येथे आड काही न साहे
3372.
येथे आड काही न साहे आणीक । प्रमाण ते एक हेचि झाले ॥१॥
गाऊ नाचु टाळी वाहू गीत छंदे । डोलावू विनोदे अंग तेणे ॥धृपद॥
मथुनिया सार काढिले बाहेरी । उपाधि त त्या येरी निवडिल्या ॥२॥
तुका म्हणे जना लाविली शिराणी । सेविता हे धणी होत नाही ॥३॥
अर्थ :
मी जे साधन ठरवले आहे त्यावाचून दुसरे काहीही आडवे आलेले मला सहन होत नाही कारण तेच साधन मला प्रमाण झाले आहे. ते साधन म्हणजे हरीचे गीत गाऊ त्या छंदामध्ये नाचू टाळी वाजवू आणि त्या छंदामध्येच आमचे अंग आनंदाने डोलवू कौतुकाने डौलवू. आम्ही वेदशास्त्राचे मंथन करुन मुख्य साररुपी मी निवडलेले साधन हेच बाहेर काढले आहे आणि योगयागादी उपाध्या बाजूला निवडून टाकल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, मी देखील लोकांना याच साधनेविषयी म्हणजे हरीच्या नामाविषयी हरीचे गुणगान वर्णन करण्याविषयी त्या छंदामध्ये टाळी वाजवून अंग कौतुकाने डोलवण्याविषयी छंद लावला आहे कारण देवाचे नांव कितीही सेवन केले तरी तृप्ती मात्र होत नाही.
