श्रीयाळ चरित्र
2172.
श्रीयाळ चरित्र
सूर्यवंशी राजा असे तो श्रीयाळ । पंच वरुषी बाळ चिलया त्यासी ॥१॥
पतिव्रता कांता नाम ते चांगुणा । अतिता भोजन घाली नित्य ॥२॥
कैलासी नारद वर्णी यांची कीर्ति । सत्व पाह्याप्रति आले शिव ॥३॥
जाहालासे अतित रूप ते कुश्चळ । रक्त पू हा गळे सर्वांगासा ॥४॥
आला तो अतित श्रीयाळाचे घरी । नमस्कार करी राजा त्यासी ॥५॥
येऊनि चांगुणा वंदिती चरण । बहुत सन्मान केला त्याचा ॥६॥
उष्णोदके त्यासी घातियले स्नान । केलेंसे पूजन अतिताचे ॥७॥
म्हणे महाराजा करावे भोजन । पतीता पवन करा तुम्ही ॥८॥
येरु म्हणे माझे शरीर हे रोगी । नरमांस वेगी देई मज ॥९॥
चांगुणा ती म्हणे देते माझे मांस । नये उपयोगास आमूचिया ॥१०॥
राज म्हणे माझे मांस मान्य करा । न लगे उदारा तुझे मज ॥११॥
पंच वरुषी बाळ तुझा हा चिल्हाळ । मांस हे सकळ देई त्याचे ॥१२॥
पाक हा करुनी घाली मज आता । खेद काय चिंता करू नये ॥१३॥
करिता हा खेद जाईन उठोनी । सत्वाची हे हानी करूनिया ॥१४॥
तेव्हा ते चांगुणा म्हणे अतिताते । करिते पाकाते सिद्ध आता ॥१५॥
बोलविला तेव्हा तिने तो चिल्हाळ । वचन कोमळ बोले त्यासी ॥१६॥
तुज हा अतित आलासे पाहुन । मागतो भोजन तुजलागी ॥१७॥
होई बा उदार अर्पी हे शरीर । संतोषला वर पार्वतीचा ॥१८॥
ऐकोनी चिलया बोले मातेप्रती । संतोष हा चित्ती माझे असे ॥१९॥
नाशवंत देह नाही राहणार । सार्थक समग्र करी याचे ॥२०॥
सांडी हे ममता होई तू उदार । कैलासी शंकर संतोषेल ॥२१॥
घेऊनि चिलिया गेली पाकशाळे । कापियेले बाळ चांगुणेने ॥२२॥
शीर त्याचे तेव्हा ठेविले झांकोन । शरिराचा तिने पाक केला ॥२३॥
तेव्हा तो अतित बोले चांगुणेसी । वस्तु हे कार्याची ठेवियेली ॥२४॥
मीही आता जातो आपुल्या आश्रमा । कासयासी श्रम करितेसी ॥२५॥
तुज हे ममता झालीसे उत्पन्न । वाहतसे आण चांगुणा ते ॥२६॥
म्हणे महाराजा सांगाल ते मान्य । वंदित चरण चांगुणा ते ॥२७॥
पाकामाजी घाली शीर हे कांडोनी । रसिक गाय गाणी आवडीने ॥२८॥
चांगुणेने शीर घातिले उखळी । ओंव्या ते वेल्हाळी गात असे ॥२९॥
सत्वधीर राजा स्वामी हा श्रीयाळ । धन्य त्याचा बाळ चिलया तू ॥३०॥
अतिताच्या वेशे आला असे शिव । देखोनिया भाव द्दढ तुझा ॥३१॥
आवडीने तुज ठेवितो उदरी । पुण्याची सामोग्री मोठी तुझी ॥३२॥
माझे पोटी तुवा घेतला अवतार । दाविले चरित्र जगामाजी ॥३३॥
येऊनि वंशाचा केला त्वा उद्धार । मित्र केला वर पार्वतीचा ॥३४॥
तुझी माता मज म्हणती हे जन । पूर्वींचे हे पुण्य फळा आले ॥३५॥
तुज हा प्रसन्न जाहला सदाशिव । मागसी वैभव देईल तो ॥३६॥
मज बाळा तुवा सांडियेले येथे । कैलासींचा पंथ धरीयेला ॥३७॥
अतित गेलीया सांडीन मी प्राण । येईन धांवोन तुजमागे ॥३८॥
तुझी माजी भेटी होईल कैलासी । सांग शिवापाशी नमस्कार ॥३९॥
धैर्याचा उखळ वैराग्य मुसळ । घेतले सबळ चांगुणेने ॥४०॥
कांडून्या शीर केला पाक तिने । अतिताकारणे भोजनासी ॥४१॥
म्हणे महाराजा करावे भोजन । वंदित चरण चांगुणा ते ॥४२॥
येरु म्हणे बाई पात्रे वाढी तीन । पंक्ति यजमान बैसा तुम्ही ॥४३॥
ऐकोनी श्रीयाळ सद्नद अंतरी । जाला असे भारी मोठा तेव्हा ॥४४॥
तेव्हा ते चांगुणा म्हणे श्रीयाळासी । बैसावे पंक्तीसी स्वामी आता ॥४५॥
नवमास बाळ ठेविला उदरी । एक दिन भारी काय झाला ॥४६॥
अतिता संतोष होय ऐसे करा । मान्य गिरिजावर होईल तो ॥४७॥
सिद्ध झाली तेव्हा दोघे भोजनासी । अतित तयासी पुसतसे ॥४८॥
काय तुम्हा आता असे हो संतान । केले शिवार्पण म्हणती ते ॥४९॥
निपुत्रिकाचे घरी न घे मी हे अन्न । चालिला उठोन अतित हा ॥५०॥
श्रीयाळ चांगुणा वंदिती चरण । फुटके प्राक्तन आमुचेंचि ॥५१॥
चिलयासारिखा गेला तोही सुत । विन्मुख अतित जातो तोही ॥५२॥
आता कासयासी ठेवावा हा प्राण । करावा अर्पण शंकरासी ॥५३॥
एकोनिया ऐसे अतित तो भ्याला । चांगुणे पुत्राला बाहे आता ॥५४॥
येईंबा चिलया धांव तू त्वरीत । न जेवी अतित तुजवीण ॥५५॥
राखी आता सत्त्व येई तू धांवोनी । तेव्हा शूळपाणि प्रगटले ॥५६॥
पंचमुख अंगी विभूत चर्चित । अर्धांगी शोभत पार्वती ते ॥५७॥
मुगुटी जयाचे शोभतसे गंगा । कोण वर्णी शोभा स्वरूपासी ॥५८॥
धांवतचि आला तेव्हा तो चिल्हाळा । आलिंगी स्नेहाळ सांभ त्यासी ॥५९॥
श्रीयाळ चांगुणा बैसवी विमानी । बाळ राजस्थानी स्थापियेला ॥६०॥
अखंड कैलासी असे त्यांचा वास । धन्य तेचि दास सांभवाचे ॥६१॥
नामदेव त्याचे आठवीत गुण । करीत करीत कीर्तन प्रेमभावे ॥६२॥
