॥ श्रीएकनाथमहाराजकृत
6.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
बालकाण्ड
॥ अध्याय सहावा ॥
श्रीरामजन्मप्रसंग
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
श्रीरामाचा जन्मकाळ :
श्रीरामाचा जन्मप्रभाव । अजन्मा जन्मेल रामराव ।
पाहू आला सुरनरसमुदाव । तो नवलाव पाहू आले ॥१॥
प्रसूतिसमय कौसल्येसी । तंव अयोध्येच्या चौपासी ।
विमाने दाटलीं आकाशी । विबुध वेगेंसी पै आले ॥२॥
सूर्यवंशा येईल रघुनाथ । यालागी मध्यान्हीं आला आदित्य ।
लग्नीं साधिला अभिजित । जन्ममुहूर्त राघवा ॥३॥
वक्री अतिचर होऊन । वेगी चालोनि आपण ।
केंद्री आणि उच्चस्थान । तेथे ग्रहगण स्वये आले ॥४॥
शुद्धसुमनी वसंत ऋतु । मधुमास अति विख्यातु ।
शुक्ल पक्ष नवमी आंतु । जन्म रघुनाथ पावला ॥५॥
सुखरूप प्रसूती व श्रीरामांचे प्रकटन :
श्रीराम स्वये अयोनी । तो स्पर्शना नाही जन्मयोनी ।
कौसल्या सन्मुख देखे नयनी । आश्चर्य मनी विस्मित ॥६॥
नाही लागली वेण उद्भट । नाही दुखिंनले गर्भपोट ।
स्वयं राम जाला प्रकट । अति उद्भट निजतेज ॥७॥
स्वप्रकाशे स्वलीला । निजतेजे अति सोज्वळा ।
घवघवित घनसावळां । दे डोळा कौसल्या ॥८॥
जेणे निजतेज विलासे । मीतूपणाचा ठावचि पुसे ।
जग आत्मत्वें प्रकाशे । सोहळा उल्लासे परमानंदे ॥९॥
ज्या तेजाचे निजनिर्धारे । अहं सोहं समूळ विरे ।
त्रैलोक्य ब्रह्म्त्वे अवतरे । सर्वांगी भरे स्वानंद ॥१०॥
ज्या तेजाचे निजनिष्ठे । विषयांचें विषयत्व आटे ।
बंधमिक्षाचे बिरडें फिटे । स्वयं कोंदाटे परब्रह्म ॥११॥
ज्या तेजाचिये दीप्ती । रवि चंदू हे स्वये हरपती ।
ते तेज प्रकाशे ब्रह्मस्फूर्ती । निर्विषयस्थिती सुख कोंदे ॥१२॥
देखे ठकराचें निजठाण । दो हाती धनुष्यबाण ।
करावया राक्षसनिर्दळण । ओढी काढोनि विन्यांसें ॥१४॥
करावया बंदिमोचन । सुरनरग्रहां अभयदान ।
अभयहस्तें संपूर्ण । विराजमान रघुवीर ॥१५॥
करिता रामनामस्मरण । जीवांस करावया ब्रह्मपूर्ण ।
स्वये कृपाळू आपण । वरदहस्तें पूर्ण आश्वासीत ॥१६॥
सामुद्रिक चिन्हें :
चरणांतरी आरक्त शोभा । लोपित बाळसूर्याचा प्रभा ।
जगाते भुलवी जगदंबा । तेही चरणरंगा भूलली ॥१७॥
माया अतर्क्य सर्वांसी । वेदशास्त्री प्रसिद्धी ऐसी ।
तीही भुलली चरनांसी । जाली दासी सर्वदा ॥१८॥
सनकादिक आणि विरक्त । तेही चरणारविंदी आसक्त ।
भ्रमर होवोनियां संतत । आमोद घेत स्वानंदे ॥१९॥
चरणांचिया सामुद्रिका । न वर्णवे वेदेंशेषादिकां ।
ध्वजवज्रांकुश ऊर्ध्व रेखा । पायी पद्म देखा यवांकित ॥२०॥
चरणांतळी आरक्त शोभा । बरवंटी शुद्ध श्याम प्रभा ।
। इंद्रधनुष्य मिरवे नभा । तैसी शोभा शोभत ॥२१॥
उपासका यंत्र पूर्ण । तैसी घोंटी पै त्रिकोण ।
दोही पायी नीळवर्ण । विरामजामन् शोभती ॥२२॥
यंत्रपीठीं वर्ण प्रबळा । तैशा पोटरिया सकळा ।
अक्षररूपें त्या निसळा । अति निर्मळा सकुमारा ॥२३॥
जानुचक्रें अति वर्तुळ । जैसे आरसे निज निर्मळ ।
निजात्मरूप सकळ । तेथे तत्काळ प्रतिविंब ॥२४॥
कर्दळीस्तंभाचे शुद्ध सार । त्याहूनि मांडिया सुकुमार ।
लागता खुपती चंद्रकर । ऐसे अरुवार जघनद्वय ॥२५॥
श्रुति आणि स्मृति । दोही पायी वांकी गर्जती ।
अंदुवा जाण निश्चिती । उपवेद स्थितिविभागें ॥२६॥
वेदांत शुद्ध शास्त्र थोर । चरणी गर्जती तोडर ।
धन्य दैत्यांचे शरीरभार । चरणी निरंतर रुळती तोडरी ॥२७॥
जगाचें गुह्य श्रीराम पूर्ण । त्या गुह्याचे गुह्य लक्षण ।
तेथे पावों शके कोण । ते सुख संपूर्ण जानकी भोगी ॥२८॥
स्वये अछिद्रत्वें मनोहर । आणि पुढिलांचे आच्छादी छिद्र ।
तोचि कांसेसीं पीतांबर । तेजे दुर्धर देदीप्यमान ॥२९॥
पीतांबर श्रीराम कांसेसीं । लागला निजभावेसी ।
तेणेचि तो अनायासीं । गुह्यगुह्यासीं पावला ॥३०॥
नाभी सोल अतिशयेसी । सहस्राब्द बुडता ब्रह्मासीं ।
ठावो न निघे रयासी । होवोनि कासाविसी वरता आला ॥३१॥
तेव्हा श्रीरामे आश्वासोनी । बैसविला कमळासनीं ।
त्यासी चतुःश्लोकी उपदेशूनी । श्रेष्ठ करोनि स्थापिला ॥३२॥
ते श्रीरामाचे नाभिस्थान । बैसला देखे कमळासन ।
त्याचे हृदयीचें महिमान । बोलता मौन श्रुतिशास्त्रां ॥३३॥
ज्याचे हृदयचिदाकाशीं । आकाश हरपे स्वकार्येंसी ।
सिद्ध पावले त्या ठायासी । चिदंशासी एकत्वे ॥३४॥
तेथे अनन्यत्वे मुनिजन । जडोनि जाले अभिन्न ।
तेअंचि हृदयी पदक पूर्ण । गुणेंवीण ल्यालासे ॥३५॥
सूक्ष्म माजाची जी अति थोरी । अभिमान होता केसरी ।
देखोनि राममध्यकुसरीं । लाजें रामभरी ते जाले ॥३६॥
पहावया श्रीराममध्यरचना । अभिमानत्याग पंचानना ।
मेखळा अंगवूनि अंगवणा । मध्यभागी जाणा चित्रत्वें जडले ॥३७॥
जो अपरंपार अनंत । त्यास अनुभवी आकळित ।
तेवी मेखळेमाजि रघुनाथ । दिसे समस्त आकळिला ॥३८॥
जालिया निजवस्तुप्राप्ती । सकळ वृत्ति उपशमती ।
तेवीं क्षुद्रघंटिकांची पंक्ती । जे मेखळेप्रती अधिमुख ॥३९॥
नाना मतांचा जितमेळा । त्याची किंकिणी ज्वाळमाळा ।
यापरी विचित्र लीळा । कटी मेखळा शोभत ॥४०॥
पीतांबराचे उभय भाग । दोन्ही भांगी मुक्तलग ।
तेणे अंगाचा फिटला पांग । अंगींच अव्यंग निजांगशोभा ॥४१॥
ज्याचे पाहता वक्षस्थळ । सबाह्य भरित समूळ ।
तेथे वसती विजनशीळ । जन वन सकळ समसाम्य ॥४२॥
पाहता ज्याचा कंबुकंथ । वेदांची ते वाहती वाट ।
तेथोनिया होती प्रकट । स्वरवर्ण वरिष्ठ मर्यादा ॥४३॥
ॐकारामाजी वर्णव्यक्ती । तेवीं मुखामाजी दंतपंक्ती ।
चौकीचे चारी मिरवती । चिदानंददीप्ती सोलींव ॥४४॥
जीव शिव विभाग जनी । तैसे देखा अधर दोनी ।
ऐक्या आले श्रीराम वदनी । मिनले मिळणीं एकत्वे ॥४५॥
निवटोनियां नास्तिक्य । अवक्र जे का आस्तिक्य ।
तेंचि श्रीरामचे नासिक । शोभेचे बिक शोभवी ॥४६॥
चालता जितुका वाय जाण । तोचि श्रीरामाचा मुख्य प्राण ।
तेंचि वेदाचें जन्मस्थान । त्रिकांड पूर्ण प्रतापें ॥४७॥
चैतन्याचे देखणेपण । त्याच्या डोळा आले शरण ।
देखणे देखे देखणा होऊन । देखणेपण सबाह्य ॥४८॥
स्वानंदे निडारली दृष्टी । चिनात्रैक देखे सृष्टी ।
देखणेपणा आणिली पुष्टी । दृश्य पाठी पोटी द्रष्टाच देखे ॥४९॥
दीपामागें पडसाई । तैशा डोळ्यांमागें भोवई ।
व्यंकटी सांडोनिया पाही । श्रीरामदेही विनटल्या ॥५०॥
जयाची विक्षेपभ्रुकुटी । रची ब्रह्मांडाच्या कोटी ।
तेथेंचि राहे व्यंकटी । अगाध दृष्टो श्रीरामाचा ॥५१॥
पूर्व उत्तर मीमांसा पूर्ण । तेंचि मुख्य श्रीरामश्रवण ।
श्वरणे श्वरणाचें भूषण । जे निज मंडण वेदांता ॥५२॥
कुंडले म्हणती साकार । एक म्हणती मकराकार ।
परी ते सत्यत्वे निर्विकार । श्रवणें विकार नासती ॥५३॥
श्रवणासी संपूर्ण । सावधानता निजभूषण ।
सावधानतेवीण जाण । भूषण ते दूषण श्रवणासी ॥५४॥
श्रीरामाचे निजश्रवण । वेदशस्त्रांसी निज भूषण ।
तेथे रिघो न शके दूषण । पावना पावन श्रीराम ॥५५॥
जैसे अधिष्ठान निर्मळ । तैसे देखा विशाळ भाळ ।
ज्याच्या कपाळावी वेळ सर सकळ वांछित ॥५६॥
उगाळोनि अहंपण । सोहं काढिले शुद्ध चंदन ।
तेंही केले रामार्पण । चंदनाचर्चन लल्लाटी ॥५७॥
आधींच तो घनसावळां । वरी टिळक रेखिला पिंवळा ।
शोभा शोभली कपाळा । सुरांसकळां स्वानंद ॥५८॥
सच्चिदानंद एकमेळी । तैसी लल्लाटींची त्रिगुण त्रिवळी ।
बोधचंदनाचे परिमळीं । पूजिला निर्मळी निजसज्जनीं ॥५९॥
वानू मुकुटाची महिमा । कैंची उपमा निरुपमा ।
मुकुटमणींची गरिमा । नेणे ब्रह्मा आकळू तो ॥६०॥
राम मिरवी लेवूनिइ लेणें । तो श्रीराम लेणियांचे लेणें ।
जेवी सोन सरे सोनटकेपणें । की सोनटका सोनेपणें सर्वत्र असे ॥६१॥
लेणें मिरवे सगुणपण । निर्गुण भूषणाहि भूषण ।
मुळी निर्गुणे शोभे सगुण । जेवी लेणें सुवर्ण एकत्वे ॥६२॥
ऐसिया श्रीरामाच्या पोटी । रामरूप देखे सृष्टी ।
सृष्टी सबाह्य संपुटी । देखे सृष्टी श्रीराम्ं ॥६३॥
ऐसिया देखोनि श्रीरामा । कौसल्येसी आला प्रेमा ।
त्या सुखाच्या सुखसंभ्रमा । देहधर्मा विसरली ॥६४॥
अंग सर्वांगी रोमांचित । स्वेदबिंदू रवरवीत ।
चित्त चैतन्यीं विरमत । नेत्री स्रवत आनंदाश्रू ॥६५॥
स्वानंद न समाये पोटी । सुखोर्मि बाष्प दाटे कंठी ।
