संत नरसी मेहता अभंग
2264.
संत नरसी मेहता अभंग
नरसी मेहता होता सावकार । जुनागडी घर महा भक्त ॥१॥
वडील तयाचे करिती व्यापार । गजी सावकार द्रव्य धान्यी ॥२॥
तया कुळी झाला भक्तराज पाही । धन ते सर्वहि धर्म केले ॥३॥
अकस्मात् नगरींत यात्रेकरी आले । द्वारके चालिले देवकाजा ॥४॥
मार्गी बहु कष्ट चोरीव आगळी । म्हणोनि मंडळी भयाभीत ॥५॥
समागमे द्रव्य निभावे कैसेनि । यालागी चिंतनी हुंडियेचे ॥६॥
ग्रामाचे भीतरी हिंडती घरोघरी । हुंडी द्यावी बरी द्रव्य घेई ॥७॥
ऐसे ऐकता ते लबाड छळक । उत्तर हो देख देते झाले ॥८॥
नरसी मेहता परम भक्त थोर । आहे सावकार हुंडीवाला ॥९॥
तयाचे निकटी जावे बहू त्वरे । तुम्हासी तो खरे वाटे लावी ॥१०॥
म्हणोनि प्रेमाचे यात्रेकरी साचे । पुसत मेहताचे घरा आले ॥११॥
देखतांचि मेहता समोरा उठोन । येऊनि नमन करिता झाला ॥१२॥
करूनि पूजन धूपदीप सारे । समर्पण बरे उपचार ॥१३॥
मग करि प्रश्न काय काजा बोला । आम्हा योगे भला असे तोचि ॥१४॥
यात्रेकरी म्हणे जाणे द्वारकेसी । म्हणोनि हुंडीसी करणे असे ॥१५॥
तीन शते साठ रुपये टाकिले । येरु म्हणे भले देई हुंडी ॥१६॥
तयेकाळी हुंडी लिहिली द्वारकेसी । नामा म्हणे साची पेठ खरी ॥१७॥
