जगी कीर्ति व्हावी ।
3182.
जगी कीर्ति व्हावी । म्हणोनी जालासी गोसावी ॥१॥
बहुत केले पाठांतर । वर्म राहिलेसे दूर ॥धृपद॥
चित्ती नाही अनुताप । लटिके भगवे स्वरूप ॥२॥
तुका म्हणे सिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा ॥३॥
अर्थ :
जगामध्ये आपली किर्ती व्हावी यासाठीच तू गोसावी झालास. तू आतापर्यंत खूप वेदाचे अनेक ग्रंथांचे पाठांतर केलेस परंतू देवाला प्राप्त करुन घेण्याचे खरे वर्म तर तुझ्यापासून दूरच राहिले आहे. अरे तुझ्या चित्तामध्ये तू केलेल्या कर्माचा अजूनही पश्चात्ताप नाही परंतू वरवर तू भगवे वस्त्र नेसून साधूचा खोटा वेश घेतला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, अरे शिंदळीच्या तू वेदाचे व अनेक ग्रंथांचे पाठांतर करुन आपल्या वाणीला व्यर्थ श्रम दिला आहे.
