वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › २. अयोध्याकाण्ड - अध्याय १८ › ५. दशरथाकडे दोन वरांची मागणी

श्री एकनाथ महाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088201 · अभंग क्र. ५

5.

श्री एकनाथ महाराजकृत

॥ श्री भावार्थ रामायण ॥

अयोध्याकाण्ड

॥ अध्याय पाचवा ॥
दशरथभवनात श्रीरामांचे आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

प्रभाते शर्वरी दृष्टवा चंद्रनक्षत्रमंडिताम् ।
ततः सूतो यथाकालं पार्थिवस्य निवेशनम् ॥१॥
प्रविवेश प्रबोधार्थं सुमंतो मतिसत्तमः॥२॥

प्रातःकाळी सुमंत दशरथास उठविण्यास गेला :

अभिषेकावया श्रीरघुनाथ । प्रातःकाळी सुमुहुर्त ।
चंद्र देखोनि गुरुपुष्ययुक्त । वेगी सुमंत ऊठिला ॥१॥
सुमंत प्रधान बुद्धिमंत । प्रबोधावया श्रीदशरथ ।
आला राजभवनांत । कैकेयीयुक्त नृप जेथे ॥२॥

दशरथाची काळजी :

अभिषेकावया रघुनंदन । राया होई सावधान ।
ऐकोनी प्रधानाचे वचन । मूर्च्छापन्न दशरथ ॥३॥
राम जाईल वनांत । कोणते तोंडी बोलू मात ।
हातींचा जाईल रघुनाथ । दुःखे मूर्च्छित दशरथ ॥४॥
वना धाडीतो दशरथ । ऐसी ऐकताचि मात ।
वचन नुल्लंघीच रघुनाथ । जाईल वनांत तत्काळ ॥५॥
रामासी नाही राज्यचाड । नाही विषयांचे कोड ।
माझे वाक्य अति गोड । घेईल ओढ वनवासा ॥६॥
वना धाडितों ऐसी गोष्टी । काना वचना होता भेटी ।
वना निघेल तो उठाउठी । जगजेठी श्रीराम ॥७॥
वनवासाची हे कथा । कानी ऎकता रघुनाथा ।
वना निघेल तत्वता । त्यासी मी आता काय करु ॥८॥
विशेषें माझी भाक । मिथ्या न करील रघुकुळटिळक ।
वना जाईल आवश्यक । दुःखशोक दशरथा ॥९॥
कैकेयी तवं आहे खोती । ह्ट्टें विस्तारील हे गोष्टी ।
पाडील श्रीरामासी तुटी । दुःखे सृष्टी मूर्च्छित ॥१०॥

रामास बोलावण्याविषयी कैकेयीची सुमंतास आज्ञा :

कैकेयी म्हणे सुमंताप्रती । रायासी लागली सुषुप्ती ।
वेगी आणावा रघुपती । आज्ञा मजप्रति रायाची ॥११॥
ऎसी कैसी हे सुषुप्ती । क्षितितळीं भूपती ।
मिथ्या मानोनियां चित्ती । निघे मागुती सुमंत ॥१२॥
तंव अभिषेकसामग्री । सभामंडपाच्या द्वारी ।
स्वये वसिष्ठ विस्तारी । नानापरी उपचार ॥१३॥

अभिषेकाची सर्व तयारी करण्याची वसिष्ठांची सुमंताला अनुज्ञा :