उन्मीलित जाली दृष्टी । पडली सृष्टी मूर्छित ॥६६॥
जेंवि केळीतें झगटे पवन । तैसे शरीर कंपायमान ।
वाचेसी पडिले महामौन । देहाभिमान विसरली ॥६७॥
सत्वगुणाचें भरिते भरे । ते आपोआप ओसरे ।
होवोनि सावध चमत्कारें । रामनिर्धारें निर्धारी ॥६८॥
कौसल्येची विनंती व श्रीरामाचे बालस्वरूप :
येणे स्वरूपें रघुनाथा । तुज येथे प्रगट होता ।
माझा पुत्र तू हे कथा । लोकी सर्वथा मानेना ॥६९॥
होईन कौसल्येचा नंदन । ते आठवीं पूर्ववचन ।
ऐकोनि हांसे रघुनंदन । चमत्कारें पूर्ण तुष्टला ॥७०॥
वचन ऐकोनि तत्काळ । श्रीराम स्वये जाला बाळ ।
बालार्कप्रभा सुनीळ । सुखकल्लोळ जननयनां ॥७१॥
भक्त माझे ऐश्वर्यें वोसंडी । परी चरणामृती पडे उडी ।
तेथे कैसी आहे गोडी । ते आवडी चाखों गेला ॥७२॥
चरणकमळींचा अंगुष्ठ । करकमळीं धरोनि स्पष्ट ।
मुखकमळी करिता प्रविष्ट । गोडी उद्भट लागली ॥७३॥
आपुली आपणियां गोडी । स्वभावे फावली धडफुडी ।
तोंडींचा अंगुष्ठ न काढी । चोखी वाफ़डी चुरदुरां ॥७४॥
माझ्या स्वरूपाची गोडी । भक्ती भोगिली धडफुडी ।
चरणामृती सुखाच्या कोडी । चोखी आवडी अंगुष्ठ ॥७५॥
तेंचि लक्षण बालकाचे ठायी । अद्यापि भासतसे पाही ।
निजांगुष्ठ मुखाचे ठायी । चोखी लवलाही स्वानंदे ॥७६॥
सार्वत्रिक आनंद व श्रीरामांचे जातक :
यापरी रघुनंदना । देखोनि बाळभावना ।
कौसल्येसी आला पान्हा । जीवी निंबलोणा करू पाहे ॥७७॥
सुरीं दुंदुभी त्राहाटिल्या भेरी । देव गर्जती जयजयकारी ।
वर्षती सुमनांच्या हारी । चराचरी आल्हाद ॥७८॥
आनंदाचे लवडसवडीं । नारदाची पडे उडी ।
सनकादिकांची आडाडी । स्वानंदे तांतडी नाचती ॥७९॥
सिद्ध आले श्रेष्ठ श्रेष्ठ । ऋषी आले झडझडाट ।
वेद होवोनियां भाट । अति उद्भट वानिती ॥८०॥
योगी संन्यासी घनदाट । पुण्यकाळाचे दाटले थाट ।
तीर्थासी तेथे न फुटे वाट । तिही शरयूतट वसविले ॥८१॥
अयोध्येच्या हाटविदी । स्वये झाडिती महासिद्धी ।
रंगमाळा घालिती सिद्धी । गुढिया समाधी स्वानंदे उभविल्या ॥८२॥
महासामें सुरस गाणीं । चारी मुक्ति त्या नाचणी ।
साही शास्त्रांची पेंखणी । शब्दश्रेणी स्वपक्षे ॥८३॥
धर्माची पहिली पहाट । स्वानंदाची मोकळी वाट ।
सुखाची पिकली पेंठ । समयो श्रेष्ठ साधूनी ॥८४॥
कौसल्येसी पुत्र जाला । स्वधर्में वाधावा आणिला ।
राजा हर्षे निर्भर जाहला । वोसंडला स्वानंदे ॥८५॥
त्राहाटिल्या निशाण भेरी । गगन गर्हे मंगळतुरीं ।
त्रैलोक्य गर्जे जयजयकारी । घरोघरी उल्लासु ॥८६॥
मंगळजळीं निजनिवाडे । राजा स्नान करी वाडेंकोडे ।
तो शिंतोडा लागे जिकडे तिकडे । पूर्वज तिकडे सुखरूप होती ॥८७॥
पूर्वज स्वये सुखी होती । हेंचि आश्चर्य सांतों किती ।
तेणे जळे त्रिजगती । उल्लासती स्वानंदे ॥८८॥
पुत्रानंदे उदार दृष्टी । सवत्स गोधनांच्या थाटी ।
अश्व रथ गज धन कोटी । वांटित्आ सृष्टी मागता सरे ॥८९॥
जन्म पावला रघुनाथ । उदार दाने दे दशरथ ।
मागते मागणें हरपत । होवोनि कृतार्थ मागणें विसरे ॥९०॥
दशरथ म्हणे ये समयी । जो जे मागेल ते देईन पाही ।
तंव मागतेचि जाले नाही । याचकां देही संतृप्ति ॥९१॥
ऐसे श्रीरामपुत्र मुख । देखता रायासी परम हरिख ।
द्विज निर्भर केले देख । तृप्त याचक अति दानें ॥९२॥
श्रीरामाचे जातक । दशरथ करी अलोलिक ।
तंव द्वितीय पुत्राचा हरिख । सद्भावे देख आणिली गुढी ॥९३॥
सुमित्रेची प्रसूती व जन्मोत्सव :
सुमित्रा देखे स्वप्न । मज झाले पुत्ररत्न ।
जागृती पाहे सावधान । तंव पुत्र निधान सेजेसीं ॥९४॥
क्षीरसागरींहूनि निघाला । राम कौसल्यागर्भा आला ।
पाथीचा शेष पाठी पावला । पाठीचा झाला सुमित्र ॥९५॥
श्रीरामासी सुष्ठु मैत्री । चालवील निजनिर्धारी ।
सुमित्र म्हणणे यापती । सुमित्राउदरीं जन्मला ॥९६॥
कौसल्येसी सुष्ठु मित्रा । चालवी यालागी सुमित्रा ।
हाही आला तिच्या उदरा । सुमित्र खरा येणेंही ॥९७॥
लक्ष्मण शेषावतार । अयोनि जन्मला निर्धार ।
तोही नातळे योनिद्वार । जन्मव्यवहार स्वलीला ॥९८॥
ते देखोनि पुत्रवदन । अष्टांगीं पावली समाधान ।
मन जाले आनंदघन । सुमित्रा संपूर्ण सुखरूप जाली ॥९९॥ ॥
यावरी आनंद चढोवढीं । हर्षाचिया लवडसवडीं ।
सद्भावे उभविली गुढी । रायासी आवडी पुत्रसुख सांगे ॥१००॥
द्वितीय पुत्राचा प्रभाव । ऐकोनि सुखें सुखावे राव ।
घेवोनिया ऋषिसमुदाव । जातकार्था पाहो स्वानंदे आला ॥१॥
फोडिली धनाचीं भांडारे । मुक्त केलीं धान्यकोठारें ।
त्यागिली गाईंची खिल्लारे । लुलु दानभारें मूर्छित जाली ॥२॥
याञ्चा बुडाली दानसमुद्रीं । दरिद्र बुडाले दातृत्वपूरीं ।
माग त्यांचा दुष्काळ नगरी । घरोघरी आनंद ॥३॥
कैकेयीस पुत्रप्राप्ती :
कैकेयी पुत्रवंती दो पुत्रीं । तिची प्रसूतीची थोरी ।
अतिशयेंसीं नवलपरी । निजनिर्धारी अवधारा ॥४॥
कैकेयीसी लागली सुषुप्ती । पुत्र जन्मले कैशा रीती ।
त्या पुत्रजन्माचे एख्याती । तिसी ते स्थिती अलक्ष ॥५॥
एक श्रीरामाचा भाग । एक लक्ष्मणाचा विभाग ।
दोन्ही लीलाविग्रही सांग । योनीचें अंग नातळती ॥६॥
सख्या प्रबोधिती कैकेयीसी । दोघे पुत्र जन्मले कुशी ।
तुझी झोंप ऐसी कैसी । पुत्रसुखासी अनोळख ॥७॥
कैकेयी पाहे पुत्रमुख । हृदयी वोसंडेना हरिख ।
सापत्नभावाचें सुख । लोकदृष्टी देख पावती जाली ॥८॥
पूर्ण कळवळा नाही मना । स्वानंदस्नेह नयेचि पान्हा ।
दाईच्यापरी स्तनपाना । लाविले स्तना पुत्र दोनी ॥९॥
सपिंडगर्भ तिचा नव्हे । परभाग गर्भे सापत्नमाये ।
तिचे स्तनपान पाहे स्वभावे दाही हे जाली ॥११०॥
पुढे सहजचि सापत्न । पुत्र नायकती तिचे वचन ।
पुत्रांचे निजसमाधान । कैकेयी जाण पावेना ॥११॥
कैकेयीची गर्ब्घस्थिती । पुत्रद्वयाची उत्पत्ति ।
यापरि जाली प्रसूती । वाधावा रायाप्रति धाडिला तिणे ॥१२॥
स्नेहाचिया लवडसवडी । सकामकामाचिया आवडी ।
पुत्रद्वयाची गर्वगोडी । कैकेयी धाडी रायापासी ॥१३॥
पुत्रद्वयाचें प्रिय जन्म । तेणे रायासी सुख परम ।
उदार हस्ते करोनि धर्म । जातककर्म तेणे केले ॥१४॥
पुत्रचतुष्टयाची दशरथाला प्राप्ती :
जेंवि का चारी पुरुषार्थ । एके काळे घरा येत ।
तेंवि चारी पुत्र दशरथ । जाले प्राप्त समकाळे ॥१५॥
चहू मुक्तींचे सुख एक । तेचि चतुर्विध होवोनि देख ।
दशरथासी द्यावया सुख । चारी अलौलिक पुत्र जन्मल ॥१६॥
सच्चिदानंद तिन्ही जाण । तिहींचे प्रकाशक वस्तु चिद्वन ।
तेंवि चारी पुत्र परिपूर्ण । आवला आपण स्वये राव ॥१७॥
प्रणव तेचि वेद चारी । तेवी एक वस्तु चौ प्रकारीं ।
पुत्रत्वें दशरथाचे घरी । सुखकारी सर्वांसी ॥१८॥
एक सुख नित्य निश्चिती । त्यासी बहुविध चतुष्ट्य म्हणती ।
तेचि हे चारी मूर्ति । पुत्र सुखार्थी दशरथ ॥१९॥
जो सकळ जगाचा निज विश्राम । सकळ सुखाचा आराम ।
जो निष्कामाचा पूर्णकाम । तो श्रीराम दशरथात्मज ॥१२०॥
सकळ लक्ष्यां आलक्षण । जो सकळ लक्षणीं संपूर्ण ।
तोचि तो लक्ष्मण जाण । सुमित्रानंदन दशरथात्मज ॥२१॥
ज्याने सकळही पदार्थ । सदासर्वदा संपूर्ण भरित ।
ते वस्तूसी म्हणती भरत । कैकेयीसुत दशरथात्मन ॥२२॥
मनुष्य शत्रूचे हनन । त्करी तो अल्प शत्रुघ्न ।
भवशत्रूचे निर्दळण । करी तो शत्रुघ्न दशरथात्मज ॥२३॥
कनिष्ठ कैकयीचे नंदन । त्यांचे नाम भरत शत्रुघ्न ।
वसिष्ठें केले नामाभिधान । चौघे जण दाशरथि ॥२४॥
चारही पुत्रांचे नामकरण :
श्रीवसिष्ठें आवश्यक । केले चौघांचे जातक ।
जन्मपत्रिका केली देख । नामनिर्दोष जगद्वंद्य ॥२५॥
यापरि श्रीराम आणि लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न ।
चौघे दशरथनंदन । नामाभिधान जगद्वंद्य ॥२६॥
यापरी श्रीरामाचे जन्म । सांगितला अनुक्रम ।
निरूपिले जन्मकर्म । चरित्रानुक्रम अवधारा ॥२७॥
येथोनि श्रीरामाचे चरित्र । अगाध अनुपम्य पवित्र ।
धन्य वाल्मीकीचे वक्त्र । कथा पवित्र शतकोटी ॥२८॥
एका जनार्दना शरण । पूर्ण जाले जन्मकथन ।
पुढे स्वानंदनिरूपण । श्रोती अवधान मज द्यावे ॥१२९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
श्रीरामजन्मप्रसंगनिरूपणं नाम षष्ठोऽध्यायः ॥६॥
॥ ओंव्या १२९ ॥
