(बाळक्रीडा अभंग)
3874.
(बाळक्रीडा अभंग)
समाधान त्यांची इंद्रिये सकळ । जया तो गोपाळ समागमे ॥१॥
गोविंदाचा झाला प्रकाश भीतरी । मग त्या बाहेरी काय काम ॥२॥
काम काज त्यांचे सरले व्यापार । नाही आप पर माझे तुझे ॥३॥
माया सकळांची सकळांही वरी । विषय ते हरी दिसो नेदी ॥४॥
दिसे तया आप परावे सारिखे । तुका म्हणे सुखे कृष्णाचिया ॥५॥
अर्थ :
जे गोपाळ श्रीकृष्णाच्या संगतीत होते त्यांची सर्व इंद्रिये समाधानी झाली होती. त्या सर्वांच्या अंत:करणामध्ये आत्मस्वरुप आणि गोविंदाचा प्रकाश झाला मग त्यांचे बाह्यरंगामध्ये काय काम राहिले ? त्यांचे सर्व प्रकारचे काम, काज, व्यापार संपले होते आणि त्यांच्या ठिकाणी आपला, परका, माझे, तुझे हा भेदभावच राहिला नव्हता. सर्वांची एकमेकांवर माया म्हणजे प्रेम होते सर्व एकमेकांना हरीरुपच पाहत होते. कृष्णावाचून त्यांना कोणी दिसत नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण सुखामुळे त्यांना आपले आणि परके हे सर्व कृष्णासारखेच दिसत होते.