वसिष्ठ म्हणे सुमंतासी । सर्व सामग्री सागें रायापासी ।
वेगी बोलवीं तयासी । अभिषेकासी सुमुहुर्त ॥१४॥
सदाफळी औदुंबर । त्याचे भद्रपीठ मनोहर ।
केले असे अतिं सुंदर । श्रीरामचंद्राभिषेका ॥१५॥
भद्रीं व्याघ्रचर्म अहत । समग्रही नखपुच्छ्युक्त ।
सिंहासनी विराजित । वरासनार्थ श्रीराम ॥१६॥
सुवर्णकुंभ शतानुशत । दीर्घ वसंडे वृषभ श्वेत ।
सुवर्णशुंगी क्षीरयुक्त । वस्त्रे अहत अति शुद्ध ॥१७॥
सिंधुसंगम सुधासंगम । गंगायमुनात्रिवेणीसंगम ।
जळे आणिली पवित्र परम । रघूत्तमभिषेका ॥१८॥
सप्त कुश सप्त मृत्तिका । सप्त ऋषी आणिले देखा ।
चतुःसमुद्रींच्या उदका । अभिषेका आणिले ॥१९॥
श्वेताशार्दुळ रथ । चंद्रोपम छत्र श्वेत ।
श्वेत चामरें रत्‍नजडीत । सुशोभित व्यजनें ॥२०॥
गोरोचनहरिद्रागौरव । क्षीरचूतपल्लव पद्मपल्लव ।
तोरणे बांधिलीं अति अपुर्वं । राजे सर्व तिष्ठती ॥२१॥
दधिमधुघृताक्षतयुक्त । पूर्ण कलश सालंकृत ।
अष्टकन्या दानार्थ । उभ्या तिष्ठती ॥२२॥
मुकुट कुंडले रत्‍नमेखळा । बाहुअंगदे कंठमाळा ।
सिद्धसामग्री या सकळा । ब्राम्हमेळा तिष्टतसे ॥२३॥
बाहेरी येवोनि आपण । अभिषेकाव रघुनंदन ।
हे वसिष्ठाची आज्ञा पूर्ण । केले नमन सुमंतें ॥२४॥
ऎकोनि वसिष्ठाचे वचन । राजा जाला अति उद्विग्न ।
केवी दावूं काळे वदन । मूर्छापन्न अति दुःखी ॥२५॥

कैकेयी सुमंताला वरांचा वृत्तांत सांगते :

देखोनि रायाची अवस्था । कंप सुटला सुमंता ।
कैकेयी सांगे समुळे वार्ता । म्हणे राव का वृथा दुःख मानी ॥२६॥
पूर्वी दिधले मज भाकेसी । भरता राज्य राम वनवासी ।
तेंचि मागतां रायायी । अति दुःखासी का मानी ॥२७॥
निश्चय जाण तू सुमंता । राज्यपत मझिया भरता ।
दंडकारण्य श्रीरघुनाथा । भाक अन्यथा मी न करी ॥२८॥

सुमंताकडून धिक्कार :

ऐकता कैकेयीची वाणी । सुमंत मूर्च्छित पडे धरणी ।
कपाळ पिटी आक्रंदोनी । काय पापिणी वदलीस ॥२९॥
राम परम प्रिय समस्ता । जीवाहूनि आवडता ।
त्या तुज द्वेषिता रघुनाथा । अभाग्यता पै आली ॥३०॥
इचें वचन अति अनर्थं । इसी राये करावा घात ।
वना दवडितां रघुनाथ । अति आकांत होईल ॥३१॥
येरी म्हणे पूर्वीची भाक । न देता रायासी होय नरक ।
सुमंता ओढवले अति दुःख । अधोमुख विलपत ॥३२॥
तयासी संबोखी दशरथ । म्हणे हे बाहेर कळो नेदीं मात ।
वेगी पाचारीं श्रीरघुनाथ । मग वृत्तांत कळेल ॥३३॥

सुमंताचे रामभवनात आगमन, भवनवर्णनः

सुमंत वेगे राजाज्ञेसी । आला श्रीरामभवनासी ।
शोभा शोभे वैकुंठासी । लाजे त्यासी कैलास ॥३४॥
भवनी मयूर नृत्य करिती । तेणे तांडव विसरे उमापती ।
मधुर पारवे घुमघुमती । चमके चित्ती सामवेद ॥३५॥
पारव्यांच्या पीयूषवाणी । गंधर्व ठेले वेडावोनी ।
चारी वेद जाले मौनी । श्रीरामभवनी आल्हाद ॥३६॥
श्रीरामच्या भवनाप्रती । शुक सुभाषित बोलती ।
वेदांत वेडावले किती । रस सेविती उपनिषदे ॥३७॥
सारिका गोड बोलती । तेणे लाजे सरस्वती ।
विस्मयो मानी बृहस्पती । पक्षी पक्षार्थी परमार्थी ॥३८॥
रस स्त्रवती द्राक्षघड । तो रस सर्वाहूनी गोड ।
सचाड तेणे होय निचाड । पुरे कोड मुमुक्षूंचें ॥३९॥
रामागणींच्या कमळिणी । कमळा लाजें त्यात देखोनी ।
माझा रहिवास चरणी । हृदयाभरणी शोभती ॥४०॥
श्रीरामभवनींचें सुमन । सुवासें होय मन उन्मन ।
तेणे सुवासें पांगुळे पवन । राहे मिळोन चिद्रूपीं ॥४१॥
पताका श्रीराममंदिरीं । झळकताती चिदंबरीं ।
जो का लक्षी त्यांची थोरी । चराचरी तो धन्य ॥४२॥
चूतवृक्ष राजभवनांत । अवघे जाले जी अच्युत ।
सफळ जाले अति विनीत । फळे त्यागीत परिपाकें ॥४३॥
पारिजात स्वर्गसुवासे । पायी लोळती कोणी न पुसे ।
श्रीराममंदिराची माणसे । अवघी उदासें तयांसीं ॥४४॥
सप्तावरण सप्त दारवंठे । द्वारपाळ सज्ञान मोठे ।
कळिकाळाते मारिती सोटे । ऎसे लाठे प्रतापी ॥४५॥
देखोनि द्वारपाळाचा वेत । कृतांत चळ्चळां कांपत ।
काळ कामरा पै होत । श्रीरघुनाथ सेवावया ॥४६॥
श्रीराममंदिर देखता देख । सुमंतासी परम हरिख ।
मागील विसरला दुःख । परम सुख पावला ॥४७॥

सप्तद्वाराचे पारमार्थिक रूपक :

रथ सांडोनि पहिले द्वारी । छत्रचामरें दुसरे द्वारी ।
(पादत्राण तिसरे द्वारी । त्यजोनि नरी जाईये ॥
पादत्राणादि सामोग्री । तिसरे द्वारी पै राहे ॥४८॥
चौथे द्वारी सांडित अर्थ । पांवचें द्वारी निःशेष स्वार्थ ।
सहावे द्वारी साधने समस्त । स्वये राहती सर्वही ॥४९॥
सांडोनि मीतूपणाचा सांगात । रिघावे द्वाराआंत ।
तैंचि भेटे श्रीरघुनाथ । मुख्य परमार्थ या नांव ॥५०॥
भावार्थ ते राजभवन । प्रथम दारवंटा ते श्रवण ।
दुसरे द्वारी ते साधन । नित्यानित्य ज्ञान ते तिजें ॥५१॥
चौथा दारवंटा ते मनन । पांचवा तो निदिध्यासन ।
सहावा तो वैराग्य पूर्ण । सातवा तो जाण साक्षात्कार ॥५२॥
याचि मार्गाचे परिपाटी । श्रीरामासी होय भेटी ।
भरलिया जीवां आव्हाटी । वाजती पाठी यमदंड ॥५३॥

श्रीरामस्वरूपवर्णन :

असो अतिशये हा कवितार्थ । पुढे चालवावा ग्रंथ ।
पाचारावया श्रीरघुनाथ । आला सुमंत सवेग ॥५४॥
अंतरशुद्ध तो सुमंत । आला सातवे द्वाराआंत ।
तेणे देखिला श्रीरघुनाथ । स्वरूपार्थ अनुपम्य ॥५५॥
राजीवलोचन घनसांवळा । आजानुबाहु अति विशाळा ।
मुकुटकुंडलें विचित्रमाळा । अनर्घ्य गळा निजपदक ॥५६॥
वीज लागोनि कांसेसी । जावों विसरली अस्तासी ।
तैसा पीतांबर तेजेंसी । कटिप्रदेशीं लखलखित ॥५७॥
सांवळे अंगी सुगंधी उटी । बाहुभूषणें बाहुवटी ।
टिळक पिंवळा ललाटीं । देखता दृष्टी मन निवे ॥५८॥
पीतांबर परिधान । कंठी मेखळा विराजमान ।
देखता हरे भूकतहान । आनंदघन श्रीराम ॥५९॥
वांकी अदुवांचा गजर । चरणी गर्जती तोडर ।
सुवर्णपर्यंकीं श्रीरघुवीर । आल्हाद थोर सुमंता ॥६०॥
सौंदर्यांची निःसीम सीमा । सीता सेवी श्रीरामा ।
लक्ष्मीकांता जैसा रमा । तैसा प्रतिमा शोभत ॥६१॥

दशरथाच्या बोलण्यावरून त्याच्याकडे श्रीरामांचे जाणे, परिवारवर्णन :

