गुणे सकुमार सावळे ।
179.
गुणे सकुमार सावळे । दोंदील पहाती पा निराळे ।
केवी वोलळे गे माये । सुख चैतन्याची उंथी ओतली ।
ब्रह्मांदिका न कळे ज्याची थोरवी । तो हा गोवळीयाच्या छंदे क्रीडतु ।
साजणी नवल विंदान न कळे माव रया ॥
डोळा बैसले हृदयी स्थिरावले । मन नुठी तेथून काही केल्या ॥धृ॥
सच्चिदानंद पदी । पदाते निर्भेदी । निजसुखाचे आनंदी । माये क्रीडतुसे ॥
तो हा डोळीया भीतरी । बाहिजु अभ्यंतरी । जोडे हा उपावो किजो रया ॥
गुणाचे पै निर्गुण । गंभीर सदसुखाचे उदार । जे प्रकाशक थोर । सकळ योगाचे ॥
आनंदोनी पाहे पा साचे । मनी मनचि मुरोनी राहे तैसे ।
बापरखुमादेविवरा विठ्ठले । की मुसेमाजी अलंकार मुराले ।
श्रीगुरु निवृत्तीने दाविले सुख रया ॥
अर्थ :
तो सर्वगुण संपन्न, सावळा, पुष्ट सुकुमार गोकुळात कसा आला ते कळत नाही. ज्याची थोरवी ब्रह्मादिकांना कळत नाही जो सुख व चैतन्याचा ओढणी अंगावर घेऊन आला आहे. तो त्या गोवळ्यांबरोबर खेळत आहे हे नवल मला कळत नाही. ते रुप डोळियानी पाहिले व मनात घट्ट बसले त्या रुपावरुन मन परतत नाही. तो सच्चिदानंद स्वरुप असुन त्या पदाला छेद न देता. निजसुखाचा आनंद देत त्या गौळ्यांबरोबर तो खेळत आहे. तो डोळ्यात भरणारा व अंतर्मन व्यापणारा, त्याच्याशी अनुसंधान कसे करायचे हा विचार करावा. तो निर्गुण गंभीर असणारा सर्वसुखाचे आगर असणारा सर्वांना ज्ञानप्रकाश देणारा, योग्यांच्या मनात असतो. हे सर्व आनंदाने पहा तो मनात मुरोन गेला आहे जसे सोने अलंकारात मुरलेले असते. असे माझे पिता व रखुमाईचे पती यांचे सुख मला निवृत्तीनाथांनी दाखवले. असे माऊली सांगतात.
