तंव आनंदला हरि परिपू
24.
तंव आनंदला हरि परिपूर्ण लोटला । मुक्ताई लाधला प्रेमकवळु ॥१॥
चांगयाचे मुखी घालित कवळु । आपण गोपाळु दयासिंधु ॥२॥
दिधले ते तु घेई पूर्ण ते होई । सप्रेमाचे डोही संतजन ॥३॥
नामया विठ्या नारया लाधले । गोणाई फावले अघटित ॥४॥
राहि रखुमाई कुरवंडी करिता । जींवे वोवाळिता नामयासी ॥५॥
निवृत्ति खेचर ज्ञानदेव हरि । सोपान झडकरी बोलविले ॥६॥
अर्थ:
काल्याच्या आनंदात देहभान हरपलेला परमात्मा भक्तांच्या स्वाधिन झाला व त्यांने मुक्ताईला प्रेमाने काल्याचा घास भरवला. तो दयासागर गोपाळ चांगयाच्या तोंडात काल्याचा घास घालत आहे. भगवंत प्रेमाने म्हणाला की पूर्णत्वाचा काला घेऊन तुम्ही संत पूर्णतेला पोहचाल. व हे ऐकुन संत आनंदाच्या डोहात डुंबु लागले. नामदेव त्यांचे चिंरजीव विठ्ठल, नारायण आई गोणाई ह्यांना ही काल्याच्या आनंदात भाग घेता आला. प्रेमाने राहि रखुमाईनी प्रेमाने नामदेवांना औक्षण केले. निवृत्तिनाथ म्हणतात की देवांने मला, ज्ञानदेव, सोपान, व विसोबा खेचरांना आवर्जुन प्रेमाने त्वरित बोलावुन घेऊन त्यांना काल्याचा लाभ दिला.
