वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › १. बालकाण्ड - अध्याय २७ › १. मंगलाचरण व रामकथेचा महिमा

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088265 · अभंग क्र. १

1.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
बालकाण्ड
॥ अध्याय पहिला ॥

॥ श्रीसद्‌गुरवे रामचंद्राय नमः ॥

जातो वंशे रघूणां मुनिवरवचनात् ताटकां ताडयित्वा
कृत्वापुण्यामहल्यां त्रुटितहरधनुर्मैथिलावल्लभोऽभूत् ।
प्राप्यायोध्यां नियोगात् पितुरटविमगात् नाशयित्वा च वालिं
बध्वाब्धिं रामचंद्रो दलितदशमुखः सीतया युज्यमानः ॥१॥
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥२॥

श्रीगणेश वंदन

ॐ नमो अनादि आद्या । वेदवेदांतवेद्या ।
वंद्यांही परमवंद्या । स्वसंवेद्या श्रीगणेशा ॥१॥
तुझे निर्धारतां रूप । केवळ अरूपाचे स्वरूप ।
तेथे अवयव कल्पितां अमूप । तंव कल्पनेचा लोप । स्वरूपीं तुझ्या ॥२॥
यालागी जैसा अससी तैसियासी । नमन साकार निराकारासी ।
तंव अंगत्व मुकले अंगासी । भज्यभजकासी अद्वैत ॥३॥
ज्ञानतेजें सतेज फरश । नित्यस्मरणाचा अंकुश ।
आनंदमोदकाचा सुरस । मुखी देसी घांस निजभक्ता ॥४॥
ऐसे ऐकोन स्तवन । संतोषला गजानन ।
माझे वसवूनियां वदन । वक्ता वचन स्वये झाला ॥५॥
ऐसा जाला सुप्रसन्न । तेणे विघ्नचि केले निर्विघ्न ।
उन्मेखेंसीं बोलिला आपण । भावार्थरामायण चालवी वेगी ॥६॥

श्रीसरस्वती वंदन

आता वंदूं सरस्वती । जे चित्तचेतना चैतन्यशक्ती ।
जे सकळ स्फूर्तीची स्फूर्ती । अमूर्ताची मूर्ति स्वरूप जिचें ॥७॥
हंसवाहिनी हा शब्द रूढ । परी ते परमहंसी आरूढ ।
गुह्यार्थ जे अति गूढ । ते दावी उघड ग्रंथार्थी ॥८॥
परमहंस अंशाअंशी । शोभा शोभे अहर्निशी ।
सत्त्वातीत शुद्धतेसीं । तोचि निजांगासी शुभ्रवर्ण ॥९॥
ॐकार तो तिचा वीणा । त्रिमात्रा तिन्ही तंती गहना ।
वेदोपनिषद पुस्तक जाणा । अर्थवी अर्थना परमार्थता ॥१०॥
ऐसी अगाधत्वे अति सुंदर । प्रभा परमार्थै मनोहर ।
जेणे प्रकाशे चराचर । तो मिथ्या जगडंबर स्वप्रभा करी ॥११॥
ऐसी ऐकोनी स्तुती । सुप्रसन्न सरस्वती ।
स्वभाएंतिची वदनी वस्ती । या वचनोक्ती ते वदवी ॥१२॥
ते म्हणे गा रामकथेतें वेगी चालवी भावार्थे ।
सद्‌भावे होईल सरतें । प्रिय संतांतें मी करीन ॥१३॥

श्रीसंत वंदन

आता वंदूं संतसज्जन । जे आर्तचातकां चिद्‌घन ।
त्रिविध तापां उपशमन । जे निजजीवन साधकां ॥१४॥
ज्यांची सहज झाल्या संगती । सकळ कर्मां होय निवृत्ती ।
स्वधर्म सच्छांती येती । भावार्थे प्राप्ती परमार्था ॥१४॥
सत्संगाचे निजमेळीं । परमार्थ जाय पाल्हाळीं ।
लगडोनि ये स्वानंदफळीं । सर्वकाळी सफळित ॥१६॥
बीजत्वाचा ना फेडिजे देंठ । आदि मध्य नाकळे शेवट ।
स्वानंद रसाळ फळघोंट । अनुभव स्पष्ट सत्संगें ॥१७॥
ऐसिया संतांचे महिमान । आकळे ऐसे कैंचें ज्ञान ।
बालत्वें वोलिलो ते न्यून । द्यावे अवधान कथेसी ॥१८॥
ऐसे ऐकोनि वचनस्तवन । सुखावले संतसज्जन ।
तुझे मनोगतीं आमुचे मन । सदा सावधान ग्रंथार्थी ॥१९॥
आम्हांसी आवडे रामकथा । तेथेंही तू रसाळ वक्ता ।
तरी स्तुती सांडोनि आता । वदे ग्रंथार्था अर्थान्वयें ॥२०॥

श्रीकुलदेवता वंदन

आता वंदूं कुळदेवतां । जे नामरूपें एकनाथा ।
एकपणादेही माथा । नांदवी निजभक्ता निजान्वयें ॥२१॥
ऐकोनि सद्‌गुरूची बोली । बोधपरशुरामे निवटिली ।
अनेकत्व सोडोनि वहिली । स्वये उठली एकत्वे ॥२२॥
ते एकरूपें एकनाथा । मूळान्वयें कुळदेवतां ।
एकाकारावांचूनि सर्वथा । द्वैताची कथा करू नेदी ॥२३॥
एकपणजनीं वनी । एकपण मनी नयनी ।
एकपण त्रिभुवनी । नांदवीं म्हणोनि कुळदेवाअ ॥२४॥
ब्रह्मा आणि हरि हर । त्रिगुणी तेन्ही अवतार ।
मी त्रिगुणांच परी प्रियकर । केलों साचार एकात्मता ॥२५॥
ब्रह्मा आणि हरि हर तियेचें खेळणें जगडंबर ।
मज खेळावया चिदंबर । देवोनि प्रियकर कुळदेव्या केलों ॥२६॥
ते जय जय जगदंबा । उदो म्हणे ग्रंथारंभा ।
श्रीरामकथेची शोभा । अति वल्लभा मजलागी ॥२७॥
तेंचि भावार्थरामायण । तुज करिता निरूपण ।
न्यून ते ते करीन पूर्ण । कथा संपूर्ण संपादी ॥२८॥

श्रीसद्‌गुरु वंदन

आता वंदूं सद्‌गुरू । जो स्वानंदबोधवज्रपंजरू ।
ज्याचेनि हा संसारू होय सुखकरू तरणोपाया ॥२९॥
जेणे कस्तकीं ठेवितां हात । अहंभावा होय घात ।
सोहंभाव होय प्राप्त । दावी अप्राप्त अद्वयानंद ॥३०॥
जन तोचि जनार्दन । जनार्दन सकळ जन ।
एका जनार्दना शरण । मीतूंपण विरालें चिदन्वयें ॥३१॥
जनार्दना पढिये एकपण । एका पढिये जनार्दन ।
स्वरूप एक नामे भिन्न । अनन्य शरण या नांव ॥३२॥
जनार्दन माझे मन । जनार्दन माझे नयन ।
जनार्दन वदते वदन । वक्ता वचन श्रीजनार्दन ॥३३॥
जनार्दन गतीची गती । जनार्दन मतीची मती ।
जनार्दन स्फुरे स्फूर्तीं । सकळ व्युत्पत्ति जनार्दन ॥३४॥
निजांगें जो सकळ जन । यालांगी नांवे जनार्दन ।
लिंगदेहा करी मर्दन । यालांगी जनार्दन व्युत्पतिव्याख्या ॥३५॥
येथे तो कर्ता मी अकर्ता । हेंही बोलणें अति मूर्खता ।
मी कर्ता तो अकर्ता । हे परम मूर्खता सोलींव ॥३६॥
यापरी मीतूपण । दूरी दवडो जनार्दन ।
बोलवी भावार्थ रामायण । कथानिरूपण चालवी ॥३७॥

रामायणाचे मूळ कारण

अजापास्नि उत्पत्तिजेत । दशेंद्रियें अति समर्थ ।
जन्मला राजा दशरथ । अतिविख्यात तिही लोकी ॥३८॥
मूळचे अजत्व लोपोनि चृष्टी । अजन्मा राम जन्मेल पोटी ।
हे रामायणींची मूळ गोष्टी । शास्त्रपरिपाठी परमार्थ ॥३९॥
रावणाचे नित्यांकित । सुरवर झाले जी समर्थ ।
ब्रह्मादिका चिंता अद्‌भुत । तिही रमानाथ प्रार्थिला ॥४०॥
करावया राक्षसांचा घात । मी अवतरेन रघुनाथ ।
रमा मुख्य कलहा हेत । इचेनि अंत निशाचरां ॥४१॥
तुम्ही सकळही सुरवर । वेगी व्हावे वानर ।
आम्ही दोघें धरोनि अवतार । सत्य करू वचनार्थ ॥४२॥
फेडावया देवांची सांकडी । स्वधर्म वाढवावया वाढी ।
नामे मोक्षाची उभवावया गुढी । सूर्यवंशा गाढी दशा आली ॥४३॥

राजा दशरथाची कथा

ते सूर्यवंशी अजाचा सुत । अहमात्मा जन्मला दशरथ ।
ऐका त्याचा वृतांत धर्मयुक्त स्वधर्मीं ॥४४॥
त्यासी तिघी राणिया प्रबुद्धा । लोकोत्तर अति प्रसिद्धा ।
धर्मपत्न्यां विशुद्धा । नामानुवावा अवधारा ॥४५॥
ज्येष्ठ कौसल्या ते सुद्विधा । सुमित्रा ते शुद्ध मेधा ।
कैकेयी ते अविद्या । मंथरा कुविद्या तीपासीं ॥४६॥
उदरा येईल आदिमूर्तीं । त्या आधी नव्हती संतती ।
अपुत्रपणें नृपती । पुत्रार्थीं उद्यत ॥४७॥
सुख नेदी राजभुवन । सुख नेदी सिंहासन ।
सुख नेदी भोगस्थान । मान सन्मान सुख नेदी ॥४८॥
सुख नेदी अलं कार वस्त्र । सुख नेदी भोग कलत्र ।
सुख नेदी छत्र चामर । स्तुतिस्तोत्र सुख नेदी ॥४९॥
राजा पोटांतून भोगी विरक्त । यालागी पोटा येईल रघुनाथ ।
जो अत्यंत विषयासक्त । त्यासी भगवंत स्पर्शेना ॥५०॥
जेवी आंधळे न देखे पिता । तेवी विषयी नेणती भगवंता ।
तोच त्यांचा प्रतिपाळिता । देखणी अवस्था त्या नाही ॥५१॥
दशरथा न गमे जनस्थानी । निघाला पारधीलागीं वनी ।
विचरे एकाकी होऊनी । आवडे विजनी रहिवास ॥५२॥
दुसरियाचा सहसा घात । सर्वथा न मानी दशरथ ।
हृदयी कळवळला रघुनाथ । झाला विरक्त सर्वार्थीं ॥५३॥
वनी एकाकी विहार । करी वनफळांचा आहार ।
नावडे राजोपभाग उपचार पुत्रार्थीं थोर साक्षेपीं ॥५४॥

श्रावणाची कथा

होणारासारखी बुद्धी । मांडली निशि अवस्था पारधी ।
अंधारी श्रावणातें वधी । मातापिता खांदी कावडीसी ॥५५॥
लौकिकाची लोकवार्ता । श्रावणें पितरें कावडी ठेवतां ।
हे तंव समूळ अबद्ध कथा । तो मातापिता न विसंबे ॥५६॥
अंधारी अंध माता-पिता । झाडीं ठेवी हे मिथ्या वार्ता ।
खांदीं घेवोनि ताता । जीवनार्थ तो आला ॥५७॥
बुडबुड कमंडलूच्या शब्दीं । ध्वनी उठली जळसंनिधी ।
दशरथ केवळ शब्दवेधी । बाणवेधी विंधिला ॥५८॥
धाव लागता संपूर्ण । काय बोलिला श्रावण ।
कोण्या सभाग्याचा बाण । रामस्मरणेंसी आला ॥५९॥
श्रावणासी बाण लागता । नठवेचि मातापिता ।
नाठवेचि देहममता । राम स्मरतां देह त्यागी ॥६०॥
अंतरी श्रीरामस्मरण । परम भाग्य हे कल्याण ।
बाण नव्हे तो ब्रह्म पूर्ण । स्मरणेंसीं प्राण त्यागिला ॥६१॥
दशरथ बोलिला आपण । कोण्या साधूचें हे वचन ।
माझ्या पापाचे न्र्दळण । केले संपूर्ण रामनामे ॥६२॥
श्रीरामनाम स्वये ऐकता । रायासी न बाधे ब्रह्महत्या ।
रामस्मरणे देह त्यागितां । नित्य मुक्तता श्रावणासी ॥६३॥
रामनामे नित्य निर्धूत । एक मुक्त एक पापातीत ।
ब्रह्महत्येसीं दशरथ । अति अलिप्त रामनानें ॥६४॥
दशरथ जंव येवोनि पाहे । तंव श्रावण बाणे विंधिला आहे ।
त्याच्या पितरें पुत्रमोहे । राजा लवलाहें शापिला ॥६५॥
आम्हांसी दिधले पुत्रदुःख । तूही पावसी पुत्रशोक ।
शापे रायासी परम हरिख । मी पुत्रमुख देखेन ॥६६॥
ब्राह्मणशाप नव्हे वृथा । मी पुत्र पावेन सर्वथा ।
परम आल्हाद दशरथा । आनंद चित्ता वोसंडे ॥६७॥
शाप नव्हे परमामृत । उल्हासे रायाचे चित्त ।
पोटी प्रकटेल रघुनाथ । शाप दशरथा सुखरूप ॥६८॥
पुत्र झाले इत्थ्ंभूत । ऐसा मानिला निश्चितार्थ ।
हृदयी संचरला रघुनाथ । उद्वेगरहित यालागी ॥६९॥
शाप देवोनि दारुण । तिही दोघीं सांडिला प्राण ।
तिघांसी देवोनि दहन । उत्तरविधान करविले राये ॥७०॥

श्रावणाचा पूर्वजन्म वृत्तांत

जळचर पक्षियांचे युग्म । त्यांसी एका मीनासी मित्रत्व परम ।
तया समकाळे मरणधर्म । झाला तो जन्म मागील ॥७१॥
आटता देखोनि सरोवरा । शीतळ निशिये चंचुभारा ।
धरोनिया तया मकरा । अगाध नीरा स्नेहें नेत ॥७३॥
तंव मार्गी वन ते नवखंड । तेथोनि उसळले बेलुकांड ।
ते मत्स्यांतें लागता चंड । पहिला दुखंड धरणिये ॥७३॥
तेणे दुःखे गृध्रीं दोघी । देह ओपिले तयालागीं ।
तेचि ऋणानुबंधयोगी । धरिले तिघीं नरदेह ॥७४॥
मत्स्य तोचि श्रावण जनी । पक्षिये ते जनक जननी ।
एके अवसरी निमाले तिन्ही । ऐसी पुराणीं मूळकथा ॥७५॥

ब्रह्महत्येचे दुष्परिणाम

राजा रामनामे दोषातीत । तरी लोकप्रवृत्तिशास्त्रार्थ ।
अश्वमेध करी दशरथ । वसिष्ठयुक्तविधाने ॥७६॥
फेडावया ब्रह्महत्याडाग । केला अश्वमेधयाग ।
राजा शुद्ध झाला सांग । परी राष्ट्रीं भंग मांडिला ॥७७॥
जे राज्यीं ब्रह्महत्या घडे । ते राज्यीं पर्जन्य न पडे ।
शुक्रें धरियले पाणियाडें । अवर्षण पडे बहुकाळ ॥७८॥
तृणाची काडी न मिळे । उष्णें झाडोरे करपले ।
वृक्ष शेंडियास वाळले । सरितांचे शोषिले जळस्रोत ॥७९॥
प्रजा घरोघरी आक्रंदती । गाई हंबरडा फोडिती ।
द्विजांची नित्यकर्में राहती । हाहाभूत क्षिती प्राणिमात्र ॥८०॥

दैत्यगुरूशी दशरथाचे युद्ध

देखोनि भूतांची दशा ऐसी । राजा कळवळला मानसी ।
शुक्रे धरिले पाणियाडासी । त्यासी युद्धासी निघाला ॥८१॥
दशरथाची शक्ति कैसी । रथ चालविला स्वर्गासी ।
कैकेयी चालली रायासरसी । राहविता तिसी न राहे ॥८२॥
तुम्ही जाल स्वर्गाप्रती । मी पाहीन स्वर्गसंपती ।
वसिष्ठ म्हणे न्यावे निश्चिंती । भविश्यस्थिती जाणोनि ॥८३॥
रायासीं तिचे अति प्रीती । प्रीतीनें बैसविली रथी ।
क्षणार्धें शक्रलोकप्रती । आला भूपति संग्रामा ॥८४॥
परम योद्धा श्रीरामजनक । देखोनि शुक्रें घेतला धाक ।
साह्य दैत्यसेना अनेक । दशरथें एकैक खिळिले बाणी ॥८५॥
वृषपर्वा तेजोराशी । राये विरथ केले त्यासी ।
मुकुट पाडोनि भूमीसीं । मोकळे केशीं पळविला ॥८६॥
वृषपर्वा जो दैत्यनाथ । युद्धी झाला हताहत ।
देखोनि दैत्यसेना समस्त । पळे कुंथत रणघायीं ॥८७॥
शुक्रें युद्ध केले अनेक । दशरथ योद्धा अति अचूक ।
सिंहनाद करोनि देख । शुक्रासंमुख लोटला ॥८८॥
शुक्रें केले अलोलिक । अचूक छेदिला रथाचा आंख ।
कैकेयीनें बाहु घातला देख । तेणे पराङ्‌मुख नव्हेचि राजा ॥८६॥
रामप्रताप दशरथ पोटी । तेणे झांकली शुक्राची दृष्टी ।
धाके पळे उठा‍उठी । दिधली पाठी संग्रामी ॥९०॥

दशरथाचा विजय

ब्राह्मण म्हणोनि राखिला हात । येरवी तत्काळ करिता घात ।
विजयी झाला जी दशरथ । हर्ष अद्‌भुत सुरनरां ॥९१॥
मोकळे झाले पाणियाडें । तत्काळ तेथे पर्जन्य पडे ।
फिटले गाईंचे साकडे । ब्राह्मणी रोकडे मांडिले याग ॥९२॥
चालिले सावास्वधाकार । हरिखले देव पितर ।
दशरथावरी अपार । सुमनसंभार वर्षले ॥९३॥
अवघे करिती जयजयकार । इंद्रासी आल्हाद अपार ।
दैत्य पराहविले थोरथोर । तेणे अमरेंद्र संतोषला ॥९४॥
दिव्यांबरे अलंकार । रायासी दिधले अपार ।
इंद्रें सन्मान केला थोर । अवघे सुरवर संतुष्ट ॥९५॥
पराभविलें दैत्यगुरूसी । अति आनंद बृहस्पतीसीं ।
तेणे सन्मानिले दशरथासी । धरिले पोटासी स्वानंदे ॥९६॥

बृहस्पतींचा वर

देवगुरु वरद वदत । जे जे तुझे मनोरथ ।
सिद्धि पावतील समस्त । जाण निश्चित नृपनाथा ॥९७॥
तुज होईल पुत्रसंतती । ते मी सांगेन श्रेष्ठ युक्ती ।
याग करावा अयोध्येप्रती । विभांडकाहातीं पुत्रेष्टी ॥९८॥
विभांडक नित्य वनवासी । तो भेटी न देईल तुम्हांसी ।
मृगीसुत पुत्र त्यासी । ऋष्यशृंग तया नाम ॥९९॥
तो प्रमदामदें वेधवोन । नगरा आणावा छळून ।
येतांच त्याचे आपण । करावे लग्न निजकन्येसी ॥१००॥
तुज नाही गा संतान । यालागी तुझा निजमित्र शांतन ।
तेणे तुज दिधले कन्यारत्नी । ते शांतनेसीं लग्न करावे ॥१॥
इंद्र म्हणे दशरथासी । आणावया ऋष्यशृंगासी ।
अप्सरा धाडीन तुजपासी । त्या तत्काळ त्यासी आणतील ॥२॥

कैकयीला राजाचे वरदान

युद्धी रथी सूदलें बाहूसी । राजा तुष्टला कैकेयीसी ।
म्हणे देईन जे जे मागसी । ऐसी भाक तिसी दिधली ॥३॥
तंव ते बोलली आपण । तुझेनि मज काय अपूर्ण ।
स्वर्गादि दिव्य भूषण । मी भोगी आपण तुझेनि ॥४॥
कल्पतरुपारिजातमाळा । तुझेनि शोभती माझिया गळा ।
स्वर्गसुखाचा सोहळा । भोगिजे स्वलीळा तुझेनि ॥५॥
येणेंचि शरीरें आपण । तुझेनि भोगी स्वर्गभुवन ।
तुझेनि आम्हा काय न्यून । मी सुखसंपन्न तुझेनि ॥६॥
हासोनी बोलली रायासी । तुम्ही मज दिधले भाकेसी ।
ते मी मागेन काळविशेषी । यथाकाळेंसीं अनुकूल ॥७॥
राजा म्हणे सत्य वचन । हे माझे भाष्यवरदान ।
जेव्हा तू मागसील आपण तत्काळ जाण मी देईन ॥८॥
ऐसी दशरथाची ख्याती । स्वर्गी देव वानिताती ।
दिग्गज वर्णिती दिगंती । कीर्ति त्रिजगती विस्तारली ॥९॥
यश कीर्ति औदार्य । गुणगांभीर्य अति धैर्य ।
दशरथाचे वीर्य शौर्य । स्वर्गी सुरवर वानिती ॥११०॥
देवा दैत्यगुरु अदट । त्याचा हरितला प्रताप श्रेष्ठ ।
वीर दशरथ सुभट । प्रवाद पाठ तिही लोकी ॥११॥
उदरा येईल रघुनाथ । सकळ संपदा आलिया तेथ ।
श्रिया विराजमान होत । श्रीमंत दशरथ यालागी ॥१२॥
स्वर्गी दशरथ भूपाळ । इंद्रे राहविला बहुकाळ ।
अति प्रीतीचा कल्लोळ । दिव्य भोग सकळ भोगविले ॥१३॥
अयोध्येत दशरथाचे अपूर्व स्वागत
येवढेनि बहुमानैश्वर्येंसीं । राजा आला अयोध्येसीं ।
मखरे तोरणे चौपासी । नरनारींसी आल्हाद ॥१४॥
घरोघरी गुढिया उभारिती । पदोपदीं आरत्या करिती ।
बंदिजन कीर्ति गाती । ओंवाळिती धनधान्यें ॥१५॥
ब्राह्मण जपती शांतिपाठ । भाट गर्जती उद्भ॥ट ।
नरनारी पाहती घनदाट । पायवाटे नेती घडिया ॥१६॥
दशरथाचा प्रताप गहन । मी बोलिलो अल्प जाण ।
सकळ आकळिता निरूपण । कथा असाधारण वाढेल ॥१७॥
अफाट न करावा ग्रंथ । ग्रंथीं बोलावा मुख्यार्थ ।
पदी दावावा परमार्थ । हा निजस्वार्थ कवित्वाचा ॥१८॥
एका जनार्दना शरण । दशरथप्रतापलक्षण ।
कथा झाली हे संपूर्ण । श्रीरामागमन अवधारा ॥११९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
दशरथविजयाभिगमनं नाम प्रथोमोऽध्याय ॥१॥
॥ ओव्या ११९ ॥ श्लोक २ ॥ एवं १२१ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग