वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ४७. सीतेची मुक्तता

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088200 · अभंग क्र. ४७

47.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय सत्तेचाळिसावा ॥
भरत – हनुमान भेट

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

भरताची राममय स्थिती :

हनुमान अत्यंत विश्वासी । अनुसरोनि बाणासीं ।
आला नंदिग्रामासीं । जेथे भरतासीं निवास ॥१॥
भरत श्रीरामाचा निजभक्त । भरतें भक्ति उल्लासित ।
आचार्य भक्तीचा भरत । भरतें निर्मुक्त चराचर ॥२॥
भरते भक्ति विस्तारली । भरतें भक्ति प्रकाशिली ।
भरतें पाल्हाळिली निजभक्ती ॥३॥
भरत भक्तीचा निजठेवा । भरत भक्तीचा विसावा ।
भरत भक्तीचा ओलावा । भक्तीच्या गांवा रिगम भरता ॥४॥
भरते सत्य सद्‌भावो । भरते साचार अनुभवो ।
भरतें प्रकट रामरावो । सर्वत्र पहा हो सर्वांसी ॥५॥
भरतें आपंगिली भक्ती । भरतें वाढविली विरक्ती ।
भरतें पाहिली निजशांती । भूते भोगती स्वानंद ॥६॥
मलयाद्रीच्या ठायी । चंदनाची पै झाडी पाही ।
तेणे डोंगर सर्वही । केला लवलाही चंदन ॥७॥
नाही आपण तेथे गेला । नाही उपडोनि आणिला ।
अंगवात वरुनि गेला । तेणे गिरि केला चंदन ॥८॥
एक वनस्पतीचा बडिवार । चंदन केला डोंगर ।
बहकतसे चौफेर । सुवास थोर आवरेना ॥९॥
माझ्याचि हृदयी भगवंत । तो भगवंत मूर्तिमंत ।
तेणे काय नव्हे प्राप्त । सभाग्य संत त्रिजगती ॥१०॥

चित्ते मुकुंदो वदने मुकुंदो दृष्टौ मुकुंदः श्रवणे मुकुंदः ।
एवं सदा सर्वगतो मुकुंदस्ते मानवाः कि न मुकुंदतुल्याः ॥१॥

दृष्टी विषय समस्त । रामरुपें देखत भरत ।
दृश्य दृष्टा दर्शन तेथ । सहज होत रामरुप ॥११॥
श्रवणीं शब्द पडतांचि जाण । शब्दार्थ श्रीराम आपण ।
श्राव्य श्रावण श्रवण । स्वये चिद्धन होवोनि ठाके ॥१२॥
घ्राणें घेता वास । वासा सबाह्य परेश ।
घ्रेय घ्राता घ्राण समस्त । चिदाकाश होवोनि ठाके ॥१३॥
त्वचा घेवो जाय स्पर्शासी । तंव दोहींते राम प्रकाशी ।
त्वचा स्पर्श स्पर्शनासी । सहज समरसी श्रीराम ॥१४॥
रसना रातली आवडी । घेता रामरसाची गोडी ।
त्रिपुटी झाली देशोधडी । रसना ओसंडी रसातें ॥१५॥
कर्मेंद्रियें याचि रीती । सेविता श्रीराम चिच्छक्ती ।
उडाली कर्माची कर्मगती । स्वच्छा वर्तती निष्काम ॥१६॥
ऐसा भरत रामे कोंदला । तो देशचि राम झाला ।
हनुमान अत्यंत सुखावला । देखो लागला अपूर्व ॥१७॥
नगरा बाह्य आराम । वृक्षध्वनी रामराम ।
रामरुप सक्ळ द्रुम । प्लवंगम विस्मित ॥१८॥
दिशा दुमदुमिती रामे । तृणें कोंदलीं रामनामे ।
वायु गर्जे रामनामे । व्योम रामे कोंदलें ॥१९॥
सत्संगें धरा सधर । भूते वागविते निरंतर ।
सांडून कठिनत्व प्रकार । मृदु अरुवार स्वये झाली ॥२०॥
सत्संगती ओलावली । अति शांति धरेसीं आली ।
एकात्मता विस्तारली । वर्तो लागली अविरुद्ध ॥२१॥
सत्संगती झाली जीवना । विसरोनि अधोगमना ।
ऐक्यवृत्ति सकळ जना । अति स्वादन मधुरत्वें ॥२२॥
गाय देखोनि सज्जन । निववी देवोनि जीवन ।
व्याघ्र पापी म्हणोन । उपेक्षण न करीचि ॥२३॥
तेजासी होता सत्संगती । आकर्षून दाहक शक्ती ।
स्वये प्रकाश सर्वभूती । त्रिजगतीमाजी विचरे ॥२४॥
ज्यानें प्रकाशिले निजगृही । त्यासी प्रकासा उणें नाही ।
पारखा चोरु आल्या पाही । प्रकाश त्यासही तैसाचि ॥२५॥
वायु सत्संगा लाढला । चंचलत्व आपुलें विसरला ।
योगीश्वरा भेटो आला । निश्चळ झाला निजरुपीं ॥२६॥
विचरे तरी सर्व देही । परी आसक्त नव्हे कांही ।
सुवास दुर्वास न म्हणे कांही । निःसंग पाही विचरत ॥२७॥
सत्संगा लाधले आकाश । खुपों नेणे पै कोणास ।
विसरोनियां निरवकाश । विरक्त उदास सर्वत्र वसे ॥२८॥
आपुल्या निजशरीरीं । शित उष्ण पर्जन्यधारीं ।
न लिंपे एकही विकारीं । सत्संगथोरी एवढी ॥२९॥
ऐसे नगर अवघेंचि संत । श्रीरामभजनी निरत ।
धन्य भक्तिप्रतापें भरत । सौभाग्यवंत नांद्त ॥३०॥
कोणाही नाही दुर्दशा । कोणी नव्हती हीनमानसा ।
श्रीरामभजने उल्लासा । सावकाश नांदती ॥३१॥
उदीम एकमोहरा करणे । अक्षराचें खरें नाणें ।
जैसे देणे तैसे घेणे । कोणाही उणें असेना ॥३२॥
एकचि वस्तु देता घेता । एका बोलाचीच कथा ।
एकावाचून सर्वाथा । दुजी वार्ता असेना ॥३३॥
दुजेपणें दे दलाल । ठकू पाहे तत्काळ ।
सर्वस्वें नेतां न लगे पळ । घेवोनि सबळ जातसे ॥३४॥
जेथे त्याची उडी पडे । सर्वस्वेंसी जीवित बुडे ।
कांही उपाय न चले पुढे । पडे रोकडें अनर्थी ॥३५॥
अंगळुमंगळु नंदभाषा । सवेग निवटूं पाहे घसा ।
प्राणिया न कळे सहसा । दलाल ऐसा द्वैताचा ॥३६॥
भरतनगरीं लोक चतुर । स्वये उदिमी एकांगवीर ।
होता द्वैताचा संचार । वृत्ति सत्वर छेदिती ॥३७॥
एक एक उदीम ऐसा । आकळी सगळिया आकाशा ।
द्वैताची तेथे कोण दशा । परम परेशा विनटले ॥३८॥
हाटवटिया चौबारें । कथाकीर्तन चौफेरें ।
गाता रामकीर्ती गजरें । अंबर झरे तुषारीं ॥३९॥
आनंद भरताच्या मनी । गेले शून्यत्व बुडोनी ।
चैतन्यघन हो‍उनी । निर्विकार जनी सुस्थिर ॥४०॥
गर्जता रामनामे कल्लोळें । गगन अवघेंचि महुरलें ।
मोक्षफळी लगडोनि आले । ऐक्य झाले हरिरंगी ॥४१॥

सादृश्यामुळे हनुमंताचा भरताला राम समजून कोप :

देखता नगरवृतांत । कपि स्वानंदे डुल्लत ।
पुढे देखिला भरत । अति विस्मित स्वये झाला ॥४२॥
जटाधारी वल्कलांबर । तापसवेषी मनोहर ।
राजीवलाचन श्यामसुंदर । अति मनोहर साजिरा ॥४३॥
ठाणमाण गुणलावण्य । कळाविन्यास प्रसन्नवदन ।
देखता कपि उद्विग्न । रघुनंदन येथे का आला ॥४४॥
मनोमय करोनी नमन । रणपुरुषार्थें क्षोभोन ।
काय बोलत कपिनंदन । कोण विघ्न तुज आले ॥३५॥
म्हणवितोसी आत्माराम । दिससी दुःखाचा आराम ।
रणी सांडिला युद्धधर्म । परम अधर्म तुवा केला ॥४६॥
धीर वीर परम उदार । रणप्रवीण महाशूर ।
पुराणे गर्जती अपार । ते समग्र लटिकेंचि ॥४७॥
लटिकें तुझे कुळ शीळ । लटिकें तुझे व्रत सकळ ।
लटकें तुझे प्रतापबळ । लटिकाच केवळ पुरुषार्थ ॥४८॥
तुज पुरुषत्वचि नाही कांही । स्त्रीत्वही तुजमाजी नाही ।
नपुंसकाहूनि पाही । वेष तोही लटिकाचि ॥४९॥
लटिकी तुझी धृती कीर्ती । लटिकी तुझी शौर्यशक्ती ।
लटिकी तुझी स्थिती गती । लटिका निश्चिती श्रीराम ॥५०॥
वृथाचि वाढविलें नाम । वृथा तुझे नेमधर्म ।
वृथा तुझे धर्माधर्म । रघूत्तम वृथाचि ॥५१॥
जितुका पुरुषार्थ केला । तितुका वायांचि वाढविला ।
क्षात्रधर्मा बोल लाविला । रणी सांडिला सौ‍मित्र ॥५२॥
बिभीषण शरणागत । वानर सांडिले अनाथ ।
सुग्रीव सांडिला येथ । रावणे घात करावया ॥५३॥
आम्ही एक एक गोळांगूळ । गिळू शकूं ब्रह्मांडगोळ ।
कायसे रावणाचे बळ । रणी सकळ जिंकावया ॥५४॥
घायी तळमळी सौ‍मित्र । रणी सांडोनि सत्वर ।
पळालासी तू रघुवीर । बाण समोर धाडिला ॥५५॥
मुहूर्त एक राहतासि तेथे । क्षणे आणितों ओषधीतें ।
उठवोनिया सौ‍मित्रातें । रावणातें मारितो ॥५६॥

भरताला आश्चर्य व हनुमंताला वस्तुस्थिती कथन :

