संत भानुदास
2252.
संत भानुदास
पंढरीसी यात्रा मिळाली अपार । नाही तो सुंदर पांडुरंग ॥१॥
म्हणती संतजन काय झाला देव । पडलासे संदेह सकळांसी ॥२॥
कांहो उपेक्षिले कृपाळु अनंता । भेट देई संता आपुलिया ॥३॥
अयोध्या नगरासी नेला पंढरीराव । कळला अभिप्राय सकळांसी ॥४॥
असा कोणी भक्त आहे पराक्रमी । रुक्मिणीचा स्वामी आणी येथे ॥५॥
ऐकोनिया मात कोणीच न बोले । म्हणोन उपेक्षिले पांडूरंगा ॥६॥
बोले भानुदास आणितो मी देव । कैसा पंढरीराव गेला पाहो ॥७॥
भानुदासे केले सकळिका नमन । मग आज्ञा घेऊन चालिला तो ॥८॥
अयोध्या नगरासी गेला भानुदास । पंढरीनिवास पाहावया ॥९॥
दुंदुभी वाजती वाजंत्रांची ध्वनि । परी चक्रपाणी द्दष्टी नये ॥१०॥
प्रात:काळी पूजा केली रामराये । आणिका न होय दर्शनची ॥११॥
कवाडे अर्गळा कुलुपे असती द्वारा । करूनिया भीतरी पांडूरंगा ॥१२॥
देखोनि कवतुक बोले भानुदास । भला बसलास देवा येथे ॥१३॥
भाग्यवंत देव झाल सितू आता । दुर्बळ अनाथा कोण पुसे ॥१४॥
तेव्हा झाली रात्र पडिला अंधकार । जोडोनियाम कर विनवितसे ॥१५॥
आता देव तुम्ही चलावे येथूनि । नाही तरी आम्ही भले नाही ॥१६॥
आम्हांसि टाकूनि येथे बैसलासि । पोटच्या पोरासी कोण पोसी ॥१७॥
आम्हा वांचोनिया नाही तुम्हा गति । न करी फजिती जगामध्ये ॥१८॥
करुणा वचन भाकोनिया येथे । केलासे उपाय भानुदासे ॥१९॥
कुलुपे कवाडा बंधन उघडती । देखिली श्रीमूर्ति भानुदासे ॥२०॥
राउळाभीतरी गेला भानुदास । साष्टांगी चरणास नमन केले ॥२१॥
सद्नदीत कंठ झाल्या दोघा भेटी । आनंद तो पोटी समायेना ॥२२॥
देवा तुम्ही कांहो सोडिली पंढरी । लागलीसे गोडी वैभवाची ॥२३॥
म्हणे पांडुरंग बंदी मी पडिलो । भिमा अंतरलो चंद्रभागा ॥२४॥
नवरत्नाची माळा घालूनिया कंठी । म्हणे द्यावी भेटी प्रात:काळी ॥२५॥
देऊळा बाहेरी गेला भानुदास । कुलुपे कवाडास बंधन झाले ॥२६॥
प्रात:काळी दर्शन भानुदास करी । आठवी श्रीहरि ह्रदयामधी ॥२७॥
घालूनि आसन बैसला ध्यानस्थ । ठेवोनिया चित्त पांडूरंगा ॥२८॥
प्रात:काळी पूजा करावया आला । रामराय न देखे माळा रत्नाचि ते ॥२९॥
कोणी नेली माळा झालासे बोभाट । ताडिले सत्वर पुजार्यासी ॥३०॥
चोर पहावयासी सेवक धांवती । माळा दिसे कंठी भानुदासा ॥३१॥
त्यासी देखूनि ताडिती प्रसिद्ध । म्हणती हाचि पक्का मैंद चोर असे ॥३२॥
चोर धरूनिया रायाराशी नेला । म्हणती यासी घाला सुळावरी ॥३३॥
शूळ तासोनिया खांदी जो दिधला । मागे चालविला भानुदास ॥३४॥
भानुदास म्हणे एइकावे वचन । भेटी मी घेईन विठोबाची ॥३५॥
आला भानुदास देवा नमन केले । शिक्षेसी लाविले म्हणे आम्हा ॥३६॥
अगा तुझी देवा लोभ असो द्यावा । आठव धरावा ह्रदयामध्ये ॥३७॥
तुजमज वियोग केंवि होय देवा । न सोडू केशवा चरण तुझे ॥३८॥
सुळ नेवोनिया वेसीबाहेर रोंविला । म्हणती आता याला वर घाला ॥३९॥
तेव्हा भानुदास आठवी विठ्ठला । म्हणती लवकर घाला सुळावरी ॥४०॥
भक्ताचा कळवळा पांडुरंगा आला । कंठ तो फुगला सद्नदीत ॥४१॥
नेत्री अश्रुधारा कांपतो थरथरी । भक्तांचा कैवारी धांविन्नला ॥४२॥
शूळा अकस्मात् पाला तो फुटला । फळे पुष्पे तो झाला घवघवीत ॥४३॥
शूळ वृक्ष झाला सांगती रायाला । विस्मय वाटला सकळिकांसी ॥४४॥
भानुदासा नमन केले रामराये । म्हणे हा अन्याय घडिला आम्हा ॥४६॥
पांडुरंग म्हणे कोणी गांजिले माझ्या भक्ता । सांग भानुदासा काय झाले ॥४७॥
आमचा कैवारी कृपाळु श्रीहरी । असता साहाकारी कोण गांजी ॥४८॥
आता तुम्ही देवा बसावे खांदेसी । नेईन मी तुम्हांसी पंढरीसी ॥४९॥
रामराय म्हणे मज उपिक्षिले । येथोनिया वहिले तुम्ही जाता ॥५०॥
आपुले वचन सत्य केले देवा । लोभ आम्हावरी असो द्यावा ॥५१॥
घेवोनी खांदेसी देव बैसवीला । पंढरीसी आला भानुदास ॥५२॥
झालीसे दाटणी करती नमस्कार । मोठा संतभार जमला तेथे ॥५३॥
नामदेव म्हणे संतांचे संगती । अधमहि होती संतजन ॥५४॥
