भांडवल माझे लटिक्याच
2612.
भांडवल माझे लटिक्याचे गाठी । उदीम तो तुटी यावी हेचि ॥१॥
कैसी तुझी वाट पाहो कोण्या तोंडे । भोवती कि रे भांडे गर्भवास ॥धृपद॥
बहू खाणीचिया रंगलोंसे संगे । सुष्ट दुष्ट अंगे धरूनिया ॥२॥
बहुतांचे बहु पालटलो सळे । बहु आला काळे रंग अंगा ॥३॥
उकलूनि नये दाविता अंतर । घडिचा पदर सारूनिया ॥४॥
तुका म्हणे आता करी गोळयासाठी । आपुल्या पालटी संगे देवा ॥५॥
अर्थ :
माझ्या सारख्या खोटारडयाच्या पदरामध्ये एवढेच एक भांडवल आहे की कोणताही व्यापार मी केला तरी माझे नुकसानच होईल. देवा माझ्या भोवताली गर्भवासाच्या फेऱ्याच चालू आहेत त्यामुळे मी तुझी वाट कशी व कोणत्या तोंडाने पाहू ? मी अनेक जन्ममरणाच्या खाणी भोगल्या आहेत त्यामध्ये कधी चांगले तर कधी वाईट शरीर धारण करुन अनेक गुणाच्या रंगाने मी रंगलो होतो आणि मी खूप जन्मामध्ये खूप लोकांच्या संगतीत राहून पालटलो आहे पण भक्तांचे विविध प्रकारचे काळे गुण कर्माचे रंग माझ्या अंगाला लागले आहेत. माझे अंतरंग कसे विविध गुणकर्माने रंगले आहे पहा जसा साडीचा पदर बाजूला करुन साडीचा रंग दाखवता येतो त्याप्रमाणे दाखवता येणार नाही. तुकाराम महाराज महणतात, माझे शरीर तुम्हाला घ्या त्याच्या बदल्यात मला तुमचे स्वरुप दाखवा.