श्रीरामा थोर अन्याय केला । विकळ बंधू रणी सांडिला ।
ऐकता भरत चकित जाला । पाहू लागला आकाशी ॥५७॥
कपि रुपे पर्वताकार । पुच्छी बांधोनि डोंगर ।
गगनी जातसे सत्वर । गर्जत थोर रामनामे ॥५८॥
दिसे अति बळे बळवंत । कळिकाळा दृष्टी नाणित ।
बाण देखोनि नामांकित । सत्वर येथ पै आला ॥५९॥
होय रामदूत साचार । युद्ध मांडले घोरांदर ।
पर्वत घेवोनि सत्वर । करावया संहार जातसे ॥६०॥
प्रसंगें येथे हा पातला । पुसों वृत्तांत वाहिला ।
चौदा वर्षापाठीं भेटला । रामे धाडिला कृपाळुत्वें ॥६१॥
श्रीराम दीनदयाळ । राम भावार्थभुकाळ ।
राम सप्रेंअ स्नेहाळ । प्रणतपाळ श्रीराम ॥६२॥
राम जीवाचे जीवन । राम जीवाचे अंजन ।
जीवी जीवा समाधान । राम चिद्धन वोळला ॥६३॥
राम कथेवीण येथ । बहुत दिवस होतो पीडित ।
रामे कृपा करोनि त्वरित । कपिपर्वत पाठविला ॥६४॥
यासी पुसतां प्रवृत्ति समग्र । रामकथा सविस्तर ।
आम्हा सांगेल वानर । अति चौर दिसताहे ॥६५॥
ऐसे विचारोनि मनी । भरत सादर रामश्रवणीं ।
पुसतां झाला तत्क्षणीं । प्रेमेंकरोनि कपीसी ॥६६॥
कोण कैंचा आलासी कोठोनी । पुच्छी पर्वत काय म्हणोनी ।
रामभेटी तुज कैसेनी । कोपेंकरोनी बोलासी ॥६७॥
राम कैंचा कोठील कोण । तुज कोपाया काय कारण ।
कोठे पाहिला लक्ष्मण । वानरगण ते कैंचे ॥६८॥
कैंचा बिभीषण शरणागत । कोठे रावणेंसीं झुंज होत ।
लक्ष्मण केंवी झाला मुर्च्छित । कोण हेतु युद्धासी ॥६९॥
कोण्या अर्था तू गेलासी । पर्वत कशालागीं नेतोसी ।
वेळोवेळां राम स्मरसी । रामी तुम्हासी सख्य कैंचे ॥७०॥
हा समूळ माझा संदेहो । तुवा छेदावा महाबाहो ।
झणें उदास होसी पहा हो । कथान्वयो सांगता ॥७१॥
तुझे मुखी रामस्मरण । म्हणोनि तुज आलो शरण ।
पुढती घालितो लोटांगण । रामकाथन मज सांग ॥७२॥
भरत प्रेमाचा संपूर्ण । प्रेमे बांधिला कपिनंदन ।
न ओळखोनि भरतचिन्ह । राम म्हणोन उपहासी ॥७३॥
उपहासमिषें कपिनाथ । श्रीरामाते वर्णित ।
सूक्ष्म सर्वगत अनंत । सदोदित सांगत ॥७४॥

हनुमंताचा राग कायम :