ऎसा देखोनि रघुवीर । सुमंतें केला नमस्कार ।
तुझे भेटीसी नृपवर । अति सादर एकांती ॥६२॥
ऎकोनि सुमंताचें वचन । सीता बोले सुहास्यवदन ।
करावया राज्याभिषिंचन । राये प्रधान पाठविला ॥६३॥
ऐकोनि पितयांचें आज्ञावचन । शीघ्र उठिला रघुनंदन ।
सीतेने करोनिया नमन । निराजन त्यासी केले ॥६४॥
श्रीराम द्वारांतरीं येत । सुमंते शीघ्र आणिला रथ ।
त्यावरी बैसविला रघुनाथ । जैसा भास्कर तेजस्वी ॥६५॥
लक्ष्मण जाला छ्त्रधारी । चामरें सुमंताचे करी ।
श्रीराम निघाला बाहेरी । जयजयकार घन गर्जे ॥६६॥
पुढं वीर वेत्रपानी । लागल्या वाजंत्र्यांच्या ध्वनी ।
राजें जे का मुकुटमणी । लागती चरणी श्रीरामाचे ॥६७॥
पाठीशी रथांचे घडघडाट । वरी युवराजे श्रेष्ठ श्रेष्ठ ।
दोही बाही कुंजरथाट । पुढे उभ्दत महावीर ॥६८॥
असिवारांचे पै थवे । वारु नाचती अति लाघवें ।
महामांडलीकांचे यावे । जयजयकारें गर्जती ॥६९॥
अश्वगजरथांचे भार । चालती पायांचे मोगर ।
हैकार थैकार जयजयकार । सेनासंभार चतुरंग ॥७०॥
ध्वजा पताका अपार । डोलती श्रीगिरीसंभार ।
सिंहनाद करिती वीर । भाट कैवार वानिती ॥७१॥
नगरनागरिक लोक । हर्षे बोलती सकळिक ।
राये श्रीराम पाचारिला देख । राज्याभिषेक करावया ॥७२॥
हेचि वार्ता घरोघरी । स्वये बोलती नरनारी ।
राम जातो निजनगरीं । राज्याधिकारी व्हावया ॥७३॥
मार्ग शिंपिले सुगंधें । तोरणे मखरे नानाविधें ।
नगर शृंगारिलें विनोदें । परमानंदे आल्हाद ॥७४॥
मुंदपघसणि होत भारी । एक चधले माडियागोपुरीं ।
एक पाहाती गवाक्षद्वारीं । आवडी भारी श्रीरामी ॥७५॥
आल्हाद नगरामाझारीं । गुढिया उभाविल्या घरोघरी ।
सदीप बलिदानें करी । नरनारी ओवाळिती ॥७६॥
पाहता श्रीरामाचे मुख । परमानंदे होतसे सुख ।
डोळिया लागली टकमक । नावडे आणिक दृष्टीसी ॥७७॥
लवो विसरली नेत्रपातीं । प्राण पांगुळ झाला निजगती ।
सर्व इंद्रियां एकवृत्ती । श्रीराममूर्ती देखोनि ॥७८॥
सादरे पाहता रघुपती । आनंदे कोंदली त्रिजगती ।
नाठवे देहगेहस्फूर्ती । श्रीराममूर्ती देखोनी ॥७९॥
देखता श्रीरामाचे मुख । निःशेष निमाले पें दुःख ।
तिही लोकी न माये सुख । हर्षे हरिख कोंदाते ॥८०॥
देखोनिया श्रीरामवदन । जीवविसरे भूकतहान ।
आनम्दे निवती नयन । रघुनंदन देखोनी ॥८१॥
पाहता श्रीरामस्वरूप । नाम निरसी पुण्यपाप ।
तक्ताळ जाती त्रिविध ताप । सुखस्वरूप श्रीराम ॥८२॥

श्रीरामांना आलेले पाहून राजाची अवस्था :

नाना ध्वनींची वाजंतरीं । श्रीराम येता निजनगरीं ।
ऎकोनि राजा रुदन करी । म्हणे कैसेपरी मुख दावूं ॥८३॥
जगासी श्रीरामाचे सुख । तेणे दशरथा परम दुःख ।
त्याचे पाहू न शके मुख । पाडिली अटक कैकेयीयें ॥८४॥
श्रीराम निनवी सर्वांसी । तेणे अति ताप दशरथासी ।
कैकेयीने पाडिलें अति भ्रांतीसी । निजभाकेसी गोंवोनि ॥८५॥
स्त्रीचरित्र अगम्य सृष्टी । निजवरदाचे नेटपाटीं ।
पित्यापुत्रां पाडीली तुटीं । उठाउठी कैकेयीयें ॥८६॥
दारूण स्त्रियांचें विंदान । श्रीरामासी वनप्रयान ।
तेंचि दशथासी मरण । नाडिली आपण वैधव्यें ॥८७॥
ऎसे जाणोनि दशरथ । अतिशयेंसींविलपत ।
तंव तेथे पातला श्रीरामरघुनाथ । समवेत सौमित्र ॥८८॥

श्रीरामांनी येताच दशरथ-कैकेयीला प्रणिपात :

नमस्कारोनि दशरथा । कैकेयीचरणीं ठेविला माथा ।
म्हने विजयी होई बा रघुनाथा । वाग्देवता सत्य वदे ॥८९॥
कैकेयीआशीर्वादगोष्टी । रामे बांधिली शकुनगांठी ।
विजयी जालो मी सृष्टी । बाहे थापटी स्वानंदे ॥९०॥
उल्लास देखोनि रघुनाथा । दारूण मूर्छा आली दशरथा ।
श्रीरामवियोगाची अवस्था । काही सर्वथा बोलवेना ॥९१॥
छेदावया दशकंठ । मुहुर्त सांगे वसिष्ठ ।
अयोध्याराज्य ते कनिष्ठ । रामराज्य श्रेष्ठ तिही लोकी ॥९२॥
श्रीरामासी संभाषण । रायास न करवे जाण ।
कैकेयीयें केले मुखमुद्रण । वनाभिगमन न सांगवे ॥९३॥
न बोलवे येथे राहे । न बोलवे वनासी जायें ।
देखोनि श्रीरामाचे पाये । दुःखी होये अति दुःखे ॥९४॥
बाष्पे रोधिला निजकंठ । घोर वाजे घरघराट ।
टंवकारिले नेत्रवाट । व्यथा उभ्दट रायासी ॥९५॥

रामाची कैकेयीला प्रार्थना :

राजा देखोनि व्यथाभूत । कैकेयीसी पुसे रघुनाथ ।
कैसेनि ताप जाला अद्‌भुत । किंवा भूतसंचारू ॥९६॥
अथवा माझी अपराधता । घडली असे मज नकळता ।
की कांही भरते धाडिली वार्ता । की शत्रुघ्ने बोलता अन्याय केला ॥९७॥
तरी नव्हे देह्तापाची निष्ठा । नव्हे भूतसंचाराचा ताठा ।
नव्हे त्रिदोषाचा फांटा । नृपवरिष्ठा कोण व्यथा ॥९८॥
दैविक दैहिक किंवा मानसिक । अथवा काही आहे अलौकिक ।
रायासी कवणेपरी दुःख । तुज सम्यक पुसतों ॥९९॥
धाडोनि सुमंत प्रधान । राये बोलाविलें जाण ।
त्या मज कोण आज्ञापन । तेंही आपण पुसावे ॥१००॥

रामांच्या क्रोधाबददल कैकेयीस भय :

कैकेयी म्हणे रघुनाथा । तुझेनि रायसी पूर्ण व्यथा ।
तेही तुज सागेन आता । कोप सर्वथा न करावा ॥१॥
माझे एकतांची वचन । तुज कोप येईल पूर्ण ।
यालागी धाके माझे मन । पूर्वकथन सांगावया ॥२॥
ऐकोनि कैकेयीचें वचन । रामे तिचे धरिले चरण ।
ऐसा महापापी कोण । जो मातृवचनविरोधी ॥३॥
त्रिसत्य सत्य हे जाण । तुझे वचन मज प्रमाण ।
वाहतो वसिष्ठाची आण । विकल्प पूर्ण सांडि माये ॥४॥
ऐकोनि श्रीरामाचे निर्वाण । कैकेयी उल्ल्हासली आपण ।
रामे करावया वनप्रयाण । धर्म वचन उब्दोधी ॥५॥
कैकेयीची युक्ती कैसी । राम करावा वनवासी ।
धर्मवचनाचे पाशीं । श्रीरामासी दृढ बांधावे ॥६॥
दृढ वराचें वरबंधन । जेणे दशरथासी दुःख संपूर्ण ।
ते निवारील रघुनंदन । प्रतिज्ञा प्रमाण वनवासा ॥७॥
राज्य सांडोनि वना जाता । दुःख नाही श्रीरघुनाथा ।
वनाभिगमन उल्हासता । लंकानाथवधार्थी ॥८॥
एकाजनार्दना शरण । जाले श्रीरामागमन ।
पुढा करावया वनाभिगमन । सावधान अवधारा ॥१०९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें अयोध्याकांडे एकाकारटीकायां
श्रीरामागमनं नाम पंचमोऽध्यायः ॥५॥
॥ ओंव्या १०९ ॥ श्लोक २ ॥ एवं १११ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग