दीर्घ रूदन करी सीता ॥१०४॥
श्रीरामे उपेक्षिलियापाठीं । जीवे जीत मी करंटी ।
प्राण द्यावया उठाउठी । सीता गोरटी अनुतापी ॥१०५॥
करिता श्रीरामस्मरण । स्वेद रोमांच अश्रुपूर्ण ।
सीतेसी करिता स्फुंदन । आले रूदन हनुमंता ॥१०६॥
कळवळ उपजली कपींद्रा । तेव्हा टाकिली श्रीराममुद्रा ।
मुद्रा देखोनि सीता सुंदरा । निद्रा तंद्रा विसरली ॥१०७॥

मुद्रिका पाहून सीतेवर झालेला परिणाम

दोनी टवकारिले नयन । चिंता गेली हरपोन ।
मनी पांगुळलें मन । विस्मयपन्न जानकी ॥१०८॥
श्रीराममुद्रेचा बडिवार । दुःख निर्दाळोनि समग्र ।
सुख द्यावे अपरंपार । चिदचिन्मात्र राममुद्रा ॥१०९॥
दीपिकातेज अंधारयुक्त । श्रीराममुद्रा ग्रासी समस्त ।
करोनि शशिसूर्य खद्योत । प्रकाशवंत राममुद्रा ॥११०॥
मुद्रिका शोभे नामेंकरीं । श्रीरामनाम मुद्रिकेवरी ।
राममुद्रिका बाह्यांतरीं । सीता सुंदरी स्वये देखे ॥१११॥
मुद्रिका पीठपत्रावळी । सहस्त्रनामप्रभावळी ।
अक्षरीं अक्षरे लिहिल्या ओळीं । अक्षरे न्याहाळी जानकी ॥११२॥
अक्षरीं अक्षरमुद्रिका । दशावतार त्यावरी टीका ।
जडित चरित्रमालिका । सुखदायका सीतेसी ॥११३॥
मुद्रिकागर्भ अति पवित्र । त्याहीमाजीं परत्पर ।
श्रीरामनाम निजाक्षर । क्षराक्षरातीत ॥११४॥
ऐसी मुद्रिका आनंदयुक्त । देखोनि सीता सद्गदित ।
नेत्री आनंदजळ स्त्रवत । रोमांचित जानकी ॥११५॥
मुख्यमुद्रा ते सुवर्ण । त्यावरी श्रीराम सुवर्णवर्ण ।
देखोनि मुद्रेचें महिमान । सुखसंपन्न जानकी ॥११६॥
तेथे चमत्कार जाहला । मुद्रा नव्हे श्रीराम आला ।
ऐसा सीतेसी भाव गमला । सरसाविला अंचळ ॥११७॥
श्रीराम आले एकाएकी । लाजे जाली अधोमुखी ।
सर्वांगें हरिखली जानकी । सुखोन्मुखी डुल्लत ॥११८॥
केउता आहे लक्ष्मण । दुष्ट दुरूक्तीं केले छळण ।
त्याचे केशी झाडीन चरण । लोटांगण त्या माझे ॥११९॥
सवेंचि श्रीरामेंसी गोडी । घ्या जी फोडी देईन विडी ।
आलेति मजकारणें तांतडी । चरण झाडीन निजकेशीं ॥१२०॥
ब्रह्मलिखित निरूपम । सीताचरित्र अनुपम ।
ऐकता श्रीरामा आले प्रेम । अति संभ्रम तो ऐका ॥१२१॥

त्या वर्णनाचा श्रीरामांवर झालेला परिणाम :

सीता देई आलिंगन । म्हणोनि उठला रघुनंदन ।
पैल दिसे सीता चिद्रत्‍न । आली धांवोनि भेटावया ॥१२२॥
दोनी बाह्या पसरोन । हर्षे धांवे रघुनंदन ।
सीता देखिली चिद्रत्‍न । आलिंगनालागून उभा असे ॥१२३॥
ऐसा धांवतां रघुनंदन । विस्मयो पावती कपिगण ।
सुग्रीव पडिला मूर्च्छापन्न । मूर्च्छित लक्ष्मण पत्रार्थी ॥१२४॥
हर्षे ओसंडे रघुनाथ । पदोपदीं होय नाचता ।
धन्य सुदिन हनुमंता । माझी मज सीता भेटाविली ॥१२५॥

श्रीरामांची शोकाकुल अवस्था पाहून मारूतीला खेद व उड्डाण करण्यासी तयारी

ऐकोनि म्हणे हनुमंत । थोर चुकलो मी तेथ ।
सीता आणितों जरी येथ । श्रीरघुनाथ सुखावता ॥१२६॥
अति अनुताप हनुमंता । चुकलों मी सर्वथा ।
मज काय आली नपुसंकता । निमेषें सीता आणीन ॥१२७॥
क्षण एक धीर धरी रघुनाथा । सवेग आणीन मी सीता ।
चरणी ठेवोनिया माथा । होय उडता हनुमंत ॥१२८॥

श्रीराम हनुमंताचे सांत्वन करितात

वेगे उडतां हनुमंता । उमज पडला श्रीरघुनाथा ।
स्वये धांवोनि होय धरिता । ऐक आता सांगेन ॥१२९॥
ब्रह्मलिखित ऐकता । प्रेम उसळलें चित्ता ।
दुश्चित ते वदलों सीता सीता । तुवा त्या अर्था नवजावें ॥१३०॥
घेवोनि श्रीरघुनाथ । वेगे उडों पाहे हनुमंत ।
अंगदे देखोनि तो अर्थ । धांवोनि धरित हनुमंता ॥१३१॥
अंगद श्रीरामांसवेत । उडों पाहे हनुमंत ।
ते देखोनि जांबुवंत । स्वये धरित तिघांसी ॥१३२॥
घेवोनिया तिघे जण । हनुमान करू पाहे उड्डाण ।
सुग्रीव होवोनि सावधान । धरी धांवोन हनुमंता ॥१३३॥
सुग्रीवाही समस्त । उडो पाहे हनुमंत ।
तो लक्ष्मणे धांवोनिया तेथ । आंवरीत निजबळे ॥१३४॥
स्फुरणें खवळला हनुमंत । अंगद सुग्रीवा जांबवंत ।
रामलक्ष्मणांसमवेत । लंकेआंत नेवों पाहे ॥१३५॥
पंच फळे वृक्षावरी । तेंवी पांच वीर ते अवसरी ।
नेवों पाहे लंकेभीतरीं । तेही परी अवधारा ॥१३६॥
श्रीराम मारील रावण । इंद्रजित मारील लक्ष्मण ।
आम्ही मर्दूं राक्षसगण । सीता घेवोन येवो सुखें ॥१३७॥
ऐसे कपीचें मनोगत । जाणोनिया श्रीरघुनाथ ।
हनुमंताचे चरण धरित । क्षमा निश्चित पै कीजे ॥१३८॥
श्रीरामे धरिता चरण । हनुमान घाली लोटांगण ।
तुझी आज्ञा अणुप्रमाण । प्राणांती आपण नुल्लंघी ॥१३९॥
तुज कळली सीतेची अवस्था । तिसी आणावया शीघ्रता ।
धीटपण केले म्या आता । क्षमा सर्वथा मज कीजे ॥१४०॥
ऐसे बोलोनि आपण । धरिले श्रीरामाचे चरण ।
रामे दिधले आलिंगन । समाधान स्वामिभक्तां ॥१४१॥
एकाजनार्दना शरण । हनुमंताचे बळ संपूर्ण ।
सुग्रीव आणि लक्ष्मण । वानरगण वानिती ॥१४२॥
बळ अद्‌भुत हनुमंता । पुढील सीतेची अवस्था ।
ब्रह्मलिखिताची कथा । सावधान अवधारा ॥१४३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें सुंदरकांडे एकाकारटीकायां
ब्रह्मलिखितहनुमंतपराक्रमवर्णनं नाम सप्तविंशतितमोऽध्याया : ॥२७॥
॥ ओव्या १४३ ॥ श्लोक - ॥ एवं संख्या १४३ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग