आनंद सर्वांचा काला अ
23.
आनंद सर्वांचा काला अरुवार । नामया साचार फुंदतसे ॥१॥
राहिरखुमाई सत्यभामा माता । आलिया त्वरिता काल्यामाजी ॥२॥
उचलिला नामा प्रेमाचे फुंदन । नुघडी तो नयन काही केल्या ॥३॥
बुझावित राहि रखुमादेवी बाही । पितांबर साई करी हरी ॥४॥
ज्ञानासी कवळु सोपानासी वरु । खेचरा अरुवार कवळु देतु ॥५॥
निवृत्ति पूर्णिमा भक्तीचा महिमा । नामयासि सीमा भीमातीरी ॥६॥
अर्थ:
काल्यातील सर्वांच्या आनंदाने गहिवरलेले नामदेवराय आनंदाने स्पुंदु लागला. ह्या काल्यासाठी राही रखुमाई व सत्यभामा ही त्वरित आल्या. सर्वांनी अनिवार आनंदात रमलेल्या नामदेवाना उचलुन घेतले तरी आनंदविभोर झालेले नामदेव डोळे उघडायला तयार नव्हते.नामदेवांचे भाग्य पहा दोन्ही मातांनी त्याचे हात धरुन त्याला भानावर आणायचा प्रयत्न केला व देवांने त्याच्यावर पितांबराची छाया धरली.ज्ञानदेवांना व सोपानाला देव काल्याचा ब्रह्मैक्याचा घास दिला व विसोबा खेचराना गहिवरुन घास दिला.निवृत्तिनाथ म्हणतात भक्तांनी पूर्ण चंद्रासारखा परिपूर्ण काला अनुभवला व नामदेवांचे वास्तव्य असलेले भीमातीरी आनंदाला सीमा नव्हती.