किती नेणतेपण घेसी । लटिकाचि प्रेमा दाविसी ।
जगासी जैसा ठकवितोसी । तैसे मजसी चालेना ॥७५॥
उघड सर्वत्र अससी । असोनि विश्वा वेड लाविसी ।
जगींच जगा न दिससी । पाहातां लपसी सूक्ष्मत्वे ॥७६॥
जे जे पहावया निघाले । ते ते उघडे नागवले ।
नागवे हळहळीत केले । हिंडविले दिगंतीं ॥७७॥
एकी अन्नचि वर्जिलें । एक पाला खाऊ लागले ।
एकी तृणरस सेविले । पाहू लागले तुजलागीं ॥७८॥
एका माथा जटाभार । एकी वळविलें शरीर ।
एक सेविती उदक मात्र । एकी नीरही सांडिले ॥७९॥
एक झाले वल्कलांबर । एक चर्माच्छादनपर ।
एका तृणाचे शेजार । एका सविस्तर नरकेश ॥८०॥
एक झाले जी बोडके । दंडी मंडी भगवे सुडके ।
एकी वेढिलें फडकें । एक बोलके अति चतुर ॥८१॥
ऐसे पाहती तुजलागीं । सर्वाथा न दिससी जगी ।
असोनि त्यांच्या सर्वांगी । भ्रमण वेगी करविसी ॥८२॥
ते मजसी न चले मत । मी जाणतसे समस्त ।
लपलासी जेथ तेथ । मी समस्त सांगेन ॥८३॥
पाहत्याभेणे लपसीं । बापुडीं वेडा लाविसी ।
शेखी पाहणे होऊन राहसी । हे कोणासीं लक्षेना ॥८४॥
निर्धार माग काढिता । वेळ न लगे जळीं बुडता ।
मत्स्याऐसा तळपतां । लाज सर्वथा असेना ॥८५॥
ओळखोनि धरिता येथ । रुप आणिकचि धरित ।
हात पाय पोटी घालून तेथ । पाठी करित अति निबर ॥८६॥
पर्वत पडिल्या पाठीवरी । ओळखी न देसी तरी ।
तेथे धरिता निर्धारी । रुपांतरीं लपतोसी ॥८७॥
धावण्या धांवतां मागेंसीं । भेणे भेणे शूकर होसी ।
वेगी दांतीं भोय धरिसी । करुणा भाकिसी अनिवार ॥८८॥
तेथे ओळखितां निर्धारी । जाभाडें पसरोनि भारी ।
गुरगुर करिसी खांबाभीतरी । नर ना केसरी होऊन ठाकसी ॥८९॥
नख केश तिखट भारी । हातें धरोनि अंगावरी ।
उदर चिरोनि नखाग्री । करिसी बोहरी पाहत्याची ॥९०॥
निर्धारितां निष्टंक । होसी बापुडा भिकारी रंक ।
दीन कुब्ज होवोनि देख । बळीपासीं भीक मागसी ॥९१॥
बळी राजा चतुर भारी । तेणे ओळखोनि निर्धारी ।
धरोनि द्वारपाळ करी । अद्यापिवरी तिष्ठत ॥९२॥
तेथून लपतां लवडसवडे । माग न सांडिती मागाडे ।
मग आपुले मायेचें मडें । निजनिवाडे काढिसी ॥९३॥
लटकीच मोकलोनि धाये । रडसी ये माये ये माये ।
लोक म्हणती झाले काये । अपूर्व पाहे केवढें ॥९४॥
आतांचि पाहां पा रोकडें । किती मेळविलीं माकडें ।
सागरी तारोनियां गुंडे । लंका कैवाडे घेतली ॥९५॥
करोनिया महारण । मारविला लक्ष्मण ।
शरणागत बिभीषण । तोही सांडून पळालासी ॥९६॥
तू राम मी मारुती । लपणी न चले मजप्रती ।
ऊठ चाल शिघ्रगती । ऊर्मिलापती उठवावया ॥९७॥
घेवोनि मोहाची बुंथी । घेवोनिया दीनवृत्ती ।
कोण म्हणोनि मजप्रती । पुसों निश्चिती आलासी ॥९८॥
एक उरलासे रावण । त्यासी मारिता न लगे क्षण ।
न येता पुच्छी बांधोनि नेईन । सत्य जाण श्रीरामा ॥९९॥
उठवीन लक्ष्मण । निर्दळीन रावण ।
अभिषेकीन बिभीषण । तरी मी दूत जाण रामाचा ॥१००॥
सोडवीन सीता सुंदरी । सुर सोडवीन निजगजरीं ।
सुरवरांचे जयजयकारीं । अयोध्यानगरी प्रवेशों ॥१॥
इतुके केल्यावीण सर्वथा । तुज ढळो नेदी मी श्रीरघुनाथा ।
वाया चुकवुं नको आता । ऊठ तत्वता जाऊ तेथे ॥२॥
धूरलक्षण ऐसे नव्हे । जेणे स्वामित्वास बाधा पावे ।
ऐसे न धरावे राघवें । वेगी निघावें युद्धासी ॥३॥
तू युद्धधर्म सांडिसी । दूषण लागे सूर्यवंशासी ।
आणि सकळांतें मारविसी । हत्या घेसी निजमाथां ॥४॥
पूर्वी शिष्टाईचे वेळे । जुझों नेदिसी गोळांगुळे ।
एकाचेनि पापबळे । दीने सकळे केंवी मारुं ॥५॥
ऐशा कृपाळु रघुनाथा । न विसंबसी निजभक्ता ।
ते सकळ रणी सांडितां । दयाळुता काय झाली ॥६॥
स्वर्गी चिंतिती सुरवर । रावणा मारील् रामचंद्र ।
बंध सोडवील समग्र । निरंतर वाट पाहती ॥७॥
ऋषि वाल्मीकाचें भाष्य । अनागत अति सुरस ।
राम मारील रावणास । त्या बोलास साच करी ॥८॥
प्रतिपाळावें वेदासी । संरक्षावे पुराणासी ।
नुल्लंघावे ऋषिवचनासी । प्रतिज्ञा ऐशी श्रीरामा ॥९॥
ते प्रतिज्ञा साच करीम् । रावणाते जीवे मारीं ।
शरणागताचा कैवारी । निजभक्ता करी उल्लास ॥११०॥
अशोक वनिकेमाझारीं । अडकली सीता सुंदरी ।
तिसी सोडवूनि झडकरी । अभिषेक करी बिभीषणा ॥११॥
तुझी आण रघुनाथा । पाऊलही न घालवे सर्वाथा ।
तुजवीण आम्ही सकळ वृथा । असारता भूमिभार ॥१२॥
किती पाहसी निर्वाण् । कासयासाठीं धरिसी मौन ।
तुजवीण न करी गमन । येथेंचि प्राण आता सांडीन ॥१३॥
नमन तुझिया पायांसी । लोटांगण चरणासी ।
बहुत झालों कासाविसी । रणी युद्धासी न वचता ॥१४॥
अश्रु आले दोही डोळा । गात्रें कांती चळचळां ।
सर्वागी स्वेदकल्लोळ चालिला । कपि विकळ जाऊ पाहे ॥१५॥

भरत शोकविव्हल व हनुमंताला सत्यकथन :

देखता कपीचें चिन्ह । श्रीरामी प्रेम गहन ।
भरत झाला मूर्च्छापन्न । देहभावासी जाण विसरला ॥१६॥
नाठवे देहगेहवृत्ती । नाठवे वर्णाश्रमजाती ।
नाठवे स्वजनसंतती । जडली वृत्ती श्रीरामी ॥१७॥
नाठवे क्रियाकर्म । नाठवे धर्माधर्म ।
नाठवे रुपनाम । भरत सप्रेम पडियेला ॥१८॥
येरीकडे कपिनंदन । झाला अति विस्मयापन्न ।
श्रीराम न होवोनियां कोण । मज संपूर्ण लक्षेना ॥१९॥
दिसे श्रीरामसादृश्य देही । एक अंश उणा नाही ।
रुपलावण्यगुण कांही । उणें नाही श्रीरामा ॥२०॥
ठाणमाण नेटका । मेघश्याम तनु देखा ।
कांसे पीतांबर सुरेखा । स्वरुप देखा साजिरे ॥२१॥
कपि विचारी मनांत । तंव भरत झाला सावचित्त ।
घालोनि लोटांगण त्वरित । कपिनाथ विनविला ॥२२॥
तू रामाचा निजभक्त । सखा जिवलग हनुमंत ।
रामाज्ञेसीं नित्यांकित । राम सेवित सर्वदा ॥२३॥
मी श्रीरामाचा धाकटा बंधु । भजनहीन महामंदु ।
नायके श्रीरामकथागंधु । अभाग्यसिंधु मी एक ॥२४॥
नायके श्रीरामाचे नाम । नाठवें श्रीरामाचे कर्म ।
न देखे श्रीरामाचे प्रेम । भजनाधम मी एक ॥२५॥
तू सभाग्य कपिनंदना । सबाह्य वेंचिलें श्रीरामभजना ।
रामेंवीण नेणसी आना । प्रेमा गहन श्रीरामी ॥२६॥
सर्वेंद्रियांच्या ठायी । राम कोंदला तुझे देही ।
रामावांचून नेणसी कांही । म्हणोनि पाही विनवीत ॥२७॥
आजी चौदा वर्षांपाठीं । कपि तुझ्या वाक्पुटी ।
ऐकिली श्रीरामाची गोष्टी । तेणे पोटी अवस्था ॥२८॥
ऐकावया श्रीरामकथा । अंतरी अनिवार अवस्था ।
भक्तोत्तमा कपिनाथा । उदासता नसावी ॥२९॥
अहर्निशी हेंचि चिंतित । जो कोणी सांगेल रामचरित ।
आजी तू भेटलासी येथ । तरी साद्यंत मज सांग ॥१३०॥

हनुमंताला चिंता :

उल्लंघोनि जासी येथ । तरी मज होईल प्राणांत ।
तुज कोपेल रघुनाथ । उपेक्षिला भरत काय म्हणोनी ॥३१॥
तिकडे स्वामी क्षोभेल । इकडे माझा प्राण जाईल ।
समाधान । ऐकोनिया कपिनंदन । लोटांगण घालित ॥३३॥
मज सांगता वृत्तांत । विलंब लागों पाहे येथ ।
उदया येतांचि भास्वत । होईल घात सौ‍मित्रा ॥३४॥
ब्रह्मशक्ति महादारुण । वरी पडता रविकिरण ।
सौ‍मित्राचा जाईल प्राण । म्हणोनि त्वरेनें जातसें ॥३५॥
जरी प्रीती सौ‍मित्रासीं । श्रीरामाते पाहू इच्छिसी ।
तरी गोवूं नको मजसी । ओषधींसी नेऊ दे ॥३६॥
तुज माझे लोटांगण । शिघ्र द्यावे आज्ञापन ।
विलंबी होईल महाविघ्न । प्राण लक्ष्मण सोडील ॥३७॥

भरताचे सूर्योदय थोपविण्याचे हनुमंताला आश्वासन :

ऐकता कपीची मात । भरत क्रोधे कृतांत ।
उदया येता भास्वत । करीन घात तयाचा ॥३८॥
वाहतो श्रीरामाची आण । वृत्तांत न सांगता संपूर्ण ।
तत्काळ माझा जाईल प्राण । अर्ध क्षण न लागता ॥३९॥
एका वांचवूं जातोसी । दुजियाते जीवे मारिसी ।
इतकेनि सुख नव्हे श्रीरामासी । कपि जाणसी ते करी ॥१४०॥
माझा प्राण जाईल येथ । शत्रुघ्न तत्काळ करील घात ।
तिघी माता त्वरित । प्राणघात करतील ॥४१॥
ऐकोनी युद्धकथा । आकांत होईल गा समस्ता ।
साद्यंत वृत्तांत न सांगता । करिशील घाता सर्वांच्या ॥४२॥
मग येथील चरित्र । श्रीरामासी सांग सविस्तर ।
मारोनि माता सहोदर । येथे सत्वर मी आलो ॥४३॥
ऐकोनिया भरतवचन । हनुमान अत्यंत विस्मयापन्न ।
यासी न देता समाधान । गमन आपण करु नये ॥४४॥
उल्लंघितां भरतासी । राम क्षोभेल मानसी ।
जगी होईल अपेशी । सज्जनासी उल्लंघितां ॥४५॥
ओषधी मंदतेज होती । वेगे क्षोभेल रघुपती ।
हे चुकवावी अपकीर्तीं । भरत चित्ती सुखावू ॥४६॥
उदयां येता गभस्ती । त्यासी मारीन निश्चिती ।
रवि माझी जाणे शक्ती । बाळपणी ख्याती केली जे ॥४७॥
आता तरी झालो टणक । श्रीरामभजनी अवंचक ।
रवि बापुडे कोण मशक । उदया देख यावया ॥४८॥
ऐसे विचारोनि मानसी । छळणें पुसे भरतासी ।
उदया येता रवीसी । अनर्थासी कारण ॥४९॥
ऐकोनि कपीचें उत्तर । पोळलें भरताचे अंतर ।
बोलो आदरिलें खडतर । कपि उत्तर ऐकत ॥१५०॥
न साधता रामकार्यासी । उदया पावता रवीसी ।
समूळ छेदीन मी त्यासी । बाणाग्रेंसीं क्षणार्धे ॥५१॥
तुज उशीर होईल जरी । तरी सपर्वत बाणाग्री ।
बैसवोनियां रामशरीं । क्षणामाझारीं पाववीन ॥५२॥
एका जनार्दना शरण । हनुमान देईल समाधान ।
अति गोड निरुपण । सावधान परिसावे ॥५३॥
चतुर एका जनार्द । करिता निजगुणानुकथन ।
शब्दासी उपरित होऊन । निजरुपीं लीन तो झाला ॥५४॥
स्वये निजरुपी लीन झाला । तरी न राहे उगला ।
निजकथा गावया वहिला । राहून ठेला साक्षित्वे ॥५५॥
कदाचित चुकवूनि जाये । म्हणऊ आड उभा राहे ।
सरासाचि लागला आहे । परता नव्हे अणुमात्र ॥५६॥
तरी भरंवसा नाही पोटी । म्हणऊन श्रीरामासी मज गांठी ।
घालोनि ठेला अवचटीं । अति संकटीं सांडीना ॥५७॥
लागलासे जेथ जेथ । कांहींही न चले मत ।
शोधूनि अहंबुद्धि चित्त । क्षीणवृत्त मज केले ॥५८॥
सबाह्य माझा करोनि गोळा । एकाएकी पालटोनि ठेला ।
उपाय सर्वाथा तुटला । पडल्या पडल्या गाववी ॥५९॥
झणें मी मौनी राहे । म्हणोनि वाचेंसीं स्वये होये ।
निजकीर्ती स्वये गाये । करु काय मी आता ॥१६०॥
कांही न चले सर्वथा । चौखरिलोंचि तत्वता ।
शरण आलो साधुसंता । विचार आता मज सांगा ॥६१॥
नेणे प्रेमाचे बोल । प्रमेय उथळ की सखोल ।
नेणे पदबंधव्युत्पत्ती । रीघ नाही संस्कृतीं ॥६२॥
लेखणी देवोनी हाती । राम निजकीर्ती लिहवितो ॥६३॥
यालागी जी स्वामिनाथा । मज बोल नाही सर्वथा ।
वरद हस्त माझे माथा । ठेवू आता क्षमा कीजे ॥६४॥
तंव कृपाळु साधुजन । उभय हस्ते आलिंगून ।
स्वये बोलते झाले वचन । अमृताहून सुखकारी ॥६५॥
तू का भाकितोसि करुणा । कासयासी होतोसि दीन ।
वक्ता एक जनार्दन । तेथे तू कोण परिहारा ॥६६॥
तुझेनि मुखे हे कथा । आवडली श्रीरघुनाथा ।
वाचे वचन आणि वक्ता । स्वये तत्वता होवोनि ठेला ॥६७॥
फुंक भरोनि मसकेसीं । आवडे स्वामीचिया मानसी ।
ध्वनि वाजवी जैसी तैसी । संबध मसकेसीं असेना ॥६८॥
ऐसे निजकृपा साधुवचन । निवविला एका जनार्दन ।
उल्लास पावोनि चौगुण । लोटांगणे विनवीत ॥६९॥
पुढील कथानुसंधान । भरतामकथा श्रवण ।
करोनि कपीचें पूजन । बाणी बैसवून बोळवील ॥१७०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे यद्धकांडे एकाकारटीकायां
भरतहनूमद्दर्शनं नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः ॥४७॥
ओंव्या ॥१७०॥ श्लोक ॥१॥ एवं ॥१७१॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग