वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › १. बालकाण्ड - अध्याय २७ › २१. दशरथाचे मिथिलेस आगमन

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088267 · अभंग क्र. २०

20.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय विसावा ॥
श्रीराम-सीता विवाह

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रामाविषयी सीतेची उत्कंठा :

श्रीरामाचे पूर्णपण । रूपरेखागुणलावण्य ।
देखोनि सीतेचे वेधले मन । सर्वथा आन नावडे ॥१॥
सांडोनिया चम्द्रामृत । चकोर अन्य न सेवित ।
तेंवी सांडूनि रघुनाथ । सीतेचे चित्त आन न मानी ॥२॥
जनकें देखोनिया रघुनाथ । चित्ती आल्हाद अत्यंत ।
जानकी द्यावी निश्चितार्थ । साशंकित धनुष्यार्थीं ॥३॥

श्रीरामांना पाहून सभाजनांची अनेकविध अवस्था :

सभास्थियांचे नयन । रामरूपी अति निमग्न ।
रावनासी पडले मोहन । तटस्थ जन श्रीरामे ॥४॥
श्रीराम देखोनि ऋषिपंक्तीं । अवघे आश्चर्य मानिती ।
सीता द्यावी रघुपतिप्रती । मानले चित्ती सर्वांसी ॥५॥
पुढील कार्य अति कढीण । केंवी धनुष्यासी वाहील गुण ।
कळवळती सकळ जन । चाप बंधन लग्नासी ॥६॥
सत्य सीतेचा भावार्थ । राम अंतर्यामी समर्थ ।
करावया सकळांचे मनोगत । चापभंगार्थ चालिला ॥७॥
मागे ठेवोनि लक्ष्मण । राम चालिला सत्राण ।
देखोनि दचकला रावण । हा धनुष्य गुण वाहील ॥८॥
हा तंव दिसताहे बाळक । याचा पराक्रम अलोलिक ।
घाये मारीचास लाविली शीक । मारिला निःशेष सुबाहू ॥९॥
म्लान देखोनि दशवक्त्रा । उल्लास थोर विश्वामित्रा ।
वेगु करी रामचम्द्रा । धनुर्धरां लाजवीं ॥१०॥

उपस्थितांना वंदन करून राम धनुष्याकडे जातात :

तेणे हरिखला रघुनंदन । विश्वामित्रा केले नमन ।
द्विजांचे घेवोनि आशीर्वचन । दिधला सन्मान सभेसी ॥११॥
जनक अतिशये सज्जन । रामे< त्यासी केले नमन ।
बाहूंसी आले स्फुरण । चापग्रहण करावया ॥१२॥
हेळसोनि सभा समस्त । मी एक सामर्थ्ये समर्थ ।
रावणाऐसा अति गर्वार्थ । श्रीरघुनाथ न करीतसे ॥१३॥
देवोनि सकळांसी सन्मान । वृद्धवृद्धां करोनि नमन ।
अति विनीत रघुनंदन चापग्रहण करू आला ॥१४॥

धनुष्याची तपस्या :

धनुष्यी अत्यंत जडपण । तेंही सांगेन मी निरूपण ।
श्रोती द्यावे अवधान । पूर्वलक्षणपर्यावो ॥१५॥
चाप सदाशिवाचे हाती । त्यासी जडत्वा शिवशक्ती ।
चापे चापजडत्वप्राप्ती । जे बोलती ते महापापी ॥१६॥
चाप अति दुष्ट निर्दळी । ते पाप नये चापाजवळी ।
शिवरामनामे पाप जाळी । मग निर्दळी दुष्टाते ॥१७॥
चापे केले बहुत तप व्रत । म्हणोनि पावले शिवाचा हात ।
शिवहस्तें अति पुनीत । यालागी रघुनाथ हाती धरी ॥१८॥
शिवाचें शिवचाप अपूर्व । ते केवी उचलू शकती जीव ।
तेथे अधिष्ठानें वसे शिव । चापी जडभाव शिवशक्तीं ॥१९॥
शास्त्रमर्यादा ते ऐसी । जो जड तोचि पापराशी ।
ते जडत्व नाही चापासी । धन्यत्व त्यासी शिवशक्तीं ॥२०॥
धनुष्य उचलितां रावण । चापीं प्रवेशे त्रिनयन ।
तेणे तो अपमानिला पूर्ण । चापी जडपण शिवशक्तीं ॥२१॥
कोदंडाचा निजभावार्थ । शिवहस्तें मी अति पुनीत ।
श्रीरामहस्तें परममुक्त । होईन निश्चित स्वयंवरी ॥२२॥
राम सदा शिवाते ध्याय । शिव वंदी श्रीरामपाय ।
तेणे चापाचे जडत्व जाय । पुष्पप्राय ते जाले ॥२३॥
असो हे धनुष्याची कथा । स्वयंवरीं वरावी सीता ।
हेंचि कार्य रघुनाथा । तत्कार्यार्था चाप पाहे ॥२४॥

एका दृष्टिक्षेपात धनुष्याच्या शक्तीचे श्रीरामाकडून हरण :

रामे अवलोकिता चाप । चाप जाले निष्पाप ।
हरला जडजाड्यसंताप । स्वये सुखरूप उचलले ॥२५॥
श्रीराम पाहे जयाकडे । त्याचे आकल्प जडत्व उडे ।
तेथे काय धनुष्य बापुडे । जडत्व पुढे उरावया ॥२६॥
श्रीराम म्हणता वाचे । जड संसार तरती साचे ।
दर्शन जालिया त्या रामाचे । जडत्व कैचें धनुष्यासी ॥२७॥
चापासी उपजे अनुताप । ऐसा श्रीरामप्रताप ।
अनुतापे जडत्व गेले पाप । रामे सकृप पाहिले ॥२९॥
यापरी श्रीरघुनाथें । अवलोकोनि धनुष्यातें ।
आकळिले वामहस्ते । सज्ज त्वरिते करावया ॥३०॥

विश्वामित्रस्तु धर्मात्मा श्रुत्वा जनकभाषितम् ।
अभ्यभाषत काकुत्स्थं प्रहृष्टेनांतरात्मना ॥१॥

श्रीरामांची कुमारावस्था पाहून जनक साशंक :

धनुष्य श्रीरामे धरिता हाती । थोर आशंका जनकाचे चित्ती ।
तो येवोनि मुनीप्रती । अति काकुळती बोलत ॥३१॥
राजा म्हणे महाऋषी । राम सौकुमार्याची राशी ।
जेणे घोळशिलें रावणासी । ते चाप यासी केंवे सज्जे ॥३२॥

विश्वामित्रांचे जनकाला आश्वासन :

ऐकता रायाचे शंकावचन । विश्वामित्र निःशंक पूर्ण ।
काय बोलिला गर्जोन । सभेचे जन ऐकता ॥३३॥
ऐके बापा रघुनंदना । पुरुषामाजीं पंचानना ।
धनुष्य चढवी आंगवणा । सावधाना निजवृत्ती ॥३४॥
तू तंव पुरुषार्थीं रघुनाथ । धनुष्य वाहावें निमेषार्धांत ।
जनकजानकींचा मनोरथ । कृतकार्यार्थ करावा ॥३५॥

श्रीरामाचा आत्मविश्वास :

ऐकोनि सद्‌गुरूचें वचन । धनुष्य पाहे रघुनंदन ।
वामहस्तें आकळून । चढवावया गुन सज्ज जाला ॥३६॥
राम म्हणे ऋषीप्रती । तुझिया वचनें कृपाप्राप्ती ।
धनुष्य वाहणें कार्य किती । वृथा कुंथती नरवीर्य ॥३७॥
हे शंकराचे दिव्य चाप । गुण वाहणे कार्य अल्प ।
आता पहा माझा प्रताप । करीन आरोपण शराकर्षणेंसीं ॥३८॥

बाढमित्यब्रवीत् राजा मुनिश्च समभाषत ।
लीलया स धनुर्मध्ये जग्राह वचनान् मुनेः ॥२॥
पश्यतां न्रुसहस्राणां बहूनां रघुनंदनः ।
आरोपयत्स धर्मात्मा सलीलमिव तद्धनुः ॥३॥

ऐसे बोलता रामचंद्र । हर्षे उल्लासे विश्वामित्र ।
म्हणे धन्य धन्य तुझे वक्त्र । तू प्रतापसमुद्र रविवंशी ॥३९॥

श्रीरामांनी एका हातानेच धनुष्य उचलले :

तुझिया वचनासाठी । मज दिधलिया अयुतकोटी ।
म्हणोनिया पाठी थापटीं । धनुष्य मुष्टी आकर्षीं ॥४०॥
जनक म्हणे रघुनाथा । मजही ऐसा भ्रम होता ।
हरधनुष्य आकळिता । वीर सर्वथा असेना ॥४१॥
तो त्वा वाढिवेचा माथा । उजळ केला सभेदेखतां ।
किती वानू पै पुरुषार्था । धन्य रघुनाथा वाढिव ॥४२॥
बोलिलासी प्रताप गरिमा । ते सत्य करावी श्रीरामा ।
संपादीं शीघ्र चापकर्मा । पुरुषोत्तमा रघुवीरा ॥४३॥
गुरुश्वशुर उभयवचन । ऐकोनिया रघुनंदन ।
धनुष्यी वाहावया गुण । चाप संपूर्ण आकळिले ॥४४॥
अति अतुर्बळी रघुनाथ । न लाविता दुसरा हात ।
एकेंचि हातें वाहिलें शीत । जाले विस्मित सुरासुर ॥४५॥
चाप टणत्कारितां करतळी । नांदे रावणा दांतखिळी ।
राजे मूर्छित भूतळें । बैसली टाळीं दिग्गजांची ॥४६॥
धनुष्य ओढिता पूर्ण कानाडी । अति कडाडी भंगलें ॥४७॥

धनुर्भंगाच्या प्रचंड आवाजानें भयावह परिणाम :

नादाचेनि घन घर्घरारी । बैसलीं वीरांची दांतेरी ।
कीरकरोनि वाजिकुंजरीं । उभी शरीरें उलंडलीं ॥४८॥
धनुर्भंगाचे कडकडाटी । नादे दुमदुमिली सृष्टी ।
तडा पडूं पाहे मेरुपृष्टीं । निमटे दृष्टी काळाची ॥४९॥
कोटिविजू तुटोनि पडे । चाप कडाडी तेणे पाडे ।
सुर नर किन्नर जाले वेडे । वायु उडे तेणे नादें ॥५०॥
नादाचिये अत्यंत प्रौढी । पृथ्वी गेली चिरढोविरढी ।
नभी नक्षत्रां पातझाडी । पदिली बुदीं डळमळिता ॥५१॥
उद्‌भट नादाची गति कैसी । पक्शी विसरले पळावयासी ।
भ्रमे भ्रमती ते आकाशी । गति सर्वांची खुंतली ॥५२॥
काळे प्राण्यांचा घ्यावा प्राण । काळ् पळाला नादाभेणें ।
आता येथे मारिता कोण । काळा आकर्षण श्रीरामे ॥५३॥
ऐसी दडपलीं सप्त पाताळें । उचंबळलीं समुद्रजळें ।
शेषशयन पै आंदोळे । मेरु कुळाचळें पै कांपती ॥५५॥
दिवि कंप भूमिकंप । सत्यलोकी चळकांप ।
रामे भंगिले शिवचाप । अति प्रताप तिही लोकी ॥५६॥
जनक आणि विश्वामित्र । राम आणि सुमित्र ।
यांचेचि सावधान नेत्र । येर सर्व मूर्छित ॥५७॥
या चौघांही वेगळी । सावधान पाहे जनकबाळी ।
देखोनि रामप्रताप बळी । उताविळी वरावया ॥५८॥
शिवचापाचें मनोगत । रामहस्तें मी परम मुक्त ।
कडकडाट नव्हे व्यर्थ । चाप गर्जन स्वानंदे ॥५९॥
आनंदनाद अति उद्भ्ट । नादें दुमदुमिले वैकुंठ ।
तेणे कोंदले कैलासपीठ । नादें नीळकंठ डुल्लत ॥६०॥
चापनिर्मुक्त आनंदगहिंवर । तेणे उलथला क्षीरसागर ।
शेषशयना आनंद फार । स्वर्गी जयजयकार देवांचा ॥६१॥
रापप्रताप आनंदद्वारा । अकार उकार मकारा ।
आनंद कोंदला अर्धमात्रा । राया रघुवीरप्रतापें ॥६२॥
लागता श्रीरामाचा हस्त । शिवचाप झाले परम मुक्त ।
तोही मुक्तीचा अर्थ । श्रीरघुनाथप्रतापें ॥६३॥
लागता श्रीरामाचे चरण । सद्यःमुक्त होती पाषाण ।
त्याचेनि हस्ते चापग्रहण । मुक्ति संपूर्ण श्रीरामे ॥६४॥
शिवचापा परम मुक्ती । जनकसंशया विनिर्मुक्ती ।
जानकीलोचना नित्यतृप्ती । ते श्रीराममूर्ति स्वयंवरी ॥६६॥
रावण गर्वाची निर्मुक्ती । आशापाशनिःशेषनिवृत्ति ।
राजाभिमाना नित्यमुक्ती । ते श्रीराममूर्ति स्वयंवरीं ॥६७॥
वेदानुवादा वचनामुक्ती । शास्त्रानुवादा युक्तिप्रयुक्ती ।
जानकीलोचन दृश्यनिर्मुक्ती । ते श्रीराममूर्ति स्वयंवरीं ॥६८॥
जनसमुदाया संदेहनिर्मुक्ति । सुररमुदाया बंधमुक्ति ।
भक्तसंतापनिजात्ममुक्ति । ते श्रीराममूर्ति स्वयंवरी ॥६९॥

सीतेची मनःस्थिती :

श्रीरामप्रतापाचा सोहळा । देखावया भाग्य कैचें सकळा ।
अंध पडिले त्यांच्या डोळा । जनकबाळा सुख भोगी ॥७०॥
श्रीरामसुखाचा सोहळा । देखोनि जानकी निवाली डोळा ।
त्याचे कंठी घालावया माळा । उताविळी भावार्थे ॥७१॥
चापभंगाचे नाद कोटी । शनैः शनैः शमले नभाचें पोटी ।
चेतनोपलब्ध जाली सृष्टी । उघडली दृष्टी जनांची ॥७२॥
जन जाले सावधान । सभा बैसली स्वस्थस्थान ।
देखोनिया धनु भग्न । विस्मीत मन सर्वांचे ॥७३॥
गेला जनकाचा संदेहो । राम अतुर्बळी महाबाहो ।
जाला सर्वार्थीं निःसंदेहो । जाणोनि राव बोलत ॥७४॥

जनकाचे धन्योद्‌गार :

जनक अत्यंत उल्लासेंसी । हरिखे बोले विश्वामित्रासी ।
राम दाशरथि सूर्यवंशी । पूर्वी बहुता ऋषीं सांगितले मज ॥७५॥
निजतेजें अत्यद्ऽऽभुत । अचिंत्यानम्त अति समर्थ ।
दृष्टी देखिले इत्यंभूत । प्रतापवन्त श्रीराम ॥७६॥ ॥
जेणे शिवाचे कोदंड । अवलीळा केले दुखंड ।
श्रीरामप्रताप प्रचंड । काळे तोंड रावणाचे ॥७७॥
पूर्ण न भरता कानाडीं । हरचाप भंगलें कडाडीं ।
त्याच्या प्रतापाची प्रौढी । कोणे केवढी वानावीं ॥७८॥
जनककुळींची कुळात्मजा । होईल श्रीरामाची भाजा ।
तेणे वंश सार्थक माझा । हा धर्म तुझा ऋषिवर्या ॥७९॥
विश्वामित्र तू धर्मात्मा । तुझेनि धर्मे भेटी श्रीरामा ।
तुझेनि निष्कृति सर्वा कर्मां । राम परमात्मा मज सुहृद ॥८०॥
तुझे रूढ नाम विश्वामित्र । परी तू माझा परम मित्र ।
राम परमात्मा परम पवित्र । सुहृद स्वतंत्र त्झेनि ॥८१॥
माझा पूर्वकृत संकल्प । सीता अमूल्य प्रतापचाप ।
तो त्वा केला निर्विकल्प । सत्यसंकल्प श्रीराम ॥८२॥
स्वयंवरीचा पण कठीण । राज भंगले सहरावण ।
त्यासी श्रीरामे वाहिला गुण । सीतावरण प्रतापीं ॥८३॥
सीतेसी श्रीराम भ्रतार । कार्यकरिता विश्वामित्र ।
भलें जाणसी ब्रअह्मसूत्र । अति पवित्र ऋषिवर्या ॥८४॥
विश्वामित्राचे चरणी माथा । ठेवोनि जनक होय बोलता ।
प्राणापरीस पढियंती सीता । ते म्या रघुनाथा अर्पिली ॥८५॥
आजि माझा याग सफळ । आजि माझे पावन कुळ ।
आजि सीतेचे भाग्य अनुकूळ । सुखकल्लोळ श्रीरामे ॥८६॥
माझी कन्या अगुण सगुण । सीता केली रामार्पण ।
विश्वामित्रा तू सज्ञान । वेगी लग्न लावावें ॥८७॥
ऐसी जनकाची विनवणी । विश्वामित्रें ऐकोनी ।
बरवे म्हणोनि प्रतिवचनी । उल्हासोनी बोलिला ॥८८॥

सीतेकडून रामाला माळ समर्पण :

ऐकोनि ऋषिरायाची गोष्टी । सीतागज प्रेरिला घडघडाटीं ।
माळा घालावया श्रीरामकंठीं । आली गोरटी उल्लासें ॥८९॥
जे सीतेचे मनी होते । तेंचि केले रघुनाथे ।
वेगी वरावया त्याते । आनंदे अदभुतें पै आली ॥९०॥
घेवोनि चिद्रत्नांुची माळा । आनंदे आली जनकबाळा ।
देखता सकळिका भूपाळा । घाली गळा श्रीरामाच्या ॥९१॥
होता डोळियां डोळेभेटी । लाज विराली उफराटी ।
आनंदें वोसंडली सृष्टी । सुटल्या गांठी चहू देहा ॥९२॥
सवेंचि पाहे सावधान । डोळियां डोळे जाले वरण ।
प्राणें प्राणा परिणयन । लागले लग्न जीवी शिवा ॥९३॥
चापे वीराभिमाना अस्तु । मध्यान्हीं तपे आदित्यु ।
सीता वरावया रघुनाथु । आला अभिजितु सुमुहूर्ती ॥९४॥
लग्नघटिला पाहे भास्वत । वाचा राहिल्या निजमौनांत ।
स्वबोध सावधान सांगत । काळ सावचित दोही भागीं ॥९५॥
धनुर्भंगाच्या गजरांत । अंतःपट निर्मुक्त ।
भावार्थ ॐपुण्या सांगत । वेगी रघुनाथा वरावया ॥९६॥
ऐसा समय साधूनि उचित । सांडोनि उभयपक्षार्थ ।
करोनि अभिमानाचा अंत । सीता रघुनाथ वरियेला ॥९७॥
येरयेरा पाहता अतिप्रीतीं । सुटल्या चिदचिन्महाग्रंथी ।
निजाइक्याच्या बहुल्याप्रती । दोघे बैसती एकात्मता ॥९८॥
वोहरें पाहता परस्परां । नोवरीमाजी दिसे नोवरा ।
नोवरियाआंगी दिसे सुंदरा । वरिलें वरा या स्थिती ॥९९॥
सीता श्रीरामी घालिता माळा । तेचि क्षणी त्याचि काळा ।
रावणा वरिले अवकळा । निढळीं टिळी काळिमेचा ॥१००॥
अवकळां बैसतांपाठीं । रावण अपमानिला सृष्टी ।
रामप्रताप देखता दृष्टी । रावणाच्या पोटी धुकधुक ॥१॥

इतर उपस्थितांना परमानंद :

विजयी जाला रामचंद्र । हरिखें नाचे विश्वामित्र ।
घेवोनि ऋषींचा संभार । तृप्तितत्पर स्वानंदे ॥२॥
एक रोकडे एक बोडके । एक ते कवळ सुडके ।
अवघे नाचती हरिखें । सीता रघुटिळकें पर्णिली ॥३॥
आनंदे नाचती आघवे । झेलिती गोपी चम्दनाचे रवे ।
घोत्रे झेलिती घदिपालवे । सीता राघवें पर्णियेली ॥४॥
एक ओंवाळिती अंगवस्त्रें । एक ओंवाळिती जुनी ध्त्रें ।
एक ओंवाळिती दर्भपवित्रें ।सीता रामचम्द्रें जिंकिली ॥५॥
एक ओंवाळिती कौपीन । एक ओंवाळिती कुशासन ।
एक ओवाळिती कृष्णाजिन । रघुनंदन निजविहयी ॥६॥
मंत्री गर्जती ऋषीश्वर । सुरवरी जयजयकार ।
सुमनांचे वर्षती संभार । रामचम्द्र निजविजयी ॥७॥
सुखाचिया अति तांतडी । देव उठिन्नले लवडसवडी ।
उभविती हरिखाची पै गुढी । राम बांधवडी सोडवील ॥८॥
जनकाच्या महाद्वारीं । त्राहाटिल्या निशाणभेरी ।
गगन गर्जे मंगळतुरीं । जयजयकारीं निजगजरें ॥९॥
विश्वामित्रें उल्लासता । रथी वाहोनिया रामसीता ।
भेटावया दशरथा । होय निघता सवेग ॥११०॥
सीता जिंकिली आपण । उल्लासें नाचे लक्ष्मण ।
अश्ववाग्दोर धरोनि पूर्ण । रथारोहन तेणे केले ॥११॥
विश्वामित्राचे अधीन । श्रीरामसीतेचें गमन ।
देखोनि जनक झाला लीन । घाली लोटांगण ऋषिराया ॥१२॥
विश्वामित्रा तू गुरुत्वे पूर्ण । स्वयंवरें केले सीतावरण ।
आता करावे पाणिग्रहण । विधियुक्त लग्न ऋषिवर्या ॥१३॥
जनक म्हणे विश्वामित्रा । उभयपक्षीं तू सोयरा ।
जाणोनि शास्त्रविचारा । येथे वधूवरा राहवावें ॥१४॥
जनकाची निजकांता । सुमेधा सती पतिव्रता ।
तीही पाहूण् धांवें रघुनाथा । वामांगी सीता बैसवोनी ॥१५॥
आणावें दशरथ भूपाळा । करावा सम्भ्रमें सोहळा ।
सुख द्यावे दोही कुळां । ऋषिनिर्मळा कृपाळुवा ॥१६॥
ऐकोनि जनकाची विनंती । कौशिक सुखावला चित्ती ।
राहविला सीतापती । ऋषिपंक्तिसमवेत ॥१७॥
धनुर्भंगें सीतावरण । समूळ जाले निरूपण ।
आता रामसीतापाणिग्रहण । लग्नविधान अवधारा ॥१८॥
एकाजनार्दना शरण । प्रकृतिपुरुशां पाणिग्रहण ।
पुढे रसाळ निरूपण । श्रोते सज्ञान परिसोत ॥११९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
धनुर्भंगसीतावरणं नाम विंशतितमोऽध्यायः ॥२०॥
॥ ओव्या ११९ ॥ श्लोक ३ ॥ एवं १२२ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग