बोलाविल्यावाचूनि आला
368.
बोलाविल्यावाचूनि आला ।
उभा पाठीसी ठाकला ।
अवचित पुंडलिके देखिला ।
मग पुजिला उपचारी ॥१॥
म्हणे आजी हे नवल झाले ।
मज अनाथा सांभाळिले ।
ब्रीद आपुले साच केले ।
सुयाणे घडले स्वामीचे ॥२॥
देव म्हणती तुझिया भावा ।
देखोनि पावलो विसावा ।
उभा राहोनि करीन सेवा ।
न वजे आता येथुनी ॥३॥
पंच महापातकी येती ।
तेही येथे मुक्त होती ।
ऐसा पुरस्करुनी पुंडलिकाप्रती ।
वरु दिधला त्रिवाचा ॥४॥
निळा म्हणे सात्विक जन ।
करिती तेथे हरि-कीर्तन ।
ते तो ब्रम्ह सनातन ।
पावती वचन हे सत्य ॥५॥
